राहुल गांधींचा अखेर 'पक्षाभिषेक' 

सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

राहुल गांधी यांना खरे आव्हान त्यांच्या पक्षाचेच असेल. वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून कॉंग्रेस पक्षसंघटना आणि विशेषतः पक्षाचे नेते अतिशय सुस्तावलेले आहेत. एवढा मार खाल्ल्यानंतरही पक्षसंघटना किंवा संघटनेचे नेते हे आत्मतुष्टीच्या ब्रह्मानंदात आहेत. "नरेंद्र मोदी चुका करतील आणि मग जनतेला आमच्याशिवाय पर्याय आहेच कोण ?' अशा भावनेत ही मंडळी आहेत.

कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांना खरे आव्हान त्यांच्या पक्षाचेच असेल. एकीकडे त्यांना पक्षाच्या आघाडीवर आमूलाग्र बदल करावे लागतील, तर दुसरीकडे भाजप व नरेंद्र मोदी यांच्या शक्तीचा मुकाबला करण्याची रणनीती आखावी लागेल. त्यासाठी राहुल गांधी यांना मोठी मेहनत करावी लागणार आहे. 

एखादा युवराज सिंहासनावर आरूढ होतो, त्याला "राज्याभिषेक' म्हणतात. राहुल गांधी हे सत्तेत नाहीत आणि एका पक्षाचे ते अध्यक्ष होणार आहेत. त्यामुळे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याला "पक्षाभिषेक' असा पर्यायी शब्द तयार केला आहे. राहुल गांधी गेली तेरा वर्षे सक्रिय राजकारणात असले, तरी पहिली दहा वर्षे ते "सत्ता-स्पर्शित' होते. सत्ता गेल्यानंतर आणि पराभवाच्या गर्तेत पक्ष खोल चाललेला असताना गेल्या तीन वर्षांत त्यांनी पक्षाचे नेतृत्व सांभाळले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या संयम व सहनशीलतेची कसोटी पाहणारा हा काळ आहे. पंजाब आणि पुद्दुचेरी असे किरकोळ विजय सोडले तर पक्षाला 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून सतत पराभव पत्करावा लागलेला आहे.

प्रतिमेच्या पातळीवर घसरण आणि जनाधार खालावलेला या दुहेरी समस्यांनी ग्रस्त पक्षाचे नेतेपद त्यांच्याकडे आले आहे. वेळोवेळी त्यांनी चुका केल्या. ते चेष्टेचे विषयही ठरले. विशेषतः एका संघटित प्रचारयंत्रणेने त्यांना यथेच्छ बदनाम केले. याला राहुल गांधी यांची धरसोड प्रवृत्ती, झोकून देण्याच्या प्रवृत्तीचा अभाव या गोष्टीही कारणीभूत ठरल्या. राहुल गांधी यांना कितीही नावे ठेवायचे ठरवले, तरी त्यांनी अद्याप मैदान सोडलेले नाही ही बाब नमूद करावी लागेल. ते टिकून राहिले. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांना सूर गवसताना दिसू लागला आहे. विशेषतः अलीकडच्या काळात त्यांनी केलेला अमेरिकेचा दौरा, तेथील त्यांची भाषणे यानंतर त्यांच्यात काही सकारात्मक बदल झाल्याचे जाणवू लागले आहे. असे असले तरी अजूनही छातीठोकपणे त्यांच्याबद्दल खात्रीशीररीत्या काहीही सांगता येणार नाही. त्यामुळेच त्यांच्याबाबत अजूनही "थांबा व वाट पाहा' असेच धोरण ठेवावे लागेल. सध्याचे सातत्य त्यांनी टिकवले तर त्यांचे बस्तान लवकर बसेल हे अनुमान मात्र व्यक्त करणे शक्‍य आहे. 

राहुल गांधी यांना खरे आव्हान त्यांच्या पक्षाचेच असेल. वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून कॉंग्रेस पक्षसंघटना आणि विशेषतः पक्षाचे नेते अतिशय सुस्तावलेले आहेत. एवढा मार खाल्ल्यानंतरही पक्षसंघटना किंवा संघटनेचे नेते हे आत्मतुष्टीच्या ब्रह्मानंदात आहेत. "नरेंद्र मोदी चुका करतील आणि मग जनतेला आमच्याशिवाय पर्याय आहेच कोण ?' अशा भावनेत ही मंडळी आहेत. या मंडळींचा आणखी एक प्रकार म्हणजे उठसूट मोदींना नावे ठेवणे, त्यांच्यावर टीका करणे, ते कसे चूक आहेत हे दाखवणे ! विरोधी पक्ष या नात्याने सत्तापक्षाच्या चुका दाखविणे हे कर्तव्य असले तरी विरोधी पक्षांकडे पर्यायी योजना, पर्यायी धोरण आहे आणि ते जनतेच्या हिताचे कसे आहे हेही समजावून सांगणे तेवढेच महत्त्वाचे असते, तरच जनता त्या पर्यायाचा विचार करू लागते आणि तो पटला तर त्याला पाठिंबा देऊन त्याचा अंगिकार करते. थोडक्‍यात एका बाजूला राहुल गांधी यांना पक्षाच्या आघाडीवर आमूलाग्र बदल करावे लागतील, तर दुसऱ्या बाजूला भाजप, मोदी यांच्या रूपाने असलेल्या महाकाय अशा शक्तीचा मुकाबला करण्याची रणनीती आखावी लागणार आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यासाठी राहुल गांधी यांना फार मेहनत करावी लागेल. 

पक्षाला चैतन्यशील व गतिमान करण्यासाठी राहुल गांधी यांना सर्वप्रथम पक्षातील "दुढ्ढाचार्य' नेत्यांना सुटी द्यावी लागेल. त्याची सुरवात काही प्रमाणात झालेली आहे. राहुल गांधी यांनी पक्षसंघटनेतील जबाबदारी देऊ करूनही, ती नम्रपणे नाकारून नव्यांना संधी देण्याचा सल्ला त्यांना देणारे माजी आदिवासी कल्याण मंत्री किशोरचंद्र देव यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांनी सर्वप्रथम "सफाई मोहीम' हाती घेणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे नव्यांना संधी देण्यासाठी सत्तरी पार केलेल्या नेत्यांनी स्वतःहून मागच्या बाकावर बसले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तशी काही चिन्हे दिसू लागली आहेत आणि मध्य प्रदेशात ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मध्य प्रदेशाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत तरुण व तडफदार नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे नेतृत्व द्यावे व त्यांना मुख्यमंत्री म्हणून "प्रोजेक्‍ट' करावे अशी जाहीर सूचना केली आहे. वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शकांच्या भूमिकेत जाऊन, नव्या ताज्या दमाच्या नेत्यांना पाठिंबा दिल्याने राहुल गांधी पक्षसंघटनेत जे बदल करू इच्छित आहेत, ते सुलभपणे होऊन संघटना सुरळीत होऊ शकते. पक्षसंघटनेच्याच पातळीवरील आणखी एका मुद्याचे निराकरण राहुल गांधींना करावे लागेल व तो मुद्दा थेट त्यांच्याशी निगडित आहे. त्यांच्या उपलब्धतेबाबतचा हा विषय आहे. ते सहज भेटू शकत नसल्याची पक्षात सार्वत्रिक व गंभीर तक्रार आहे. त्यांनी या तक्रारीचे निराकरण न केल्यास त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्याचबरोबर राजकारण हा अर्धवेळ करण्याचा प्रकार नसून तो "सदासर्वकाळ' (24 बाय 7) आहे. यातूनच राहुल गांधी त्यांच्या मनासारखी पक्षबांधणी करू शकतील. 

गांधी कुटुंबाचे निकटवर्ती जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांच्यासमोरच्या आव्हानांची चर्चा करताना मोदींचे नेतृत्व, व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व या मुद्यांचा उल्लेख केला. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनीही त्यांच्या अमेरिका दौऱ्यात मोदी यांच्या वक्तृत्व कौशल्याची वाखाणणी करून खिलाडूपणाचा प्रत्यय दिला होता. त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे केवळ पक्षविस्तारासाठीच नव्हे, तर पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी जे देशभर दौरे करीत आहेत ती बाबही उल्लेखनीय आहे आणि राहुल गांधी यांना त्या आघाडीवरही मुकाबला करावा लागेल. भाजपकडे अमित शहा यांच्यासारखे मेहनत करणारे कुशल पक्ष व निवडणूक व्यवस्थापक आहेत आणि मोदी यांच्यासारखे प्रभावी प्रचारक आहेत. पण कॉंग्रेसचे भावी अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांना या दुहेरी भूमिका एकट्यालाच कराव्या लागणार आहेत. ही साधी गोष्ट नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांचे अध्यक्षपद हा फारसा नावीन्याचा विषय राहिलेला नसला, तरी अध्यक्ष या नात्याने त्यांच्यापुढच्या आव्हानांची ही एक झलक आहे. 

सामान्य भाषेत बोलायचे झाल्यास राहुल गांधी यांना पक्षसंघटनेच्या पातळीवर अमित शहा यांच्याशी मुकाबला करावा लागेल, तर राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांच्याशी दोन हात करावे लागतील. त्याचबरोबर कॉंग्रेसची जनमानसातील प्रतिमा पुन्हा उजळविण्याचे आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे. दुसरीकडे युवकांना जास्तीतजास्त आकर्षित करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसला नव्या साच्यात घालणे आणि पक्षाला नव्या युगाची भाषा शिकविण्याचे काम त्यांना करावे लागेल. इतिहासापेक्षा वर्तमानाच्या पातळीवर पक्षाला आणणे आणि कॉंग्रेस समाजाला भाजपपेक्षा वेगळे असे काय देऊ शकणार आहे, यावर भर द्यावा लागेल, कारण लोकांना नावीन्याचे आकर्षण असते !

Web Title: Anant Bagaitekar writes about Rahul Gandhi becomes Congress President