उजव्या बुरुजावरून:संघयंत्रणेतील बदलाची नांदी

anant kolamkar blog article about changes in rss
anant kolamkar blog article about changes in rss

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा तुम्हाला मान्य असो वा नसो, पण ही संघटना आज देशभरात प्रभाव ठेवून आहे व राजकारण, समाजकारण, कामगार, विद्यार्थी, ग्राहक अशा विविध क्षेत्रात या संघटनेचा प्रभाव ठसठशीतपणे दिसून येतो, हे कुणालाही नाकारता येत नाही. आज या संघटनेने नव्वदी पार केली आहे. सहा वर्षांनंतर या संघाला शंभर वर्षे पूर्ण होतील. या 94 वर्षांमध्ये संघाला संपवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, त्याला अरबी समुद्रात बुडवण्याचीही भाषा वापरली गेली, बंदी घालून दडपण्याचाही प्रयत्नही झाला... पण, उलट झाले... ही संघटना संपण्याऐवजी आणखी वाढली... तिचा प्रभाव विस्तारला. आज स्थिती अशी आहे की, या संघाचा प्रचारक राहिलेला स्वयंसेवक, एकदा नव्हे तर तीनदा देशाच्या पंतप्रधानपदीही पोहोचला.

असेच आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संघाच्या प्रारंभापासून त्यांच्या विचारधारेला विरोध होत आला आहे. प्रश्नह संघाच्या विचारधारेच्या विरोधाचा नाही. संघाचा विचार, त्याची ध्येयधोरणे न पटणाऱ्याला त्याचा विरोध करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे व ते असलेच पाहिजे. पण, त्या विरोधाचीही एक पातळी हवी. दुर्दैवाने गेले काही दिवसांत ही पातळी घसरली आहे. संघाच्या विचारधारेला विरोध करण्यापेक्षा संघाविषयी कोणताही आधार नसलेला अपप्रचार करण्याची एक मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळेच की काय, पण संघही त्याच्याविरोधात होणाऱ्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी पुढे येऊ लागला आहे. नुकतीच सहसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाने एक 16 पानांची छोटी पुस्तिका प्रकाशित झाली आहे व ती पीडीएफ फार्मेटमध्ये सोशल मीडियावरूनही प्रसारित केली जात आहे. खरं तर ही पुस्तिका भागवतांनी लिहिलेली नाही. कायद्यानुसार कोणत्याही प्रकाशित साहित्यावर, पुस्तकावर प्रकाशक, प्रकाशन संस्थेचे नाव, आईएसबीएन क्रमांक अथवा नोंदणी क्रमांक प्रसिद्ध करणे आवश्य्क असते. पण, या पुस्तिकेवर अशी कोणतीही माहिती नोंदविलेली नाही. मजेशीर बाब तर ही आहे की, या पुस्तिकेचा प्रचार अधिक व्हावा म्हणून वाचकांनी या पुस्तिकेवरील त्यांच्या सूचना संघाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयाला व पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यास सांगितले आहे. इतकेच नाही, तर उत्कृष्ट सूचना देणाऱ्याला दहा हजार रुपयांचा पुरस्कार देण्याचे आमिषही देण्यात आले आहे.

पुस्तिकेच्या एकंदर रचनेवरून ही पुस्तिका भागवत यांनी लिहिली, असे भासवण्यात आले आहे. संघ भारतीय राज्यघटना बदलवण्याचा प्रयत्न करणार आहे व नवीन राज्यघटना ही धर्माच्या आधारावर असेल, असे या पुस्तिकेत नमूद करण्यात आले आहे. हा अपप्रचाराचा एक हीन पातळीचा प्रयत्न होता. त्यामुळेच संघाने त्याला कठोरपणे उत्तर देण्याचा निर्णय घेतला. देशभरात ठिकठिकाणी या पुस्तिकेच्या विरोधात, व त्याच्या अज्ञात लेखकाविरोधात संघ स्वयंसेवकांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत.

आजवर संघ अशा अपप्रचाराला व आरोपांना उत्तर देण्याचा भानगडीत पडत नव्हता. संघाच्या एकूण कार्यपद्धतीतच तो भाग नव्हता. त्यामुळे संघाची कार्यपद्धती ही पोलादी भिंतीमागे चालणारी गोपनीय संघटना आहे, असा भ्रम संघविरोधकांनी पद्धतशीरपणे पसरवला. पण संघाला त्याचे सोयरसूतक नव्हते. या अपप्रचारानंतरही संघाचे लाखो स्वयंसेवक आपापल्या क्षेत्रात संघविचाराने कार्यरत राहिले, समाजसेवा करीत राहिले. दरम्यानच्या काळात सोशल मीडियाचे प्रस्थ वाढले. त्यातच संघप्रचारक राहिलेले अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. संघविचाराने जगणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदावर आरूढ होण्यामुळे संघविरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक होते. तेथून संघविरोधाची तीव्रताही वाढली. 2014 मध्ये संघप्रचारक असलेले नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाले. इतकेच नाही तर स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत आले. 2019मध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. हा संघाला पाण्यात पाहणाऱ्यांसाठी जबर धक्का होता. त्यातही संघाच्या अनेक वर्षांपासूनच्या काही मागण्या मोदी सरकारने पूर्ण केल्या. त्यामुळे संघविरोधकांचे संतापणे, चवताळणे सहज समजता येऊ शकते. पण, त्यांचा संताप हीन पातळीवर पोहोचला. भागवत यांच्या नावाने निघालेली कथित पुस्तिका हे त्या हीन पातळीच्या संतापप्रदर्शनाचे उदाहरण आहे.

असेच आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खरं तर, संघाला विरोध करणाऱ्या किती जणांना संघ खऱ्या अर्थाने माहीत आहे, हा प्रश्नेच आहे. मध्यंतरी संघ नेमका काय, संघाची नेमकी विचारधारा काय, संघाचे हिंदुत्व काय, या प्रश्नांपसोबत विविध प्रश्नां वर संघाची भूमिका याचे विवेचन खुद्द सरसंघचालक भागवत यांनीच दिल्लीतील एका जाहीर कार्यक्रमात केले होते. अशा प्रकारे संघाची भूमिका मांडण्याचा प्रयोग संघाच्याही इतिहासात पहिल्यांदाच झाला. त्या प्रयोगाचा एक सकारात्मक परिणामही झाला. दुरून पाहणाऱ्याला संघ समजत नाही, तर संघ जवळून अनुभवणाऱ्याला तो अधिक चांगल्या पद्धतीने कळतो, उमगतो, असे संघात सांगितले जाते. पण संघाजवळ जाऊन संघ जाणून घेण्यापेक्षा त्यावर टीका करण्याचा एक प्रघात पडून गेला आहे. संघासारख्या संघटनाही काही राजकीय पक्षांनी व स्वनामधन्य नेत्यांनी काढून पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्यात किती यश आले, हे साऱ्यांनाच माहीत आहे. संघाची कार्यपद्धती काय व कशी चालते, हे समजून न घेता काढलेल्या या संघटना कधी आल्या व कधी गेल्या हेसुद्धा अनेकांना कळले नाही. संघाच्या विरोधातील अपप्रचाराचीही गत तशीच होत राहिली आहे. त्यामुळे सरसंघचालकांच्या नावाने आलेल्या कथित पुस्तिकेचेही भविष्य फार नाही. म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण, काळ सोकावतो याची चिंता अधिक आहे. त्यामुळेच संघ स्वयंसेवक अलीकडे कायदेशीर मार्गाचा अवलंब करून या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर द्यायला लागले आहे. मग संघावर खोटे आरोप केले म्हणून राहुल गांधींविरोधात न्यायालयात जाणे, असो की पुस्तिकेच्या विरोधात देशभरात तक्रारी दाखल करणे असो; संघ स्वयंसेवक दुष्प्रचार सहन करणार नाहीत, हे दिसायला लागले आहे. हा संघयंत्रणेतील एक मोठा बदल आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com