उजव्या बुरुजावरून : जातनिवारणाची चर्चा का झाली नाही? 

अनंत कोळमकर
Monday, 2 March 2020

सामाजिक समरसतेचा संदेश देणाऱ्या या भाषणाची चर्चा माध्यमांमधून फारशी झाली नाही. संघविचारांचा आदर्श घेऊन निर्माण झालेला "समरसता मंच' या क्षेत्रात फार अगोदरपासून कार्यरत आहे.

संघविचारांवर चालणाऱ्या भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासारख्या अनेक संघटनांना आकार देणारे ज्येष्ठ संघप्रचारक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम देशभरात होत आहेत. गेल्या महिन्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचेही देशभरात अनेक कार्यक्रम झाले. त्यांच्या भाषणांना माध्यमांनी उलटसुलट प्रसिद्धीही दिली. त्यांच्या भाषणातील मुद्यांवर टीका करण्याचा माध्यमांना अधिकार आहेच. पण, त्यांनी केलेल्या समाजहिताच्या विधानांना प्रसिद्ध का दिली जात नाही? संघप्रेरित संघटनांच्या सकारात्मक समाजकार्यांना माध्यमांमध्ये जागा का मिळत नाही? हाही एक प्रश्नेच आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

फेब्रुवारीत रांची व अहमदाबाद येथील सरसंघचालकांच्या भाषणांची माध्यमातून प्रचंड चर्चा झाली. रांचीतील भाषणात त्यांनी "राष्ट्रवाद' हा शब्द न वापरण्याचा सल्ला दिला, तर अहमदाबादमध्ये शिक्षण व संपन्नतेसोबत अहंकार येतो, असे विधान केले. दोन्ही भाषणांचे विषय वेगळे होते. कार्यक्रमांचे स्वरूपही वेगळे होते. दोन्ही भाषणांचा बाज वेगळा होता. परंतु केवळ ही दोन विधाने घेऊन माध्यमांनी भागवतांना चर्चेत ठेवले. खरं तर या विधानांवर टीका करणाऱ्या कितीजणांनी भागवतांची ती मूळ भाषणे ऐकली होती? रांचीच्या भाषणात भागवत काही वेगळे बोलले नव्हतेच. संघाने कधीच त्यांचा वेगळा राष्ट्रवाद असा सांगितलाच नाही. त्यांनी अनेकदा राष्ट्रीय, राष्ट्रीयत्व याच शब्दांचा पुरस्कार केला. हिंदू राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद या शब्दावलीची निर्मिती माध्यमांची होती व ती संघाच्या संदर्भात रुढ केली गेली. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या भाषणात त्यांनी त्यांच्या इंग्लंडमधील प्रवासाचा उल्लेख केला. या प्रवासात त्यांनी तेथील एका व्यक्तीने "इझम' या इंग्लिश शब्दाबाबत माहिती दिली. हा शब्द हिटलरच्या विचारसरणीमुळे बदनाम झाला आहे व त्यामुळे "नेशनलिझम' (राष्ट्रवाद) हा काही चांगला शब्द समजला जात नाही. तुम्ही नेशन (राष्ट्र) वापरा, नेशनल (राष्ट्रीय) किंवा नेशनलिटी (राष्ट्रीयत्व) हे शब्द वापरा; पण, "नेशनलिझम' वापरू नका, असे त्या व्यक्तीचे म्हणणे होते. या संवादाचा संदर्भ देऊन भागवतांनी आपला विचार मांडला. आणि संघाने आता राष्ट्रवाद सोडला, वगैरे टीका लगेच सुरू झाली. पण, सर्वाधिक वादग्रस्त राहिले अहमदाबादमधल्या भाषणातील "शिक्षण व संपन्नतेसोबत अहंकार येतो', हे विधान. या वाक्याहचा संदर्भ समाजात वाढत असलेल्या घटस्फोटांच्या प्रकरणांशी होता. त्यावरही टीका सुरू झाली. विशेष म्हणजे, "शिक्षण व संपन्नतेमुळे घटस्फोट वाढलेत', हा भागवतांचा नवीन शोध, असा हेटाळणीचा सूर या टीकेमागे होता. पण पुन्हा मुद्दा तोच; कितीजणांनी हे भाषण मुळात ऐकले? ज्या कार्यक्रमातील हे भाषण आहे, त्या कार्यक्रमाचे नाव होते "अपने घरवाले'. नावाप्रमाणेच तो संघ स्वयंसेवकांचा पारिवारिक कार्यक्रम होता. त्यात सरसंघचालक कुटुंबव्यवस्थेच्या महत्वावर बोलत होते. ते म्हणाले होते की, ""कुटुंबात सोबत राहिल्याने आपण समाजातही सर्व लोकांच्या सोबत राहणे शिकत असतो. लहान लहान गोष्टींवरून कुटुंबांमध्ये भांडणे होत आहेत. त्यामुळे आज घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण शिक्षित आणि संपन्न वर्गात जास्त आहे. कारण शिक्षण व संपन्नतेच्या सोबतच अहंकारही आला व त्याचा परिणाम कुटुंब उद्‌ध्वस्त होण्यात झाला. संस्कार संपले की समाज विस्कळित होतो. कारण समाजसुद्धा एक कुटुंबच असते.'' आता "च्यासोबत अहंकार येणे' व "च्यामुळे अहंकार येणे' या दोन वाक्यां मधला अर्थ जर कळत नसेल, तर काय म्हणायचे? 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

असो... वादच घालायचा असेल, तर कशावरही घालता येईल. टीकाही करता येईल. पण म्हणून भागवतांच्या व संघाच्या चांगल्या, सकारात्मक विचारांनाही थारा द्यायचाच नाही का? गेल्याच महिन्यात गोरखपूरमध्येही भागवतांचा कार्यक्रम झाला. भाषणही झाले. भाषणाचा रोख हिंदू समाजातील जाती निर्मूलन, समरसता असाच होता. पण माध्यमांमध्ये या भाषणाचे वृत्तही फारसे आले नाही व ना कुणा इलेक्ट्रॉ निक मीडियात त्याची चर्चा झाली. ते या भाषणात म्हणाले होते की, ""जातपात, विषमता, अस्पृश्यरता यांसारखे सामाजिक विकार लवकरात लवकर समाप्त झाले पाहिजे. अशा विकृतींमुळे केवळ सामाजिक विणच उसवत नाही, तर समाजाला तोडणारा प्रचारही केला जात आहे. या विकृती दूर करणे, त्यासाठी समाजाचे मन बदलवणे व विपरीत प्रचार संपवून सामाजिक समरसता कायम करण्याची जबाबदारी स्वयंसेवकांची आहे.'' 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सामाजिक समरसतेचा संदेश देणाऱ्या या भाषणाची चर्चा माध्यमांमधून फारशी झाली नाही. संघविचारांचा आदर्श घेऊन निर्माण झालेला "समरसता मंच' या क्षेत्रात फार अगोदरपासून कार्यरत आहे. विशेष म्हणजे ज्या दत्तोपंत ठेगडींची जन्मशताब्दी यंदा साजरी केली जात आहे, तेच सामाजिक समरसता मंचाच्या स्थापनेतही सहभागी होते. याच सदरातील मागील लेखावर एका महानुभावाने माझ्याशी फोनवर बोलताना "संघ एका जातीचा आहे', अशी टीका केली होती. संघ दुरून पाहून समजत नाही... तो जवळून अनुभवावा लागतो, असे संघात सांगितले जाते. संघात स्वयंसेवकाची जात पाहिलीच जात नाही. अनेक वेगवेगळ्या जातीचे स्वयंसेवक संघात आहेत, हे मी पाहिले आहे. पण त्याबाबत संघ प्रचार करीत नाही. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खूप वर्षांपूर्वी माझ्या माहितीतील एका पुरोगामी विचारवंताचे जात निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहांचा हिरीरीने पुरस्कार करणारे भाषण ऐकले होते. विशेष म्हणजे ते स्वतः त्यांच्या मुलासाठी जातीतील मुलगी शोधत होते. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तिच्याशी कौटुंबिक संबंधही त्यांनी तोडले होते. पण ज्या संघावर उच्चवर्णीय जातीची संघटना म्हणून आरोप केला जातो, त्याच संघाच्या एका सरसंघचालकांनी जाहीर व्याख्यानात आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला होता. वनवासी क्षेत्रात संघ विचारांचीच "वनवासी कल्याण आश्रम' ही संघटना काम करीत आहे. अभाविपसारखी विद्यार्थी संघटना ईशान्य भारतातील वनवासी तरुणांना देशाच्या अन्य भागातील स्वयंसेवकाच्या कुटुंबात राहायला नेते... संघविचारांच्या विविध संघटना विविध प्रकारे जातनिर्मुलनाचे कार्य करीत आहेत. "विद्या भारती' या संघटनेच्या उत्तर प्रदेशातील एका शाळेत तर शेकडो मुस्लिम मुले शिकत आहेत. पण संघविचारांच्या या समाजोभिमुख कामांना मीडिया किती प्रसिद्धी देते? प्रश्न. प्रसिद्धीचा नाही. संघ विचार पटत नसेल तर त्याला विरोध केलाच पाहिजे. त्यावर टोकाची टीकाही केली पाहिजे. पण ती टीका संदर्भ सोडून तर नसावी. संघाच्या चांगल्या कामाचेही कौतुक का करू नये? की, कौतुकाबाबतही आपण निवडक झालो आहेत. तसे नसते तर सरसंघचालकांचे गोरखपुरातील भाषण असे दुर्लक्षित राहिले नसते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anant kolamkar writes blog about rss social work