Mauryan Empire : मौर्यकला (भाग 2)

मौर्यकाळातल्या सर्वात प्राचीन यक्षाची तांबड्या वालुकाश्मात घडवली गेलेली मूर्ती मथुरेजवळच्या परखम इथं सापडली.
Mauryan Empire  : मौर्यकला (भाग 2)
esakal
Summary

बिहारच्या दीदारगंज इथं सापडलेली यक्षी ही पिवळ्या वालुकाश्म दगडात मौर्यकालीन झिलईसह घडवली गेली आहे.

अजेय दळवी ajeydalvi2@gmail.com

एकसंध वालुकाश्म दगडात कोरलेल्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या शिल्पांबरोबरच तत्कालीन मानवी शिल्पांकनसुद्धा मौर्यकलेत दिसून येतं. याचंच उदाहरण म्हणजे यक्ष-यक्षिणीच्या मूर्तींची घडण होय. यामध्ये उत्स्फूर्तता, कमालीची भव्यता, जोम आणि जिवंतपणा जाणवतो. मौर्यकाळातल्या सर्वात प्राचीन यक्षाची तांबड्या वालुकाश्मात घडवली गेलेली मूर्ती मथुरेजवळच्या परखम इथं सापडली. या यक्षाचं नाव बहुधा मणिभद्र हे असावं.

गळ्यात रत्नमाला, कमरेच्या वरचा भाग अनावृत असून कमरेभोवती गुंडाळलेल्या वस्त्राची दोन टोकं खाली धोतरावर लोंबत आहेत. शिल्पाचे दोन्ही हात तुटलेले आहेत - तरीही, शिल्पकारानं मूर्ती उत्स्फूर्तपणे सरळ घडवलेली असल्यामुळं - त्या शिल्पात अतिमानवी, शक्तिशाली रूप साकार झालं आहे. मोठ्या आकारात शिल्प घडवण्याचा कदाचित हा भारतीय शिल्पकारांचा सुरुवातीचा प्रयत्न असावा असं वाटतं.

Mauryan Empire  : मौर्यकला (भाग 2)
Katal Shilpa : कोळंबे रक्षणेश्वराच्या सड्यावर सापडला तब्बल 42 कातळशिल्पांचा खजिना, काय आहे खासियत?

पाटणा इथं सापडलेली यक्षमूर्ती इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकातली आहे. शिर आणि दोन्ही हात तुटलेले, स्थूल शरीर अशा प्रकारच्या या भव्य यक्षमूर्तीचा वरच्या भागावर आणि पावलांवर चकचकीत झिलई पाहायला मिळते. अशी झिलई हे सर्व मौर्य शिल्पांचं वैशिष्ट्य होय. चवरी ढाळणाऱ्या या सेवकाच्या गळ्यात जाडजूड माळ, कमरेभोवती धोतरासारखं वस्त्र असून, नेसलेल्या वस्त्रावर कंबरपट्टा आहे. डाव्या खांद्यावर पट्टा आहे. तो सेवक असल्याचं या वैशिष्ट्यांवरून स्पष्ट होतं. वस्त्रावरच्या कोरीव कामातल्या खोदलेल्या समांतर रेषा इराणी शैलीच्या आहेत. मात्र, शरीराची घडण भारदस्त आणि पूर्णपणे भारतीय आहे.

Mauryan Empire  : मौर्यकला (भाग 2)
Katal Shilpa : कोळंबे रक्षणेश्वराच्या सड्यावर सापडला तब्बल 42 कातळशिल्पांचा खजिना, काय आहे खासियत?

बिहारच्या दीदारगंज इथं सापडलेली यक्षी ही पिवळ्या वालुकाश्म दगडात मौर्यकालीन झिलईसह घडवली गेली आहे. कमरेच्या वरच्या शरीराचा भाग हा दागदागिन्यांच्या कौशल्यपूर्ण कोरीव कामासह असून पूर्णपणे अनावृत आहे. चेहरा वर्तृळाकृती घाटाचा असून त्याचे अवयव आणि केशकलाप अत्यंत कुशलतेनं कोरलेले आहेत. डाव्या हातात चामर असून उजवा हात खांद्यापासून तुटलेला आहे. वक्षस्थळांवरून रुळणारा रत्नहार, कमरेचं वस्त्र, कंबरपट्टा, पायातले तोडे आणि हातावरून जमिनीपर्यंत दर्शवलेलं उत्तरीय या सगळ्याचं कोरीव काम खूप तपशिलानं केलेलं आहे.

बांधेसूद, प्रमाणबद्ध कंबर ही निरोगी शरीराचं निदर्शक आहे. या सर्व तपशिलावरून तत्कालीन स्त्रीसौंदर्यविषयक कल्पना आणि मौर्यशिल्पांची अत्यंत प्रगत अवस्था या मूर्तीत पाहायला मिळते. या सर्व कलाकृतींमध्ये शिखर गाठणारा, आपल्या सर्वांच्या आत्मीयतेचा विषय ठरतो तो ‘सारनाथचा सिंहस्तंभशीर्ष’. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी सारनाथ इथल्या मृगोद्यानात पहिलं प्रवचन दिलं होतं. त्याचं स्मरण म्हणून सम्राट अशोकांनी हा स्तंभ चुनार खाणीतल्या एकसंध पिवळ्या वालुकाश्म दगडात उभारला आहे.

या सिंहस्तंभशीर्षाचे तीन प्रमुख भाग आहेत. सर्वात खाली घंटेच्या आकाराचं उलटं कमळ, त्यावर खालच्या कड्यापेक्षा थोडं मोठं असणारं वरचं दुसरं कडं. त्याच्या वर अनियमित अष्टकोनी शीर्षस्तंभफलक आहे. या फलकाच्या चारही दिशांना चार धर्मचक्रे उठावात कोरलेली आहेत. प्रत्येक दोन चक्रांच्या मध्ये एका धावत्या प्राण्याची - उदाहरणार्थ : बैल, घोडा, सिंह आणि हत्ती या चार प्राण्यांची - सुरेख शिल्पे उठावात कोरलेली आहेत. हे प्राणी धावत्या अवस्थेत दाखवल्यामुळे त्यांची गती सूचित होते.

Mauryan Empire  : मौर्यकला (भाग 2)
देवरुख सड्यावर दीपकाडीच्या नव्या वाणाची नोंद; IUCN च्या लाल यादीत संकटग्रस्त प्रजाती म्हणून स्थान

स्तंभशीर्षफलकावर पाठीला पाठ लावलेले चार सिंह चार दिशांना तोंड करून दिमाखात उभे आहेत. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये सिंह हे सूर्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. ‘अधर्माचा काळोख धर्मरूपी सिंह नष्ट करतो,’ या कल्पनेला अनुसरून सिंहाची योजना केलेली आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. सिंहाचा रुबाबदार; परंतु काहीसा ताठर आविर्भाव, मुखवट्याप्रमाणे भासणारे त्यांचे चेहरे, नाकपुड्यांखालचा ओठाचा भाग समांतर व वक्ररेषांनी दाखवण्याची पद्धत, डोळ्यांचा त्रिकोणी आकार आणि या कोरलेल्या शिल्पाची आरशासारखी चकचकीत झिलई हे तत्कालीन सर्व इराणी शिल्पांमध्ये पाहायला मिळतं.

या चार सिंहांच्या डोक्यावर धर्मचक्र होतं. या स्तंभाच्या उभारणीमागं धर्मप्रसाराचा उद्देश स्पष्ट आहे. जनतेसमोर राजाज्ञा ठेवण्याची इराणी प्रथा सम्राट अशोक यांनी स्वीकारली; मात्र, तिचा उपयोग स्वतःचं राजकीय व्यक्तिमाहात्म्य वाढवण्यासाठी न करता केवळ धर्मप्रसारासाठी केला हे त्यांचं श्रेष्ठत्व ठरतं. ‘बराबर डोंगरा’तल्या गुहा सम्राट अशोक यांनी, बौद्ध मत न मानणाऱ्या आजीवक पंथाच्या भिक्षूंना राहण्यासाठी कोरल्या होत्या हे आवर्जून लक्षात घेण्यासारखं आहे. हे सिंहस्तंभशीर्ष उदारमतवादी भारतीय संस्कृतीचं योग्य प्रतीक आहे हे लक्षात घेऊन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे महान शिल्प भारत सरकारनं राजमुद्रा म्हणून स्वीकारलं.

आक्रमक म्हणून आलेल्या ग्रीकांसोबत तत्त्ववेत्तेही होते. कलाकारही होते. त्यांत पर्शियन कलाकारांचाही समावेश होता. शत्रू म्हणून आलेल्यांकडूनही उचित ते वेचण्याचं सामर्थ्य आपल्या समाजात प्राचीन काळापासून असल्याचं दिसून येतं. त्यामुळं तत्कालीन मौर्यकलेला ग्रीक आणि पर्शियन कलागुणांची जोड मिळाली आणि आपली भारतीय कला अधिक समृद्ध होत गेली.

(लेखक हे चित्रकार आणि कलाभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com