वाद अन्‌ वेगळेपणही! (अनीश प्रभुणे)

अनीश प्रभुणे prabhune.aneesh@gmail.com
रविवार, 3 मार्च 2019

ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. एकीकडं या सोहळ्याबाबत उत्सुकता असताना, त्याला यंदा वादाची आणि गोंधळाची किनारही होती. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याची वैशिष्ट्यं, वेगळेपण आणि गोंधळ आदी गोष्टींचा वेध.

ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. एकीकडं या सोहळ्याबाबत उत्सुकता असताना, त्याला यंदा वादाची आणि गोंधळाची किनारही होती. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याची वैशिष्ट्यं, वेगळेपण आणि गोंधळ आदी गोष्टींचा वेध.

"सालाबादप्रमाणं यंदाही मंडळानं सादर केलेला भव्य देखावा' किंवा "वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं विविध गुणदर्शन आणि पारितोषिकांचा कार्यक्रम आयोजित केला आहे...' अशा प्रकारची वाक्‍यं आपल्याला नवीन नाहीत. ऍकॅडमी किंवा ऑस्कर पुरस्कार हीसुद्धा खरंतर याहून काहीच वेगळं नसलेली गोष्ट आहे. हॉलिवूडच्या मुख्य प्रवाहातले निर्माते, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आणि अर्थातच त्यांचे चित्रपट यांचा एक वैयक्तिक कौतुक सोहळा म्हणजे ऑस्कर पुरस्कार. तरीही, काहीबाही कारणानं वर्षभर चर्चेत राहणं आणि एक मोठा दिमाखदार सोहळा आयोजित करणं हे मात्र गेली अनेक वर्षं सातत्यानं जमवणं ही यामागची खरी कला होय.
यंदाही या पुरस्कारांनी स्वतःभोवती अनेक वादविवाद निर्माण करून "चर्चा तर होणारच' हा मंत्र जमला. गेली नव्वद वर्षं "ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर्स, आर्टस अँड सायन्सेस' ही अमेरिकेतली संस्था "ऍकॅडमी ऍवार्डस्‌' म्हणजेच "ऑस्कर' पुरस्कार आयोजित करते. सर्वांत जुना आणि अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार. वर्षभरातल्या अनेक पुरस्कारसोहळ्यांनंतर होणारा सर्वांत महत्त्वाचा पुरस्कार सोहळा. अनेक लोकप्रिय, समीक्षकप्रिय आणि चित्रपट महोत्सवप्रिय चित्रपट या एका सोन्याच्या बाहुलीसाठी स्पर्धेत उतरतात आणि वर्षभर दौडत राहतात. अपेक्षित, अनपेक्षित निकाल आणि कोण काय म्हणालं या गोष्टी म्हणजे ऑस्करची खरी गंमत. मग या सोहळ्याला सूत्रधार असो अथवा नसो.

खरं तर इथूनच या सोहळ्याच्या वादाची पहिली ठिणगी पडली. प्रथेनुसार, एखादा विनोदी अभिनेता किंवा अभिनेत्री या सोहळ्याचं सूत्रसंचालन करतात. यंदा केव्हिन हार्ट या अभिनेत्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. केव्हिन हा अत्यंत मार्मिक विनोद करणारा गुणी अभिनेता; परंतु त्यानं कोणे एके काळी समलिंगी संबंधांच्या संदर्भात केलेला एक विनोद काही लोकांना आढळला आणि त्या वादंगाच्या गर्तेमुळं केव्हिन कधी बाहेर पडला हे त्यालासुद्धा कळलं नसावं. ऑस्करला सूत्रसंचालक नाही, असं तब्बल वीस वर्षांत पहिल्यांदाच घडलं. आमच्या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणास पुरेसे प्रेक्षक मिळत नाहीत, म्हणून "संकलन, छायाचित्रण' किंवा ज्यामुळं सिनेमा घडतो अशा विभागांची आणि काही इतर "बिनमहत्त्वाच्या' विभागांची पारितोषिकं जाहिरातींच्या दरम्यान देण्यात यावी, अशी नवीन टूम ऍकॅडमीनं काढली. झालं! आधीच इतक्‍या वादात अडकलेल्या सोहळ्यावर अनेक प्रस्थापितांनी बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यावर कुठंतरी ऍकॅडमीनं आपली चूक मान्य करून सर्व पुरस्कार थेट प्रक्षेपणात दाखवण्याचं मान्य केलं.

या सर्व गोंधळानंतर अखेरीस सर्वजण वाट पाहत असलेला दिवस आला. चित्रपटसमीक्षक, प्रेक्षक, किंवा काही "जाणकार' प्रेक्षकांना सर्वांत उत्सुकता असते ती म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री आणि पटकथेच्या पुरस्कारांची. परंतु अनेक विभागांमध्ये फारशी स्पर्धा नसल्याचं प्रकर्षानं जाणवत होतं. प्रत्येक विभागात, फारतर दोन पर्याय किंवा एकच खात्रीशीर विजेता असं समीकरण या वर्षी जमून आलं होतं. "रोमा' या चित्रपटानं इतिहास घडवताना, परकी भाषेतला असूनही, त्या विभागात आणि सर्वोत्तम चित्रपटाच्या विभागातही नामांकन मिळवलं. अभिनेत्री, सहायक अभिनेत्री, छायाचित्रण आणि दिग्दर्शन या विभागांतही रोमानं नामांकनं मिळवली आणि एकुणात दहा नामांकनं मिळवून सर्वाधिक नामांकनं मिळवणारा परकी भाषेतला चित्रपट असा एक नवीन इतिहास घडवला. "क्वीन' या ब्रिटिश बॅंडच्या प्रसिद्ध गाण्याचं नाव असलेला आणि त्यांच्या मुख्य गायकाच्या आयुष्यावर बेतलेला "बोहेमिअन ऱ्हॅप्सोडी' या चित्रपटानंदेखील, सट्टेबाजांपासून ते समीक्षाकांपर्यंत सर्वांची अनुमानं खोटी ठरवत नामांकनं मिळवली.

या सर्वांत उत्सुकता होती ती म्हणजे स्पाईक ली या बंडखोर कृष्णवर्णीय दिग्दर्शकाला अखेरीस ऑस्कर मिळणार का? केवळ आपल्या अभिनयानंच नव्हे, तर एखाद्या भूमिकेसाठी शरीराची रचना बदलण्याची जादू करणाऱ्या ख्रिश्‍चन बेलला या वर्षी परत पुरस्कार मिळणार का? आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण? अनेकदा नामांकित असलेली ग्लेन क्‍लोज, की भन्नाट ऑलिव्हिया कोलमन?

सहायक अभिनेत्यांचे पुरस्कार मिळणारे अभिनेते सामान्यपणे दुर्लक्षित होतात; परंतु प्रमुख भूमिकेइतकाच त्यांचाही चित्रपटाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असतो. रेजिना किंगला अपेक्षेप्रमाणं "इफ बिल स्ट्रीट कूड टॉक'साठी सहायक अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं. आपल्या मुलीच्या आयुष्यात आलेल्या दु:खदायक आणि भयंकर प्रसंगात धीरोदात्तपणे उभी राहणारी आई रेजिनानं अत्यंत सहजतेनं साकारली. तिनं तिची व्यथा एखाद्या बोचऱ्या काट्यासारखी जाणवू दिली. सहायक अभिनेता म्हणून "ग्रीन बुक" चित्रपटासाठी माहेरशाला अली या अभिनेत्यास पारितोषिक मिळालं. या दोन वर्षांत दोन ऑस्कर मिळवणारा माहेरशाला अलीसारखा अभिनेता निराळाच. सहायक अभिनयाचे दोन्ही पुरस्कार कृष्णवर्णीय कलाकारांना मिळणं हा म्हणजे केवळ दुर्मिळ योग.

ऑस्करची सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चित्रपटातले कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांच्याबरोबर अनेक तंत्रज्ञांचाही गौरव या सोहळ्यामध्ये होतो. वेशभूषा, ध्वनीमिश्रण, ध्वनीसंकलन, कला दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, स्पेशल इफेक्‍ट्‌स अशा अनेक महत्त्वाच्या अंगांचा ऑस्करमध्ये गौरव होतो. चित्रपटाचा सर्व बाजूंनी विचार केला जावा आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना योग्य सन्मान मिळावा, ही ऍकॅडमीची दृष्टी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.

"ब्लॅक पॅन्थर' या लोकप्रिय आणि सध्याच्या सुपरहिरो चित्रपटांच्या लाटेमध्ये आलेल्या महत्त्वाच्या चित्रपटास वेशभूषा आणि कला दिग्दर्शन अशी दोन पारितोषिकं मिळाली. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचं पारितोषिकही त्याला मिळालं. ध्वनीमिश्रण, ध्वनीसंकलन या गोष्टी सर्वसामान्य प्रेक्षकांस सहजपणे जाणवणाऱ्या नसल्या, तरीही अनेक तंत्रज्ञांचे अनेक महिन्यांचे कष्ट त्यामागे असतात. यंदा "बोहेमिअन ऱ्हॅप्सोडी'नं या दोन्ही विभागांत बाजी मारली.
तंत्रज्ञांचा गौरव करताना, जाणकारांना मात्र त्यामध्येसुद्धा उजवे-डावे अशी चर्चा आवडते. "बोहेमिअन ऱ्हॅप्सोडी'ला मिळालेला सर्वोत्कृष्ट संकालनाचा पुरस्कार हा अनेकांच्या चर्चेचा विषय अजूनही आहे.

ऍनिमेशनपट हा ऑस्करचा लाडका विभाग. अमेरिकेत आणि इतर काही देशांत तयार होणारे सर्वोत्तम ऍनिमेशनपट या विभागात नामांकन मिळवतात. परंतु, सातत्यानं आपल्या तंत्रज्ञान आणि कलात्मक चित्रपटांच्या मिलाफानं उत्तम ऍनिमेशनपट तयार करून डिस्ने किंवा पिक्‍सार यांनीच या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. यंदा मात्र ती मक्तेदारी मोडून काढत "इंटू द स्पायडरवर्स" या सोनी कंपनीच्या चित्रपटास ऑस्कर मिळालं. सर्वोत्कृष्ट गीत हा पुरस्कार अनेकदा हॉलिवूडमध्ये गमतिशीर वाटतो. हॉलिवूडमध्ये गाण्यांचा वापर हा मुख्यतः एखाद्या सीनच्या पार्श्वभूमीवर वाजणं या पलीकडं फार कमी वेळा होतो. मात्र, तरीही अशी अनेक गाणी अमेरिकन चित्रपटांमध्ये वापरली जातात आणि त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण होतं. लेडी गागा या प्रतिभावंत गायिकेला घेऊन ब्रॅडली कूपर या अभिनेत्यानं "अ स्टार इज बॉर्न' हा चित्रपट करण्यामागचं महत्त्वाचं कारण हे कदाचित त्यातली भूमिका ही एका गायिकेची आहे हेच असू शकते. तिच्या गाण्याबरोबरच तिच्या अभिनयाचंही अत्यंत कौतुक झालं. लेडी गागाला आपल्या पदार्पणाच्या चित्रपटातच सर्वोत्कृष्ट गीत आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अशी दोन्ही नामांकनं मिळाली. तिनं "शॅलो' या नामांकित गाण्याचं सोहळ्यादरम्यान केलेलं सादरीकरण पाहता पारितोषिक कोणाला जाणार, हे अगदीच उघड झालं होतं. अपेक्षेप्रमाणं लेडी गागा आणि तिच्या संचानं या गाण्यासाठी ऑस्कर पटकावलं.

ऑस्करचा पटकथा विभाग हा नेहमीच कुतूहलाचा विषय आहे. नवीन पटकथा/ मूळ पटकथा आणि आधारित पटकथा अशा दोन विभागांत हा पुरस्कार दिला जातो. अनपेक्षितरीत्या इतर उत्तम पटकथांना मागं टाकत, "ग्रीन बुक'चं नाव विजेता म्हणून जाहीर झालं. स्पाईक ली यास अखेर ती सोन्याची बाहुली मिळाली. अनेक वर्षं आणि अथक प्रयत्न केल्यानंतरही आपल्या आतल्या बंडखोरास स्वस्थ बसू न दिलेल्या या लेखक-दिग्दर्शकास यथायोग्य सन्मान मिळाला. वर्णद्वेष हा मूळ गाभा ठेवून एका अफलातून सत्यघटनेवर आधारित "ब्लॅकक्‍लॅन्समन' या 1970 च्या दशकात घडणाऱ्या चित्रपटासाठी स्पाईक ली यास हे पारितोषिक मिळालं.

अत्यंत चुरशीची स्पर्धा असलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री या विभागांच्या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता होती. यंदा खरी चुरस असलेले हे विभाग. ग्लेन क्‍लोज का ऑलिव्हिया कोलमन हाच प्रश्न सर्वांच्या मनात होता. नोबेल पारितोषिक विजेत्या पतीच्या पाठीशी सतत खंबीरपणे उभी राहणारी स्त्री ग्लेन कोल्जनं समर्थपणे उभी केली आहे. आपल्या पतीभोवतीच केंद्रित झालेलं आयुष्य, त्यातली घुसमट आणि एका क्षणात त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेवून स्वतःला आजमावणारी स्त्री अशा विविध छटा आपल्याला या व्यक्तिरेखेमध्ये दिसतात. इंग्लंडमध्ये सन 1706मध्ये राज्य करणारी राणी ऍन. राज्य सोडून इतर सर्व प्रकारच्या तऱ्हेवाईक उद्योगांमध्ये मनापासून रस घेणारी अशी ही राणी. आपल्या मनोरंजनासाठी लोकांना चिखलात लोळून भांडायला लावण्यापासून बदकं, ससे किंवा इतर कुठल्याही प्राण्याची शर्यत लावणं आणि टाळ्या वाजवत बघत बसणं हाच तिचा आवडता उद्योग. अशा विक्षिप्त राणीची भूमिका तितक्‍याच विक्षिप्तपणे "द फेव्हरेटस्‌ या चित्रपटात साकारल्याबद्दल ऑलिव्हिया कोलमन या ब्रिटिश अभिनेत्रीस ऑस्कर मिळालं.

आता प्रश्न होता, रामी मालेक का ख्रिश्‍चन बेल? दोन्ही अभिनेत्यांनी चरित्रपटातल्या भूमिकेसाठी नामांकन मिळवलं होतं. एक गायक, तर दुसरा नतद्रष्ट म्हणावा असा राजकीय नेता. फ्रेडी मर्क्‍युरी ऊर्फ फारोख बलसारा याच्या भूमिकेसाठी रामी मालेकला तर डिक चेनी या अमेरिकेच्या माजी उपाध्यक्षाच्या भूमिकेसाठी बेलला नामांकन होतं. काहींच्या मतानुसार, रामी मालेक हा फ्रेडीसारखा दिसतोच! ख्रिश्‍चन मात्र आपल्या अभिनयानं कोणाहीसारखा दिसू शकतो! परंतु अखेर, "बोहेमिअन ऱ्हॅप्सोडी'मधल्या फ्रेडीच्या भूमिकेसाठी रामीला पुरस्कार मिळाला. ऑस्करच्या मंचाचा वापर हा राजकीय विधान करण्यासाठीच असतो हा पायंडा न मोडता रामी मालेकनं सध्याच्या अमेरिकन सरकारच्या धोरणावर "आडून' टीका केलीच.

या सर्व सोहळ्यामध्ये अल्फोन्सो क्‍युरोन या मेक्‍सिकन दिग्दर्शकाबद्दल वेगळं बोलावंच लागेल. दहा नामांकनं पटकावणारा हा चित्रपट अनेक महोत्सव गाजवून आलाच होता; परंतु आल्फोन्सो क्‍युरोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं दिग्दर्शनासमवेत प्रथमच छायाचित्रणाची धुरा पेलली होती. वैयक्तिक अनुभव, आणि काही ऐकीव गोष्टींचा आधार घेऊन, त्यानं "रोमा' ही नितांतसुंदर कलाकृती निर्माण केली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, परकी भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट याचबरोबर अनेक धुरिणांना मागं टाकत आपल्या पहिल्याच प्रयत्नात, त्यानं छायाचित्रणाचाही पुरस्कार पटकावला. सरतेशेवटी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिक कोणाला जाणार? "रोमा' दोन विभागांत बाजी मारणार? का "द फेव्हरेट'ला ऑस्कर जाणार? या सर्व अपेक्षा, चर्चा किंवा पैजासुद्धा धुळीस मिळवत "ग्रीन बुक'नं बाजी मारली.... आणि एकच चर्चा सुरू झाली. एखादा अपात्र विजेता ठरवणं हे ऍकॅडमीला अजिबात नवीन नाही; परंतु इतका अपात्र चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर घेऊन जातो, हे जरासं नवीनच. सोहळा संपल्यावरच अनेक समीक्षक, प्रेक्षक, किंबहुना विजेत्यांमध्ये सुद्धा हीच चर्चा होती, की "असं कसं झालं आमच्या नशिबी आलं....'
खरंतर या वर्षीचा सोहळा हे एखादे प्रहसन म्हणून अधिक परिणामकारकरित्या सादर होईल हीच गत. तरीही... अशा रीतीने हा "साठा घोटाळ्यांचा सोहळा' "घोटाळ्यांनी सुफळ संपूर्ण' झाला. पुढील वर्षी बरा पाऊस पडो असं म्हणणाऱ्या चातकाप्रमाणंच सर्वजण पुढील वर्षाच्या तयारीस लागले....

"पिरीयड'चा गौरव
माहितीपटांचा गौरव करणे हा ऍकॅडमीचा शिरस्ता आहेच; परंतु त्यामध्येही लघुमाहितीपट हा स्वतंत्र विभाग ठेवून ऍकॅडमीनं नवख्या किंवा छोट्या माहितीपट निर्मात्या-दिग्दर्शकांना एक कौतुकाची थाप दिली आहे. यंदा भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे "पिरीयड : एंड ऑफ सेन्टेन्स' या लघुमाहितीपटास ऑस्कर मिळालं. मासिक पाळीसारखा नाजूक विषय मांडत "पॅडमॅन' अरुणाचलम मुरुगनाथम यांचं अफलातून काम आणि त्यामुळं एका छोट्या गावात झालेला बदल याबद्दल अवघ्या 26 मिनिटांत एक माहितीपट करणं म्हणजे अजिबात सोपं काम नाही. भारतामध्ये मासिक पाळीबद्दल असलेले गैरसमज, अंधश्रद्धा आणि इतर अनेक गोष्टींमधून वाट काढत स्त्रियांच्या हातात फक्त पॅड नाही, तर स्वयंपूर्णतेचं एक साधन येतं, हा प्रवास खरंच विलक्षण. विशेष म्हणजे, अमेरिकेतल्या काही शाळकरी विद्यार्थ्यांनी अक्षरश: गोळ्या-बिस्किटं विकून पैसे उभे करून या माहितीपटासाठी मदत केली आहे.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा केंद्रबिंदू भारतातलं एक गाव असलं, तरीही त्याचं दिग्दर्शन, निर्मिती आणि सर्व गोष्टी या परदेशी लोकांनीच केल्या आहेत. हा माहितीपट नेटफ्लिक्‍सवर उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anish prabhune write oscars 2019 article in saptarang