भीमाशंकरचं शिवमंदिर

श्रावण महिना सुरू झाला की भक्तांची पावलं शिवमंदिराच्या दिशेनं वळतात. भीमाशंकर इथलं शिवमंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ ते आहे.
Bhimashankar Shivmandir
Bhimashankar Shivmandirsakal

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

श्रावण महिना सुरू झाला की भक्तांची पावलं शिवमंदिराच्या दिशेनं वळतात. भीमाशंकर इथलं शिवमंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ ते आहे. सर्व बाजूंनी दाट जंगलानं वेढलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील एका खडकावर हे मंदिर असून दीडशे फूट पायऱ्या उतरून मंदिरात जावं लागतं. भीमा नदीच्या उगमापासून पाच दगडी कुंडांमधून नदी प्रवाहित होते. मंदिराजवळच असलेल्या नदीप्रवाहाचं महत्त्वही मंदिराइतकंच आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहाव्या क्रमांकाचं हे महत्त्वाचं श्रद्धास्थान समुद्रसपाटीपासून तीन हजार ४४८ फूट उंचीवर आहे, तसंच ते १३४ चौरस किलोमीटरच्या अभयारण्यानं वेढलेलं असून, महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ याचं हे निवासस्थान आहे. महाशिवरात्रीला भरणाऱ्या जत्रेला अंदाजे अडीच लाख भाविक इथं येत असतात. श्रावणात भाविकांचा ओघ ५० हजार ते एक लाख या प्रमाणात असतो.

मंदिराजवळ आज कुठल्याही अवशेषांच्या अस्तित्वाचा मागमूस नसलेल्या; परंतू १८८५ च्या ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’मध्ये (खंड १८, भाग तीन) उल्लेख असलेल्या जुन्या विस्तीर्ण मंदिरालगत नाना फडणवीस यांनी बांधायला सुरुवात केलेलं व त्यांच्या पश्चात पत्नीनं पूर्ण केलेलं असं हे ऐतिहासिक महत्त्वाचं मंदिर आहे.

डोंगरांनी व जंगलांनी वेढलेलं मंदिर असल्यामुळे परिसराची जागा अतिशय अरुंद आहे. शिवमंदिराची रचना काळ्या पाषाणात क्रमाक्रमानं चढणाऱ्या शेकरी शैलीतील कळसांच्या पद्धतीची असून खालील पट्ट्यावर कोरीवकाम आहे. भीमा नदीचं उगमस्थान मंदिराच्या पूर्वेकडे उंच भागात असून तिथं पाषाणातील छोटं कुंड आहे, तसंच कुंडाजवळ छोट्या मंदिराचे अवशेष आहेत. उगमस्थानापासून नदी प्रथम पायरीमार्गावरील ‘ज्ञानकुंडा’जवळ येते व या कुंडापासून मंदिरपरिसरातील ‘मोक्षकुंड’ व ‘सर्वतीर्थकुंड’ या दोन कुंडांजवळून ती वाहते.

मंदिरपरिसरातील कुंड हे भाविकांच्या दृष्टीनं अतिशय पवित्र असून या सगळ्या कुंडांना ‘तीर्थ’ असं म्हणतात. या तीर्थांपासून नदी ‘अमृतसंजीवनी’ कुंडापासून पुढं वाहत ‘गुप्तभीमामंदिर’ इथं जाते. निसर्गाशी समरूप होणारी वास्तुकला इथं उदयास आली आहे. आजूबाजूच्या पाषाणाशी साधर्म्य दाखवत फारशी कलाकुसर नसलेली रांगडी शैली मंदिराच्या व कुंडांच्या उभारणीत दिसून येते.

नैसर्गिक अभयारण्यात वसलेल्या मंदिराचं वैशिष्ट्य हे निसर्गानं सीमित केलेल्या मर्यादित जागेमुळे टिकून राहिलं आहे. चारशे मैल प्रवाहित होत जाणाऱ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भीमा नदीला पुढं इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, सीना, घोड या नद्या येऊन मिळतात व पुढं कृष्णा नदीचं खोरं समृद्ध करतात.

सन २०१७ मध्ये भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा तयार झाला. त्यामधील पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीतील मंदिरपरिसरातील कामं वनक्षेत्राच्या अंतर्गत नसल्यामुळे वेगानं सुरू झाली. काळ्या पाषाणातील मुख्य मंदिराच्या कळसाची, भिंतींची शास्त्रीयरीत्या स्वच्छता करण्यात आली.

जीर्ण झालेली दीपमाळ उतरवून पुन्हा त्याच पद्धतीनं नवीन दीपमाळ आता बांधण्यात आली आहे. मंदिराला लागूनच विसाव्यासाठी, परिसराला विसंगत असलेली व क्रीडासंकुलाला शोभेल अशी, स्टेडियमची पत्र्याच्या छताची इमारत बांधण्यात आली होती. वास्तविक, इथल्या पावसाचा विचार करता अशा स्वरूपाच्या इमारतीचा काहीच उपयोग नव्हता. ती इमारत उतरवून त्या जागी भक्तांना विसाव्यासाठी मंदिराच्या शैलीशी व परिसराशी सुसंगत अशा काळ्या दगडात कमानी व कोरीव कामासह ओवऱ्या उभारण्यात आल्या आहेत. हे सर्व बांधकाम पारंपरिक पद्धतीनं चुन्यात करण्यात आलं आहे.

मंदिरपरिसरातील दगडी फरसबंदीचं कामही व्यवस्थित उतारानं कमीत कमी पायऱ्यांच्या स्वरूपात करण्यात आलं आहे. चुन्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं गूळ, बेलफळ, मेथ्या, सुर्खी यांचं विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून, विशिष्ट फेऱ्यांमध्ये मळणीयंत्रात फिरवून, ते विशिष्ट वेळात बांधकामात वापरून योग्य गुणवत्तेला अनुसरून बांधकाम करण्याची पद्धत अवलंबली आहे.

दगडात विशिष्ट आकारमानात घडई करणं, कलाकुसर करणं, चुन्यात बांधकाम करून पारंपरिक शैलीतील इमारती उभारणं हे कालबाह्य झालेलं नाही. काळा, गुणवत्तेचा पाषाण विशिष्ट खाणींमध्ये उपलब्ध असतो. तो दळणवळणाच्या माध्यमातून कुठल्याही ठिकाणी पोहोचवता येतो.

कारागिरांची कमतरता आपल्या देशात नाहीच. त्यांच्या हातातील, नजरेतील कला जिवंत आहे. त्याला आधुनिक शस्त्रसाधनांची जोडही मिळाली आहे. नवनवीन कल्पक रेखांकनं पारंपरिक रेखांकनांसारखीच साकारण्याचं कसब त्यांच्याकडे आहे.

अवजड दगड स्थलांतरित करणं, जागेवर बसवणं यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध आहे. काळा दगड व पारंपरिक चुन्याच्या मसाल्यात अनुसरून केलेली बांधकामशैली टिकाऊपणासाठी काळाच्या कसोटीवर शतकानुशतकं उतरलेली आहे. तिचा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं अवलंब करणं ही वास्तुविशारदांची ‘किमया’ आहे.

भीमा नदीच्या उगमस्थानापासून ते ज्ञानकुंड, मोक्षकुंड, सर्वतीर्थकुंड, अमृतसंजीवनीकुंड, पेशवे बारव या सर्व ठिकाणच्या कुंडांची स्वच्छता करून नदीप्रवाह पूर्वपदावर आणण्यात आला आहे.

सन २०१७ मध्ये भेट दिली असता नदीप्रवाहाचं रूपांतर कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या यांमुळे होत्याचं नव्हतं झालं होतं. उगमस्थानाच्या कुंडापासून नदीपात्राला दोन्ही बाजूंनी दगडी भिंती बांधून त्यांमध्ये नदीप्रवाह सीमित करून पावसाळ्यात भरभरून वाहणाऱ्या पाण्यासाठी आता ‘नदीपात्र’ उपलब्ध झालं आहे. अस्तित्वातील उतारांचा विचार करून हा नदीप्रवाह तयार करताना मंदिरपरिसरात जमिनीखालून दगडी कमानींचं (Vault) भुयार तयार करण्यात आलं आहे.

पारंपरिक बांधकाम शैलीने तयार केलेल्या सात फूट उंच दगडी भुयारात पावसाळ्यात नदी मनमुरादपणे वाहते. उगमस्थान जुन्या दगडांत तसंच ठेवून परिसराच्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. ‘ज्ञानकुंडा’तून कचरा, प्लॅस्टिक बाहेर काढल्यावर त्याची खोली सहा मीटर खोल असल्याचं आढळून आलं. त्याची पुनर्बांधणी प्रगतिपथावर आहे.

पेशवे बारवेच्या भिंतीचा काही भाग गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पडला. त्याचं दगडी चिऱ्यांमध्ये व चुन्यात बांधकाम करून जमिनीखाली गाडलेल्या पायऱ्या पहिल्यासारख्या करण्यात आल्या आहेत. नदीप्रवाह, कुंड या मंदिराशी निगडित जागांचं पावित्र्य राखणं ही जबाबदारी प्रशासन, मंदिर ट्रस्ट यांच्याइतकीच भक्तांची व पर्यटकांचीही आहे.

मुख्य मंदिराचा मंडप १९७० च्या शतकात सलोह काँक्रिटमध्ये बांधण्यात आला होता. कोसळणाऱ्या पावसानं त्याच्या गळतीच्यासमस्या आहेतच. त्याजागी ज्योतिर्लिंगांच्या शैलीस अनुसरून दगडांमध्ये कलाकुसरीनं परिपूर्ण भव्य मंडपाचं बांधकाम पावसाळ्यानंतर सुरू होईल. भीमाशंकर हे स्थान अभयारण्यात असल्यामुळे प्रचंड पावसात काम करणं अशक्य असतं. त्यामुळे इथलं सर्व बांधकाम पावसाळ्यात बंद ठेवावं लागते.

मंदिरपरिसराच्या सुधारणांव्यतिरिक्त पायरीमार्ग, वाहनतळ, स्वच्छतागृहे, रस्ते, विद्युत-व्यवस्था, घनकचरानिर्मूलन, मलनिस्सारण, वनीकरण, सुशोभीकरण या सर्वांचा अंतर्भाव आराखड्यात आहे. गर्दीच्या काळात दर्शनव्यवस्था राखणं हे प्रशासन, पोलीस व ट्रस्ट यांच्यासाठी आव्हान असतं.

पारंपरिक शैलीत असलेल्या वारसास्थळाचं जतनसंवर्धन करताना पूरक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच परंपरेचंही भान ठेवणं आवश्यक असतं. भक्ती, श्रद्धा यांबरोबरच तिथली वास्तुकलाही तितकीच मोलाची असते. आधुनिक सुविधा पुरवताना वारसा हा ‘वारसा’स्वरूपात जपला तरच व त्याचं पावित्र्य राखण्याचं भान ठेवलं तरच पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचं महत्त्व जाणवेल व पारंपरिक वास्तुशैलीचं संक्रमण हे काळाच्या पडद्याआड लुप्त न होता अव्याहत सुरू राहील. त्यासाठी संवेदनशीलतेनं जतन-संवर्धन, नवीन वास्तूंची निर्मिती हा जरी वास्तुविशारदांच्या कक्षेतील भाग असला तरी गावकरी व भक्त, पर्यटक यांनी काहीएक विशिष्ट जाणिवेनं संवर्धन अबाधित राखणं ही त्यांचीही जबाबदारी आहे.

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com