सेंट्रल बिल्डिंग

इंग्रजांच्या काळात ज्या इमारती पुण्यामध्ये बांधल्या गेल्या, त्यापैकी अनेक इमारती अजूनही वापरात आहेत.
Central Building, Pune
Central Building, PuneSakal

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

इंग्रजांच्या काळात ज्या इमारती पुण्यामध्ये बांधल्या गेल्या, त्यापैकी अनेक इमारती अजूनही वापरात आहेत. मोठे आकारमान, भक्कमपणा व पाश्चिमात्य शैली वापरून उभारलेल्या इमारती म्हणजे काळाचा वर्चस्वरूपी ठसा इंग्रजांनी इथल्या मातीवर अक्कलहुशारीनं उठवला आणि आजही त्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. ससून रुग्णालयाकडून पुढं विधानभवनकडं जाताना डाव्या बाजूला मध्यवर्ती प्रशासकीय इमारत लागते.

‘सेंट्रल बिल्डिंग’ या इंग्रजी नावानंच ती ओळखली जाते. पुणे जिल्ह्याचा कारभार सांभाळणारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची काही खाती या इमारतीच्या संकुलात कार्यरत आहेत. जॉर्ज व्हीटेट आणि जॉन बेग या स्कॉटिश वास्तुविशारदांची इमारतींसाठी नेमणूक झाल्याची नोंद सापडते.

इंग्रजी आय आकाराची एक लाख वीस हजार चौरस फुटांची मध्यवर्ती कार्यालयाची इमारत काळ्या पाषाणाचा आधार घेऊन दिमाखात उभी आहे. तीन मजली भक्कम इमारतीच्या एका मजल्याचं क्षेत्रफळ एक एकर एवढं आहे व परिसर साडेदहा एकर आहे.

१९१० ते १९२० या काळात बांधलेल्या मध्यवर्ती इमारतीचा ढाचा तत्कालीन बांधलेल्या ससून, जीपीओ, पेशवेदप्तर, कृषी विद्यालय, अभियांत्रिकी विद्यालयाची इमारत अशा इमारतींशी मिळता-जुळता आहे. काळा पाषाण व आतल्या बाजूनं चांगल्या प्रतीच्या भाजक्या विटांमध्ये इमारत बांधली असून भक्कमपणा व उत्तम स्थैर्य इमारतीच्या आकारमानातूनच प्रतीत होतं.

इमारत बांधताना प्रशासकीय कारभारासाठी बांधली गेली व आजही तिचा वापर एक शतक उलटल्यानंतरही त्याच कारणासाठी होत आहे. रुंद व्हरांडे व पॅसेज, दालनांची भरपूर उंची इमारतीच्या अंतर्गत भागांची भव्यता दर्शवतात. घडीव दगडातील अत्यंत कमी दरजांचे (जॉइंट्सचे) बांधकाम, झोकदार रोमन शैलीच्या कमानी, पानाफुलांच्या रचनेचे खांबांवरील कॅपिटल, दगड कामात प्रत्येक मजल्यावर इमारतीच्या बाहेर डोकावणारे दगडी कॉर्नीस इमारतीच्या तपशिलांची नजाकत वाढवतात.

सरकारी काम किंवा सरकारी कचेऱ्या म्हटलं, की नकळत कपाळावर आठी उमटते पण ती तेथील क्लिष्ट कारभारामुळं. इमारतीकडं जरा लक्षपूर्वक पाहिलं तर तिच्यामधील सौंदर्यस्थळांचा आस्वाद घेण्यासारखं अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटक इमारतीच्या निरनिराळ्या भागात आहेत. तळमजला व दोन मजले असलेल्या इमारतीचा बोजडपणा जाणवू नये यासाठी दर्शनी भागात ठराविक अंतरानं इमारतीचे काही भाग पुढे येतात.

त्यांच्या दगडी खांबांना वरती छोटे छत्रीवजा घुमट (क्युपोला) त्यानंतर इमारतीच्या कडांना गोलाकार घडाई करून त्यावर दौलदार घुमट असे तपशील कौशल्यानं साकारले आहेत. इमारतीचा डौल वाढावा अशा दृष्टीनं जाळ्या, ओतीव लोखंडाचे रेलिंग, दगडांचे घडवलेले वैशिष्ट्यपूर्ण घटक यांचा उपयोग केला आहे. तळमजला व त्यावरील मजल्यांच्या कमानींचा प्रकार वेगवेगळा आहे.

इमारतीचे कडेचे भाग वैशिष्ट्यपूर्ण असावे यावर आवर्जून भर दिला आहे. छतावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पाइप दर्शनी भागात दिसू नयेत म्हणून आतल्या बाजूनं दगडी बांधकामात गुंतवले आहेत पण शतकाच्या अंतरानं त्यांची निगा राखणे ही समस्या झाली आहे. आवाराला सीमित करणारी सुरक्षाभिंतही इमारतीला पूरक अशी काळा दगड व ओतीव लोखंडात बांधली आहे.

इमारतीच्या अंतर्गत भागात मजल्यांसाठी लोखंडी आय सेक्शनचे घटक व त्यामध्ये चुन्यात अर्धगोलाकार फिरणारे वैशिष्ट्यपूर्ण ‘जॅक अर्च फ्लोअर’ असून काही भाग वगळता अजूनही मजबूत आहे. अशा प्रकारचं मजल्याचं काम सुबक तर दिसतंच पण इमारतीच्या छताचा बोजडपणाही कमी करतं.

लांबचलांब मध्यवर्ती पॅसेजमध्ये अंधार वाटत नाही कारण ठराविक अंतरानं त्याला उजेडाची सोय आहे. इमारतीच्या पश्चिमेकडील चौकातून अर्धवर्तुळाकार रस्त्याने प्रवेश असून त्यासाठी अर्ध घुमटकर पोर्च आहे. दक्षिण व उत्तरेकडं अशाच पद्धतीचं उठावदार पोर्च असलेलं प्रवेशद्वार आहे.

एवढ्या मोठ्या आकारमानाच्या इमारतीमध्ये प्रवेश हा विविध भागातून होणं अपरिहार्य आहे. सदर इमारतीमध्ये पन्नासहून अधिक सरकारी विभाग कार्यरत आहेत. मध्यवर्ती इमारतीच्या आवारात कार्यकारी अभियंता इमारतीचं बांधकाम १९४३ मध्ये तर दुसऱ्या प्रशासकीय इमारतीचं बांधकाम १९६४ च्या दरम्यान झालं.

मध्यवर्ती इमारत ही लोडबेरिंग पद्धतीनं बांधली असून बाह्यभिंतींची जाडी दोन फुटांपेक्षा जास्त व अंतर्गत भिंतींची जाडी पावणेदोन फूट इतकी आहे. इमारतीच्या कोपऱ्यांसाठी वापरलेल्या दगडांचा आकारमानही इतरत्र दगडांच्या तुलना करता दुप्पट आहे. इमारतीला एकूण ४९३ खिडक्या असून विविध आकारांना आकारानुसार २३ प्रकार आहेत.

सागवानी दरवाजांचा भव्यपणाही नजरेत भरतो. आवारामध्ये भरपूर वृक्षसंपदा असून इमारतीच्या अंतर्गत भागात तसेच बाहेरही हवेचं संतुलन राखण्यास मदत होते. सरकार दफ्तरी कामास येणाऱ्यांचं प्रमाणही भरपूर असून सद्य परिस्थितीत वाहनतळ ही समस्या आहे. इमारतीचं छत हे लाकडी क्वीन पोस्ट पद्धतीच्या कैच्यांवर तोडून धरलंय, तर काही भागात सपाट छताची व्यवस्था आहे. एवढ्या महाकाय इमारतीची तपशीलवार रेखांकनं करणं आव्हान होतं त्याशिवाय पुढं काम करणं अशक्य होतं. इतक्या जुन्या इमारतीचा नकाशा उपलब्ध होत नाहीत.

शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ इमारत सतत वापरात असल्यामुळे इमारतीचा काही भाग जीर्ण झाला आहे. विशेषतः स्वच्छतागृहं, सांडपाणी व्यवस्था असणारा भाग. अनेक विभाग कार्यरत असल्यामुळं निरनिराळ्या भागांची डागडुजी तत्सम विभागानं करून घेतल्यामुळं संपूर्ण इमारतीशी सुसंगत नाहीत. छतावरील कौलं निसटून अनेक ठिकाणी तात्पुरत्या दुरुस्त्या केल्या आहेत.

ज्या ठिकाणी सपाट छत आहे त्यावर जलप्रतिबंधक थरावर थर चढले. १०० वर्षांमध्ये विद्युत व्यवस्था, प्रगत यंत्रणा गरजेनुसार इमारतीमध्ये सामावताना वाहिन्यांचं जाळे झाले आहे. मध्यवर्ती लोखंडी सांगाड्याची लिफ्ट ही अद्ययावत होण्याची वाट पाहत आहे. इंग्रजांनी बांधलेल्या इमारतींमध्ये छतांची गळती ही ऐरणीची समस्या असतेच.

अनेक वादकांनी एकत्र येऊन संगीताची उत्कृष्ट रचनेची निर्मिती केली पण कालांतरानं प्रत्येक वादक वेगवेगळ्या सुरावटी वाजवू लागला तर ती कलाकृती बेसुरी होते. तसंच मूळ वास्तुविशारद इमारतीपासून बाजूला झाल्यावर इमारतीकडं एकसंधपणे बघण्याचा दृष्टिकोन हरवल्यामुळं आज मध्यवर्ती इमारतीलाही एक बेसुरा चेहरा लाभला आहे. ती हरवलेली सुरावट पुन्हा एकदा सुश्राव्य करण्याचा प्रयत्न ‘किमया’ करत आहे.

ऐतिहासिक इमारत सुसंगत दिसावी व आधुनिक पूरक सुविधा व तंत्र सामावताना त्यासाठीची योजना नीटनेटकी असावी, यासाठी इमारतीच्या जतनसंवर्धनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. इमारतीचा मूळ ढाचा सुस्थितीत असेल, तर तिचे संवर्धन करून नवीन यंत्रणांचा अंतर्भाव कौशल्याने करून ती वापरात ठेवणं हितकारक आहेच पण ऐतिहासिक वास्तुसंपदेचं, शैलीचं जतनही आहे.

अनेक प्रशासकीय इमारती स्वातंत्र्योत्तर काळात बांधल्या आहेत पण तुलनात्मकतेनं शतायुषी मध्यवर्ती इमारत आपलं स्थैर्य आणि नखरा सांभाळत दिमाखात उभी आहे. काळाच्या ओघात झालेल्या विसंगत बदलांनी तिच्या सौंदर्याला थोडी बाधा आणली आहे. काळ्या पाषाणाने बाह्यभागाचा वारंवार होणारा रंगरंगोटीचा खर्च वाचवला आहे.

इमारतीच्या दगडांची स्वच्छता झाल्यावर निखळलेले, हललेले दगड पुनःप्रस्थापित होतील. इमारतीवर उगवलेली झाडं काढल्यावर दगडांच्या सांध्यांना होणारी झीज यांचं चुन्यांमध्ये सांधेभरण होईल. विद्युत वाहिन्या, अग्निप्रतिबंधक उपाययोजना, जल व मलनिःसारण वाहिन्या यांना नवीन स्वरूप देण्यात येईल.

जॅक अर्च फ्लोअर जिथं खराब झाले आहे त्याची डागडुजी, छताचं संवर्धन ही सर्व कामं स्थैर्याच्या चाचण्या झाल्यावरच करण्यात येतील. आधुनिक फरशांमुळं व जलप्रतिबंधक थरामुळं मजल्यावर चढलेला भार उतरवून फरशांचा एकच थर व चुन्याचा जल प्रतिबंधक थर इमारतीला मूळ स्वरूप प्राप्त करून देतील.

तत्कालीन आयपीएस चुन्याच्या घोटाईत केलेले भूआच्छादन जीर्ण झालं असून लोकांचा वाढता वावर पाहता इमारतीच्या शैलीशी सुसंगत नवीन फरशा बसवण्यात येतील. इमारतीच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ व मोकळा करून जोत्याचे संरक्षण केल्यावर बाह्यभाग आधुनिक तंत्राच्या सौम्य विद्युतीकरणाने उजळून निघेल. लवकरच अनावश्यक विसंगत बदल उतरवून मध्यवर्ती इमारत कात टाकेल. तिच्या बाजूच्या ऐतिहासिक इमारतीही संवर्धनाने आयुष्मान होतील.

ऐतिहासिक सरकारी कचेऱ्यांमध्ये जाताना कदाचित त्यांच्या तपशिलांकडं दुर्लक्ष होत असेल. पण त्यांचं आकारमान, सामग्रीचा कौशल्यपूर्ण वापर, भक्कमपणा, इमारतीचे तपशील साकारताना साकारलेली उत्कृष्ट कारागिरी, सामग्री व आकारमान यामुळं साधलेलं हवेचं संतुलन, भव्यपणा, पण आक्रमकतेचा अभाव या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. बदलत्या जीवनशैलीत सध्या परिस्थितीमध्ये कल्पकतेनं व नवीन तंत्रज्ञानाला सामावून घेणाऱ्या प्रशासकीय इमारती जोमानं बांधल्या जात आहेत.

वाढत्या गरजा व त्यासाठी कार्यरत यंत्रणा यासाठी आधुनिक सुविधांनी युक्त इमारतींची आवश्यकता आहेच. पण एका कालखंडात कारागिरीलाही महत्त्व देऊन विशिष्ट शैलीत बांधलेल्या इमारती पुन्हा नव्यानं बांधणं होणं नाही. आहे तो ऐवज जपला तर एका कालखंडाच्या वास्तुशैलीचं संवर्धन होईलच.

इमारत जरी इंग्रजांनी बांधली, तरी यासाठी इथल्या कारागिरांनीच घाम गाळला आहे, पैसा इथलाच वापरला आणि इमारतही तुमच्या-आमच्या पिढीनं व गतपिढीनं वापरली आहे. पुढच्या काही पिढ्याही तिच्या तपशिलांचं, सौंदर्यांचं मर्म जाणून तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतील. कदाचित काही वर्षांनी अजून प्रगत तंत्रज्ञानानं त्यांचं जतन-संवर्धन करतील.

(लेखिका वास्तुविशारद असून जतन-संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com