अभिमानास्पद वारसा

पुणे शहरात ऐतिहासिक वारसा असणाऱ्या अनेक ठळक इमारती असून चर्च, मंदिरं, मंडया, शैक्षणिक संस्था यांच्याबरोबरीनंच प्रशासकीय ऐतिहासिक इमारतींची संख्या शहरात मोठी आहे.
historical heritage council hall pune
historical heritage council hall punesakal
Summary

पुणे शहरात ऐतिहासिक वारसा असणाऱ्या अनेक ठळक इमारती असून चर्च, मंदिरं, मंडया, शैक्षणिक संस्था यांच्याबरोबरीनंच प्रशासकीय ऐतिहासिक इमारतींची संख्या शहरात मोठी आहे.

- अंजली कलमदानी anjali.kalamdani10@gmail.com

पुणे शहरात ऐतिहासिक वारसा असणाऱ्या अनेक ठळक इमारती असून चर्च, मंदिरं, मंडया, शैक्षणिक संस्था यांच्याबरोबरीनंच प्रशासकीय ऐतिहासिक इमारतींची संख्या शहरात मोठी आहे. अशा बहुतेक इमारती ब्रिटिशांनी बांधल्या आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाची दखल घेतली जाईलच अशा ठसठशीत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं बांधलेल्या आहेत. त्यापैकीच एक इमारत म्हणजे कॅन्टोन्मेंटच्या पश्चिमेला असलेली कौन्सिल हॉलची सुबक, लाल वीटकामातील प्रमाणबद्ध कमानींची इमारत. सरकारी अधिकाऱ्यांचा राबता असलेली कौन्सिल हॉलची ही इमारत पुणे जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली अशा पाच जिल्ह्यांच्या प्रशासकीय कारभाराचं महत्त्वाचं ठिकाण असून विभागीय आयुक्तांचं कार्यालय इथं आहे. महत्त्वपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण अशा कौन्सिल हॉलच्या इमारतीला भरगच्च हिरव्यागार वृक्षसंपन्नतेचं कोंदण लाभलेलं आहे.

सन १८७० मध्ये उभारलेल्या व्हेनएशियन गॉथिक शैलीतील या इमारतीचं रेखांकन अभियंता मेलिस यांनी केलं होतं. कॅन्टोन्मेंटच्या पश्चिमेला ५० हजार ८७५ रुपयांना जमीन खरेदी करून तीवर एक लाख २२ हजार ९४० रुपये खर्च करून कौन्सिल हॉलची शानदार इमारत उभी बांधण्यात आली.

सन १८८६ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या पुत्राच्या वाढदिवसानिमित्त इथं फॅन्सी ड्रेस स्पर्धा व बॉलनृत्याचा कार्यक्रम आयोजिला गेला होता असा उल्लेख आढळतो.बाळासाहेब खेर हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली’चं ऑगस्टचं पहिलं अधिवेशन पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये ता. १९ जुलै १९३७ पासून सुरू झालं. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महत्त्वपूर्ण अशा कायदेमंडळाच्या अधिवेशनात ता. सहा ऑक्टोबर १९४९ रोजी पुण्याच्या याच कौन्सिल हॉलमध्ये महत्त्वपूर्ण भाषण केलं होतं. इमारतीत ८० फूट लांब, ४० फूट रुंद व ४० फूट उंची असलेलं मध्यवर्ती सभागृह आहे. पांढऱ्या रंगांत कलाकुसरीच्या कामाला सोनेरी वर्ख लावल्याची नोंद गॅझेटिअरमध्ये आहे.

खिडक्यांना रंगीत काचांमध्ये - स्टेन्ड् ग्लास- पाना-फुलांचं आकर्षक नक्षीकाम आहे. उत्तरेकडील रोझ विंडोमधील काचांची रंगकला मूळ स्वरूपात असून तीमधील रंगीबेरंगी भारतीय पाना-फुलांच्या रचनेत इंग्लंडच्या राणीच्या मुकुटाची प्रतिमा व ‘स्टार ऑफ इंडिया’ हे मानचिन्ह, तसंच ‘परमेश्वर आम्हास प्रकाश दाखवो’ हे ब्रीदवाक्य आहे.

कालसंक्रमणात या इमारतीच्या दुरुस्तीची व पुनरुज्जीवनाची निकड निर्माण झाली व इमारतीच्या आणि परिसराच्या जतन-संवर्धनाचा आराखडा तयार करण्यात आला. मुख्य इमारतीच्या स्थैर्याचं सर्वेक्षण करून कामाला सुरुवात झाली. प्रथम छताच्या मजबूतीचा आढावा घेऊन छतातून होणारी गळती थांबवण्यासाठी छताच्या उतारामध्ये व आवश्यक तिथं छताचे घटक बदलून गळती होणाऱ्या जागी शिशाचे पत्रे अंथरण्यात आले आहेत; जेणेकरून शिशाच्या गुणधर्मानुसार पुढील अनेक वर्षं गळतीची समस्या उद्भवणार नाही. ३२०० चौरस फूट मुख्य सभागृहाच्या आभासी लाकडी छताला वारंवार केलेलं रंगकाम उतरवून पुन्हा लाकडी मूळ स्वरूप देण्यात आलं आहे. त्यावरील नक्षीकाम असलेल्या कमलाकृती ५६ घटकांना मूळ रूपाप्रमाणे सोन्याचा वर्ख देण्यात आला. हे काम जयपूरच्या कुशल कारागिरांनी केलं.

भिंतींना असलेला चुन्याचा गिलावा गळतीमुळे खराब होऊन कालमानानुसार जीर्ण झाला होता, तसंच त्यावर आधुनिक रंगप्रकाराचे अनेक प्रयोग केले गेल्यामुळे त्याचं मूळ स्वरूप नष्ट झालं होतं. चुन्याच्या मूळ घटकाच्या मिश्रणासह चुन्याचा नवीन गिलावा मुख्य सभागृहाला व इतर दालनांना देण्यात आला व त्यावर नैसर्गिक रंग लावण्यात आला.

सभागृहातील मूळच्या लाकडी फ्लोरिंगच्या जागी कोटा व हिरव्या संगमरवराचं फरशीकाम करण्यात आलं होतं, ते काढून त्या जागी पुन्हा लाकडी सागवानी फ्लोरिंग इमारतीला साजेशा रचनेत करण्यात आलं. सभागृहातील सौंदर्यपूर्ण रंगीत काचांच्या - स्टेन्ड् ग्लास - कलाकृतींमधील फुटलेल्या, खराब झालेल्या काचा मूळ स्वरूपाप्रमाणे तज्ज्ञांकडून तयार करून बसवण्यात आल्या. स्टेन्ड् ग्लास तयार करण्याचं शास्त्रीय तंत्र वापरून अस्तित्वातील मूळ काचांचं जतन-संवर्धन व नूतनीकरण करण्यात आलं. काचांचं रंगीत डिझाईन भट्टीमध्ये भाजणं व शिशाचं कोंदण तयार करणं हेही तंत्र वापरण्यात आलं.

सभागृहातील मध्यवर्ती गॅलरी व पत्रकारांची गॅलरी इथलं ओतीव लोखंडाच्या नक्षीदार रेलिंगचं रंगकाम व अस्तित्वातील सोनेरी वर्खाच्या जागी वर्खकाम करण्यात आलं. सभागृहाला असलेल्या भव्य काचेच्या तावदानांच्या खिडक्या दुरुस्त करून मूळ स्वरूपाप्रमाणे योग्य फिटिंगसह जतन करण्यात आल्या. सुबक दगडकामावरील रंगकाम उतरवून मूळ दगडाचं रूप दिसू लागले. सभागृहाला साजेशी विद्युत्-रचना करून छताला काचेची झुंबरं लावण्यात आली आहेत.

सभागृहाच्या कामकाजासाठी लागणारं भव्य मध्यवर्ती टेबल व त्यासाठी प्रतवारीप्रमाणे आकर्षक खुर्च्या तयार करण्यात आल्या. सर्व लाकूडकाम हे इमारत ज्या काळात बांधली त्या काळातल्यासारख्या शैलीत करण्यात आलं आहे.

आधुनिक काळात आवश्यक असणाऱ्या सुविधा, उदाहरणार्थ - ध्वनियंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा, दृक्-श्राव्य यंत्रणा- यांचाही नूतनीकरणात समावेश आहे. त्यासाठी लागणाऱ्या विद्युत्-वाहिन्या लाकूडकामातून फिरवताना त्यांचा पसारा नजरेस पडणार नाही अशा प्रकारे हे काम करण्यात आलं आहे. रंगसंगती, पडद्यांची रंगसंगती साधताना इमारतीची शैली, वापर व काळाचं भान ठेवण्यात आलं आहे. एखादा ऐतिहासिक ऐवज त्याच्या मूळ स्वरूपात जतन-संवर्धन करताना त्याचे बारीकसारीक तपशील संवेदनशीलतेनं सांभाळावे लागतात. इमारतीत गरजेनुसार उभारण्यात आलेली पार्टिशन काळाच्या ओघात हटवण्यात आली असून दालनं व व्हरांडे मोकळे केले गेले आहेत.

विधानभवनासाठी आवश्यक असलेला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा कक्ष, खासगी कक्ष योग्य अंतर्गत सजावटीसह व सुविधांसह तयार करण्यात आला आहे. दृक्-श्राव्य कॉन्फरन्स कक्षही सुसज्ज आहे. विभागीय आयुक्तांचं कार्यालय, स्वागतकक्ष व पहिल्या मजल्यावरील कार्यालय आवश्यक त्या फर्निचरसह व सुविधांसह तयार झाला आहे. दगडावरील रंगकाम उतरवल्यामुळे मूळ स्वरूपातील गॉथिक शैलीतील सुबक काम उठून दिसू लागलं आहे.

मुख्य इमारतीला पश्चिमेकडे व उत्तरेला प्रवेशद्वारं आहेत. पोर्चचं दगडावरील रंगकाम उतरवून तुटलेले दगड पुन्हा नव्यानं मूळ जागेत आधुनिक तंत्रानं बसवण्यात आले आहेत. संपूर्ण इमारतीचे लाकडी दरवाजे व खिडक्या त्यांच्या मूळ भव्य स्वरूपात इमारतीच्या सौंदर्यात भर घालत आहेत. इमारतीच्या सभोवतीची जागा डांबरीकरणाचे थर चढल्यामुळे मूळ जमिनीच्या पातळीपेक्षा उंचावून जोतं कमी झालं होतं. इमारतीची मूळ पातळी दर्शवून त्याभोवती घडीव दगडाचं जोतं-संरक्षण व छतावरून गळणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याची सोय पुनःप्रस्थापित करण्यात आली आहे. इमारतीच्या सौंदर्यपूर्ण घटकांचं संवर्धन करताना तिच्या स्थैर्याच्या दृष्टीनं आम्ही प्रामुख्यानं उपाययोजना केली. इमारतीच्या उंच मनोऱ्याची डागडुजी करून तिथं संरक्षक उपाययोजना राबवण्यात आली. उंचीवर काम करताना ऐतिहासिक इमारतीच्या कुठल्याही भागाचं नुकसान होऊ नये यासाठी ‘एच फ्रेम लोखंडी पहाडा’चा वापर करण्यात येतो.

योग्य सामग्री पारखून योग्य तंत्रज्ञानानं इमारतीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. महत्त्वाच्या इमारतीचं जतन करताना रात्रीच्या वेळी इमारतीचे सौंदर्यपूर्ण घटक उजळून निघतील अशा प्रकारे विद्युत्-व्यवस्था केल्यामुळे इमारतीच्या रात्रीच्या सौंदर्यात भर पडते. ऐतिहासिक इमारतीला साजेशी संरक्षकभिंत बांधताना तीमध्ये भिंतीची उंची कमी ठेवून रेलिंगची उंची वाढवण्यात आली आहे. राजकीय पाठबळ, उत्तम कारागीर, तंत्रज्ञ, सल्लागार, कंत्राटदार व प्रशासकीय अधिकारी या सर्वांच्या सहभागानं महत्त्वपूर्ण अशा कौन्सिल हॉलचं जतन-संवर्धन शास्त्रीय पद्धतीनं केवळ आठ महिन्यांत पूर्ण झालं. नेहमीच्या दरपत्रकांच्या प्रणालीबाहेर जाऊन नवीन काम करताना त्यासाठी वेगळं दरपत्रक शासनस्तरावर मंजूर करून घेणं हा किचकट व धाडसी प्रयोगही राबवण्यात आला.

ही इमारत जरी ब्रिटिशांनी बांधलेली असली तरी साकारली इथल्याच कारागिरांनी. आज पाच जिल्ह्यांच्या प्रशासकीय कारभाराची सूत्रं इथून हलतात व महत्त्वाच्या बैठका याच इमारतीत पार पडतात. ऐतिहासिक वारसा हा जतन करून वापरात राहिला तर इमारतीची शान व महत्त्व नक्कीच द्विगुणित होते. सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांच्या विभागासाठी सध्याच्या काळात अप्रचलित अशा पद्धतीचं संवर्धनाचं काम साकारताना सल्लागारांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

(या सदरातील गेल्या वेळच्या लेखात ‘ता. आठ नोव्हेंबर १७७२ रोजी सकाळी माधवराव हे जग सोडून गेले,’ या वाक्यात आठ नोव्हेंबरऐवजी १८ नोव्हेंबर असं हवं होतं, तसंच शीर्षकही ‘स्मारक रमा-माधव यांचं’ याऐवजी ‘स्मारक रमाबाईंचं’ असं हवं होतं.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com