निरगुडे इथलं हनुमानमंदिर

आपल्या गावातलं मंदिर ही गावाची नुसती खूणच नसते तर सर्वांना एकत्र आणणारी, एखाद्या अनामिक नात्यानं गुंफून ठेवणारी गावची मौल्यवान ठेवही असते.
nirgude village hanumanmandir
nirgude village hanumanmandirsakal
Summary

आपल्या गावातलं मंदिर ही गावाची नुसती खूणच नसते तर सर्वांना एकत्र आणणारी, एखाद्या अनामिक नात्यानं गुंफून ठेवणारी गावची मौल्यवान ठेवही असते.

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

आपल्या गावातलं मंदिर ही गावाची नुसती खूणच नसते तर सर्वांना एकत्र आणणारी, एखाद्या अनामिक नात्यानं गुंफून ठेवणारी गावची मौल्यवान ठेवही असते. देवालयातल्या देवाविषयी भक्ती, आपलेपणा, आश्वस्त करणारा आधार अशा अनेक भावना गावकऱ्यांमध्ये रुजलेल्या असतात. निरगुडे गावातील मारुतीच्या मंदिराबाबतही असंच म्हणता येईल. या मंदिराचा जीर्णोद्धार शास्त्रोक्त पद्धतीनं करण्याचं ग्रामस्थांनी ठरवलं आणि ते काम पूर्णही करून दाखवलं.

छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्म झाला तो जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला सर्वांना परिचयाचा आहे. याच शिवनेरी किल्ल्याला लागून वळसा घालून डोंगराच्या रम्य परिसरातून रस्ता पुढं जातो आणि एका फाट्यावरून पुढं निरगुडे हे गाव लागतं.

फळबागा, आमराई, भाज्यांची, धान्याची शेतं पार केल्यानंतर निरगुडे गावाची वस्ती दिसू लागते. गावातला रस्ता घेऊन जातो काळ्या दगडी पाषाणात बांधलेल्या मारुतीमंदिराजवळ. मंदिराच्या संरक्षकभिंतीला ठेंगणं प्रवेशद्वार आहे. त्यातून वाकूनच आत जावं लागतं आणि मग दिसते स्थानिक पाषाणातून साकारलेली मंदिराची कलाकृती. मंदिरात पाच शिलालेख आहेत. त्यातील एकावर ‘निरगुडकर कुळात जन्मलेल्या यादव नावाच्या व्यक्तीनं - हनुमानाच्या कृपेनं भरभराट झाल्यामुळे - मंदिराची बांधणी केली,’ असा उल्लेख आहे. हा कालनिर्देश २८० वर्षांपूर्वीचा आहे. मंदिराच्या परिसरातील गजान्तलक्ष्मीच्या शिल्पावरून मंदिर १५०० वर्षं जुनं असावं असा अंदाज बांधता येईल. निरगुडकर यांच्या कुटुंबीयांकडे वंशपरंपरेनं मंदिराचं प्रतिनिधित्व आहे.

मारुतीच्या मूर्तीवर अनेक वर्षं चढवण्यात आलेलं शेंदराचं लेपन उतरवण्याचा निर्णय सन २०१० मध्ये मंदिराच्या ट्रस्टींनी घेतला. लेपन उतरवण्याच्या निर्णयापूर्वी गावकऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी ग्रंथांचा आधार घेण्यात आला व त्यामागचं शास्त्र त्यांना समजावून सांगण्यात आलं. ज्या वेळी शेंदूरलेपन उतरवायचं ठरलं, त्या वेळी गावात पूर्णपणे शांतता व एक अनामिक धडधड होती.

शेंदूरलेपनाचे जवळजवळ ९५० किलोचे थर व चांदीच्या सात नेत्रजोड्या उतरवल्या गेल्यावर आत मारुतीची रेखीव मूर्ती तर होतीच; परंतु मारुतीच्या डाव्या बाजूला सिद्धिविनायकप्रतिरूप गणेशाची मूर्तीही तिथं ‘अवतरली’. गेल्या चार-पाच पिढ्यांनी मारुतीची मूळ मूर्ती व गजाननाची मूर्ती मूळ स्थितीत पाहिलीच नव्हती; किंबहुना, गजाननाची मूर्ती हा मारुतीच्या वाकवलेल्या मांडीचाच भाग आहे अशीच साऱ्यांची समजूत होती.

गावकऱ्यांनी आपल्या आवडत्या देवाचं दर्शन घेतलं व त्यानंतर मंदिराचं जतन-संवर्धन पारंपरिक पद्धतीनं व्हावं हा निर्णय घेतला. एका छोट्या गावानं सर्वांपुढं ठेवलेला हा आदर्शही म्हणावा लागेल. सध्याच्या परिस्थितीत अनेक धार्मिक स्थळांचं नूतनीकरण नवीन सामग्री वापरून मूळ मंदिराशी विसंगत असं केलं जातं आणि पारंपरिक वारसा आपला मूळ चेहरा आणि ऐतिहासिक महत्त्व हरवून बसतो.

दगडातील मोठ्या चिऱ्यांमध्ये २८० वर्षांपूर्वी मेहनतीनं घडवलेलं हे शिल्प...पण कुणी अज्ञानानं प्रत्येक दगड तैलरंगात रेखाटन करून रंगवला होता. वीट आणि चुना यांमध्ये बांधलेल्या कळसाची पडझड झाली होती. दशावतारांच्या अनेक मूर्ती तुटल्या होत्या. मंदिराभोवतीची फरसबंदी फुटल्यामुळे प्रदक्षिणा घालणं सोईचं राहिलं नव्हतं.

गर्भगृह, अंतराळ आणि एकसंध चौकोनी दगडी मंडप असलेल्या मंदिरावर कारागिरांनी कौशल्यपूर्ण कारागिरी केलेली होती. तैलरंग शास्त्रीय पद्धतीनं उतरवल्यावर कारागिरांची करामत अधिकच स्पष्ट होऊ लागली. पूर्णपणे भग्न पावलेल्या कळसावरच्या मूर्तींसाठी नव्यानं रेखांकनं करण्यात आली. यासाठी दशावतारातील मूर्तींचा आधार घेण्यात आला.

कळसावर पूर्वीची रंगसंगती, हातानं चितारलेली रेखीव कलाकुसरीची पाना-फुलांची चित्रं आढळून आली. खाचाखोचांमध्ये काही रंग ऊन्ह-पावसाला दाद न देता टिकून राहतात आणि ऐतिहासिक पुरावा म्हणून उपयुक्त ठरतात. मंदिराच्या कळसाचं काम मूळ ढाच्याप्रमाणे चुन्यात करण्यास गावकरी तयार झाले. मंदिराच्या प्रांगणात चुना मळण्याची जुनी घाणी दगडासकट होती. ती व्यवस्थित चालू करण्याचे सोपस्कार झाल्यावर घाणी फिरवण्यासाठी गावकऱ्यांनी आपल्या शेतातील बैल देण्याचं ठरवलं. कळीचा चुना आणून तो भिजवण्यासाठी टाकी तयार करण्यात आली. कारागिरांनी मूर्तींची घडण समजून कामाला सुरुवात केली.

मंदिराच्या सपाट छतावर घुमटाकार कळस असून त्यावर बाजूनं १६ छोटे कळस आहेत. छोट्या कळसांच्या खाली उभ्या प्रतलावर दशावतारातील मूर्ती आहेत. मंडपावर छोटा घुमट असून त्याच्या बाजूनं चार छोटे घुमट आहेत. मुख्य शिखराच्या नागप्रतिमा लक्ष वेधून घेतात. संपूर्ण शिखराचं जतन ही उन्हातानात काम करणाऱ्या कारागिरांसाठी जिकिरीची गोष्ट असते. गणेश हे कारागीर काही कामासाठी बाहेरगावी गेल्यावर अपघातानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं चुन्यात काम पूर्ण केलं. बाह्य भागावर चौकोनी दिसणारी सभामंडपाची अंतर्गत रचना करताना दगडकामातच चौकोन ते अष्टकोन आणि गोलाकार घुमट ही बांधकामरचना साकारली. त्यावर केलेल्या कोरीव कामातील प्रत्येक हत्तीची प्रतिमा वेगवेगळ्या रूपात असून दगडकामातील फुलंही वेगवेगळी आहेत.

गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील चौकट पाषाणातील वेलबुट्टीतून घडवताना टणक अग्निजन्य दगडावर अशी असामान्य कलाकुसर करणं हे अवघड तर होतंच; मात्र, ती शतकानुशतकं टिकावी अशीही यामागची धडपड आहे.

मंदिराच्या जोत्यावर बाहेरच्या बाजूनं कमळांच्या प्रतिमांची मालिका असून कमळ घडवल्यावर त्याच्या बाजूनं बारीक कंगोऱ्यांची, एकमेकांत काटकोनात गुंतलेली साखळी कोरलेली आहे. कमानी, देवळ्या, आलंकारिक पानाफुलांची रेखांकनं, कमानीच्या खालच्या टोकांमधील रचना यांमध्ये कमालीची प्रमाणबद्धता व प्रावीण्य दिसून येतं. एका आडगावात साकारलेली ही कलाकृती म्हणजे या गावासाठी मोठा ऐवज आहे आणि तो त्यांनी एकमतानं जपला आहे.

जतन-संवर्धनाचं काम परिपूर्णतेकडे नेताना गावातल्या ज्येष्ठ आणि तरुण मंडळींचं सहकार्य मिळालं. मोकळ्या भागातील फरसबंदी पुन्हा दगडात करून पाण्याचा निचरा होईल अशी सुविधा साधण्यात आली आहे.

इथले महत्त्वाचे सण म्हणजे पोळा आणि हनुमानजयंती. पोळ्याला बैल ठेंगण्या दरवाजातून आत जातात. रामनवमीपासून सुरू होणारा उत्सव हनुमानजयंतीपर्यंत रंगतो. मंदिरासमोरील व्यासपीठावर सादर होणारी रामायण-महाभारतातील स्थानिक कला वाखणण्यासारखी असते. हनुमानजन्माचा सोहळा तर डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो.

मंदिरापुढील भव्य मांडवात पहाटेपासून सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम असतो...त्यात रंगून जात असतानाच तांबडं फुटतं व पहाटेचं सूर्यबिंब वर येतं...व हनुमानजन्माचा उत्सव सुरू होतो...पाळणा हलतो आणि सर्वत्र हर्षोल्हासाचं वातावरण तयार होतं. कीर्तनकार आणि साथीदारांचा आवाज टिपेला पोहोचतो. निरगुडकर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती पाळण्यातील नवजात हनुमानाचं बाळ दोन्ही हातांत धरून सर्व भाविकांच्या जवळ जाऊन त्यांच्या कपाळाला ममतेनं लावण्याची प्रथा पार पडतात. आणि, हे भक्त थोडेथोडके नव्हे तर, पंधराशेच्या आसपास असतात. प्रसाद घेत भक्तगण घरी जातात.

गावकऱ्यांनी पै पै जोडून मंदिराचं जतन-संवर्धन पूर्ण केलं आणि ता. पाच मार्च २०२० रोजी कलशारोहणाचा कार्यक्रम केला. सर्व वयोगटातील लोकांनी एकत्र येऊन पुढच्या पिढीसाठी आणि इतर सर्व लहान गावांसाठी हा आदर्श घालून दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com