पालखीच्या वाटेवरील पालखीतळ

हजार वर्षांहून जुनी असलेली महाराष्ट्राची वारीची परंपरा हा महाराष्ट्राचा अमूल्य असा सांस्कृतिक वारसा आहे.
Bhandishegav Palkhital
Bhandishegav Palkhitalsakal

- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com

नाचत जाऊ त्याच्या गावा रे।

खेळिया सुख देईल विसावा रे।

गात जा गा गात जा गा प्रेम माझा विठ्ठल॥

हजार वर्षांहून जुनी असलेली महाराष्ट्राची वारीची परंपरा हा महाराष्ट्राचा अमूल्य असा सांस्कृतिक वारसा आहे. अध्यात्माची बैठक लाभलेल्या संतपरंपरेतील वारीला इतिहासाची, संगीताची, भक्तिभावाची जोड आहेच; पण २३७ किलोमीटर प्रवास करणाऱ्या वारीचं व्यवस्थापन ही दिंड्या, प्रशासन, पोलीस खातं या सर्वांची जबाबदारी असते. अनेक यंत्रणा यासाठी सुसज्ज होऊन कार्यरत असतात.

संत तुकाराममहाराजांची पालखी देहूहून मार्गस्थ होऊन पुणे व सोलापूर जिल्ह्यांमधून प्रवास करत पंढरपुरात पोहोचते. संत ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी आळंदीहून निघते व पुणे-सातारा-सोलापूर या जिल्ह्यांतून पंढरपूरला रवाना होते. संत सोपानकाकांची पालखी सासवडहून सुरू होत पुणे व सोलापूर या जिल्ह्यांमार्गे पंढरपुरात पोहोचते. या पालख्यांच्या सर्व मिळून अंदाजे ५५० अधिकृत नोंदणीच्या दिंड्या असतात.

याशिवाय, नोंदणी नसलेल्याही अनेक दिंड्या वारीत सहभागी होतात. प्रत्येक दिंडीत ५० ते ५००/१००० भक्तांचा सहभाग असतो. या दिंड्या त्यांच्या मूळ स्थानांपासून पंढरपुरात दाखल होताना मार्गावरील ४४ ठिकाणी त्यांच्या विसाव्याची ठिकाणं परंपरेनुसार निश्चित आहेत. पालख्यांच्या विसाव्यांच्या जागांना ‘पालखीतळ’ असं संबोधलं जातं. पालखी म्हणजे एका मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामी जाणारी चालती-बोलती वसाहतच असते जणू. नियोजित पालखी वर्षातून एकच रात्र मुक्कामी विसावते; परंतु त्यासाठी तयार कराव्या लागणाऱ्या मूलभूत सुविधांबद्दल जाणून घेणं सध्याच्या आषाढीवारीच्या निमित्तानं रोचक ठरेल.

संत तुकाराममहाराजांच्या जन्मचतुःशताब्दीच्या निमित्तानं सर्व पालखीतळांची सुव्यवस्था निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं ‘देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्रे व पालखीमार्ग विकास आराखडा’ तयार केला होता. त्यात देहू-आळंदी-पंढरपूर-भंडारा डोंगर या ठिकाणी सुविधा पुरवण्याव्यतिरिक्त पालखीतळांसाठी सुविधा पुरवण्याच्या उपक्रमाला प्राधान्य होतं. पालखीतळांसाठी सद्यपरिस्थितीत सुविधा पुरवताना पाणी, स्वच्छतागृहे, भक्तांची राहण्याची व्यवस्था, वीज, अग्निशमनव्यवस्था, रस्ते, सुरक्षा व वैद्यकीय सेवा या मूलभूत बाबी अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला.

सर्व पालखीतळांपैकी २३ ठिकाणी पालख्यांच्या मुक्कामाची व्यवस्था असते. उरलेली ठिकाणं रिंगणासाठी किंवा दुपारच्या विसाव्यासाठी आरक्षित आहेत. संत तुकाराममहाराजांच्या पालखीमार्गावर पुणे, लोणीकाळभोर, यवत, वरवंड, उंडवडी, बारामती, सणसर, लासुर्णे, निमगावकेतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी व पंढरपूर ही स्थानकं असतात.

संत ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वेल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, पुरंदरवड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव या ठिकाणी विसावत वाखरीला पोहोचते.

वाखरीला तिन्ही व इतर पालख्या एकत्र होऊन पंढरपूरला अंतिम टप्प्यात पोहोचतात. पालखीतळांच्या सुव्यवस्थेत आराखड्यांची व्यवस्था करण्यासाठी दोन स्तरांच्या समित्यांची स्थापना वास्तुविशारद सल्लागारांसह करण्यात आली. ‘पालखीतळ शिखरसमिती’त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निरनिराळ्या स्तरांवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह देवस्थानप्रमुख, पालखीसोहळाप्रमुख, पालखीचोपदार, दिंडीसंघटना व आमदार यांचा समावेश आहे.

स्थानिक स्तरावरील व्यवस्थापन समितीत प्रांताधिकाऱ्यांपासून स्थानिक प्रशासन, पालखीचोपदार, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीजव्यवस्था, सरपंच व नगराध्यक्ष अशा विविध यंत्रणांसह महत्त्वाच्या प्रतिनिधींचा समावेश असतो.

प्रत्यक्ष पालखीच्या विसाव्यासाठी मधोमध कट्टा व दोन हजार क्षमतेची भजन-कीर्तनासाठी जागा आहे. सभामंडप-उभारणी आवश्यकतेनुसार करण्यात आली; जेणेकरून वर्षातील इतर वेळी स्थानिक समारंभासाठी त्याचा वापर ग्रामस्थ करू शकतात.

संत तुकाराममहाराजांच्या पालखीविसाव्यासाठी अष्टकोनी कट्टा काळ्या घडीव पाषाणात बांधण्यात आला आहे. महाराष्ट्राची पारंपरिक मंदिरंही काळ्या पाषाणाशी निगडित आहेत. तेव्हा, पालखीविसावा हा आधुनिक काँक्रिटमध्ये न करता काळ्या पाषाणातच तयार करण्यात आला.

त्याच्यासमोर भजनासाठी दगडी बैठकीची व्यवस्था करण्यात आली. पालखीसोहळ्याच्या विश्वस्तांसाठी राहण्याची जागा व स्वयंपाकघरासह पालखीतळावर मुक्कामी असलेल्या मुख्य पालखीसमवेत असणाऱ्या किमान २५ दिंड्यांच्या राहण्यासाठी मुरमाची आखीव जमीन आखणं आवश्यक असतं. अडीच हजार लोकांसाठी ५०० शौचालयं, तसंच आंघोळीसाठी एक हजार नळांचं तात्पुरतं न्हाणीघर यांची व्यवस्था असते. ५० हजार लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करावं लागतं.

संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या ४२५ दिंड्या, प्रत्येक दिंडीसमवेत त्यांचं सामान वाहून नेणारे दोन ट्रक, दोन टेम्पो असतात. माउलींची पालखी परंपरेप्रमाणे शितोळे सरकारांच्या तंबूत विसावते. पालखी विसावते तेव्हा त्यांच्या राहुट्या ट्रकच्या भोवती पडतात व तिथंच त्यांची भोजनव्यवस्था असते.

या सर्वांसाठी आरक्षित जागांचे आराखडे त्यांच्या संख्येनुसार बनवावे लागतात. पालखी विसावते तेव्हा ग्रामस्थांची वेगळी दर्शनबारी तयार होते. सर्व दिंड्या पालखीतळावर मुक्काम करतात असं नाही. प्रमुख दिंड्या मुक्काम करून इतर गावांत अन्यत्र विसावतात. अशा चालत्या-बोलत्या विसाव्याचं स्थलांतर झाल्यावर मागं अस्वच्छता, जंतुसंसर्ग, रोगराई, कचरा यांमुळे मूळ ग्रामस्थांना त्रास होऊ नये याकरिता एका दिवसासाठी प्रभावी यंत्रणेची व्यवस्था आधीपासून केली जाते.

जागेवर रात्रीच्या वेळी भरपूर प्रकाश असावा यासाठी जास्त प्रकाशमान दिव्यांची तात्पुरती सोय करण्यासाठी मूळ सुविधा उपलब्ध करण्याचा अंतर्भाव आराखड्यात आहे. पालखीतळावर स्वच्छतागृहांची सोय ही सर्वात महत्त्वाची बाब असते. वर्षभर त्यांचा वापर नसल्यामुळे आवश्यक तेवढी स्वच्छतागृहं बांधून इतर मोठ्या संख्येनं लागणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छतागृहांची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था केली जाते.

प्रत्येक दिंडीत किमान २० लोकांचा एक अशा २० तंबूंची सोय असते. गरजेनुसार तंबूंची संख्या वाढत जाते. वाखरी इथं जेव्हा सर्व पालख्या एकत्र जमतात तेव्हा सुविधांचं प्रमाणही वाढतं. पालखीतळांची सोय करताना अस्तित्वातील जमिनीचा पोत अभ्यासून त्यानुसार सुविधांचा ढाचा बदलतो. या सर्व जमिनी शेतीसाठी वापरल्या जात असल्यानं त्यामध्ये बऱ्याचदा काळी भुसभुशीत शेतजमीन, नाले, ओढे यांचा विचार करून डांबरी रस्त्यांचं, मुरमाचं नियोजन करावं लागतं. तसं ते करण्यात आलं.

पावसाळ्यामुळे जागेवर चिखल न होता जागा वापरण्यायोग्य असण्याच्या दृष्टीनं नियोजन करावं लागतं. लाल माती पावसाचं पाणी पिऊन फुगते व अशा वेळी पालखीचे ट्रक फसण्याची शक्यता असते; म्हणून रस्त्यांसाठी दगडी चुऱ्याचे भराव टाकण्यात येतात. प्रत्येक पालखीचं काटेकोर वेळापत्रक तयार असतं. जागा निश्चित असतात. त्यात सुसूत्रता आणणं हा नियोजनाचा भाग आहे. सर्व व्यवस्थेला सरकार पाठबळ देण्याचा प्रयत्न करतं; परंतु त्यात स्थानिक दानशूरांचं पाठबळही मोठं असतं. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था पालखीतळाव्यतिरिक्त वाडे, शाळा, घरे आदी ठिकाणी केली जाते.

या सुविधांची जुळवाजुळव २३ ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं करताना त्याचे आराखडे, दरपत्रकं प्रशासनातील यंत्रणेशी संपर्क साधून त्याविषयीची प्रक्रिया करण्यात आली. अनेक व्यक्तींचा सहभाग असलेली ही कृती करताना तीत अनेक वेळा कसरतही करावी लागते. वास्तविक, वारीच्या व्यवस्थेचे आराखडे तयार करताना वास्तुविशारदांसाठी संपूर्ण पालखीतळाचं व्यवस्थापन समजून घेणं व त्यासाठी २३ ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार आराखडे तयार करणं हा तीन वर्षांचा सलग अनुभव वारी चालून जाण्याइतकाच प्रभावी होता.

प्रशासनातील विविध विभाग, दिंड्यांचं व्यवस्थापन, ग्रामस्थ व सल्लागार यांच्या या एकत्रित ‘दिंडी’च्या दोन वर्षं किमान ५५ बैठका, स्थळपाहणी, सादरीकरण, पडताळणी अशा सगळ्या बाबींमुळे भविष्यातील वारीव्यवस्था सुकर होईल हे निश्चित. ‘ग्यानबा-तुकाराम’ असा गजर करत गावागावातून जाणारी वारी मोहक दिसते खरी! रंगांची, निरनिराळ्या खेळांची उधळण करणारी ही वारी छायाचित्रकारांसाठी तर पर्वणीच; पण तिचं व्यवस्थापन ही यंत्रणेसाठी मोठीच कसरत असते.

ती पार पाडताना विविध विभाग कार्यरत होतात आणि तरीही ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्यांमुळे त्रुटी राहून जातात. पर्यटनाची कुठलीच स्वप्नंसुद्धा बघणं अशक्य असलेल्या विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथल्या गरीब शेतकरी-ग्रामस्थांना दैनंदिन जीवनापासून काही दिवस दूर होत वेगळेपणाचा अनुभव देणारी, पायी पायी चालत भक्तिमार्गानं बदल घडवणारी वारी ही संतांनी घालून दिलेली गोरगरिबांसाठीची व्यवस्था आहे... शेतीतून हाती लगलेल्या कमाईला मोहापासून सुरक्षा देणारा सन्मार्ग आहे.

‘बदल’ हे जीवनाची बॅटरी चार्ज करणारं ॲप आहे... ही गुरुकिल्ली आमच्या संतांनी फार वर्षांपूर्वी ओळखून त्याचं साधं-सोपं बीज रुजवलं...आणि या वारीला परमार्थाची जोड देत निसर्गाच्या सान्निध्यात ऊन-पाऊस-वाऱ्यातून आनंददायी केलं. तिची ओढ कमी न होता लोकप्रियता वाढीला लागली. ‘चंद्रभागे स्नान विधि तो हरिकथा। समाधान चित्ता सर्वकाळ’ अशी विठ्ठलाच्या भेटीची आस लावणारी वारी ही केवळ अनुभूती आहे;

पण त्यासाठी करावी लागणारी व्यवस्था ही मात्र कार्यतत्पर कृती होय. प्रशासन, स्थानिक जनता यांच्या सहकार्यानं वारीव्यवस्थापन करताना त्रुटी राहतात...तर दरवर्षी नवीन आव्हानांनाही सामोरं जावं लागतं. या सगळ्याचा मेळ साधत उत्तम सुविधांची वारी होण्यास कदाचित अजून थोडा वेळ द्यावा लागेल. 

(लेखिका वास्तुविशारद व नगरविन्यासकार असून, जतन-संवर्धनक्षेत्रात कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com