esakal | ग्रामविकासासाठी गावाकडे चला !

बोलून बातमी शोधा

ग्रामविकासासाठी गावाकडे चला !
ग्रामविकासासाठी गावाकडे चला !
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्रत्येक माणसाने प्रपंच करणे चुकीचे नाही. फक्त स्वतःचा छोटा प्रपंच करताना त्या जोडीने गावाचा मोठा प्रपंचसुद्धा करावा. मोठ्या प्रपंचात खरा आनंद असतो. छोट्या प्रपंचात दुःख असते. कारण, छोट्या प्रपंचामध्ये सर्व माझे असते आणि त्या माझ्यामागेच दुःख लपलेले असते. गाव हाच प्रपंच मानून मोठा प्रपंच केला, तर माझं काहीच नसतं. त्यामुळे सर्व आनंद असतो.

म हाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. या ६१ वर्षांत राज्यात आणि देशात विविध क्षेत्रांत अनेक कार्यकर्त्यांनी प्रगतीची मोठी झेप घेतली. असे असले तरी काही निवडक कार्यकर्त्यांनी ग्रामविकासामध्ये राज्याला आणि देशाला एक नवी दिशा देण्याचे बहुमोल असे कार्य केले आहे. महात्मा गांधींनी म्हटले होते की, खेड्याकडे चला! तुम्हाला देश बदलावयाचा असेल तर अगोदर गाव बदलावे लागेल. गावे बदलल्याशिवाय देश खऱ्याअर्थाने बदलणार नाही. खेड्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही.

हेही वाचा: शेतकरी, कामगारच विकासाचे इंजिन

निसर्ग आणि मानवतेचे शोषण न करता केलेला विकास हाच खरा शाश्वत विकास आहे. निसर्गाचे शोषण करून केलेला विकास हा विनाशाकडे घेऊन जाणारा आहे. तो दीर्घकाळ टिकणारा नसून, तात्पुरता असतो. स्वातंत्र्यानंतर आम्ही विविध क्षेत्रांत विकास केला आहे. पण, आज आपण पेट्रोल, डिझेल, कोळसा जाळून विकासाचे स्वप्न पाहत आहोत. असा विकास शाश्वत असणार नाही. तो कधीतरी विनाशकारी ठरेल.

हजारो, लाखो टन कोळसा, पेट्रोल, डिझेल जाळून आपण विकासाचे स्वप्न पाहत आहोत. मात्र, त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत चालले आहे. त्यामुळे माणसांचे आजार वाढत चालले आहेत. त्याचप्रमाणे अनेक राज्यांचे उष्णतामानही वाढते आहे. त्यामुळे बर्फ वितळत चालला आहे. बर्फाचे वितळणारे पाणी समुद्रात जात आहे. त्यामुळे समुद्राकाठच्या शहरांना भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता वाढत चालली आहे. जगातील वैज्ञानिकांनी म्हटले आहे, येणाऱ्या ८० ते ९० वर्षांमध्ये समुद्रकाठच्या शहरांना धोके निर्माण होणार आहेत.

भाकरीचा प्रश्न गावातच सुटेल

ग्रामविकासासाठी निसर्गाचे शोषण करण्याची गरज नाही. प्रकृतीने दिलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण योग्य पद्धतीने व जपून वापर करणे गरजेचे आहे. ही नैसर्गिक साधनसंपत्ती कधी ना कधी संपणार आहे. याचा विचार समाजाने केला पाहिजे. दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग करून शेतीचा विकास केला तर हाताला काम आणि भाकरीचा प्रश्न गावातच सुटू शकेल. शेतीच्या विकासामुळे गावातील प्रत्येक माणसाच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटेल व तसे झाले तर खेड्यातील तरुणांना शहराकडे धाव घेण्याची वेळ येणार नाही. आज आपण कोरोनाच्या साथीमुळे अनुभव घेत आहोत की, बेरोजगारीमुळे पूर्वी गाव सोडून शहरांकडे गेलेल्या लाखो लोकांचे लोंढे शहरातील रोजगार बंद झाल्यामुळे रेल्वे, पायी, बसद्वारे आपल्या गावांकडे परतत आहेत. हे करताना त्यांना अनंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

इमारतींचीच उंची वाढली

स्वातंत्र्यानंतर अनेकांनी ग्रामविकास कार्यक्रमांचे काही प्रयोग केले. त्यातून खेड्यातही हाताला काम, दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न गावात सुटू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खेड्यातील तरुणांना शहराकडे जाण्याची गरज पडली नाही. उलट, पूर्वी शहराकडे गेलेली माणसे गावाच्या विकासामुळे पुन्हा गावाकडे आलेली आपण पाहात आहोत. स्वातंत्र्यानंतर आम्ही ग्रामविकासाचा विचार न करता फक्त शहरांच्या विकासाचा विचार केला आणि त्याचा परिणाम शहरात उंच इमारती उभ्या राहिल्या. शहरातील या इमारतींची उंची दिवसेंदिवस वाढत गेली आणि माणसांची वैचारिक पातळी खाली येत गेली.

हेही वाचा: "शहरी गर्दीत नको...आता गावाकडे चला' 

सुपीक माती, जल नियोजन हवे

शाश्वत ग्रामविकास हा गावाच्या सुपीक माती आणि पावसाच्या पाण्याच्या योग्य नियोजनावर अवलंबून आहे. म्हणून पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब गावात कसा राहील, याचा विचार करणे आवश्यक आहे. मात्र, पावसाच्या पाण्याबरोबर आज गावातील हजारो टन सुपीक माती बाहेर वाहून जात आहे. ती सुपीक माती पुढे तलाव, धरणे, नद्यांमध्ये साठते आहे. त्या मातीच्या पुढे वीटभट्ट्या तयार होतात. त्या वीटभट्ट्यांच्या आधाराने उंच इमारती उभ्या राहात आहेत. त्यातून ही सिमेंटची जंगले उभी झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याचबरोबर ग्रामविकासासाठी वापरात आणणारी सुपीक माती नद्यांमधून मोठ्या धरणांमध्ये साचत जाऊन धरणे मातीच्या गाळाने भरत चालली आहेत. धरणे बांधण्यासाठी काही मर्यादा आहेत; पण शहरांकडे जाणाऱ्या माणसांच्या लोंढ्याला मर्यादा नाहीत. कालांतराने शहरातील वाढत जाणाऱ्या माणसांच्या लोकसंख्येमुळे शहरातील पिण्याचा आणि औद्योगिक क्षेत्राला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील लोकांनी ग्रामविकासासाठी गावाकडे यायला हवे. जेणे करून तेथे आपल्या हाताला काम मिळेल व भाकरीचा प्रश्न सुटू शकेल.

गाव हाच आपला परिवार

ग्रामविकासामध्ये सामूहिकतेची भावना आहे. गावातील लोक आजही लाखो रुपयांची ग्रामविकासाची कामे एकजुटीने करतात. त्या कामांमध्ये आपलेपणाची व आपुलकीची भावना असते. त्यामुळे अनेक गावे ‘गाव हाच आपला परिवार’ अशा भावनेने एकत्र येऊन कामे करताना दिसतात. या गोष्टी शहरात दिसणार नाहीत. त्यामुळे शहरात विषमता वाढताना दिसते. त्यासाठी ग्रामविकास हाच एक पर्याय आहे. विकासाचे कार्य करताना गरीब आणि श्रीमंत यांच्यातील विषमतेची दरी वाढू नये, त्यासाठी ग्रामविकास हा खरा पर्याय ठरू शकतो. आम्ही भौतिक विकास खूप केला; पण तो आभासी आहे. त्यामुळे माणसाची फक्त भूकच वाढली मूळे समस्या आहे तिथेच राहिल्या.

हेही वाचा: नागरीकरणाची गाडी सुसाट

गावाचे नेतृत्व महत्त्वाचे

गावाच्या प्रत्येक माणसाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मी माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी जगेन; पण माझ्या परिवारातील काही वेळ गावासाठी देईन, असा विचार करणारी माणसं समाजात तयार होणे गरजेचे आहे. आज दिवसेंदिवस ‘मी आणि माझं’ या पलीकडे माझा गाव, माझा समाज, माझा देश याचा विचार करायलाच माणसे तयार नाहीत. ही स्थिती पाहून मनात प्रश्न निर्माण होतो की, अशा अवस्थेत कसा उभा राहणार गाव, समाज आणि देशाचा शाश्वत विकास? असा माणूस निर्माण होण्यासाठी गावाचे नेतृत्व ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. गावाचे नेतृत्व करणारी जी माणसं असतात, त्यांच्याकडे गावातील मुलं, युवक-युवती आणि इतर कार्यकर्ते पाहत असतात. आमचे नेते आम्हाला विकासाबाबत खूप ज्ञान सांगतात. ग्रामविकासाच्या गोष्टी सांगतात; पण कथनीप्रमाणे करणी म्हणजे वागणे आवश्यक आहे. त्याचा अभाव असल्यामुळे गावातील लोकांवर त्यांच्या शब्दाचा प्रभाव पडत नाही. कारण, गावचे लोक त्या नेत्याकडे पाहत असतात की, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो काय खातो, काय पितो, कसा बोलतो याकडे लोकांचे लक्ष असते. म्हणून संत तुकडोजी महाराज म्हणतात की, ‘पुढारी गावी जो जो करी। गावचे लोक तैसेची वागती घरोघरी।।’ म्हणोनी याची जबाबदारी पुढाऱ्यावरती. त्या पुढाऱ्याचे आचार व विचार शुद्ध आहेत का, जीवन निष्कलंक आहे का आणि त्याच्या जीवनात त्याग आहे का? हे लोक सतत पाहतात. तसे असेल तरच त्या पुढाऱ्याच्या शब्दांना वजन प्राप्त होते. म्हणून ग्रामविकासामध्ये गावच्या पुढाऱ्याची फार मोठी जबाबदारी असते. चारित्र्य आणि त्याग या बाबी फार महत्त्वाच्या असतात. भारताची आणि महाराष्ट्राची परंपरा आहे की, ग्रामविकास करावयाचा असेल तर त्याने त्याग हा करावाच लागतो.

त्याग करावाच लागतो

शेतामध्ये दाण्याने भरलेली भरघोस कणसं दिसतात; पण त्यासाठी आधी एका दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. त्याग करावा लागतो, मग अनेक दाण्याने भरलेली भरघोस कणसं शेतात दिसतात. एका दाण्याने जमिनीत गाडूनच घेतले नाही तर ही कणसं पाहायला मिळणार नाहीत. याउलट, जे दाणे जमिनीत गाडून घेत नाहीत ते दाणे पिठाच्या गिरणीत जातात आणि त्यांचे पीठ होते व ते नष्ट होऊन जातात. भगवद्‌गीता सांगते की, ‘त्यागात शांती निरंतरम्’. त्यागात शांती असते आणि भोगात रोग असतो. मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष अनुभव करतो आहे की, जीवनात फक्त थोडा त्याग केला. मला कोटी रुपयांचे अमेरिका, दक्षिण कोरिया, कॅनडा यांसारख्या देशांकडून पुरस्कार मिळाले. ते मी माझ्या जवळ ठेवले नाहीत, समाजासाठी अर्पण केले. त्यामुळेच लखपती, करोडोपतींना जो आनंद मिळत नसेल, तो आनंद मला मिळत आहे. आज मी तो प्रत्यक्ष अनुभवतो आहे.

( अण्णा हजारे : लेखक ज्येष्ठ समाजसेवक व ग्रामविकासाचे प्रणेते आहेत.)

(शब्दांकन ः मार्तंड बुचुडे)