आप की नजरों ने समझा...

आप की नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात शिक्षणाचा नुकताच प्रसार सुरू झाला होता असा तो काळ. एकीकडं सामान्य माणसाला शिक्षणाचं महत्त्व पटायला सुरुवात झाली होती.
आप की नजरों ने समझा...
आप की नजरों ने समझा...Sakal

- डॉ. कैलास कमोद

आप की नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात शिक्षणाचा नुकताच प्रसार सुरू झाला होता असा तो काळ. एकीकडं सामान्य माणसाला शिक्षणाचं महत्त्व पटायला सुरुवात झाली होती. शिक्षण घेऊन आपण आपला सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक दर्जा उंचावू शकतो‌ असा आशावाद सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला होता, तर दुसरीकडं सावकारी किंवा व्यापारीवर्गातल्या धनवान शेठजींना शिक्षण घेणं कमीपणाचं वाटत होतं.

‘शिक्षण हे निम्नस्तरीय! ते आपलं काम आपलं नाही...ते कनिष्ठांनी करावं...आपल्या पोरांनी आपल्या पेढ्या सांभाळाव्यात’ अशी बहुतेक धनवानांची वृत्ती असायची. अशा परिस्थितीत मग स्त्रीशिक्षणाचा तर विचारच नको. ‘स्त्रियांना काय करायचंय शिक्षण?

त्यांनी घरात बसावं...चूल सांभाळावी...पोरं-बाळं जन्माला घालून त्यांना वाढवावं...चांगल्या चांगल्या साड्या नेसून, दागदागिन्यांनी स्वत:ला मढवून सणासुदीला किंवा लग्नसमारंभात बड्या घरची लेक/सून म्हणवून घेत मिरवावं...’ असा विचार स्त्रियांविषयी करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात असे.

अशाच एका धनवान कुटुंबातली रूपसुंदर तरुणी ‘अनपढ’ राहिली ती तिच्या भावाच्या अशा विचारांमुळे. एका चांगल्या घरातल्या उच्चशिक्षित तरुणाशी तिचा विवाह पार पडला. अर्थातच मुलगा आणि मुलगी यांनी एकमेकांना लग्नाआधी पाहण्याचा किंवा पालकांनी त्यांची मतं जाणून विवाह निश्चित करण्याचा तो काळ नव्हता.

मुलाच्या आई-वडिलांनी फक्त मुलगी पाहिली आणि तिच्या भावाशी परस्पर बोलणी करून आपल्या शिकल्या-सवरलेल्या मुलाबरोबर तिचं लग्न ठरवलं. ‘माता-पित्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही...ते करतील ते योग्य असेल’ असा त्या काळचा रिवाज असल्यानं मुलानं ते लग्न मान्य केलं.

प्रत्यक्षात लग्नानंतर ‘ती’ सासरी आली तेव्हा मुलाच्या लक्षात आलं की, दागिन्यांनी मढलेली ही मुलगी सुंदर असली तरी तिला ‘क-ख-ग’सुद्धा वाचता येत नाही...ती ‘अनपढ’आहे. आपल्या गळ्यात अशिक्षित स्त्री पत्नी म्हणून बांधली गेली अशा विचारानं तो पत्नीचा तिरस्कार करू लागला.

तिचा काही दोष नसूनही मानहानी सहन करत ती खालमानेनं संसार रेटू लागली. पुढं आयुष्यात असा काही घटनाक्रम घडला की, त्यानं समाधानानं तिचा स्वीकार केला. तशी ती उत्स्फूर्तपणे म्हणाली :

आप की नजरों ने समझा

प्यार के काबिल मुझे

दिल की ए धडकन, ठहर जा

मिल गई मंज़िल मुझे

त्या प्रसंगाला उचित असं हे गाणं लिहिताना गीतकार राजा मेहदी अली खाँ यांनी समर्पक शब्दरचना केली आहे. ‘दिल की ऐ धडकन, ठहर जा...मला हवं होतं ते प्राप्त झालंय. आतातरी माझ्या उरातली धडधड थांबू दे.’

दर्यावरच्या तुफानात सापडलेल्या नौकेला किनारा मिळाला जणू अशी आपली मनोवस्था ती वर्णिते.

आप की मंज़िल हूँ मैं, मेरी मंज़िल आप है

क्यूँ मैं तूफाँ से डरूँ? मेरा साहिल आप है

कोई तूफानों से कह दे, मिल गया साहिल मुझे

आप की नज़रों ने...

तुझ्या प्रेमाची छत्रछाया माझ्यावर आहे आणि जिकडं तिकडं सनईचे मंजूळ ध्वनी निनादत असून ते कानात रुंजी घालू लागले आहेत.

पड गयी दिल पर मेरे आप की परछाईयाँ

हर तरफ बजने लगी सैंकडों शहनाईयाँ

दो जहाँ की आज खुशियाँ हो गई हासिल मुझे

आप की नज़रों ने...

पतीकडून समाधान आणि आनंद प्राप्त झालेल्या पत्नीच्या संवेदना राजा मेहदी अली खाँ यांनी फार छान लिहिल्या आहेत; पण गाणं कमालीचं श्रवणीय करण्याची किमया साधली आहे ती संगीतकार मदनमोहन यांच्या संगीतानं.

‘अडाणा’ आणि ‘दरबारी’ अशा संमिश्र रागांत बांधलेली गाण्याची चाल तर गोड आहेच; पण मंद मंद सुरांतली वाद्यरचना तो गोडवा अधिक वाढवते. सुरुवातीला इन्ट्रो-म्युझिकला मेंडोलिनचे तरंग येतात.

दोन अंतऱ्यांच्या मध्ये इंटरल्यूडला मेंडोलिनच्या जोडीला व्हायोलिनची अप्रतिम सुरावट आणि ॲकॉर्डियनचा पीस या बाबी फार मजा आणतात. विशेष म्हणजे, बॅकग्राऊंडला तबला न वापरता बोंगोचा हलकासा ठेका आणि तंतुवाद्य फार मस्त. मदनमोहन यांची अशी गाणी आजच्या पिढीलासुद्धा वेडावून टाकणारी का आहेत ते अशा गाण्यांमुळे लक्षात येतं.

...आणि लता मंगेशकर! त्यांच्याशिवाय या गाण्यासाठी इतर कुणाचा विचारही मनाला शिवू शकत नाही. त्यांच्या गायकीतली सौंदर्यस्थळं वर्णनापलीकडची आहेत. ती ऐकणाऱ्यांच्या लक्षात येतातच. संगीतकारानं फक्त चाल सांगितली...बाकी आलाप, ताना,

आरोह-अवरोह सगळं सगळं लता मंगेशकर यांचं स्वत:चं! त्यांचं मदनमोहन यांच्याशी असलेलं ट्यूनिंगच तसं होतं. लता मंगेशकर यांच्या अत्युत्कृष्ट गीतांपैकी एक हे गीत.

नजर खाली झुकवत लज्जित मुद्रेनं आपल्या पतीविषयीची उपकृततेची भावना व्यक्त करत माला सिन्हानं सुंदर अभिनय केला आहे. पतीच्या सहवासापासून वंचित अशी ती विरहिणी आहे. दीर्घ कालावधीनंतर पतीचा सहवास लाभल्यानं निर्माण होणारी कामुक भावना तिच्या नजरेतून व्यक्त करत शृंगाररसात्मक अभिनयाचा सुंदर आविष्कार तिनं दर्शवला आहे.

एका जुन्या मराठी गाण्‍यामधली अभिसारिका म्हणते :

तुझ्याचसाठी राजसा

मी विनवणी करते थांब ना

माझी रातदिन झुरते काया

तुझ्या मूठभर पैशासाठी रे

माझी लाखाची प्रीत जाई वाया

या ओळीतल्या भावनेनुसारच प्रीतीसाठी झुरणारी अभिसारिका असावी अशा तऱ्हेचा अभिनय माला सिन्हानं केला आहे. गाण्याचा बहुतांश भाग तिच्या चेहऱ्याच्या क्लोजअपवर चित्रित केला गेल्यानं तिनं नजरेतूनच अभिनय सुंदररीत्या व्यक्त केला आहे. शुभ्र साडीत ती दिसतेही सुंदर. कपाळावरचं ठसठशीत कुंकू तिच्या सौंदर्यात भर घालतं.

कोरा चेहरा घेऊन वावरणारा धर्मेंद्र तिच्या समोर अगदीच नवखा वाटतो. पूर्वी बंगलेवजा घरांच्या गच्चीवर दिसणारी मोठ्या चौकडीची बांबूची जाळी आणि तीवर चढलेल्या वेली बॅकग्राउंडला दिसतात. हे त्या काळचं नेपथ्य शोभून दिसतं. गीत, संगीत आणि स्वर यांचा अप्रतिम मिलाफ असलेलं हे श्रवणीय गीत.

या गीतासाठी लता मंगेशकर यांना त्या वर्षीचं ‘बेस्ट सिंगर फिल्मफेअर ॲवार्ड’ मिळालं होतं. ‘जिया ले गयो जी मोरा साँवरिया’ किंवा ‘है इसी में प्यार की आबरू...

वो जफा करे, मैं वफा करूँ’ यांसारखी आणखी छान गाणी देणाऱ्या मदनमोहन यांना मात्र संगीतदिग्दर्शकासाठीचं पारितोषिक मिळालं नाही. खरं तर मदनमोहन आणि लता मंगेशकर या कॅाम्बिनेशनचं मास्टरपीस म्हणावं असं हे गाणं आहे.

महात्मा फुले यांनी दाखवून दिलेल्या मार्गानुसार स्त्रीशिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक मोहनकुमार यांनी ‘अनपढ’ या चित्रपटातून केला होता. वर्ष होतं १९६२.

प्रजासत्ताकदिनाच्या दुसऱ्या दिवशी, २७ जानेवारी १९६३ रोजी, दिल्लीत स्टेडियमवर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या उपस्थितीत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संगीतकार मदनमोहन यांनी लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणं लाईव्ह सादर केलं होतं.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com