esakal | चांदोली : दऱ्या-खोऱ्यांच्या जंगलात...
sakal

बोलून बातमी शोधा

अशा रानगव्यांसाठी ‘चांदोली’ प्रसिद्ध आहे. (छायाचित्र : करणराज गुजर)

रानभूल
भारत हा निसर्गसंपदेनं नटलेला देश आहे. भाषा, पेहराव, भौगोलिक प्रदेश, यांबरोबरच इथं जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर आहे. गुजरात राज्यात सुरू होऊन तामिळनाडूपर्यंत पसरलेला पश्चिम घाट हे तर भारताला लाभलेलं निसर्गदेवतेचं वरदानच. अत्यंत दुर्मिळ वनस्पती, झाडं, पशू-पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या वास्तव्याचं ठिकाण.

चांदोली : दऱ्या-खोऱ्यांच्या जंगलात...

sakal_logo
By
अनुज खरे informanuj@gmail.com

भारत हा निसर्गसंपदेनं नटलेला देश आहे. भाषा, पेहराव, भौगोलिक प्रदेश, यांबरोबरच इथं जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर आहे. गुजरात राज्यात सुरू होऊन तामिळनाडूपर्यंत पसरलेला पश्चिम घाट हे तर भारताला लाभलेलं निसर्गदेवतेचं वरदानच. अत्यंत दुर्मिळ वनस्पती, झाडं, पशू-पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या वास्तव्याचं ठिकाण. याच पश्चिम घाटात महाराष्ट्रातील एक व्याघ्रप्रकल्प आहे व तो म्हणजे ‘सह्याद्री व्याघ्रप्रकल्प.’ राज्यातील सहा 
व्याघ्रप्रकल्पांपैकी पश्चिम महाराष्ट्रात असणारा एकमेव व्याघ्रप्रकल्प. चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य मिळून सुमारे ६००.१२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हा व्याघ्रप्रकल्प पसरलेला आहे. या नितांतसुंदर व्याघ्रप्रकल्पातील चांदोली धरणाच्या काठी असणारं ‘चांदोली राष्ट्रीय उद्यान’ हा या दऱ्या-खोऱ्यांच्या जंगलाला लाभलेला अनमोल ठेवा.

सन १९८५ मध्ये या जंगलाला अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यात वारणा नदीवर चांदोली हे धरण बांधलेलं आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात हे चांदोली जंगल पसरलेलं आहे. पुढं २००४ मध्ये या अभयारण्याच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली आणि ३१७.६७ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत पसरलेलं असून, जंगलाचा काही भाग सातारा आणि रत्नागिरी याही जिल्ह्यांत येतो. प्रचितगड हा सुप्रसिद्ध किल्ला या राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात आहे. २०१० मध्ये जंगलाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला. जास्त संख्या असलेल्या भागातून वाघांचं पुनर्वसन करायचं झाल्यास चांदोली राष्ट्रीय उद्यान हे या प्रकल्पासाठी अनुकूल असं जंगल ठरेल. गव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चांदोलीला जैवविविधतेची देणगीही मोठ्या प्रमाणावर लाभली आहे.   

रांगड्या सह्याद्रीच्या अस्तित्वामुळे डोंगराळ भागातून आपल्याला निसर्गभ्रमंती करावी लागते. एकदा आपण चांदोलीच्या जंगलात प्रवेश केला की कच्च्या रस्त्यावरून भ्रमंतीला सुरुवात करावी लागते. रस्त्यावरची बहुतेक झाडं अंजनीची आहेत. इथं सुरुवातीला अनेक गावं होती. आता या गावांचं जंगलाबाहेर पुनर्वसन झालं आहे. त्यामुळे इथे मोठी गवताळ मैदानं तयार झाली आहेत. या मैदानांवर मान्सून आणि नंतरच्या काळात गव्यांचे मोठे कळप बघायला मिळतात. याच गवताळ प्रदेशात एक वॉच टॉवर आहे. टॉवरच्या मागं आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याला नाव पडलं आहे ‘जनीचा आंबा’. इथून पुढं एक रस्ता झोळंबी नावाच्या ठिकाणी जातो. इथं मोठा, लांबलचक पठाराचा भाग आहे. याला सडा म्हणतात. या सड्यावर मान्सूनमध्ये निरनिराळी फुलं उमलतात आणि संपूर्ण प्रदेश - कासच्या पठारासारखा - फुलांनी फुलून जातो. तुम्ही उन्हाळ्यात या चांदोलीत गेलात तर रानमेवा म्हणजे जांभळं, करवंदं, तोरणं, डोंबलं खात जंगलभ्रमंती करू शकता. जंगलात फिरताना आपल्याला अर्थातच गाईड सोबत घ्यावाच लागतो. वनविभागाच्या उत्तम संरक्षणामुळे हा संपूर्ण संरक्षित प्रदेश नंदनवन बनलेला आहे.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

शेकरू, सांबर, गवा, अस्वल, बिबट्या, भेकर, पिसोरी अशा सस्तन प्राण्यांबरोबर वाघाचंही दर्शन कधीतरी या जंगलात घडू शकतं. उंच-सखल भागामुळे वाघ या जंगलात फार मोठ्या संख्येनं नाहीत; पण जंगलात सध्या असणारे वाघ याच जंगलात राहावेत म्हणून वनविभागाचे खूप प्रयत्न सुरू आहेत. पाणी, गवताळ प्रदेश आणि त्या गवताळ प्रदेशावर अवलंबून असणारे शाकाहारी प्राणी या वाघांसाठी जंगलात आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी. त्यावर वनविभाग इथं मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. पक्षीप्रेमींसाठी चांदोली म्हणजे तर पर्वणीच. तुरेवाला सर्पगरुड, शिक्रा, मोहोळ घार, कापशी घार यांसारखे शिकारी पक्षी, इंडियन स्कॉप्स आउल, पिंगळा, हुप्पो, माळटिटवी, तितर, हळद्या, सुतारपक्षी, कोतवाल, ककणेर असे अनेक पक्षी इथं पाहायला मिळतात.

इथं भ्रमंती करताना वाघ दिसणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखंच असतं! मात्र, इथं बिबटे मोठ्या संख्येनं आहेत, त्यांचं दर्शन मात्र नक्कीच होऊ शकतं. चांदोलीच्या या निबिड वनात काळ्या बिबट्याच्या अस्तित्वाचीही नोंद झाली आहे. या जंगलात वनविभागानं एक छान नेचर ट्रेल तयार केला आहे. विविध प्रकारची झाडं, पक्षी, कीटक या नेचर ट्रेलवर दिसू शकतात. इथं फिरताना माहिती देण्यासाठी वनविभागाकडून एक गाईड दिला जातो. या मार्गावर दिसणाऱ्या विविध निसर्गघटकांची माहिती तो आपल्याला देतो. या नेचर ट्रेलवर वनविभागानं सुंदर पाणवठा तयार केला आहे. या पाणवठ्याच्या बाजूला एक वॉच केबिन आहे. पाण्यावर येणाऱ्या प्राण्यांचं, पक्ष्यांचं निरीक्षण या वॉच केबिनमधून करता येतं. समोर येणारा प्राणी अशा प्रकारच्या वॉच केबिनमधून पाहणं म्हणजे एखादा चलच्चित्रपट पाहण्यासारखं असतं.

चांदोलीतल्या दुर्गम भागामुळे या जंगलाला संरक्षणच लाभलं आहे. आपण इथल्या जंगलात आलो की एक वेगळ्या आनंदाची अनुभूती आपल्याला होते. जंगलवाचनाचे नवनवे पैलू कळत जातात. जंगल हे एखाद्या वर्तमानपत्रासारखं आपल्याला वाचता यायला हवं असं मला नेहमीच वाटतं. वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानावर जशी रोज नवीन बातमी असते, तसंच जंगलाचंही असतं. जंगलवाचन हे नित्यनवं असतं! इथं आल्यावर संध्याकाळी एखाद्या सह्यकड्यावरून समोर अथांग पसरलेलं कोकण आणि त्यातील जंगल पाहत राहणं यासारखं दुसरं सुख नाही!

कसे जाल? 
पुणे-कऱ्हाड-मणदूर-चांदोली.

भेट देण्यास उत्तम कालावधी -
ऑक्टोबर ते जून.

काय पाहू शकाल? -
सस्तन प्राणी - सुमारे २६ प्रजाती : वाघ, बिबट्या, गवा, शेकरू, सांबर, अस्वल, भेकर, पिसोरी इत्यादी.

पक्षी -
सुमारे १२५ हून अधिक प्रजातींचे पक्षी : तुरेवाला सर्पगरुड, शिक्रा, मोहोळ घार, कापशी घार, इंडियन स्कॉप्स आउल, पिंगळा, हुप्पो, माळटिटवी, तितर, हळद्या, सुतारपक्षी, कोतवाल, ककणेर इत्यादी.

सरपटणारे प्राणी -
सुमारे २० प्रजाती : इंडियन कोब्रा, रॅट स्नेक, रसेल्स व्हायपर, मगर, सरड, सापसुरळी इत्यादी.

(शब्दांकन : ओंकार बापट) 

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

Edited By - Prashant Patil

loading image