esakal | ‘सारस महोत्सवा’ चं नवेगाव बांध !
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger

‘सारस महोत्सवा’ चं नवेगाव बांध !

sakal_logo
By
अनुज खरे informanuj@gmail.com

नोव्हेंबर (१९९७) महिन्यातली ही गोष्ट आहे. किरण पुरंदरे यांचं निसर्ग शिबिर. नवेगाव बांधचे ते दिवस किरण ने सांगितलेल्या एका अनुभवामुळे आजही माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे आहेत. त्यावेळी जंगलात चालत फिरण्याची मुभा होती. शिबिरार्थीं वेगवेगळे गट करून निरीक्षणासाठी बाहेर पडायचे. विविध पक्ष्यांचे, वनस्पती, फुले, इतर वन्यजीव यांचे निरीक्षण करत करत शिबिरार्थीना जंगलातील विविध घटकांची ओळख करून देण्याचे काम केले जायचे. त्यातून अनेकांना निसर्ग वाचायची गोडी लागली. अनेक लोक निसर्गाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागले. निसर्ग निरीक्षणाला वयाचं कोणतंही बंधन नसतं. कोणत्याही वयोगटाचा माणूस एकदा का निसर्गात रमला की निसर्गाच्या रंगात हरवून जातो. नोव्हेंबरच्या ‘नवेगाव’ अभयारण्यातील त्या शिबिरातही विविध वयोगटातील शिबिरार्थी होते . तरुण हौशी मुलांसोबत अगदी केस पांढरे झालेले ‘युवक’ही आनंदाने आणि हिरिरीनं अशा शिबिरात येऊन निसर्गात रंगून जात असत. नोव्हेंबरचे ते शिबिर मात्र एका व्यक्तीमुळे आमचा कायम स्मरणात राहील. सोमण काका!!!!

सायंकाळच्या एका ट्रेलनंतर चर्चासत्र घेण्याच्या तयारीत असताना कोणाच्यातरी लक्षात आले की सोमण काका निवासाच्या ठिकाणी कुठे दिसत नाहीत. ते ज्या गटात होते त्यांच्याकडे चौकशी केली. ट्रेलला सोमण काका आले होते हे सर्वांना आठवत होते. अगदी जंगलातल्या परतीच्या वाटेवरही सोमण काकांच्या मागे असल्याल्या मुलाने त्यांना पहिले होते. मात्र एका पक्ष्याचे निरीक्षण करता करता तो मुलगा पुढे गेला. अंधार पडायला सुरुवात झाल्यावर हा गट निवासस्थानी परतला. सर्वांच्या लक्षात आलं की सोमण काका हरवलेत. तातडीने ४-५ स्वयंसेवकांना घेऊन आणि वनविभागातील काही कर्मचाऱ्यांना घेऊन किरण सोमण काकांच्या मागावर निघाला.

अंधार पसरला होता. सोमण काकांच्या नावाचा पुकारा करत सर्व जंगल तुडवत होते . तो गट ज्या मार्गाने गेला आणि ज्या मार्गाने परतला तिथला प्रत्येक भाग धुंडाळत लोक जात होती. त्यांचा आवाज सोमण काकापर्यंत पोहोचण्यात एक अडचण होती. वयाने साठीपार पोहोचलेल्या सोमण काकांना ऐकू कमी येत असे. एका ठिकाणी दोन रस्ते फुटत होते. गट ज्या रस्त्याने परतला तो रस्ता सोडून सर्वांनी मुद्दाम दुसरा रस्ता पकडला. तोंडाने सोमण काकांच्या नावाचा गजर सुरूच होतं. बेंबीच्या देठापासून सर्वजण हाका मारत होतो, “सोमण का...का...”

अचानक एका झाडावरून त्यांचा सादाला प्रतिसाद आला, ‘‘मी इथे आहे!!!’’ समोरच्या एका झाडावर सोमण काका बसले होते. भीतीने गारठून गेलेल्या काकांच्या तोंडातून एखादा शब्दच फुटत होता. कसल्यातरी पानाचं निरीक्षण करण्यासाठी सोमण काका मागे रेंगाळले आणि बरोबर दोन रस्ते फुटणाऱ्या जागेवर रस्ता चुकले. सोमण काकांच्या हातात डायरी आणि पेन होते. त्या दिवसाची देखील त्यांनी झाडावर बसून डायरी लिहिली होती. त्यात शेवट एकच वाक्य लिहिले होते, ‘‘मी हरवलो आहे. यात माझी चूक आहे. यासाठी आयोजकांना जबाबदार धरण्यात येऊ नये.’’ किरण त्यांना शोधायला गेला होता आणि त्याला ते सापडले याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण या प्रसंगाने जंगलातल्या वाटा, जंगलात फिरताना घ्यायची काळजी, अशा प्रसंगात दाखवायचे प्रसंगावधान आणि एकूण अशा शिबिरांचे आयोजन करताना घ्यावयाची दक्षता या सगळ्या गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या. निसर्गाने एक धडा शिकवला होता. तो गिरवत गिरवत नवेगावच्या जंगलात पुढची अनेक वर्ष मी भटकलो. अनेक शिबिरं आयोजित केली. अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेलं, नवेगाव बांधाच्या काठावर वसलेलं गोंदिया जिल्ह्यातील नितांतसुंदर जंगल, ‘नवेगाव’.

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचा भाग असणाऱ्या या जंगलाचे प्रशासकीय दृष्ट्या दोन भाग पडतात. सुमारे १२९.५५ चौरस किलोमीटरचे नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि सुमारे १२२.७६ चौरस किलोमीटर नवेगाव वन्यजीव अभयारण्य. १९७५ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळालेले हे जंगल सातपुडा पर्वताच्या उपरांगांमध्ये वसलेलं आहे. इटियाडोह धरण बांधून अडवलेल्या पाण्याच्या एका प्रवाहातून या नवेगाव जलाशयाची निर्मिती झाली आहे. भंडारा जिल्हा हा तळ्यांचा जिल्हा म्हणून फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. गोंड राणी दुर्गावती हिने सुमारे ३०० वर्षापूर्वी या तळ्याची निर्मिती केली असे म्हणले जाते. राजस्थानमधील उत्कृष्ट कारागीर बोलवून राणीने हे तळे बांधून काढले. पुढे आलेल्या अनेक राजवटीत या तळ्याचे अधिकाधिक संवर्धन झाले. इटियाडोह धरणाच्या निर्मितीनंतर या जलाशयाच्या क्षेत्रात अधिक भर पडली. सुमारे ११ चौरस कलोमीटर पसरलेल्या जलाशयाच्या काठावर असणाऱ्या या जंगलात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते.

नवेगाव जंगल हे प्रामुख्याने पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नानाविध प्रजातींचे पक्षी आपल्याला येथे पाहायला मिळतात. ठराविक कालावधीत काही स्थलांतरित पक्षीही येथे पाहायला मिळतात. सुमारे २०९ प्रजातींच्या पक्ष्यांनी या जंगलाला नंदनवन बनवले आहे. हिवाळ्याच्या कालावधीत येथे दिसणाऱ्या सारस पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या छबी कॅमेराबद्ध करण्यासाठी अनेक पक्षी निरीक्षक आणि वन्यजीव छायाचित्रकार नवेगाव जंगलाला हमखास भेट देतात. पक्षी अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रात फक्त नवेगावमध्ये सारस पक्ष्याची वीण होते. नवेगावच्या जंगलाचे सौंदर्य सर्वांसमोर यावे यासाठी महाराष्ट्र वनविभागाने गेल्या काही वर्षांपासून येथे ‘सारस महोत्सव’ आयोजित करण्यास सुरवात केली आहे. इतर जैवविविधताही या जंगलात आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. अनेक प्रजातींचे सरपटणारे प्राणी, उभयचर या जंगलात आपण पाहू शकतो. सुमारे २६ प्रजातींचे सस्तन प्राणीही येथे पाहायला मिळतात. वाघ, बिबट्या अशा प्राण्यांबरोबरच एका दुर्मिळ प्राण्याची नोंदही इथे सापडते. तो प्राणी म्हणजे स्लेंडर लॉरीस अर्थात लाजवंती.

जंगलाच्या संवर्धनासाठी आणि इथल्या प्राणीजीवनाच्या संरक्षणासाठी वनविभागाने चांगले प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. जंगलात असणाऱ्या अनेक नैसर्गिक जलस्त्रोतांबरोबर वनविभागाने अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे बांधले आहेत. सौरउर्जेच्या माध्यमातून या पाणवठ्यांमध्ये पाण्याची सोय वनविभागाने जंगलातील प्राण्यांसाठी केली आहे. वनविभागाच्या या प्रयत्नांमुळे इथे वन्यजीवन बहरलेले आपण पाहू शकतो. येथे वनविभागाची निवासाची व्यवस्था आहे. आता जंगलात पायी फिरण्याला बंदी घालण्यात आली आहे. सकाळ व सायंकाळ आपण जिप्सीमधून जंगल फिरू शकतो आणि इथल्या निसर्गाचा आनंद लुटू शकतो.

हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला नवेगाव बांधचा विस्तीर्ण जलाशय, दृष्टी जाईल तिथे दिसणारी हिरवळ यामुळे नवेगावचं जंगल आपल्या मनावर एक निराळी जादू करतं. आजूबाजूच्या हिरवळीचं प्रतिबिंब जलाशयात पडल्यामुळे जलाशयाचं पाणीदेखील आपल्या हिरवगार भासतं. एखाद्या कातरवेळी जंगलात पसरलेल्या नीरव शांततेत त्या साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या प्राण्या-पक्ष्यांचे निरीक्षण करताना ती शांतताही बरच काही सांगून जाते. निसर्गात फिरण्याची, निसर्ग वाचण्याची कला शिकवून जाते. हा निसर्ग वाचताना आपण आयुष्याचा नवा अध्याय लिहित असतो. माझे गुरु कै. व्यंकटेश माडगुळकर यांच्या तोंडून मी अनेकदा या जंगलाचे वर्णन ऐकले आहे. मी अनेकदा या जंगलात भटकलो. जंगलाचा प्रत्येक भाग पालथा घातला. नवेगावच्या जंगलाने माझ्या मनावर वेगळंच गारुड केलंय. १९९७ सालचा तो प्रसंग मला आयुष्यभराची निसर्ग अनुभवाची वेगळीच शिदोरी देऊन गेला. जंगलात भटकताना काय काय करायचं हे शिकवणारं हे सोमण काकांचं ‘नवेगाव’ जंगल माझ्या मनाच्या एका कोपऱ्यावर आजही अधिराज्य गाजवतंय.

कसे जाल? – पुणे/मुंबई-नागपूर-भंडारा-नवेगाव

भेट देण्यास उत्तम हंगाम – ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल? –

सस्तन प्राणी – वटवाघळांच्या काही प्रजाती, झाडचीचुन्द्री, तीनपट्टी खार, जरबेल उंदीर, मुंगुस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळींदर, ससा, वानर, कोल्हा, रानकुत्रे, खोकड, चांदी अस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, वाघाटी, चितळ, सांबर, भेकर, दुर्मिळ पिसोरी हरीण, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर, इ.

पक्षी – तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळ घार, कापशी घार सारखे शिकारी पक्षी, मत्स्य घुबड, कंठेरी शिंगळा घुबड, गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, मत्स्य गरुड, कोतवाल, कुरटुक , सूर्यपक्षी, सारसक्रेन, उघडचोच करकोचा, मध्यम व मोठा बगळा, छोटा निळा खंड्या, पाणमोर, पाणकावळा, जांभळी पाणकोंबडी, टिटवा, पाणपिपुली, इ.

सरपटणारे प्राणी - मगर, कासव, पाल, गेको, सरडा, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, धुळ नागीण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसे, मण्यार, पट्टेरी मण्यार , घोणस, इ.

वृक्ष – साग, बीजा, करू, ऐन, तिवस, शिसम, गराडी, शिवण, तेंदू, सालई, मोवई, चार, जांभूळ, मोह, हिरडा, आवळा, बेहडा, वड, पिंपळ, उंबर, अर्जुन, धावडा, रोहन, धामन, बहावा, पळस, शाल्मली इ.

(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)

( शब्दांकन : ओंकार बापट)

loading image
go to top