नयनरम्य ‘शरावती’

कर्नाटकातील शरावती अभयारण्याचं नयनरम्य दृश्य. (छायाचित्र : कल्याण वर्मा)
कर्नाटकातील शरावती अभयारण्याचं नयनरम्य दृश्य. (छायाचित्र : कल्याण वर्मा)

अनेक हिंदी चित्रपटांमधून आपण निरनिराळी विहंगम निसर्गदृश्यं पाहतो. काही वन्यजीव-माहितीपटांतही अशी दृश्यं आढळतात. एका मोठ्या धबधब्याचंही दृश्य आपल्याला अनेकदा बघायला मिळतं... आणि मग आपण विचार करतो की हे दृश्य भारतातील आहे की परदेशातील? पण अशा अनेक अप्रतिम निसर्गरम्य दृश्यांची खाण असलेला पश्चिम घाट आपल्या भारताला लाभलेला आहे आणि या पश्चिम घाटातच कर्नाटकातील ‘शरावती वन्यजीव अभयारण्य’ आहे.

जैवविविधता हे त्याचं वैशिष्ट्य. 
या अभयारण्याला निसर्गाचा वारसा तर लाभलेला आहेच; पण त्याचबरोबर अभयारण्याच्या नावावरून त्याला पौराणिक संदर्भही आहे असं म्हणता येतं. असं सांगितलं जातं की, रामायणकाळात राम-सीता या अरण्यात आले असता सीतेला लागलेली तहान शमवण्यासाठी रामानं बाणाद्वारे जमिनीतून पाण्याची धार काढली. हे पाणी ‘तीर्थ’ म्हणून प्रसिद्ध झालं. या ठिकाणाला नाव पडलं ‘अंबुतीर्थ’. या ठिकाणी या धारेतून एक जलस्रोत वाहू लागला. याच जलस्रोताची पुढं नदी झाली. रामानं मारलेल्या बाणापासून, म्हणजे शरापासून, उत्पन्न झालेल्या या नदीला नाव मिळालं ‘शरावती’. 

सुमारे १२८ किलोमीटर वाहणाऱ्या आणि पुढं उत्तर कन्नड जिल्ह्यातील होनावर इथं अरबी समुद्राला मिळणाऱ्या याच शरावती नदीच्या काठावर हे जंगल पसरलेलं असून त्याल ‘शरावती अभयारण्य’ असं नाव देण्यात आलं. शिवमोगा आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांत पसरलेल्या या अभयारण्याची निर्मिती सन १९७४ मध्ये झाली. सुमारे ४३१.२३ चौरस किलोमीटर क्षेत्रात असलेल्या या अभयारण्यात प्रामुख्यानं सदाहरित आणि निमसदाहरित जंगलप्रकार पाहायला मिळतो. घनदाट अभयारण्य, जमिनीवर सूर्यप्रकाशही मोठ्या मुश्किलीनं पडू शकेल असे मोठमोठे वृक्ष, अनेक प्रकारची दाट झुडपं यांमुळे अभयारण्यात जैवविविधता बहरली आहे. सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी आणि विविध प्रकारचे पक्षी इथं आहेत. ‘नागराज’ अर्थात् किंग कोब्रा, शेकरू, विविध प्रकारचे बेडूक, दुर्मिळ असा मोठा धनेश असे प्राणी-पक्षी इथं बघायला मिळतात. 

शरावती अभयारण्यात आणखी एका दुर्मिळ सस्तन प्राण्याचा वावर आहे व तो प्राणी म्हणजे ‘सिंहपुच्छ माकड’. ‘धोक्यात’ आलेल्या प्राण्यांच्या वर्गप्रकारात मोडणाऱ्या आणि केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या या दुर्मिळ माकडप्रजातीची संख्या ‘शरावती’त लक्षणीय आहे.

सन २०१९ मध्ये या अभयारण्याच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली आणि ‘सिंहपुच्छ’ माकडांच्या संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं ‘अघनाशिनी सिंहपुच्छ माकड संरक्षित क्षेत्र’ हे सुमारे २९८.९३ चौरस किलोमीटरवर पसरलेलं जंगल शरावती अभयारण्याला जोडण्यात आलं. शिवाय, शिवमोगा आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांतील सुमारे २०० चौरस किलोमीटर जंगलाचा समावेशही शरावती अभयारण्यात करण्यात आला. कक्षा रुंदावल्यामुळे शरावती अभयारण्याचं एकूण क्षेत्रफळ आता सुमारे ९३०.१६ चौरस किलोमीटर एवढं मोठं झालं आहे. सिंहपुच्छ माकडाला अधिक संरक्षण मिळण्याच्या हेतूनं कर्नाटक सरकारनं अभयारण्याचं हे क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सिंहपुच्छ माकडांना तर संरक्षण मिळेलच; पण त्याचबरोबर इतर अनेक छोट्या-मोठ्या जीवांनाही संरक्षण मिळेल.

शरावती अभयारण्यात वाढ करण्यात आलेलं हे क्षेत्र प्रामुख्यानं ‘मायरिस्टिका स्वॅम्प’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दलदलक्षेत्रात प्रामुख्यानं असलेल्या जंगली जायफळाच्या विविध प्रजातींमुळे ‘मायरिस्टिका’ हे नाव या भागाला मिळालं आहे. नव्यानं वाढवलेल्या या जंगलात दलदलयुक्त जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. शरावती आणि अघनाशिनी या नद्यांमुळे आता हे संपूर्ण जंगल अनेक वन्यजीवांचं माहेरघर ठरलं आहे. ज्या प्राण्याच्या संरक्षणाच्या हेतूनं ही जंगलवाढ करण्यात आली त्या प्राण्यावरून आता या अभयारण्याला ‘शरावती सिंहपुच्छ माकड वन्यजीव अभयारण्य’ या नावानं ओळखलं जातं. अनेक जलस्रोत, मोठमोठे वृक्ष, बारमाही नद्या, प्राणी-पक्ष्यांच्या दुर्मिळ जाती यामुळे हे अभयारण्य पाहणं ही पर्यटकांसाठी पर्वणीच.

शरावती अभयारण्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे ‘जोग’ धबधबा. शरावती नदीवर २५३ मीटर उंचीवरून प्रचंड वेगानं दरीत उडी घेणारा हा धबधबा ‘गिरसप्पा धबधबा’ या नावानंही ओळखला जातो. राजा (किंवा नाल), रोअरर (गरजणारा), रॉकेट (उडणारा) आणि राणी (म्हणजे धवल स्त्री) या चार धबधब्यांतून पुढं ‘जोग’ हा महाधबधबा तयार होतो. गर्द वनराईत खळाळून कोसळणाऱ्या या पाण्याचा आवाज ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात. लिंगणमक्की जलाशय, होनेरमराडू बॅकवॉटर ही या अभयारण्यातील आणखी काही भेट देण्यायोग्य ठिकाणं.

अप्रतिम निसर्गसौंदर्य, नजर जाईल तिथं दिसणारी हिरवाई, अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, उभयचर, निरनिराळ्या प्रकारचे उंचच उंच वृक्ष, त्यांच्या आश्रयाला वाढलेली दाट झुडपं, प्रचंड वेगानं कोसणारा दुधाळ पाण्याचा जोग धबधबा यांमुळे  पर्यटक शरावती जंगलाच्या प्रेमात पडतात. निसर्गाशी असलेलं त्यांंचं नातं अधिक दृढ होत जातं. 

कसे जाल? 
पुणे-बेळगाव-हुबळी-शिवमोगा-शरावती

भेट देण्यास उत्तम कालावधी 
नोव्हेंबर ते एप्रिल

काय पाहू शकाल? 
सस्तन प्राणी : सिंहपुच्छ माकड, गवा, वाघ, बिबट्या, रानकुत्रा, कोल्हा, लंगूर, रानडुक्कर, विविध प्रकारची हरणं, विविध प्रकारच्या खारी इत्यादी.

पक्षी : धनेश, विविध प्रकारची घुबडं, विविध प्रकारचे अन्य पक्षी.

सरपटणारे प्राणी : किंग कोब्रा, अन्य सर्पप्रकार, मगर इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com