esakal | शुष्क भागातील नंदनवन
sakal

बोलून बातमी शोधा

Deer

शुष्क भागातील नंदनवन

sakal_logo
By
अनुज खरे informanuj@gmail.com

आपला महाराष्ट्र विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. इथली परंपरा, इतिहास, संस्कृती, समृद्ध मराठी भाषा यांनी आपला ठसा जगभरात उमटवला आहे. इथं प्रत्येक बाबीत विविधता आढळते. भाषा, राहणीमान हे ठराविक अंतरावर बदलत असलं तरी एकूणच मराठी भाषेत आणि महाराष्ट्राच्या जीवनशैलीत एक प्रकारचा गोडवा आढळतो. त्यामुळे या विविधतेत आपलेपण कायम जाणवत राहतं. भौगोलिक परिस्थितीत असलेल्या विविधतेमुळे इथं निसर्गवैविध्यही मोठ्या प्रमाणावर आढळतं. रांगड्या सह्याद्रीच्या अस्तित्वामुळे कोकण भागातील जंगलं अधिक खुलली आहेत, तर घाटावरच्या आणि विदर्भातल्या जंगलांची मजा आणखी वेगळी आहे.

आपल्या वेगळेपणामुळे महाराष्ट्राच्या निसर्गसौंदर्यात भर टाकणारी अनेक छोटी-मोठी अभयारण्यं आणि व्याघ्रप्रकल्प महाराष्ट्रात आहेत. आज आपण अशाच एका छोट्या; पण सुंदर जंगलाविषयी माहिती घेऊ या. त्याचं नाव आहे ‘येडशी-रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य.’ हे अभयारण्य उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. ता. १६ मे १९९७ रोजी अभयारण्य म्हणून मान्यता मिळालेलं हे जंगल सुमारे २२३७.४२ हेक्टर एवढ्या प्रदेशात पसरलेलं असून, उस्मानाबाद तालुक्यातील तीन गावं आणि कळंब तालुका असा त्याचा विस्तार आहे. भगवान शंकराच्या ‘रामलिंग’ या प्राचीन मंदिरासाठीही हे जंगल प्रसिद्ध आहे.

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या २० किलोमीटरवर असलेलं हे सुंदर अभयारण्य सह्याद्रीच्या बालाघाट पर्वतरांगेत येतं. ‘उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळी वनं आणि काटेरी वनं’ या जंगलप्रकारात हे अभयारण्य मोडतं. या परिसरासंदर्भात एक आख्यायिका प्रचलित आहे. त्या आख्यायिकेनुसार, ‘वनवासात असताना रावणानं सीतेचं अपहरण केल्यानंतर सीतेच्या शोधार्थ निघालेल्या रामाची जखमी अवस्थेतील जटायू या गिधाड प्रजातीच्या पक्ष्याशी याच परिसरात भेट झाली होती. तेव्हा त्याला पाणी पाजण्यासाठी रामानं जमिनीत एक बाण मारला, त्यामुळे इथं एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली. सीतेला वाचवण्यासाठी रावणाबरोबर झालेल्या युद्धात जटायूचा मृत्यू झाला. या ठिकाणी जटायू पक्ष्याची समाधी आहे...’

पावसाळ्यात याच गुहेतून येणाऱ्या पाण्याचा मोठा धबधबा तयार होतो. या अभयारण्याच्या परिसरातील रामलिंगमंदिर, जटायूची समाधी, धबधबा व भोवतालचा सुंदर निसर्ग यांमुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींच्या आवडीचं स्थळ ठरलं आहे.

या जंगलाची एक खासियत म्हणजे, या जंगलातून एकही नदी वाहत नाही, तसंच जंगलात एकही मोठा तलाव नाही; पण जंगलातून वाहणारे दोन मोठे नाले आणि इतर उपनाले यांमुळे जंगलातील जीवांची तहान भागते. जंगलात चार विहिरी आहेत; पण त्या बारमाही नाहीत, त्यामुळे जंगलातील प्राणिमात्र या विहिरींवर पाण्यासाठी अवलंबून नाहीत. एकूणच उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार केला तर हा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा आहे. सुमारे ४०० ते ५०० मिलिमीटर एवढाच पाऊस या प्रदेशात वर्षभरात पडतो, त्यामुळे ‘दुष्काळी भागात फुललेलं नंदनवन’ असं या जंगलाचं वर्णन करता येऊ शकेल.

जंगलाची भौगोलिक ठेवण ही टेकड्यांची आणि मोकळ्या गवताळ प्रदेशांची आहे. त्यामुळे इथं भौगोलिक विविधता आढळते. त्यावर आधारित असणाऱ्या जीवांमध्येही या जंगलात विविधता आहे. जंगलाचा एकूण इतिहास पहिला तर, अगदी वाघ आणि बिबट्या या सर्वोच्च शिकारी वर्गाच्या प्राण्यांची नोंदही इथं पाहायला मिळते. कालपरत्वे जंगलाच्या एकूण परिस्थितीत बदल होत गेला आणि या सर्वोच्च शिकाऱ्यांनी या जंगलातून इतर जंगलात आश्रय घेतला. आज हे दोन्ही जीव या जंगलात पाहायला मिळत नाहीत; पण मोकळ्या माळरानांमुळे ‘काळवीटा’सारखा सुंदर प्राणी या जंगलात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो.

सन १९९७ मध्ये अभयारण्याची स्थापना झाल्यावर जंगलाला चांगल्या प्रकारे संरक्षण देण्यात आलं आहे, त्यामुळे साळिंदरासारख्या दुर्मिळ प्राण्याबरोबरच माळरानांवर आढळणाऱ्या सुंदर पक्ष्यांचा अधिवासही इथं पाहायला मिळतो. सर्पगरूड, रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, भटतित्तर, चंडोल, सुगरण, डोंबारी, काळा कोतवाल, करडा कोतवाल, पीतमुखी टिटवी, नकल्या खाटीक, तुईया पोपट, पावशा, चातक, ढोकरी, गायबगळा, मध्यम बगळा, पांढऱ्या पोटाची पाणकोंबडी, अडई, टकाचोर, भारद्वाज, सातभाई, रानभाई, वटवट्या अशा पक्ष्यांच्या प्रजाती इथं पाहायला मिळतात. आपला राष्ट्रीय पक्षी मोरही इथं मोठ्या प्रमाणावर आढळतो. हिवाळ्यात काही स्थलांतरित पक्ष्यांचंही आगमन होतं.

अभयारण्याच्या क्षेत्रात एकही गाव, वस्ती नाही, त्यामुळे ‘माणसांचा जंगलभागात होणारा हस्तक्षेप’ हा निसर्गासमोर असणारा धोका या अभयारण्याबाबत दिसून येत नाही. त्यामुळे साहजिकच जंगलाच्या सौंदर्यात आणि समृद्धीत वाढ होत आहे. अशा प्रकारे जंगल वाढत गेलं तर लवकरच बिबट्यासारखे शिकारी प्राणीही इथं पाहायला मिळू शकतील. वन्यजीवांच्या अधिवासात आणि एकूण जंगलात वाढ होण्याच्या दृष्टीनं वनविभागाकडून सातत्यानं प्रयत्नही करण्यात येत आहेत.

निसर्गात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप आपण केला नाही तर, निसर्गाला त्याच्या पद्धतीनं वाढू दिलं तर जंगलाची प्रत खूप जास्त पटींनी समृद्ध होते हे वारंवार सिद्ध झालं आहे. निसर्ग वाचवणं हे काही रॉकेट सायन्स नाही. जंगल वाचवण्यासाठी काय आवश्यक आहे ते सर्व आपल्याला माहीत आहे. गरज आहे ती ते फक्त योग्य रीतीनं राबवण्याची. आपले प्रयत्न आणि आवश्यक संरक्षण आपण निसर्गाला पुरवलं तर निसर्ग त्याचं काम चोख बजावेल यात शंका नाही आणि आपली पुढची पिढी समृद्ध जंगल अनुभवू शकेल.

कसे जाल?

पुणे/मुंबई-बार्शी-सोनगाव-भानसगाव-येडशी

भेट देण्यास उत्तम हंगाम : ऑक्टोबर ते जून

काय पाहू शकाल?

सस्तन प्राणी : काळवीट, वटवाघळांच्या काही प्रजाती, झाडचिचुंद्री, मुंगूस, जवादी मांजर, ऊदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, ससा, वानर, कोल्हा, खोकड, रानडुक्कर, भेकर, लालतोंडं माकड इत्यादी.

पक्षी : टकाचोर, हळद्या, नाचण, मॉटल्ड् वूड आउल, पिंगळा, दयाळ, सोनपाठी सुतार, सर्पगरूड, रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, भटतित्तर, चंडोल, सुगरण, डोंबारी, काळा कोतवाल, करडा कोतवाल, माळटिटवी, नकल्या खाटीक, रानतुईया, पावशा, चातक, ढोकरी, गायबगळा, मध्यम बगळा, लाजरी पाणकोंबडी, अडई, टकाचोर, भारद्वाज, सातभाई, रानभाई, वटवट्या, इत्यादी.

सरपटणारे प्राणी : पाल, गेको, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, नाग, फुरसं, मण्यार, घोणस इत्यादी.

वृक्ष : अर्जुन, बहावा, बाभूळ, बेल, बोर, चंदन, चिंच, धामण, जांभूळ, करवंद, खैर, मोवई, नीम, पळस, पांगारा, पिंपळ, सालई, तेंदू, वड, उंबर, आपटा, अंजन, भेरा, गराडी, सीताफळ इत्यादी.

झुडपं : लोखंडी, मुरुडशेंग, निरगुडी, रुई, तरोटा, रानतुळस इत्यादी.

(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)

(शब्दांकन : ओंकार बापट)

loading image