सोन्याच्या खाणीचं अमेरिकेतलं शहर!

सेडोना हे अमेरिकेतील एक ऐतिहासिक शहर आहे. त्याचमुळे आम्ही सेडोनाला जायचे ठरविले. आम्ही ग्रँड कॅनियनहून निघालो अन् सेडोनाच्या दिशेने सेडोना शहराचे स्वप्न पहात पहात निघालो.
American city of gold mines
American city of gold minessakal
Summary

सेडोना हे अमेरिकेतील एक ऐतिहासिक शहर आहे. त्याचमुळे आम्ही सेडोनाला जायचे ठरविले. आम्ही ग्रँड कॅनियनहून निघालो अन् सेडोनाच्या दिशेने सेडोना शहराचे स्वप्न पहात पहात निघालो.

- अनुराधा गांगल, saptrang@esakal.com

सेडोना हे अमेरिकेतील एक ऐतिहासिक शहर आहे. त्याचमुळे आम्ही सेडोनाला जायचे ठरविले. आम्ही ग्रँड कॅनियनहून निघालो अन् सेडोनाच्या दिशेने सेडोना शहराचे स्वप्न पहात पहात निघालो. कारमध्ये बसलो असलो तरीसुद्धा माझे डोळे दोन्ही बाजूंना भिरभिरत होते. दोन्ही बाजूंना डोंगर होते. ते गुलाबी रंगाचेच होते.

ग्रँड कॅनियन पाहून आल्यामुळे ते गुलाबी डोंगर पाहत असताना माझ्या मनात सतत येत होते जसे कोलोराडो नदीने ग्रँड कॅनियन घडवले ती जडणघडण अजून संपलेली नाही. ती सेडोना शहरापर्यंत घडलेली असावी. ग्रँड कॅनियनपासूनच सेडोना शहरापर्यंत लाल-गुलाबी डोंगर दिसून येत होतेच. सेडोना शहरामध्येही लाल-गुलाबी रंगाचे डोंगर व त्यांची शिल्पे बघायला मिळत होती. अनेक कोटी वर्षांमुळे कोलोराडो नदीनेच अन् निसर्गानेच ग्रँड कॅनियनपासून ते या सेडोना शहरापर्यंत आपल्या कारागिरीमुळे काही रचना, काही शिल्पे तयार केली असावीत.

आमचा भाचा गिरीश याने अगोदरच रूम बुक करून ठेवली होती. ‘रूम’ कसली ! तो एक बंगलाच होता. अंक दाबून कुलूप उघडले गेले अन् आम्ही बंगल्यात पाऊल ठेवले. मस्त बंगला, मस्त घर होते ते. घरात हॉल, दोन बेडरूम्स, डायनिंग रूम, किचन अशा सर्व गोष्टी सिद्ध होत्या. किचनमध्येही सगळ्या वस्तू म्हणजे फ्रिज, डिश वॉशर, गॅस, चमचे भांडी, क्रोकरी अगदी सर्व गोष्टी जागच्या जागी होत्या.घराच्या बॅक यॉर्ड म्हणजे मागील बाजूस ओपन व्हरांडा होता.

sedona america
sedona americasakal

त्यातही बसायला सोफा, पुढे‘शेक’ घेण्यासाठी टीपॉय विथ इलेक्ट्रिक शेगडी अशी सर्व साग्रसंगीत सामुग्री होती. मुख्य म्हणजे त्या सोफ्यावर बसले की समोर सूर्योदय-सूर्यास्त अन् डाव्या बाजूला एक अगदी बंगल्याला लागूनच कोलोराडो नदीने केलेले देवळाच्या आकाराचे शिल्प होते. फार छान होता तो बंगला अन् त्याचे व त्याच्या आजुबाजूचे ते देखणे रूप. ग्रँड कॅनियनची आम्ही पाहिलेली दरी कशी घडली असेल याच्या खुणा सेडोनातही दिसून येत होत्या. सेडोना हे अॅरिझोनातील एक ऐतिहासिक महत्त्वाचे असे देखणे अन् छोटेसे टुमदार शहर आहे.

सेडोना शहर हे गेल्या शतकभरातच खरे तर विकसित झाले आहे. असे जरी असले तरीसुद्धा त्या शहरात इतिहासाच्या जुन्या खुणा पहायला मिळतात अन् त्यामुळेच या सेडोना शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सेडोना शहरात अमेरिकेच्या प्रसिद्ध अशा काऊबॉय संस्कृतीचे अवशेष दिसून येतात. या गोष्टी फारच रम्य आहेत.

सेडोना शहराच्या टापूत सोन्याच्या खाणींचा शोध लागला. त्यामुळे झाले काय ! आजूबाजूच्या अनेक लोकांना झटपट श्रीमंतीची ‘हाव’ सुटली आणि त्यांनाही आपण झटपट श्रीमंत व्हावे असे वाटू लागले. श्रीमंतीची स्वप्ने ती लोक पाहू लागली. त्यावरच आधारित हॉलिवूड सिनेस्टार ग्रेगरी पिक अभिनित ‘मॅकेनीज गोल्ड’ हा हॉलिवूडपट सिनेमा तयार झाला होता आणि तो खूप गाजलाही होता.

ग्रँड कॅनियन सारखेच सेडोनालाही म्युझियम आहे.त्यात खूप सखोल अशी माहिती असल्याने ते आवर्जून पाहण्यासारखेच आहे. ग्रँड कॅनियनची दरी पाहून अमेरिकेचा देश, त्याचा भूभाग कसा घडला हे कळून येते तर सेडोना शहरामुळे आधुनिक अमेरिका कशी घडली असेल याचा साधारणपणे अंदाज येतो. तो तेथील राहणाऱ्या वास्तव्य करणाऱ्या लोकांवरून.

तेथील मूळच्या ‘नेटिव्ह इंडियन’ लोकांची संस्कृती नंतर मुख्यत: दक्षिण अमेरिकेतून म्हणजे ब्राझिल-मेक्सिकोतून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केलेली काऊबॉय संस्कृती अन् पीच, सफरचंद, संत्री अन् अनेक अमेरिकन फळफळावळांचे मळे असलेल्या लोकांची संस्कृती झाली होती आणि आता निर्माण झालेली आधुनिक अमेरिकन व्यापारी लोकांची संस्कृती, अशा सगळ्या मिश्र संस्कृतींचा हा देश आहे असे आपल्याला तेथील लोकांचे जीवन अन् राहणीमान पाहून कळून येते. सेडोना या प्रदेशात १८५० पासून लोक वसाहत करण्यासाठी, राहण्यासाठी येऊ लागले.

१९५० नंतर सेडोना छोटेसे, टुमदार अन् आकर्षक असे हे शहर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले. निवृत्ती झाल्यानंतर केवळ येथे विश्रांती घ्यावी यासाठी सगळी लोकं भेट देऊ लागले आणि अनेक लोक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सेडोना शहरात येऊ लागले. पर्यटनस्थळ, निवृत्तीस्थळ, सुट्टी घालविण्याचे स्थळ असे म्हणून हे सेडोना शहर नावारूपाला आले.

सेडोना शहरात म्युझियम प्रमाणेच आणखीन एक आकर्षण असलेले स्थळ आहे - ‘होली क्रॉस प्रार्थना मंदिर’. सुमारे हजार फूट उंचीची ती टेकडी आहे. त्या टेकडीवर खालून वरपर्यंत सुमारे सत्तर फूट उंचीचे ते ‘हॉली क्रॉस प्रार्थना मंदिर’ उभारलेले आहे. आपल्याला ते दृश्य पाहताना टेकडी खोदूनच ते प्रार्थना मंदिर बांधले आहे असा भास होतो. अशी ती एक आकर्षक अशी वास्तू पाहण्यासारखी आहे.

दुसऱ्या एका छोट्या टेकडीवर बुद्धाचे मंदिर आहे. हे मंदिर मूळ भारतीय लोक जे तेथे राहतात, त्यांनी बांधलेले आहे. यावरून अमेरिकेत भारतीय संस्कृतीचीही छाप पडत आहे असेही दिसून येते, हॉलिवूडच्या अनेक सिनेमांचे सेडोनाला शुटींग झाले आहे. मुख्य म्हणजे ‘सेडोना’ याच नावाचा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ग्रँड कॅनियन, सेडोना येथे कोलोराडो नदीमुळे अन् कोटी वर्षांच्या निसर्गाने जी जी देखणी शिल्पे, जी जी देखणी व रेखीव अशी मंदिरे निर्माण केली त्यावर जर सूर्योदयाच्या-सूर्यास्ताच्या किरणांचा प्रकाश पडला तर ती शिल्पे, ती देखणी मंदिरे सोनेरी रंगांनी उजळून निघतात.

अमेरिकेत त्यांच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे ४ जुलैला देखणी फायर वर्क्सची रोषणाई पहायला विशिष्ट मोकळी जागा (पॉइंट) जिथे निर्माण केलेली असते, तेथे त्या दिवशी संध्याकाळी सात नंतर त्या मोकळ्या जागेवर अनेक लोक जमा होतात. तसेच ग्रँड कॅनियनला अन् सेडोनाला अशा मोकळ्या जागेवर (वेगवेगळे पॉइंट्स) सूर्यास्ताची किरणे पहायला अनेक जण धाव घेत असतात.

या डोंगर शिखरांवरील गिरिभ्रमण हे पण एक महत्त्वाचे आकर्षण आहेच. या सेडोना शहराचे नाव सेडोना कसे पडले त्याची कहाणी पण रंजक आहे. सेडोना शहराचे पहिले पोस्ट मास्टर थिओडोर कार्लटन श्मेबेली यांच्या पत्नीचे नाव सेडोना अराबेला मिलर श्मेबेली असे होते. १८७७ ते १९५० या कालावधीत सेडोना तेथे रहात होत्या. त्यांनी त्यांच्या काळात सेडोना शहरासाठी विविध योजना अन् विविध तऱ्हेची कामे केली. त्यांच्या नावामुळे अन् कर्तबगारीमुळेच या शहराला सेडोना असे नाव दिले गेले. अशी ही ग्रँड कॅनियन, सेडोना, हुवर डॅम ही स्थळे म्हणजे जगातील मोठमोठी आश्चर्येच आहेत. कोलोराडो नदी अन् त्याला साथीदार हा निसर्ग. त्यानेही अनेक वर्षांचा इतिहास घडवून आपल्या पुढे हे चैतन्य उभे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com