स्त्रिया आणि लठ्ठपणा (डॉ. राजीव शारंगपाणी)

डॉ. राजीव शारंगपाणी
सोमवार, 22 एप्रिल 2019

"शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल"पुरवणीत...

हेल्थ वर्क
लठ्ठ स्त्रियांना मासिक पाळी बंद झाल्यानंतर जास्त त्रास होतो, पण त्या आधी ही लठ्ठपणाची सुरवात कुठून होते ते पाहूया. ‘प्राप्तेतु षोडषेवर्षे गर्दभ्यपि अप्सरा भवेत्‌!’ अशा सुंदर वयापासून आपण सुरवात करूयात. या वयात खरोखरीच सर्व मुली आटोपशीर शरीराच्या असतात. सुदृढ असतात असे मुळीच नाही. निसर्गाने तशी काळजीच घेतलेली असते आणि ही फुलपाखराची स्थिती साधारण चोवीस ते पंचवीस वयापर्यंत टिकते. या छान दिसण्याचा परिणाम म्हणूनच की काय, तिचे लग्न होते आणि मग लठ्ठपणाकडे प्रवास सुरू होतो. लग्न ठरल्याबरोबर सायकल मारणे, वगैरे बंद होते. लग्न होते. मेजवान्या सुरूच राहतात. त्यानंतर सुस्तपणाही वाढतो. शरीराकडे लक्ष? ‘छे! उठायला इतका उशीर होतो की स्वयंपाकाचीच कामं आटपत नाही, मग शरीराकडे बघणार कोण?’ अशातच दिवस जातात! दिवस गेल्यावर तर विचारूच नका. पहिल्या उलट्या होण्याचा काळ संपला, की डोहाळजेवण चालू होतात. सारखे खावेसे वाटते. कौतुकाचा वर्षाव होतो. शरीराकडे आणखी दुर्लक्ष होते. एवढे मोठे पोट घेऊनच ती इतकी दमून जाते, की आणखीन व्यायाम कुठे करायचा? प्रसूती झाल्यावर तर चुकीच्या गोष्टी करण्याची जणू चढाओढ लागते. बाळाला एका तासाच्या आत दूध पाजण्याऐवजी ग्लुकोजचे पाणी दिले जाते. बाळाला वरचे दूध दिले जाते. इथे लठ्ठपणाचा मूळ पाया घातला जातो. त्यातच ‘ओली बाळंतीण’ म्हणून हालचाल अजिबात करू दिली जात नाही. सिझेरिअन झाले असेल, तर विचारूच नका. अळिवाचे व डिंकाचे लाडू, तूप असा पहेलवानाच्या वर खुराक चालू होतो. 

आई झाल्यावर मुलांच्या शाळा, यजमानांचा डबा, सासू-सासऱ्यांच्या चहाच्या वेळा सांभाळताना हालचाल आणखी कमी होते. त्यातच, सर्वांच्या शेवटी जेवणाची सवय असल्याने ‘एवढासा भात कुठे ठेवायचा’ म्हणून पोटात ढकलला जातो. मध्यमवयीन झाल्यावर मुले आणि नवरा कामाला गेल्यावर दुपारी वेळ मिळतो. हा वेळ झोप, गप्पा, कादंबऱ्या वाचणे, खरेदी, टीव्ही यात जातो. मनोरंजन होते. शरीराकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाही... प्रत्येक दिवशी काही न काही निघतंच!

अशातच पाळी बंद व्हायची वेळ येते. मुले मोठी झालेली असतात. एव्हाना मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, पोटदुखी असले रोग मागे लागलेले असतात. नैराश्‍य येऊ लागते. एकूण काय? तारुण्यातले मोहक शरीर मोडकळीला येते. त्यामुळे आपले शरीर निरोगी म्हणूनच आकर्षक तुम्हीही ठेवू शकाल, पण आजच सुरवात करा. गेला दिवस पुन्हा येत नाही! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artcile By Dr Shrinivas Sharangpani In All Is Well Supplement Of Sakal Pune Today