#mokalevha प्रेमविवाह - आभास व वास्तव 

#mokalevha प्रेमविवाह - आभास व वास्तव 

क्रांतीची आई मला भेटायला आली आणि म्हणाली, ‘‘सागर, मी खूप वैतागली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून क्रांतीच्या लग्नासाठी स्थळं शोधत आहे, पण तिचं कुठे जमतच नाही. आज तर मी तिला सांगून टाकलं, की आता तुझा तूच प्रियकर शोध, प्रेम कर, एकमेकांना समजून घ्या. माझी काही हरकत नाही. आम्ही मनापासून तुमचं लग्न लावून देऊ.’’

एकेकाळी प्रेमविवाहाला कडाडून विरोध करणारी ही पिढी आज त्याला मान्यता देत आहे, हे ऐकूनच मी थक्क झालो. पण विचार करता प्रेम विवाहाचे अनेक फायदे मला लक्षात येऊ लागले. स्थळ बघून, घरच्यांच्या पसंतीने आपण ठरवून लग्न करतो तेव्हा एका पूर्णपणे अनोळखी व्यक्तीबरोबर आपण आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतो. मनुष्य समजायला आयुष्य पुरत नाही असे एकीकडे आपण म्हणतो आणि लग्न ठरवताना मात्र दोन-चार भेटींमध्येच भावी आयुष्याचा जोडीदार निवडतो. रंग-रूप, घरदार, शिक्षण व इतर सामाजिक प्रतिष्ठेच्या मुद्द्यांवरून जोडीदाराच्या स्वभावाबद्दल ठोकताळे बांधतो.

परंतु लग्नाआधी प्रेम केल्यास आपल्या जोडीदाराला आपण खूप जवळून बघू शकतो. जोडीदाराचा स्वभाव, मानसिकता, वागणूक, विचार याचे अवलोकन करण्यास आपल्याला अवधी मिळतो. प्रेमविवाहाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे, असे मला वाटते.

प्रेमाच्या कालावधीमध्ये एकमेकांना स्वीकृत असलेल्या गोष्टींची जाणीव होते. तसेच आपल्या जोडीदाराला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारायची मानसिकता तयार होते. प्रेम करणाऱ्या जोडप्यांमध्ये देखील अनेक वेळेला वाद-विवाद होतात. असे वाद झाल्यावर ते सोडवायचे कसे हे शिक्षणदेखील लग्नाअगोदरच त्या प्रेमी युगुलाला मिळते. 

स्वतःच्या क्षमतेला आव्हान देत आपल्या प्रियकरासाठी आपण अशक्यप्राय गोष्टीदेखील साध्य करायचा प्रयत्न करतो. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी झटताना शारीरिक, मानसिक व सामाजिक मर्यादांना तोंड देण्याची एक वेगळीच ताकद निर्माण होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रेमविवाहाबद्दल इतके सकारात्मक विचार करत असताना काल अचानकपणे स्मिता व तिचे आई-वडील माझ्याकडे आले. उच्चशिक्षित व रूपाने सुंदर असलेली स्मिता तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या विशालच्या प्रेमात पडली. मुलगा चांगला असल्यामुळे स्मिताच्या आई-वडिलांचा देखील या नात्याला होकार होता. दोन वर्षे एकत्र असताना स्मिता व विशाल खूप जवळ आले. तारुण्याच्या दबावाखाली दोघांनी शारीरिक सुखाची देखील अनुभूती घेतली. गेल्या काही महिन्यांपासून मात्र विशालच्या स्वभावात स्मिताला बदल जाणवू लागला. अचानकपणे दोन दिवसापूर्वी आता मला तुझ्याशी लग्न करायचे नाही, असे त्याने सांगितले. प्रेमाच्या या खेळात सगळे गमावून बसलेली स्मिता कोलमडून गेली. प्रेमाची ही दुसरी बाजू बघून माझे मन दोलायमान झाले. प्रेमाची ही स्वार्थी बाजू बघितल्यावर माझे मन घाबरून गेले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रेम करताना अनेक बाबींची काळजी दोघांनीही घेतली पाहिजे. अशी काळजी न घेतल्यास स्मिताप्रमाणे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेम हे दोन प्रकारचे असते भावनिक व वास्तववादी! भावनिक प्रेमामध्ये आपण क्षणिक शारीरिक - मानसिक सुखासाठी संबंध जोडतो. कुठलाही सारासार विचार न करता केवळ भावनेच्या भरात तथाकथित प्रेमात पडतो. अशा संबंधांमध्ये भविष्यासंदर्भात कुठलाही विचार केलेला नसतो. भावी आयुष्याची फक्त मनाला भावतील अशीच स्वप्ने बघितलेली असतात. असे नाते वास्तवात उतरते तेव्हा कोलमडून पडते. त्यामुळेच मग अशा प्रेमाची परिमिती दुःखदायक ठरते.

प्रेम विवाह वाईट नसतो. परंतु प्रेम करताना विचार करून, डोळसपणे नाते प्रस्थापित करावे. आपल्या मनाला विचारात घेऊन हृदयाची गुंफण घालत केलेले प्रेम सदासर्वकाळ अबाधित राहते. असे झाले तरच प्रेमविवाह यशस्वी होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com