का भुललासी वरलिया रंगा? (ॲड. स्वाती यादवाडकर)

Swati-Yadvadkar
Swati-Yadvadkar

सोशल मीडियाचा वापर करून फसवणूक केल्याच्या बातम्या हल्ली दर दोन दिवसांनी वाचायला मिळतात. अनेकदा फसवणूक करणारी व्यक्ती ही पूर्वीची काहीही ओळख नसताना केवळ मेसेजवरून, चॅटिंग करत ओळख वाढवलेली आणि मैत्री झालेली व्यक्ती असते हे लक्षात येतं. हे प्रकार जगभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात. या प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल साइट्सवरून सावजं हेरली जातात आणि सहजी फसवणूक केली जाते. या प्रकारची फसवणूक करणारे गुन्हेगार जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून तुम्हाला अलगद त्यांच्या जाळ्यात ओढतात. सामान्य माणूस त्यात असा काही गुंतत जातो, की त्याला ते पुरतं फसल्याशिवाय लक्षातही येत नाही. लक्षात येतं, तोवर तो संपूर्णपणे लुबाडला गेलेला असतो. 

‘इंटरनेटच्या माध्यमातून महिलेची फसवणूक, चाळीस लाखाला गंडा!’, ‘खोटी प्रलोभने दाखवून फेसबुकवरील मित्राने किंवा मैत्रिणीने वीस लाख रुपये उकळले’ अशा प्रकारच्या बातम्या हल्ली दर दोन दिवसांनी वर्तमानपत्रांत किंवा अन्य ठिकाणी वाचायला मिळतात. बातमी व्यवस्थित वाचली, तर फसवणूक करणारी व्यक्ती ही पूर्वीची काहीही ओळख नसताना केवळ मेसेजवरून, चॅटिंग करत ओळख वाढवलेली आणि मैत्री झालेली व्यक्ती असते हे लक्षात येते. मेसेज पाठवणारी अथवा इंटरनेटद्वारे संपर्कात आलेली व्यक्ती बहुतांशवेळा परदेशी किंवा परप्रांतीयच असते असं नाही, तर हल्ली मराठी नावानंसुद्धा फसवणूक करणारी मंडळी सापडायला लागली आहेत. 

हे प्रकार जगभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात. या प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल साईट्सवरून सावजं हेरली जातात आणि सहजी फसवणूक केली जाते. हे सर्व गुन्हे ‘सायबर गुन्हे’ या परिभाषेत येतात. या प्रकारची फसवणूक करणारे गुन्हेगार जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून तुम्हाला अलगद त्यांच्या जाळ्यात ओढतात. सामान्य माणूस त्यात असा काही गुंतत जातो, की त्याला ते पुरतं फसल्याशिवाय लक्षातही येत नाही. लक्षात येतं, तोवर तो संपूर्णपणे लुबाडला गेलेला असतो. ही फसवणूक वेगवेगळ्या मार्गानं केली जाते. 

व्यवस्थित अभ्यास केला, तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ज्यांची फसवणूक होते त्यापैकी अनेक जण कायम फेसबुकवर ऑनलाइन राहणारे, सिंगल, अविवाहित, घटस्फोटित स्त्री-पुरुष असेच असतात. विशेषतः रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन राहणारे लोक, पॉर्न फिल्म्स पाहणारे, त्या प्रकारच्या साईटसना भेट देणारे लोक यांना टार्गेट केलं जातं. हल्ली सोशल मीडियावर आपली संपूर्ण माहिती कोणालाही सहज उपलब्ध होते. आपलं व्यक्तिगत आयुष्य, फोटो, आयुष्यात घडणाऱ्या घटना आपण सहजपणे सोशल मिडीयावर पोस्ट करत असतो. अगदी त्यावरच्या टिप्पणीसह. मग त्यावर येणारे रिप्लाय, चर्चा हे चवीनं एन्जॉय केले जातात. मात्र, याचा अतिरेक झाला, तर व्यक्तिगत आयुष्य चव्हाट्यावर आणण्याचा हा प्रकार आहे, असं म्हटलं, तर ती अतिशयोक्ती ठरू नये. आणि मग अशा माहितीवर लक्ष ठेवून असणाऱ्या या टोळ्यांचं फावतं. कोणतं सावज जाळ्यात ओढलं जाईल याचा त्यांना बरोबर अंदाज येतो.

ही फसवणूक नक्की होते कशी? 
नीलिमाचं उदाहरण घेऊ. नीलिमा ही पंचावन्न वर्षांची, मध्यमवर्गीय कुटुंबातली, सुशिक्षित महिला आहे. दुर्दैवानं नीलिमाचा पती ऐन चाळिशीतच निर्वतला. त्याच्या पश्चात नीलिमानं नोकरी केली. मागं एक मुलगी आणि सासू-सासरे होते. काबाडकष्ट करून घरच्या, मुलीच्या शिक्षणाच्या, सासू-सासरे यांच्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पेलल्या. मुलगी मोठी झाली. शिक्षणासाठी बाहेर गेली. आता नीलिमा जरा निवांत झाली, निवृत्तीकडे झुकू लागली. गेल्या पाच-सहा वर्षात मुलीच्या नादानं फेसबुक, व्हॉट्सॲप यांच्याशी तिची मैत्री झाली. एकट्या नीलिमाच्या आयुष्यात हा बदल फार मोठा होता. कित्येक मनोरंजनाची साधनं बोटांवर उपलब्ध झाली. जुनी गाणी, सिनेमे पाहता येऊ लागले. रात्री झोप आली नाही, की युट्यूब सोबत असे. फेसबुकवर मित्र-मैत्रिणी गोळा झाले. त्यात कोणी ऑनलाइन असलं, तर गप्पा होऊ लागल्या. यात प्रत्यक्ष ओळख नसलेले काही मित्र होते. विशेष म्हणजे यातले दोन-तीन परदेशी मित्रदेखील होते. नीलिमाला आधी कुतूहल वाटलं; पण त्यातल्या एकाशी तिची छान मैत्री झाली. जेम्स त्याचं नाव. आवडीनिवडी, छंदसुद्धा बऱ्यापैकी सेम होते दोघांचे.

त्याची पत्नी म्हणे इंडियन कल्चरवर रिसर्च करायची, त्यामुळे त्याला भारताबाबत बरीच माहिती होती. त्याची कथित पत्नी काही वर्षापूर्वी ट्रेकला गेली असताना अपघातात मरण पावली होती. जेम्ससुद्धा पंचावन्नच्या आसपासचा होता. तो रात्री ऑनलाइन असे. नीलिमाला त्याच्याशी गप्पा मारून बरं वाटायचं. हळूहळू रात्री अकराला सुरू झालेल्या गप्पा आता पहाटे दोन- तीनपर्यंत सुरू असायच्या. नीलिमाला आयुष्यात पहिल्यांदाच मित्र मिळालेला. तोही या टप्प्यावर. ऑनलाइन मैत्रीत कोणाच्या डोळ्यावर येणारी नाही, शिवाय फक्त गप्पाच तर मारायची ती, त्यामुळे सगळ कसं सेफ होत तिच्यासाठी. रात्र झाली, की सोळा वर्षाच्या पोरीच्या ओढीनं नीलिमा अंथरुणात जाऊन मोबाईल हातात घेई. हळूहळू गप्पा वैयक्तिक आवडीनिवडीकडे झुकू लागल्या.

जेम्सनं तिला एकदा तिचा लाल साडीतला फोटो मागितला, त्याच्या बायकोला लाल साडी आवडायची म्हणे. नीलिमाला जरा ऑकवर्ड वाटलं; पण मैत्री तुटेल म्हणून तिनं ठेवणीतली साडी, हलकासा मेकअप, गजरा घालून एक सेल्फी पाठवून दिला. कित्येक दिवसांनी आपण आतून नटलो हे तिनं स्वतःला कबूल केलं. एकीकडे हवंहवंसं वाटणारं हे फीलिंग तिला सुखावून गेलं. जेम्सनं तर कौतुकाच्या मेसेजची रांगच लावली. त्याच्या ऑफिसची माहिती, तिथले फोटो शेअर केले. त्यानंतर त्यानं त्याचे काही फोटो शेअर केले. मैत्री प्रेमाच्या नात्यात कधी बदलून गेली, नीलिमाला कळलंदेखील नाही. एका रात्री गप्पा हळूहळू शारीरिक सुखाकडे वळल्या. जेम्सनं तिच्यापुढे पत्नीनंतरचं त्याचं भकास आयुष्य मांडलं. नीलिमाची स्थिती वेगळी नव्हतीच. याच भरात त्यानं त्याचे काही आक्षेपार्ह फोटो शेअर केले.

नीलिमाकडे तीच मागणी केली. नीलिमानं बेसावध क्षणी ही मागणी पुरी केली. हळूहळू नीलिमा पुरती गुंतत गेली. जेम्सनं तिला लग्नाची मागणी घातली. नीलिमानं भानावर येऊन नकार दिला; पण त्यानं गिफ्ट तरी स्वीकार म्हटल्यावर तिला नकार देणं शक्य झालं नाही. जेम्सनं दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये जाऊन नीलिमासाठी घड्याळ, मोत्यांचा महागडा सेट, पर्स, महागडा मोबाईल अशी बरीच खरेदी केली आणि तिला त्याचे फोटो पाठवून ‘या गोष्टी मी भारतात तुझ्या पत्त्यावर पाठवत आहे, तू त्या कलेक्ट कर,’ असं आग्रहानं सांगितलं. कित्येक वर्षांनी कोणीतरी तिची दखल घेतलेली. घरी ‘माझ्या ऑफिसच्या सगळ्यांसाठी दिवाळीनिमित्त काही गिफ्ट्स येणार आहेत,’ असं तिनं खोटंच सांगून ठेवलं.

तीन दिवसांनी दुपारी नीलिमाला एका कुरिअर कंपनीमधून फोन आला. एक मुलगी हिंदी, इंग्लिश मिक्स भाषेत बोलत होती. नीलिमाचं नाव, पत्ता, नंबर तिनं कन्फर्म करून घेतला आणि सांगितलं : ‘‘मॅडम, तुमचं कुरिअर आलं आहे. त्यात घड्याळ, मोत्यांचा महागडा सेट, पर्स, महागडा मोबाईल अशा वस्तू आहेत आणि त्यातच चाळीस हजार डॉलर्ससुद्धा आहेत. या नोटा तुमच्या पार्सलमध्ये कशा आल्या?’’ नीलिमा आता घाबरून गेली. तिला हा प्रकार उलगडेना. तिनं कसाबसा फोन खाली ठेवला. आधी ऑफिसच्या बाहेर पडली. कॉरीडॉरमध्ये जाऊन तिनं जेम्सला फोन लावला. त्यानं फोन उचलला. तिला सांगितलं : ‘‘घाबरू नकोस. मी भारतात येतो आहे.

तिथं बिझिनेस सुरू करायचा आहे. त्यासाठीचे पैसे आहेत. तू ते पार्सल ताबडतोब ताब्यात घे, कोणाला कळू देऊ नकोस. ते पार्सल सोडवण्यासाठी ती मुलगी काय सांगते ते ऐक, तिथं जा, नाहीतर गडबड होईल.’’ घाबरून नीलिमानं पुन्हा त्या मुलीला फोन लावला. मुलीनं सांगितलं : ‘‘पार्सलमधली कॅश बेकायदा आहे, आणि पार्सल तुमच्या नावावर आहे. तुम्ही ते ताबडतोब सोडवून घ्या. त्यावर जेम्सनं  टॅक्स भरलेला नाही. मी पोलिसांना सांगितलं, तर गडबड होईल. तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. तुम्ही स्त्री आहात. त्यापेक्षा एक काम करा. मी सांगते त्या अकाऊंटला तातडीनं पैसे भरा आणि यातून मोकळ्या व्हा.’’ नीलिमापुढे अन्य कोणताच मार्ग नव्हता. दुसऱ्या क्षणी तिच्या मोबाईलवर चार वेगवेगळी बँक खाती आणि नावं आली. शिवाय प्रत्येक खात्यात भरायची रक्कमही आली. जवळपास साडेतीन लाख रुपये होते ते. नीलिमाच्या डोळ्यांपुढे अक्षरशः अंधारी आली. ‘एवढे पैसे? देवा, कोणाला सांगताही येत नाही अशी गोष्ट.’ नीलिमानं पटापट हिशेब केले. मुलीच्या लग्नासाठी जमवून ठेवलेले आठ लाख रुपये नुकतेच मॅच्युअर  झाले होते. त्यातून देऊ असा विचार करून हाफ डे टाकून ऑफिसमधून ती बाहेर पडली. सांगितल्याप्रमाणे बँकेतून पैसे काढले आणि दिलेल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये रकमा भरल्या, त्याची पावती त्या मुलीला व्हॉट्सॲप केली.

मुलीला ‘‘गिफ्ट घ्यायला कुठं येऊ?’’ म्हणून विचारलं, तेव्हा त्या मुलीनं ‘‘माझे बॉस आले आहेत, त्यांच्याशी बोला,’’ म्हणून फोन एका माणसाकडे दिला. फोनवर कोणीतरी बंगाली हेल काढून हिंदी भाषेत माणूस बोलत होता. त्यानं नीलिमाला तिच्या पार्सलमधली रक्कम बेकायदा असून, अशी रक्कम थेट कुरिअरनं पाठवता येत नाही, असं सांगितलं. ‘‘ही रक्कम हवाल्याची असू शकते आणि तो मोठा गुन्हा आहे. आम्हाला ही झंझट नको आहे. आम्ही पोलिसांना बोलावतो. मगच तुम्ही इकडे या,’’ असं म्हणून फोन ठेवून दिला. नीलिमा मटकन खाली बसली. जेम्सला फोन लावला, तर तो बंद येत होता. तिनं त्याला वेड्यासारखे मेसेज पाठवायला सुरवात केली; पण काहीच उत्तर नाही. पती गेला, तेव्हाही नाही वाटलं इतकं आयुष्यात पहिल्यांदा नीलिमाला हवालदिल वाटलं. 

पुन्हा दोन तासांनी त्याच मुलीचा फोन आला. आता नंबर वेगळा होता. थरथरत नीलमानं तो फोन घेतला. तिकडून तो मघाचाच माणूसच बोलत होता : ‘‘मॅडम, मी पोलिसात जात नाही; पण या पैशांची किंमत पाहता तुम्ही आणखी पाच लाख रुपये भरा, मी हे सगळे पैसे आणि तुमच्या भेटी तुम्हाला देतो. तुम्हाला विश्वास नसेल, तर या भेटवस्तूंचे फोटो पाठवतो तुम्हाला.’’ त्यानं खरोखरच फोटो पाठवले. वस्तू तर जेम्सच्याच होत्या. सोबत नोटाही दिसत होत्या. नीलिमा आतून बाहेरून हादरली.

क्षणभर पोलिसात सांगावं, असंही वाटलं. एकुलत्या एका भावाचा सल्ला घ्यावा असाही विचार आला; पण मग ही सगळी जेम्सची भानगड सांगावी लागेल, या विचारानं ती आणखीनच खचली. गुपचूप परत बँकेत जाऊन नीलिमानं उरलेली रक्कम काढली, दिल्या खात्यांवर भरली आणि त्या कुरिअर कंपनीला फोन लावला. फोन बंद येत होता.

जेम्सला फोन लावला- त्याचाही फोन बंद! नीलिमाच्या लक्षात आलं- ती पुरती फसवली गेली होती. तिच्या पायातलं त्राण निघून गेलं. त्या दिवशी रात्री नीलिमाच्या मोबाईलवर वेगळ्याच नंबरवरून काही फोटो आले. तिनं जेम्सला पाठवलेले तिचेच फोटो होते. जेम्सचे फोन, फेसबुक अकाऊंट एका रात्रीतून बंद झालं होत. फोटोंचा गैरवापर व्हायला नको असेल, तर आणखी पाच लाख मागितले गेले. अंगावरचं सोनं मोडून नीलिमानं पुढच्या दोन दिवसांत त्याची भरपाई केली. फोटो, गिफ्ट्स काहीच ट्रेस होईना होईना म्हणून ती धाडस करून पोलिस स्टेशनमध्ये गेली. 

एव्हाना नीलिमाचे साडेतेरा लाख रुपये गेले होते. तपासातून काही मिळण्याची शक्यता नव्हतीच; पण किमान फोटोंचा गैरवापर होणार नाही, याची खात्री तरी पोलिसांनी नक्की दिली. तपास अजून चालू आहे.

...अशा कितीतरी नीलिमा आपल्या आजूबाजूला असतील. फक्त त्या समोर येत नाहीत. तक्रार करायला राजी नाहीत. हे फक्त स्त्रियांचाच बाबतीत होतं का? तर नाही. पुरुषही या जाळ्यात सहज अडकवले जातात. इंटरनेटचं हे मायाजाल कधी तुम्हाला फसवेल याचा नेम नाही. या गुन्हेगारी लोकांचे सिनिअर सिटिझन हे सगळ्यांत सोपं टार्गेट असतं. एकतर ही मंडळी बऱ्याचदा एकटी असतात. जवळ पैसा बाळगून असतात. तसंच फसवले गेल्यानंतर नामुष्कीच्या भीतीनं कोणाला सांगूही शकत नाहीत. गुपचूप मागितले तितके पैसे देतात आणि प्रकरण चुपचाप मिटवण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश सिनिअर नोकरदार अथवा एकटे स्त्री-पुरुष फसवले गेलेले आहेत. मध्यंतरी एका उच्चशिक्षित संशोधक महिलेला सुमारे चाळीस लाख रुपयांना लुबाडलं गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. मोठ्या पदावर असणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यालादेखील अठरा लाख रुपयांना फसवल्याची गुन्हा नोंद आढळते. इतकंच नव्हे, तर तुम्ही रात्री पॉर्न फिल्म्स पाहताना ‘आम्ही तुम्हाला नको त्या स्थितीत शूट केलं आहे. तुम्ही आम्ही सांगू ती रक्कम दिल्या अकाउंटला ट्रान्स्फर केली नाही, तर तुमच्या नातेवाईकांना आणि फेसबुक अकाउंटला ते फोटो पुढच्या चोवीस तासांत व्हायरल होतील,’ अशी धमकी देण्याचे आणि पैसे उकळण्याचे प्रकार उघडकीला आले आहेत. अशा वेळी घाबरून न जाता पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवणं केव्हाही श्रेयस्कर ठरतं.    

खरं तर इंटरनेट, स्मार्ट फोन अशी साधनं आपल्या सोयीसाठी उपलब्ध होतात. सुविधाही सोबत येतात. मात्र, त्यांचा वापर हा योग्य मार्गानंच व्हायला हवा, हे पुनःपुन्हा सिद्ध होत आहे. त्यासाठी मनाचंच नियंत्रण हवं. कोणतीही गोष्ट फुकट मिळत असेल, तर त्यात धोका आहे, फसवणूक आहे हे आधी लक्षात आलं पाहिजे. 

अशा पद्धतीच्या फसवणुकीमध्ये तर फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली किंवा शंका जरी आली, तरी त्या क्षणी थांबणं हाच सर्वोत्तम उपाय. त्यापुढे जाऊन फसवलं गेल्यानंतर पैशांची मागणी झाली, तर कोणत्याही बदनामीला न घाबरता सायबर गुन्हे अन्वेषण विभागात ताबडतोब तक्रार नोंदवली गेली पाहिजे. किमानपक्षी जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्या, आलेले मेसेज न संकोचता दाखवा. पोलिस खातं आणि सायबर गुन्हे अन्वेषण विभाग अशा तक्रारींची तातडीनं दखल घेतात.

तक्रार वेळेत दाखल केली, तर गुन्हेगार पकडले जाण्याची अथवा रक्कम परत मिळण्याची थोडी तरी संधी असते. मात्र, उशीर झाला, तर ज्या खात्यात संबंधित रक्कम भरलेली असते, ते खातंही बंद झालेलं असतं. अशा वेळी याचा शोध घेणं पोलिसांनादेखील अवघड होऊन बसतं. महत्त्वाची गोष्ट पुन्हा अधोरेखित करते आहे, की अशी फसवणूक झाली अथवा होतानाच लक्षात आलं, तर तातडीनं सायबर गुन्हे विभागात तक्रार नोंदवू शकता. असा विभाग आपल्या भागात, शहरात उपलब्ध नसेल, तर तातडीनं जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जा आणि तक्रार करा. हल्ली अनेक पोलिस स्टेशनमध्ये एक सायबर सेल असतो. जाताना ज्या मोबाईलवर मेसेज आले, संपर्क झाला तो मोबाईल, फेसबुक अकाऊंट यांचे डिटेल्स सोबत ठेवा. जितक्या लवकर तक्रार कराल, तितका धोका कमी. 

जगभरात अशा टोळ्या कार्यरत असतात. बहुतांशी या गुन्हेगारी टोळ्यांचा धागा रशिया, नायजेरिया, नोइडा इथवर गेलेला आढळून येतो. 

सोशल मीडियावर सक्रिय राहताना घ्यायची काळजी -

  •  फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर यांसारख्या माध्यमांवर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणं टाळावं.
  •  फ्रेंड रिक्वेस्ट करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण माहिती पडताळून पाहावी. ती योग्य वाटली, तरच स्वीकारावी. 
  •  अनोळखी व्यक्तीनं संपर्क केला, तर त्याला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.
  •  कोणत्याही भेटी, वस्तू अनोळखी व्यक्ती देत असेल, तर त्याला ठाम नकार देऊन ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा किंवा त्या व्यक्तीशी संपर्क कायमचा तोडावा.
  •  शक्यतो रात्ररात्र ऑनलाइन राहणं टाळावं.
  •  मुलांच्या हाती मोबाईल असेल किंवा त्यांचं फेसबुक अकाऊंट असेल, तर त्यांची फ्रेंडलिस्ट वारंवार तपासावी. त्यांचे चॅट मुलांच्या व्यक्तिगत बाबींमध्ये ढवळाढवळ न करता तपासावेत. 
  •  मुलांना या सर्व बाबींमधले धोके मित्रत्वाच्या नात्यानं सौम्य भाषेत समजून सांगावेत. 
  •  कोणाशीही आपले वैयक्तिक फोटो, घरातल्या सदस्यांचे फोटो शेअर करणं टाळावं. कोणत्याही प्रसंगी कुठल्याही दबावाला बळी पडून आपले आक्षेपार्ह फोटो, सेल्फी कोणालाही पाठवू नये.
  •  सिनेमात काम मिळवून देतो, लग्न करतो, नोकरी मिळवून देतो अशी सहज अश्वासनं देऊन संवाद वाढवणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावं.
  •  घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींनादेखील या सर्व बाबी योग्य पद्धतीनं समजावून सांगाव्यात, बऱ्याचदा सिनिअर पैसे बाळगून असल्यानं आणि खोट्या प्रतिष्ठेपायी ते तक्रार दाखल करण्याची शक्यता नसल्यानं ज्येष्ठ नागरिक हे या लोकांचे सॉफ्ट टार्गेट आहेत. 
  • लेखाच्या सुरवातीला वर्णन केलेली नीलिमा हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा फसवणूक करणाऱ्या लोकांची सावज शोधायची पद्धत नेमकी असते. त्यामुळे वर नमूद केलेल्या गोष्टींची काळजी घेतली, तर या मोहजालात अडकण्याची शक्यताच नाहीशी होते. सोशल मीडियाचा निखळ मनोरंजनासाठी आनंद घेता येतो. उत्तम संपर्क आणि उत्तम मित्रमंडळ यांचं जाळं आपण विणू शकतो. सजगपणे वावरून हे धोके टाळू शकतो.

शेवटी काय, वरवर आकर्षक वाटणाऱ्या, मनाला भुरळ घालणाऱ्या या कांचनमृगापासून चार हात दूर राहिलेलं केव्हाही चांगलं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com