आकार आणि प्रतिमा (आश्र्विनी देशपांडे)

Ashwini-Deshpande
Ashwini-Deshpande

आकार हे डिझायनर्सच्या पेटीतलं एक प्रभावी अस्त्र आहे, असं म्हणता येईल. योग्य संदर्भानुसार डिझायनर्स आकारांचा उपयोग भावना, संकेत, संदेश व्यक्त करण्यासाठी करत असतात. आकाराचा उपयोग वर्गीकरण स्पष्ट करण्यासाठी केला जातो.

विशिष्ट आकार डोळ्यासमोर आल्यावर आपल्याला काय वाटतं? वर्तुळाकार पाहिल्यावर जसं वाटतं, तसंच त्रिकोण पाहिल्यावर वाटत असतं की काही वेगळं? तीक्ष्ण खाचाखोचा असलेली ढब अथवा बाकदार वळणं असलेली ठेवण पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया का उमटतात? प्रत्येक आकारात वेगवेगळे संदेश दडलेले असतात. काही आकार भूमितीवर आधारित असतात, तर काही नैसर्गिक किंवा उत्स्फूर्त, अनियमित. काही रेषांनी मूर्त होणारे, तर काही रंग, पोत यांनी व्यक्त होणारे. काही आकार उबदार, आपलेसे वाटतात, तर काही काटेरी, दूरच ठेवावेत असे! काही ठसठशीत तर काही बटबटीत...

आकार हे डिझायनर्सच्या पेटीतलं एक प्रभावी अस्त्र आहे, असं म्हणता येईल. योग्य संदर्भानुसार डिझायनर्स हे आकारांचा उपयोग भावना, संकेत, संदेश व्यक्त करण्यासाठी करत असतात. आकाराचा उपयोग वर्गीकरण स्पष्ट करण्यासाठी केला जातो. कधी नजर एका भागावरून दुसरीकडं सहजपणे वळवण्यासाठी, तर कधी एका विशिष्ट भागी नजर खिळवून ठेवण्यासाठीही आकाराचा उपयोग केला जातो. रुंदी, खोली आणि हालचाल व्यक्त करण्यासाठीही आकाराच्या योजनेवर भर दिला जातो. एखादी वस्तू सुंदर दिसते तेव्हा किंवा पटकन उचलून हाताळावीशी वाटते तेव्हा रंगांच्या बरोबरीनं त्या वस्तूचा आकार आपल्याला आकर्षित करत असतो. रोजच्या आयुष्यातल्या घटना, रिवाज, नियमित वापराच्या वस्तू, ब्रॅंड्‌स ‘प्रभावी आकार’ या अस्त्राचा वापर सातत्यानं आणि परिणामकारकरीत्या करत असतात. काही आकार वारंवार विशिष्ट कल्पनांबरोबर जोडले गेल्यामुळं स्पष्ट संदेश पोचवू शकतात. सन १९६० मध्ये कुटुंबनियोजनाच्या माहितीशी लाल त्रिकोण जोडून दीप त्यागी या भारतीय सरकारी अधिकाऱ्यानं एक अवघड आणि महत्त्वाचा संदेश निरक्षर जनतेपर्यंतही अतिशय प्रभावीपणे पोचवला. यानंतर घाना, झिम्बाब्वे, इजिप्त अशा अनेक विकसनशील देशांनी लाल त्रिकोण हा ‘परिवारयोजने’चं चिन्ह म्हणून वापरायला सुरवात केली. वेगवेगळ्या कारणांमुळं केवळ शाकाहारीच असणारे लोक शाकाहाराबाबत अतिशय काटेकोरअसतात. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये चुकूनही गोंधळ होऊ नये म्हणून ‘फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्डस ॲथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) या सरकारी संस्थेच्या नियमांनुसार, प्रत्येक पॅकेज्ड्‌ फूडच्या वेष्टनावर हिरवा किंवा लाल ठिपका दाखवणं अनिवार्य आहे. ठराविक हिरव्या रंगाच्या चौकोनाच्या मध्यभागी मांडलेला साधा वर्तुळाकार ठिपका सन २००६ पासून कोट्यवधी शाकाहारी लोकांना आश्वासक ठरला आहे. भाषा, लिपी, साक्षरता यापलीकडं जाऊन केवळ आकार आणि रंग यांच्या मदतीनं दिला जाणारा हा महत्त्वाचा संकेत लोकमान्य ठरला आहे.

‘आकार म्हणजेच ब्रॅंडची ओळख’ अशीही काही प्रचंड लोकप्रिय उदाहरणं पाहायला मिळतात. पॅकेजिंगचा वैशिष्ट्यपूर्ण कल्पक आकार आणि त्याचा सातत्यानं प्रसार यामुळं काही मोजके ब्रॅंड जागतिक पातळीवर आपली अद्वितीय प्रतिमा आणि वर्चस्व प्रस्थापित करू शकले आहेत.

अष्टकोनी ठसा असलेली ‘हाइन्झ टोमॅटो केचप’ची बाटली सन १९०६ च्या सुमारास बाजारात आली. संपूर्ण पारदर्शक असलेली ही काचेची बाटली आतलं केचप किती शुद्ध आहे ते दिसावं अशा तऱ्हेनं आणि बाटली पकडायला सोपी जावी अशा तऱ्हेनं डिझाईन केलेली होती. उंच आणि निमुळत्या तोंडामुळं सॉस बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कापासून दूर ठेवला जाण्यासही मदत व्हायची आणि त्यामुळं त्याचा रसरशीत रंग काळपट न होता टिकून राहायचा. सातत्यानं वापरात असलेली ही बाटली आता प्लास्टिकमध्येही बनवली जात असली तरी मूळ आकारापासून दूर गेलेली नाही. या बाटलीचा आकार हीच ‘हाइन्झ’ची ओळख आहे. सन १९१२ मध्ये ‘हाइन्झ केचप’च्या ६५ कोटी बाटल्या जगभरात विकल्या गेल्या. आज तो आकडा त्याहून मोठाच असणार.

आकार = ब्रॅंड हे समीकरण कोका कोलाच्या बाबतीतही चपखल बसतं. कोका कोलाची बाटली ही विसाव्या शतकात विकली जाणारी सगळ्यात लोकप्रिय वस्तू होती असं सिद्ध झालेलं आहे.  सन १९१५ मध्ये कोका कोला कंपनीनं जाहीर केलेल्या डिझाईन स्पर्धेत ‘द रूट ग्लास कंपनी’ अतिशय वेगळ्या प्रकारची बाटली सादर करून विजयी झाली. पेयाच्या नावावरून स्फूर्ती घेऊन रूट कंपनीच्या डिझायनर्सनी कोकोच्या बियांचा आकार अभ्यासला आणि त्यावरून प्रेरणा घेऊन हातात सहज पकडता येईल अशी गोलसर बाटली डिझाईन केली. कार्बोनेटेड पेयांची लोकप्रियता उतरणीवर असली तरीही कोका कोलाच्या तब्बल १९० कोटी बाटल्या दर वर्षी विकल्या जातात. या बाटलीचा आकार एवढा परिचित आहे की तीवर ब्रॅंड छापला नाही तरीही तो ओळखला जाईल.

सन १९२० च्या सुमाराला गॅब्रिएल कोको शनेल यांची, ‘जगात सर्वोत्तम असं परफ्युम आपण तयार केलं आहे,’ अशी खात्री पटली होती आणि ‘मुळात परफ्युम उत्तमच आहे तर बाटलीवर कलाकुसरीची गरजच नाही,’ अशा विचारानं साधी चौकोनी पारदर्शक बाटली वापरण्याचं ठरलं. फ्रान्समध्ये त्या काळातल्या सुशोभित, नक्षीदार बाटल्यांपुढं शनेलची बाटली अगदीच वेगळी ठरली. सन १९२४ पासून ते आजतागायत ‘ही बाटली म्हणजे उत्तम परफ्युम’ हे समीकरण कायम आहे. जपानच्या सुशी या पारंपरिक पदार्थाबरोबर वाढला जाणारा सॉय सॉस आता जगभर लोकप्रिय झाला आहे तो कीकोमन या तिथल्या सुप्रसिद्ध ब्रॅंडच्या वैशिष्ट्यपूर्ण बाटलीमुळंच. केंजी एकुआन या जपानी डिझायनरनं आपल्या टीमबरोबर तीन वर्षं काम करून सुमारे १०० नमुन्यांची चाचणी केल्यानंतर सॉय सॉस ओतायला अतिशय योग्य अशी थेंबाच्या आकाराची बाटली निश्‍चित केली. 

सन १९६१ मध्ये सादर झालेली ही बाटली ७० देशांत आपलं वर्चस्व कायम ठेवून आहे. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे सन २०१४ मध्ये भारतात सादर झालेली ‘पेपरबोट’ ही पेयं आगळ्यावेगळ्या सोईस्कर आकाराच्या पाऊचमध्ये मिळतात. हा ब्रॅंड जरी नवीन असला तरी या विशिष्ट आकारामुळं तो आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेला आहे. रेषा आणि बिंदू यांना अर्थ असतोच; पण सौंदर्यशास्त्राच्या व्याकरणात आकाराला विशेष महत्त्व असतं हे या सगळ्या उदाहरणांवरून स्पष्ट होतं.

(छायाचित्रे: क्रिएटिव्ह कॉमन्स तत्त्वानुसार, अथवा निर्मात्याच्या मालकीची)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com