'लिडर' घडवणारी निडर लेडी

'लिडर' घडवणारी निडर लेडी

महिला दिन 2019 : बच्छेंद्री पाल गढवालमधील नाकुरीसारख्या छोट्याशा गावात लहानाची मोठी झाली. ती 1984 मध्ये एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली. मात्र, तेवढ्यावर न थांबता ती महिलांसाठी एव्हरेस्टसह विविध 'हटके' मोहिमा आखून, त्यांची तयारी करून घेत आहे. 'लिडर' बनलेल्या आणि त्यानंतरही न थांबता अनेक 'लिडर लेडी' घडवीत असलेल्या या निडर लेडीबद्दल खास महिला दिनानिमित्त 'सकाळ अर्काईव्ह'मधून..!

'टॉप'ला जाणे अवघड असतेच; पण टॉपवर टिकून राहणे त्याहून खडतर, अशा आशयाच्या म्हणी जगातील बहुतेक भाषांमध्ये आहेत. याचा अर्थ हा सिद्धांत जागतिक सत्य आहे. विविध क्षेत्रांमध्ये टॉपला गेलेल्या मातब्बरांचे कर्तृत्व-कार्यपद्धती-कामगिरी हेच दाखवून देते. याच नव्हे तर अगदी भौगोलिक संदर्भातही एखादी व्यक्ती 'टॉप'लाच नव्हे तर 'दी टॉपमोस्ट पॉइंट'ला गेली असेल तर? मग तर तिचे योगदान आणखी कौतुकास्पद ठरते. बच्छेंद्री पालने अशीच कामगिरी 1984 मध्ये केली. एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर सर केलेली ती पहिली भारतीय महिला ठरली. गढवालमधील नाकुरीसारख्या छोट्याशा गावात बच्छेंद्री लहानाची मोठी झाली. तिचे वडील तिबेटमध्ये खेचरांवरून धान्य विकत असत. तिने याच गावातील पहिली पदवीधर महिला होण्याचे ध्येय ठेवले आणि प्रत्यक्षात ती पंचक्रोशीतील पहिली द्विपदवीधर महिला ठरली! ही आणि 'पहिलीवहिली एव्हरेस्ट वीरांगना' अशा दोन अचिव्हमेंट बच्छेंद्रीसाठी आयुष्य सार्थकी लावणाऱ्या ठरल्या. पण, ती तेवढ्यावर थांबली नाही. स्वतः एव्हरेस्ट सर केल्यानंतर तिने 1993 मध्ये महिलांच्या एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व केले. महिलांसाठी गेल्या दोन दशकांमध्ये तिने विविध मोहिमा आखल्या आहेत. कच्छचे रण ते वाघा बॉर्डर उंटावरून, हरिद्वारला गंगेच्या विलक्षण वेगवान तराफ्यावरून मार्गक्रमण, काराकोरम खिंडीतून पदभ्रमण, भूतानमधील बर्फाळ भागातून ट्रेकिंग, अशा 'हटके' मोहिमा फक्त महिलांसाठी आखून, त्यासाठी महिलांची तयारी करून घेण्यापासून त्यांच्याकडून कामगिरी तडीस नेण्याचे 'महान कार्य' (खऱ्या अर्थाने...!) बच्छेंद्रीने केले.

या मोहिमांसाठी बच्छेंद्रीने तरुणी, गृहिणी, लेकुरवाळ्या आणि अगदी चाळिशी उलटलेल्या महिलांना सहभागी करून घेतले. वास्तविक 'गिर्यारोहणातील सर्वोच्च कामगिरीचे एव्हरेस्ट' केल्यानंतर त्या खेळात काही कमावण्यासारखे नाही, असे मानले जाते. त्यामुळेच इतर भगिनींना प्रेरित करण्यासाठी मुळात बच्छेंद्रीला इतकी कशी काय प्रेरणा मिळते, याचे आश्‍चर्य वाटत राहाते आणि तिच्या मोहिमांच्या दरवर्षी येणाऱ्या बातम्यांमुळे त्यात भरच पडते. प्रेरणास्थान काय, या प्रश्‍नावर बच्छेंद्री तत्त्वज्ञान न सांगता अगदी प्रामाणिक भावना व्यक्त करते. बंगालीपेक्षा गोड वाटणाऱ्या गढवाली ढंगाच्या हिंदीत अधूनमधून इंग्रजी शब्दांची नाटकी नव्हे तर उत्स्फूर्त पेरणी करीत ती सांगते, 'देखो भाई, एव्हरेस्ट समीट करनेवाली 'फर्स्ट इंडियन वूमन' ऐसा कहके मैं जिंदगी नही गुजार सकती. एव्हरेस्ट किया, ठीक है, लेकिन उसके बाद मैने क्‍या किया? मेरे लिए यह क्वेश्‍चन सबसे इम्पॉर्टंट है.'

बच्छेंद्रीच्या उत्तुंग कार्याला टाटा स्टीलने प्रचंड पाठिंबा दिला आहे. अलीकडे विविध वाहिन्यांवर; तसेच वृत्तपत्रांमधून बच्छेंद्री 'रोल मॉडेल' बनून साहस, शिस्तीचा संदेश देत असते. जमशेदपूरमध्ये टाटा स्टील ऍडव्हेंचर फौंडेशनची स्थापना करण्यात आली असून, बच्छेंद्रीच्या संकल्पनेतून येथे अनेक उपक्रम, कोर्सेस राबविले जातात. याबद्दल टाटा ग्रुपविषयी सुरवातीलाच आवर्जून कृतज्ञता व्यक्त करीत बच्छेंद्री म्हणते, 'मैं बहुत लकी हू, क्‍योंकी टाटाने मुझे सपोर्ट किया. वही मैंने खुद लिडरशीप स्किल्स सिखे.' बच्छेंद्रीची 'रिअल लाइफ स्टोरी' पाहिल्यास अपयश कुठे दिसत नाही, तरीही भूमातेशी असलेली नाळ तिने कधी तुटू दिलेली नाही. यश-अपयश काय शिकविते, त्यावर कशी मात करतेस, या प्रश्‍नावर बच्छेंद्री म्हणते, ''या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रयत्न-संघर्षांची (एफर्टस-स्ट्रगल) किंमत शिकवितात. लहानात लहान गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. प्रयत्न कमी पडत असल्यास जिद्द न सोडता संघर्ष करावा लागतो. अपयश आल्यास प्रयत्नांचे महत्त्व आणखी अधोरेखित होते.''

नव्या पिढीकडे 'टॅलेंट' असले तरी 'डेडीकेशन' नाही, अशा मतप्रवाहाविषयी बच्छेंद्री म्हणते, ''हे काही प्रमाणात खरे आहे, कारण आज मुलांना सर्व काही 'बना-बनाया' मिळून जाते. त्यांना 'प्रॉपर गायडन्स'ची गरज आहे. 'शॉर्टकट'च्या मागे लागल्यामुळे त्यांना 'एफर्टस-स्ट्रगल' सुरवातीलाच करावा लागत नाही. ते करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र 'प्रॉपर गायडन्स' मिळत नाही. वास्तविक सुरवातीपासूनच मुलांना हे कळेल असा अभ्यासक्रम आपण शाळेत राबवायला हवा.'

अलीकडे 'शालेय अभ्यासक्रमात क्रीडाविषय सक्तीचा करा,' असे मत कित्येक वर्षे हिरिरीने मांडले जात आहे; पण राज्य-राष्ट्रीय पातळीवर 'खेळाचा खेळखंडोबा' अशी स्थिती आहे. गिर्यारोहणाच्या बेसिक-ऍडव्हान्स-सर्च अँड रेस्क्‍यू अशा विविध कोर्सेसमध्ये मात्र 'प्रयत्नांती परमेश्‍वर' ही शिकवण दिली जाते. रॉक क्‍लायम्बिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग अशा विविध साहसी खेळांचे धडे मुला-मुलींकडून गिरवून घेताना बच्छेंद्रीसारख्या इन्स्ट्रक्‍टर्स 'एफर्टस-स्ट्रगल'चे महत्त्व दाखवून देतात. 'लेडी' असूनही 'लिडर' बनलेल्या आणि त्यानंतरही न थांबता अनेक 'लिडर लेडी' घडवीत असलेल्या बच्छेंद्रीला सलाम!

बच्छेंद्रीचा गुरुमंत्र

  • जितकी खडतर परिस्थिती तितके कठोर प्रयत्न करा.
  • तुम्ही इतरांसाठी काय करता याला महत्त्व जास्त असते.
  • यश येवो किंवा अपयश स्ट्रगल करणे सोडून चालत नाही.
  • कौतुक झाले, मानमरातब मिळाले, तरी जबाबदारीची जाणीव विसरू नका, उलट जबाबदारी अधिक वाढते.
  • अपयश आले तरी त्रुटी दूर करण्यासाठी पुन्हा कंबर कसून सज्ज व्हा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com