गांधींचे सत्य!

प्रा. चैत्रा रेडकर
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सत्य काय आणि असत्य काय, याविषयी प्रचंड संभ्रम या कालखंडात आहे. सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून संभ्रमावस्थेला खतपाणी घालण्याचे काम जगभरात होत आहे. अशा कालखंडात महात्मा गांधींच्या सत्याची प्रस्तुतता काय?

सत्य काय आणि असत्य काय, याविषयी प्रचंड संभ्रम या कालखंडात आहे. सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून संभ्रमावस्थेला खतपाणी घालण्याचे काम जगभरात होत आहे. अशा कालखंडात महात्मा गांधींच्या सत्याची प्रस्तुतता काय?

सत्य महात्मा गांधी यांच्या विचारात केंद्रस्थानी आहे.आज आपण ज्या काळात त्यांची दीडशेवी जयंती साजरी करत आहोत, त्या काळाचा उल्लेख ‘पोस्ट-ट्रुथ’चा कालखंड (सत्योत्तर) असा केला जातो. सत्य नावाची गोष्ट संपून गेल्याचा कालखंड! सत्य काय नि असत्य काय,याविषयी प्रचंड संभ्रम या काळात  आहे. सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून संभ्रमावस्थेला खतपाणी घालण्याचे काम जगभर होत आहे. अशा कालखंडात महात्मा गांधींच्या सत्याची प्रस्तुतता काय?

सत्य म्हणजे खरे बोलणे किंवा खोटेपणा, फसवणूक यांपासून दूर राहणे, असा अर्थ आपण घेतो. मात्र गांधींची सत्याची कल्पना ही निव्वळ खरे बोलण्याने साकार होत नाही. त्यात जीवनाविषयीचा सखोल दृष्टिकोन आहे. सत्य म्हणजे काय, या गहन प्रश्नाला गांधीजींनी भारतीय तत्त्वज्ञान परंपरेच्या साह्याने दिलेले उत्तर या दृष्टिकोनात आहे. प्रत्येकाचे अनुभवविश्व भिन्न असते, आशा-आकांक्षा वेगवेगळ्या असतात. त्यातून जगाचे आकलनही भिन्न होते आणि प्रत्येकाचे सत्यही वेगळे असू शकते. अशा भिन्न दृष्टिकोनाच्या जंजाळात नेमके सत्य म्हणजे काय हे कसे शोधायचे? सत्य म्हणजे काय हा प्रश्न तात्त्विक आहे आणि राजकीयही.

तात्त्विक यासाठी की कोणत्याही गोष्टीचा मानवाला साकल्याने बोध होण्याची शक्‍यता, वास्तवाचे नेमके स्वरूप, त्याच्या आकलनातल्या मर्यादा असे तत्त्वज्ञानाच्या परिघातले अनेक मुद्दे या निमित्ताने चर्चेला येतात.

विविध तात्त्विक भूमिकांमधून त्याची उत्तरे निरनिराळी असतात. हा प्रश्न राजकीयही, कारण विविध दृष्टिकोनातून शेवटी सत्य म्हणून जे पुढे येते ते सहसा प्रस्थापित आणि सत्ताधारी वर्गांना साजेसे असे एक आकलन असते.

‘जिसकी लाठी उसकी भैंस’ अशी म्हण आहे. तसे सत्यही प्रस्थापिताला पटणारा दृष्टिकोन असतो. अर्थात आपण ज्याला सत्य म्हणतो ते निव्वळ एक आकलन आहे, हे मान्य करायला कोणी तयार होत नाही. आपण म्हणू तेच खरे, असा आग्रह असतो. पूर्वी घडून गेलेल्या व आता घडत असलेल्या घटनांचे अर्थ आणि त्यातले सत्य आपापल्या सोयीनुसार, हितसंबंधांनुसार माणूस स्वीकारतो. फाळणी, पाकिस्तानची निर्मिती, महात्मा गांधींची स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका, ३७० व ३७१वे कलम अस्तित्वात येण्यामागची भूमिका, स्वतंत्र भारताच्या उभारणीत पंडित नेहरूंचे योगदान, वल्लभभाई पटेल आणि नेहरू यांचे नातेसंबंध, सुभाषचंद्र बोस-नेहरू आणि गांधी यांचे संबंध या आणि यांसारख्या अनेक बाबींमधले नेमके सत्य काय? याविषयी अनेक ‘कहाण्या’ आपल्यापर्यंत पोचतात. दिशाभूल करण्यासाठी रचलेल्या कहाण्या हा एक वेगळाच प्रकार. त्यातले धादांत असत्य कधी ना कधी उघडकीला येतेच! मात्र ज्यात अजिबात बनाव नसतो असे किस्सेसुद्धा शेवटी घडून गेलेल्या गोष्टींकडे पाहण्याचा निव्वळ एक दृष्टिकोन असतो. ठरावीक पद्धतीने लावलेला केवळ एक अर्थ असतो.व्यापक सत्याचा तो केवळ एक कवडसा असतो. कवडशालाच सूर्य मानत आपापल्या तुकड्याला कवटाळून बसणाऱ्यांचे ‘सत्य’ हे गांधींच्या सत्याच्या कल्पनेपासून कोसो दूर आहे. 

गांधींची सत्याची कल्पना समजून घेण्यासाठी हत्ती आणि चार दृष्टिहीन व्यक्तींची जातककथा समर्पक ठरते. या चार जणांपैकी कोणाच्या हाताला हत्तीचा पाय लागतो, तर कोण्याच्या हाती सोंड, कोणाच्या हाती कान लागतो, कोणाच्या हाती शेपूट! स्पर्शातून झालेल्या आपापल्या अनुभवाच्या आधारे कोणाला हाती लागलेली वस्तू खांब वाटते, कोणाला झाडाची फांदी, कोणाला ते सूप वाटते, तर कोणाला दोरखंड! यातील कोणाचाच अनुभव खोटा नाही, मात्र तो परिपूर्णही नाही. आपले अनुभवही अशाच प्रकारे खरे असले तरी संपूर्ण नाहीत. गांधींची सत्याविषयीची जाणीव या अपूर्णत्वाची आठवण करून देते. याचा अर्थ आपले अनुभव नाकारायला गांधी सांगत नाहीत, उलट आपल्या अनुभवांतून समजलेले सत्य मांडण्याच्या निर्भीडपणा बाळगण्याचा आग्रह धरतात. आपल्याला गवसलेल्या सत्याबद्दल विश्वास बाळगणे आणि त्याचबरोबर आपण केवळ अंश आहोत, समग्र वास्तव नाही, याची जाणीव या दोन बाबी गांधींच्या संकल्पनेचा आत्मा आहेत. ते सत्याच्या या दुहेरी अस्तित्वाचे भान ठेवण्याचा आग्रह धरत.

गांधींचे सत्य अंगीकारणे म्हणजे आपल्याला गवसलेल्या सत्याची विशिष्टता स्वीकारणे. दुसऱ्याला गवसलेल्या आपल्यापेक्षा भिन्न अशा सत्याविषयी सहिष्णुता बाळगणे. भिन्नता आणि विविधता याविषयी आदर राखणे. आपले आकलन आणि दुसऱ्याचे आकलन यांना एकमेकांच्या प्रकाशात तपासून अधिक व्यापक आकलनाकडे प्रवास करणे. एकमेकाशी अविरत संवादाला तयार राहणे. समोरच्या व्यक्तीला पटले नसले, तरी सत्याच्या आपल्या पैलूवर ठाम राहण्यासाठी जेवढी निर्भयता आवश्‍यक असते, तेवढीच अहिंसा आणि ऋजुताही आवश्‍यक असते. ‘माझे सत्य दुबळेही ठरत कामा नये आणि आक्रमकही होत कामा नये. मी भयभीत होता कामा नये आणि माझी भीतीही कोणाला वाटता कामा नये,’ अशी वृत्ती निर्माण होणे महात्मा गांधींना अभिप्रेत होते. ‘मी, माझा समुदाय, माझे राष्ट्र हेच काय ते खरे आहेत. दुसरी व्यक्ती, दुसरा समुदाय, दुसरे राष्ट्र खोटारडे आहेत. विकासाचा मला समजलेला अर्थ आणि मला दिसलेला मार्गच काय तो खरा. माझे ते सत्य इतर सर्व खोटे! इतरांचा मला धोका आहे’ अशी दृष्टी ही गांधींना शूराची मानसिकता वाटत नाही. दुसऱ्याविषयीची साशंकता हे भयग्रस्त असण्याचे लक्षण आहे. इतरांना आपली भीती वाटावी किंवा इतरांना आपले दडपण वाटावे ही वृत्तीदेखील निर्भयतेचे लक्षण नाही.

माझ्यावर कोणाचे नियंत्रण नाही आणि माझेही कोणावर नियंत्रण नाही, अशा सहजीवनाची कल्पना गांधींच्या सत्यात समाविष्ट आहे. त्यामुळे सत्याचा खरा उपासक वेगळेपणाला निर्भयतेने आणि हार्दिकतेने सामोरा जातो. आपण नष्ट होऊ ही भीती त्याला नसते, ना दुसऱ्याला नष्ट करण्याची गरज त्याला वाटते! संवाद, सहजीवन, संतुलन या जीवनाला पूरक गोष्टी गांधीजींच्या सत्याचा आत्मा आहेत. म्हणूनच कालखंड ‘पोस्ट-ट्रुथ’चा असो किंवा कलियुगाचा, गांधी जीवनवादी विचारांची प्रस्तुतता टिकून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Chaitra Redkar on Mahatma Gandhi