खुब्याच्या संधिवातावरील अत्याधुनिक उपचार

Arthritis
Arthritis

आरोग्यमंत्र - डॅा. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ
गुडघ्याच्या सांध्यातील कूर्चाप्रमाणे खुब्याच्या सांध्यामधीलही कूर्चाची झीज होते. त्याला खुब्याचा संधिवात (हिप ऑस्टिओअथ्रायटीस) असे म्हणतात. हा कूर्चा खराब झाल्याने खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना, सांधा कडक होणे, हालचाली मर्यादित होणे यांसारखी लक्षणे आढळतात. ही झीज अधिक प्रमाणात होते, तसे या कूर्चाचे तुकडे होऊन आजार अधिक गंभीर स्वरूपाचा होतो. सुरवातीच्या टप्प्यात झीज कमी असल्याने विविध औषधोपचार केले जातात. 

१. वेदनाशामक औषधे : अगदी सुरवातीच्या टप्प्यात अयुबोप्रोफेन, ॲसिटामिनोफेन यांसारख्या वेदना कमी करणाऱ्या व सूज कमी करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. 

२. इंजेक्‍शन : वेदना कमी करण्यासाठी काही जण हायल्युरॉनिक ॲसिडचे इंजेक्‍शन देतात. हे इंजेक्‍शन वंगणयुक्त द्रव्यासारखे काम करते. सांध्यातील कडकपणा कमी होऊन सांधा हलका, मोकळा होण्यास मदत होते. 

३. प्लेटलेटरिच प्लाझ्मा थेरपी : या अत्याधुनिक पद्धतीचा वापर संशोधनाच्या टप्प्यात आहे. टायगर वूडस, राफेल नदाल या खेळाडूंनी गुडघ्यावर याचा प्रयोग केला आहे. यामध्ये स्वतःच्या रक्तामधून कॉन्सेट्रेडेट प्लेटस्‌ तयार करून त्यांचे सांध्यामधून इंजेक्‍शन देतात. त्यामध्ये सांध्यातील खराब कूर्चा भरून येण्यात मदत होते व वेदनांपासून लवकर आराम मिळतो. हे प्रयोग खुब्यावरही सुरू असून, अजून हे उपचार संशोधन टप्प्यात आहेत. 

४. फिजिकल थेरपी व स्ट्रेचिंग : हलके शारीरिक व्यायाम व स्ट्रेचिंगमुळे खुब्याच्या हालचाली होण्यास काही अंशी सुरवातीच्या टप्प्यात मदत होते. त्यामध्ये योग, तायिची, पोहणे इत्यादींचा समावेश होतो. पुढील बाजूस खाली वाकणे, झोपून गुडघे पोटाजवळ घेणे, भुजंगासन यांसारख्या व्यायामाने ताण देऊन काही स्ट्रेचिंगचे व्यायाम करून सांध्यामधील वेदना व हालचाली सुलभता आणता येते. त्याचबरोबर वेदना अधिक असतात त्या वेळी हालचाली कमी करणे, खुब्याच्या सांध्याला आराम देणे, वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, जंकफूड, फास्ट फूड टाळून संतुलित व पोषक आहार घेणे, सांधा कडक असेल तर गरम पिशवीचा शेक घेणे व सूज अधिक असेल तर बर्फाच्या पिशवीने शेकणे, नियमित व्यायाम करणे, यामुळे खुब्याचा सांध्याच्या वेदना कमी करता येतात. ॲक्‍युपंक्‍चर, पाण्यातून चालणे (हायड्रोथेरपी), मसाज यांसारखे उपचारही केले जातात. चालण्यासाठी काठीचा उपयोग करणे, हाही तात्पुरता उपाय म्हणून उपयुक्त असतो. 
वरील उपचारपद्धतीचा उपयोग करूनही आराम मिळत नाही, अशा वेळी अंतिम टप्प्यात शस्त्रक्रियेचा उपयोग केला जातो. त्यामध्ये खालील पद्धतीचा वापर करतात. 

टोटल हिप रिप्लेसमेंट - यामध्ये खराब झालेले सॉकेट व मांडीच्या हाडाचे शीर (बॉल) हे दोन्हीही कृत्रिम इम्प्लॉंटचा वापर करून बदलले जातात. रुग्णाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, वेदना कमी करणे, हालचालीत सुलभता व सहजता येण्याच्या दृष्टीने या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी व उपयुक्त ठरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com