खुब्याच्या सांध्यावर रोपण शस्त्रक्रिया

Arthritis
Arthritis

आरोग्यमंत्र - डॅा. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ
खुब्याचा सांधा खराब झाला असेल तर कृत्रिम इम्प्लॉट बसवून ‘कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया’ अत्यंत यशस्वीपणे केल्या जातात. गुडघ्याप्रमाणेच खुब्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी आहे.  खुब्यांच्या खालील विकारामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणे गरजेचे असते. 

१) खुब्याचा संधिवात (ऑस्टिओअर्थ्रायटिस) - वयोमानानुसार वाढत्या वयात खुब्याच्या सांध्याची झीज ही अखेरच्या टप्प्यातील असेल व कूर्चा खराब झाला असेल तर सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच खात्रीशीर व यशस्वी असा उपाय आहे. 

२) खुब्याच्या सांध्यातील मांडीच्या हाडाला (बॉल) रक्तपुरवठा न झाल्यास. (अव्हॅसक्‍युलर नेक्रोसिस) - खुब्याच्या सांध्यातील हाड तुटले अथवा सांधा निखळल्यामुळे हाडांच्या काही भागास रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे हाडांतील पेशी मृत होतात. त्यामुळे तो भाग खडबडीत होतो. त्यास ‘ऑस्टिओनेक्रोसेसि’ असेही म्हणतात. यामध्ये पायांची लांबी थोडी कमी होते. चालताना लंगडल्यासारखे चालणे, वेदना होणे, यासारखा त्रास होतो. अपघातामध्ये मार लागून हाड तुटणे, कर्करोग उपचारातील रेडिएशनमुळे हाडे कमकुवत होतात व रक्तवाहिनीला इजा होते. छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये (फॅटीडिपॉझिट्‌स) अडथळा निर्माण होतो. तसेच सिकल सेल, ॲनिमिया, गाऊचर्स डिसीज, मधुमेह, पॅनक्रियॅटायरिस, एड्स (एच.आय.व्ही.), सिस्टेमिक ल्युपस इरदिमॅट्‍स या आजारामुळेही अव्हॅसक्‍युलर नेकोसिस झाल्याचे आढळून येते. अतिमद्यपानामुळेही रक्तवाहिन्यांमध्ये मेदाचा थर साठून रक्तप्रवाहास अडथळा होतो. दीर्घकाळ स्टिरॉइड्‍स घेतल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा होऊन हाडांच्या पेशी मृत होतात. अशावेळी उपचार म्हणून खुब्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया कराव्या लागतात. 

३) खुब्याच्या सांध्याचा आमवात (हिप ह्युमॅटॉइड) - यामध्ये खुब्याच्या सांध्याच्या हाडांच्या कडा (बोन लायनिंग) खराब होतात. सांध्यामधील रचनांत विकृती (डिफॉर्मिटी) येते. ही अवस्था अत्यंत वेदनादायक असते. सांध्यावर सूजही येते. याचबरोबर सकाळच्या वेळी सांध्यामध्ये कडकपणा, गरम वाटणे, थकवा जाणवणे याचबरोबर भूक मंदावणे यासारखी लक्षणे असतात. यामध्ये अंतिम टप्प्यात खुब्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा मार्ग उपयोजतात. 

४) अपघातामुळे/पडल्यामुळे/खुब्याचे हाड फॅक्‍चर झाल्यामुळे - खुब्यामधील मांडीचे हाड तुटले अथवा खोबणीचे हाड तुटल्यामुळे कूर्चा खराब होतो. तसेच हालचालीतील बदलामुळे हाडांवरही परिणाम होतो. त्यामुळे खुब्याचा संधिवात निर्माण होऊन पुढे सांधेरोपण शस्त्रक्रिया करावी लागते. 

खुब्याच्या सांध्यावरील रोपण शस्त्रक्रिया 
या शस्त्रक्रियेमध्ये सर्जन खुब्यांच्या सांध्यामधील खराब भाग काढून त्या ठिकाणी धातू, सिरॅमिक तसेच अत्यंत कठीण प्लॅस्टिकपासून बनविलेल्या कृत्रिम इम्प्लॉंटचे भाग लावतात. याला ‘हिप आर्थोप्लास्टी'' असेही म्हणतात. आजकाल दीर्घकाळ टिकाऊ स्वरूपांचे असे सिरॅमिकपासून बनविलेले इम्प्लॉंट असतात. यामध्ये हे इम्लॉंट बसविण्यासाठी बोन सिमेंटचा वापर करावा लागत नाही. त्याला ‘अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंट'' म्हणतात. काही वेळा ज्येष्ठ व्यक्तीमध्ये इम्प्लॉंट बसविण्यासाठी बोन सिमेंटचा वापर करावा लागतो. त्यास ‘सिमेंटेड हिप आर्थोप्लास्टी’ म्हणतात.

संशोधनाच्या प्रगतीमुळे इम्प्लॉंटच्या रचनेत, कार्यातही काही बदल केले आहेत. ड्युएल मोबिलिटी इम्प्लॉंट वापरून केलेल्या हिप आर्थोप्लास्टीनंतर रुग्णांच्या हालचालीत अधिक सहजता, सुलभता आल्याचे आढळते. तर रुग्णांची तपासणी करून काही काळानंतर काही रुग्णांना खाली बसण्यासही परवानगी दिली जाते. रुग्णांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, दैनंदिन हालचालीत कार्यक्षमता वाढवणे, हालचाली सहज, सुलभ करता येणे हा या शस्त्रक्रियेचा उद्देश सांधेरोपण सर्जरीमुळे हे यशस्वीपणे साध्य होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com