spondyl
spondyl

मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया

आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ
आपल्या पाठीच्या मणक्यांची विशिष्ट रचना असते. या मणक्याच्या रचनेत पाठीच्या मणक्यांची हाडे एकमेकांवर साखळीप्रमाणे विशिष्ट पद्धतीने गुंफलेली असतात. या दोन हाडांच्या मध्ये एक चकती असते. तिला शास्त्रीय भाषेत ‘इंटर व्हर्टिब्रल डिस्क’ असे म्हणतात. बोलीभाषेत तिला ‘मणक्यातील गादी’ असेही म्हणतात. पाठीच्या हालचाली, वाकणे, उडी मारणे या क्रियेमध्ये मणक्यांचा दाब शॉक अॅबसॉर्बरप्रमाणे सहन करणे, हे  या चकतीचे काम असते. ही चकती/गादी सरकते अथवा फुटून बाहेर येते (हर्नियेटेड डिस्क) तेव्हा मणक्यामध्ये असणाऱ्या मज्जारज्जूच्या नसांवर दाब येतो. त्यामुळे पायामध्ये वेदना होणे, त्या पाठीपासून पायाकडे सरकणे, मांडीमध्ये वेदना होणे, मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, पायातील ताकद कमी वाटणे, मलमूत्र विसर्जनावरील नियंत्रण कमी होणे, यासारखी लक्षणे आढळून येतात. या आजारामध्ये मुख्यत्वे आरामाच्या स्थितीमध्ये वेदना कमी होतात. वेदनाशामक औषधे, शास्त्रीय पद्धतीचे व्यायाम यामुळे लक्षणे कमी होतात. पण वरील उपचार घेऊनही ती कमी झाली नाहीत तर मात्र शस्रक्रिया हाच खात्रीशीर उपाय असतो.

तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाचे परीक्षण करून पाठीच्या मणक्याचे एक्स रे, एमआरआय, गरजेप्रमाणे सिटी स्कॅन करून निदान करतात. या ठिकाणी रुग्णाची लक्षणे, डॉक्टरांना तपासणीमध्ये आढळलेली निरीक्षणे व निदान तपासणीचा अहवालाचा सारासार विचार करूनच शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. औषधोपचाराने वेदना थांबत नाहीत, दैनंदिन क्रियाही अडचणीच्या होतात, चकतीचा दाब नसांवर येऊन पायातील बधिरता, मुंग्या येणे वाढते, पायाच्या ताकदीवर परिणाम होऊ लागतो, मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण राहत नाही. अशा वेळी शस्त्रक्रिया करणे गरजेचेच ठरते.

या शस्त्रक्रियांमध्ये प्रामुख्याने दोन मणक्यांच्या हाडांमधून बाहेर आलेल्या चकतीचा खराब भाग काढून नसांवरील दाब काढला जातो. ही शस्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.

१. ओपन डिस्केक्टॉमी : पाठीवर छेद घेऊन खराब चकती काढून ही शस्त्रक्रिया केली जाते.

२. मायक्रोडिस्केक्‍टॉमी : या शस्त्रक्रियेमध्ये सर्जन एका छोट्याशा छेदातून कॅमेरा असलेली ट्यूबनळी घालून परीक्षण करतात व काही विशिष्ट अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने खराब डिस्क काढली जाते.

३. लंबर लॅमिनेक्टॉमी : काही वेळा मणक्यामधील हाडाचा छोटासा भाग सर्जनला काढावा लागतो. मणक्याच्या या भागाला ‘लॅमिना’ म्हणतात. हा लॅमिना हाडांच्या आवरणातून मज्जारज्जूचे रक्षण करत असतो. खराब चकतीपर्यंत पोचण्यासाठी काही वेळा ही लॅमिनेक्टॉमी करण्याची अवश्‍यक असते. यामुळेही नसांवरील दाब कमी होण्यास मदत होते. पायातील वेदना, सायाटिका त्रास कमी होतो. काही वेळा मणक्याच्या या हाडाचा (लॅमिना) संपूर्ण भागही काढावा लागतो. त्यास ‘लॅमिनेक्टॉमी’ म्हटले जाते. लॅमिनाबरोबरच खराब चकतीही काढली जाते.

४. मणके जोडणे (स्पायनल फ्युजन ) : लॅमिनेक्टॉमी अथवा डिस्केकटॉमीनंतर सर्जन काही वेळा मणके जोडण्याची शस्त्रक्रिया करतात त्याला ‘स्पायनल फ्युजन’ म्हणतात. मणक्यांची रचना स्थिर राहण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असते. दोन हाडांना जोडल्याने ते स्थिर राहिल्याने वेदनाही कमी होतात. 

५. आर्टिफिशियल डिस्क रिप्लेसमेंट : काही लोकात हा पर्यायसुद्धा वापरला जातो. खराब चकती काढून त्या ठिकाणी कृत्रिम चकतीचे रोपण केले जाते. ही कृत्रिम चकती मणके स्थिर ठेवण्यास तसेच मणक्याच्या हालचाली सुलभ करण्यात मदत करते.

या शस्त्रक्रिया आता ‘मिनिमल इन्व्हेसिव्ह’ पद्धतीने करता येतात. त्यामुळे या शस्त्रक्रियेमध्ये कमीत कमी छेद, कमीत कमी रक्तस्राव, जलद आराम हे फायदे असतात. रुग्ण शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हालचाली करू शकतो. जड वजन उचलणे, दीर्घकाळापर्यंत बसणे, कंबरेतून वाकणे या कृती करताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेणे आवश्यक असते. सद्यःस्थितीत या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी होत असल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com