दहावी- गुण आणि अपेक्षा

Education
Education

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
शाळेचे इयत्ता नववीचे वर्ष संपायला लागताच मुला-मुलींवरचे दडपण वाढते. याचे मूळ असते आई-वडील व शिक्षकांच्या सततच्या उद्‍गारांमध्ये. नववी तर संपली, आता दहावीचे महत्त्वाचे वर्ष. सारे काही दहावीच्या मार्कांवर अवलंबून असणार आहे ना? कुठे अन्‌ कसा प्रवेश मिळणार आहे? काय करणार आहे देव जाणे? 

या असल्या उद्‌गारांनी महाराष्ट्रातील सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांची झोप उडवण्याचा उद्योग घरोघरी सुरू होत असतो. मी त्याला कुटिरोद्योग म्हणतो, कारण या कुटिरोद्योगातून फक्त झोप उडण्याशिवाय काहीही निर्माण होत नाही. झाल्या तर फक्त निर्माण होतात अवास्तव अपेक्षा.

अवास्तव अपेक्षा वास्तवापासून कोसो दूर असतात; नेहमीच. खरे तर, आपले मूल त्याच्या पालकांना त्याच्या सवयी, कुवती, आवडीनिवडींसह छानसे कळलेले असते. इयत्ता पहिली ते नववी दरम्यानचा त्याचा शैक्षणिक प्रवासाचा आलेख छान पाठही असू शकतो. शिक्षकांना त्याचा किमान अंदाज असतो, मात्र वर्गातील साठ जणांमध्ये भावनिकदृष्ट्या अडकणे त्यांना शक्‍य नसते. पण शंभर टक्के निकाल हवा या दटावणीने त्यांचाही, आता तुमची दहावी सुरू हा घोष सुरू होतो. मग घडते ते सारे अपेक्षांच्या दडपणाखाली, म्हणजे नववीपर्यंत जेमतेम ५० टक्केवाली मुले एकदम ६५-७० टक्के गाठतात. तर ७० टक्‍क्‍यांवर अडकलेली ८५ टक्‍क्‍यांवर येऊन थांबतात. तर ऐंशी-पंचाऐंशीवाली थेट नव्वदीपार करून लढाई जिंकतात. मनातले, अपेक्षेतले, स्वप्नातले कॉलेज मोठ्या शहरातील तीव्र स्पर्धेतून मिळवण्याची ही लढाई इथेच संपते. खरे युद्ध असते ते इयत्ता बारावीनंतरच्या कोणत्याही प्रवेश परीक्षेदरम्यान होणारे. त्या युद्धाला तोंड लागण्यापूर्वीच हे आमचे नव्वदीपार केलेले शूरवीर ढेपाळतात. दहा-पंधरा टक्‍क्‍यांचा फुगवटा घेऊन दहावी उत्तीर्ण होणारे पुन्हा वीस टक्क्यांनी खाली कोसळतात. 

मग खरे वास्तव काय असते? इयत्ता नववीचे विषयवार मार्कांचे नेमके विश्‍लेषण. भाषांचे मार्क/सामाजिक शास्त्रातील प्रगती/गणिताची आवड व मार्क/शास्त्राचे मार्क व चौकसवृत्ती यामध्ये फारतर नैसर्गिक पाच टक्‍क्‍यांची वाढ होते. दहावीचे खरेखुरे मार्क ओळखणारे पालक व विद्यार्थी इयत्ता बारावीनंतरचे युद्धाला जिद्दीने सामोरे जातात. कोणत्याही युद्धामध्ये जिद्दच निर्णायक असते, हेच वास्तव!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com