जड झालेले अपेक्षांचे ओझे...

Career
Career

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
एखादा विद्यार्थी जेव्हा कॉमर्सला प्रवेश घेतो तेव्हा त्याला सहजपणे प्रश्‍न विचारला जातो, ‘काय मग सीए करणार का सीएस?’ त्यातही मार्क ऐंशी टक्‍क्‍यांच्या पुढे असतील, तर त्याचे पालकच काय पण विद्यार्थी स्वतःसुद्धा या रस्त्याकडे स्वाभाविकपणे खेचला जातो. कारण अपेक्षांचे ओझे त्याच्या खांद्यावर वाढलेले असते. सुप्त आकर्षण तर असतेच असते. 

मग अर्थातच साधा क्‍लास न लावता थेट अगदी अकरावीपासूनच यापैकी एका परीक्षेची तयारी ‘करून घेणारा’ क्‍लास शोधला जातो. त्या क्‍लासला मनोभावे जाणारा विद्यार्थी कॉलेजात मात्र शोधावा लागतो. कॉलेज अटेंड करणे हा एक दिवसेंदिवस गहन होत चाललेला विषय आहे. असो. 

इयत्ता अकरावी संपते, बारावी कॉमर्सची परीक्षा झाली, की सीएची प्रवेशपरीक्षा सीपीटी किंवा सहा महिन्यांनी फाउंडेशनसाठीची सीएसची परीक्षा अशा चक्रातून विद्यार्थी जातो. मग उजाडतो तो दिवस असतो वास्तव कळण्याचा. सर्वसाधारण टक्केवारी पाहता गेल्या संपूर्ण दशकात या परीक्षांचा निकाल जेमतेम २५-३५ टक्के उत्तीर्ण एवढाच लागत आलेला आहे. चूकभूल देणे व घेणे, पण दहावीत ८० टक्के असूनही यात बदल झालेला नाहीये. 

आता प्रश्‍न असतो अनुत्तीर्णांनी काय करावे असा. इथे खरा गोंधळ सुरू होतो अपेक्षा आणि वास्तवाचा. सहजपणे कानावर पडत आलेले असते, की या परीक्षांना दोन-तीन वेळा तरी बसावेच लागते. त्या कठीण असल्या तरी त्यात कष्टानेच यश मिळते, हुशारी लागतेच असे नाही. मात्र या द्विधा मनःस्थितीमुळे थेट परिणाम सुरू होतो तो पदवीच्या मार्कांवरती. जी मंडळी अगदी फर्स्ट अटेंप्टमध्ये प्रवेश परीक्षा पार करतात, त्यांना पुढच्या परीक्षांत सहजी यश मिळतेच असेही अपवादानेच घडते. त्या परीक्षांतील निकालाची टक्केवारी जेमतेम १५ ते २५ टक्केच राहते. मग यामागचे वास्तव कसे समजून घ्यायचे? 

इयत्ता दहावीच्या टक्‍क्‍यांवर न अवलंबता सलग एका बैठकीत निदान वीसएक पाने वाचनाची सवय महत्त्वाची. आर्थिक, वित्तविषयक, करविषयक घडामोडींबद्दलचे अवांतर वाचनात रस हवा. नेमक्‍या मांडणीतून, मुद्देसूद उत्तर लिहिण्याची सवय व शिस्त शिकणे सर्वांत महत्त्वाचे असते. 
खरे तर प्रवेशपरीक्षेत प्रथम प्रयत्नात ४५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी मार्क असतील तर बी.कॉमला सत्तर टक्के मिळवून ही परीक्षा न देताही सीए/सीएसला सुरवात करणे हे खरे उत्तर असते. तोवर सर्वच विषयांची समज व आवाका वाढतो व यश आवाक्‍यात येते. थोडक्‍यात मोठे होण्याची घाई टाळणे हेच खरे नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com