‘रिसर्च’चा मागोवा..!

Career
Career

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
माझा असा अनुभव आहे की शास्त्र हा विषय न आवडणारे दहात फारतर दोन विद्यार्थी असतात. पण, त्याचा असा अर्थ नसतो की उरलेल्या आठांना शास्त्र हा विषय मनापासून आवडतो व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कळतो. या विषयातील प्रयोग असोत किंवा छोटी-मोठी उदाहरणे असोत; त्या प्रत्येकासंदर्भात काहीतरी घडताना दिसते, अनुभवता येते. त्यातून एक निर्माणाचा आनंद मिळतो. आता वाचकांनीच सांगावे असे अन्य कोणत्या शालेय विषयात घडते? फारतर अवघड गणित सोडवल्याचा आनंद मिळतो एवढेच. तर सांगायची गोष्ट म्हणजे शास्त्र हा आवडीचा विषय. 

मग इयत्ता नववी, दहावीला जर शास्त्रात किंवा एकूणच ९० टक्के मार्क पडले तर एक वेगळाच शब्द मुला-मुलींच्या तोंडून अगदी नित्यनियमाने मला ऐकावा लागतो. 

मला ना, संशोधनच करायचे आहे. हा शब्द ऐकून पालकांना मनातून आनंद होतो, त्याच वेळी थोडीफार हुरहूरसुद्धा सुरू होते. म्हणजे हा किंवा ही डॉक्‍टर वा इंजिनिअर नाही होणार? हेही ठीकच आहे. पण, ज्यावेळी माझा प्रतिप्रश्‍न असतो की संशोधन करायचे आहे म्हणजे काय? कशात करावेसे वाटते? त्यासाठी किती वर्षे द्यावी लागतात? किती शिकावे लागते? तिथेच सारी गडबड सुरू होते. मग संशोधन शब्दाचे इंग्रजी रूपांतर मला ऐकावे लागते. म्हणजे रिसर्च हो! ही झाली अपेक्षा. 

वाचकांना अगदी सोपे करून सांगायचे तर संशोधनाचा रस्ता हा खडतर, लांबचा, अत्यंत चिकाटीचा, दमछाक करणारा असतो. या साऱ्यामध्ये मी टक्केवारी, हुशारी, तेलबुद्धी असा कोणताही शब्द वापरलेला नाही, हे कृपया नीट समजून घ्यावे. मात्र हुशारी असली तर दुधात साखरच समजा. अगदी थोडक्‍यात सांगायचे तर इयत्ता दहावी ते एमएस्सीदरम्यान किमान ७५ टक्के टिकवले तर संशोधनाचा पाया भरला जाऊ शकतो. खरी सुरवात होते ती पीएच.डी. करून झाल्यावर म्हणजेच वय ३१/३२ वर्षांनंतरच. असाच एक मोठ्ठा गैरसमज म्हणजे संशोधन फक्त शास्त्रातच असते. भाषेपासून समाजशास्त्रांपर्यंत व भूगर्भापासून ते अंतरिक्षापर्यंत प्रत्येकात संशोधन करणाऱ्यांचा समावेश होतो. वास्तव वेगळेच सांगते. इयत्ता दहावीला रिसर्च करायचे ठरवणाऱ्या हजारातील फारतर दोन-पाच मुले-मुली खरेच हा रस्ता पकडतात. त्यापेक्षाही दुर्दैव म्हणजे डॉक्‍टरेट हाती आली की खरोखर संशोधन संस्थांत काम स्वीकारणारा अपवादानेच शोधावा लागतो. कारण, संशोधनाला ना ग्लॅमर, ना भरभक्कम पॅकेज. चांद्रयान मोहिमेआधी डॉ. शिवम्‌ किती भारतीयांना माहिती होते हो?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com