मंझिल की जुस्तजूँ में मेरा कारवाँ तो है... (डॉ. यशवंत थोरात)

Yashwant-Thorat
Yashwant-Thorat

मला जाणवलं की शिक्षणक्षेत्रात काम करण्याची संधी आज, या क्षणी, माझ्यासमोर आहे. पूर्वी जेव्हा मला खूप तीव्रतेनं वाटत होतं तेव्हा मला तशी संधी मिळाली नव्हती; पण आज ती संधी माझ्यासमोर उभी होती. प्रश्न होता तो ती संधी स्वीकारायचं धैर्य माझ्यात होतं का? कितीही किंमत द्यावी लागली तरी...? की वयाचं कारण सांगून मी ती हातची घालवणार होतो? विचारांचा हा कल्लोळ माझ्या मनात दाटला होता.

माझ्या जन्माच्या वेळची गोष्ट. माझी आई जेवत असतानाच तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. परिणामी, तिला माशांची आमटी आणि भाताचं जेवण अर्धवट सोडावं लागलं. सन १९४७ मधला हा प्रसंग आणि माझं धावपळीचं जीवन यांचा काहीतरी अन्योन्यसंबंध असावा असा माझा तर्क आहे! त्यामुळेच जन्मदिवसापासून सुरू झालेली माझी धावपळ आजपर्यंत कायम आहे. त्या हुकलेल्या जेवणाचा प्रभाव माझ्या आयुष्यावर कसा पडला याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. 

बहात्तर वर्षांच्या एका निवृत्त माणसाचा रोजचा दिनक्रम तसा चाकोरीबद्ध असतो. सकाळी चहा आणि वृत्तपत्रवाचन, दुपारच्या जेवणापूर्वी आवडीचं टीव्ही चॅनल पाहणं, संध्याकाळी नाना-नानी पार्कमध्ये जाणं किंवा तत्सम एखाद्या बागेत चालण्याचा व्यायाम आणि रात्री झोपण्यापूर्वी दूरदर्शनच्या बातम्या पाहणं. असं असलं तरीसुद्धा  दर महिन्याला मी ४०० किलोमीटर ड्रायव्हिंग करत मध्य महाराष्ट्रातल्या सुमारे शंभर शिक्षण संस्थांमध्ये तिथले प्रश्न सोडवायला का जातो याचं उत्तर कुणी मला देईल का! 

माझ्या या उपक्रमाकडे कुणाचं लक्ष गेलं नाही असं मात्र समजू नका. त्यावर वारंवार चर्चा झाली आहे. माझ्या मुलींना माझ्या प्रकृतीची काळजी वाटते. मित्रांना माझ्या मनःस्वास्थ्याची चिंता वाटते. माझ्या पत्नीला दोहोंची काळजी वाटते. वयाचा एक मुद्दा सोडला तर सर्वसाधारणपणे मी ठीक आहे. अनेक लोकांप्रमाणे मीही निवृत्तीनंतर काही गोष्टी केल्या. एका कॉलेजमध्ये शिकवलं, एका विश्र्वस्त संस्थेचं काम पाहिलं आणि काही कॉर्पोरेट संस्थांच्या संचालक मंडळावर काम केलं. हे सगळं केल्यानंतर एके दिवशी पूर्णविराम घेण्याचा निर्णय मी घेतला. पंचेचाळीस वर्षांपूर्वी मी रिझर्व्ह बॅंकेत नोकरीला सुरुवात केली होती. आयुष्यानं मला चांगलं यश दिलं. चेअरमन झालो, माझी बऱ्यापैकी ओळख निर्माण झाली. या सगळ्याबद्दल मी तसा समाधानी होतो; पण तरीही कधी कधी असं वाटायचं की काहीतरी राहिलं आहे, राहून गेलं आहे. 

पत्नी उषानं मला एकदा विचारलं : ‘‘तू समाधानी आहेस का?’’
‘‘होय, आहे’’ मी म्हणालो. 
मग तिच्या मनाची समजूत काढण्यासाठी मी तिला म्हणालो : ‘‘हे बघ, आयुष्य हे असंच असतं. हवी असलेली गोष्ट प्रत्येकाला मिळतेच असं नाही. कोणत्याही बाबतीत ठरवलेली उद्दिष्टं मृगजळासारखी असतात.’’ उषाचं समाधान झालं; पण खूप प्रयत्न केल्यावरदेखील मी माझं समाधान मात्र करू शकलो नाही.

काही दिवसांनंतर एका संस्थेनं ‘ग्रामीण शिक्षणाच्या संदर्भात काम करण्यात रस आहे का?’ असं मला विचारलं. अनेक संस्थांचा सहभाग असलेल्या या संस्थेची स्थिती थोडी नाजूक होती. ही स्थिती बदलली पाहिजे असं संस्थेला वाटत होतं. ती स्थिती बदलू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात ती संस्था होती. मला हा प्रस्ताव आवडला. मी तयारही होतो. फक्त घरच्या ‘लोकसभे’त याला मान्यता मिळणार की नाही हा प्रश्न होता! अपेक्षेनुसारच माझा प्रस्ताव फेटाळला गेला. 

उषा म्हणाली : ‘‘यापूर्वी तुम्ही शिक्षणक्षेत्रात कधीच काम केलेलं नाही, त्यामुळे तुम्ही ही जबाबदारी स्वीकारण्यास अपात्र आहात.’’ 
मुली म्हणाल्या : ‘‘अशी एखादी मानद जबाबदारी स्वीकारण्याच्या पुढं तुमचं वय गेलं आहे.’’ 
मित्र म्हणाले : ‘‘अशा संस्थांमध्ये राजकारण मोठ्या प्रमाणावर चालतं. तुमचा सरळ स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा त्यांना झेपणार नाही.’’
गेली तीस वर्षं आमच्याकडे घरकाम करणारी सुषमा म्हणाली : ‘‘पप्पांचं काहीतरी सटकलंय.’’ 
विरोध झाला तर माझा निर्धार अधिकच बळकट होतो. माझ्या मतस्वातंत्र्याला महत्त्व देत मी सगळे आक्षेप बाजूला सारले आणि ते काम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 
मी स्वतःला म्हणालो : ‘प्रत्येक महिन्यात एक आठवडा त्यासाठी द्यायला काही हरकत नाही. हे काम मी विनावेतन करणार आहे. त्यामुळे मला वाटेल त्या वेळी मी ते सोडून त्यातून बाहेर पडू शकेन.’ मी कामाला सुरुवात केली. दोन-तीन महिन्यांतच माझ्या लक्षात आलं की संस्थेला सरळ मार्गावर आणण्यासाठी ग्रामीण भागातील 
शिक्षणव्यवस्था आणि तळागाळातलं राजकारण याविषयी मला खूप काही शिकावं लागणार आहे. खरं तर या कामासाठी महिन्यातले तीसही दिवस अपुरे पडले असते. त्यासाठी मी महिन्यातले फक्त सात दिवस देत होतो. या कामात संपूर्णपणे झोकून देण्याची गरज होती. माझ्यापुढे मात्र या कामाबरोबरच इतरही अनेक व्यवधानं होती.

शिवाय, संस्थेला या कामासाठी तरुण माणसाची गरज होती आणि मी तर वयाची सत्तरी ओलांडलेली होती. म्हणजे ‘मागणी आणि पुरवठा’ किंवा ‘गरज आणि उपलब्धता’ यांत जमीन-अस्मानाचं अंतर होतं. त्यामुळे काहीतरी कारण सांगून काम थांबवायचं आणि कोल्हापूरला परतायचं असा विचार माझ्या मनात आला अन्‌ पक्का झाला. त्यानुसार पुढच्या भेटीत संस्थेच्या अध्यक्षांना भेटायचं आणि ‘वयाचा आणि प्रवासाचा त्रास होत असल्यामुळे काम करता येणार नाही,’ असं सांगायचं असं मी ठरवलं. 

मी अध्यक्षांना भेटण्यापूर्वी मला तीन मुली भेटल्या.
पहिली मुलगी मला फुटबॉलच्या मैदानावर भेटली. सकाळी सहा वाजता. मैदानात ती बसली होती; पण तिच्या पुढ्यात पुस्तकांचा ढीग होता. मी तिला बोलतं केलं.
‘‘काय करतेस?’’
‘‘अभ्यास’’ तिनं एका शब्दात उत्तर दिलं.
‘‘कसला अभ्यास?’’
‘‘स्पर्धा परीक्षेचा,’’ पुन्हा त्रोटक उत्तर.
‘‘तू पास होशील असं तुला वाटतं का?’’
‘‘का नाही होणार?’’
‘‘वा, छान; पण त्याऐवजी डॉक्टर किंवा इंजिनिअर होणं तुला आवडणार नाही का?’’
‘‘मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचा खर्च मला झेपणार नाही. या परीक्षेत मात्र मी माझ्या गुणवत्तेवर पास होईन याची मला खात्री आहे,’’ ती ठामपणे म्हणाली.
ती पास झाली तर ती मोठीच गोष्ट असणार होती; पण त्यासाठी फक्त निर्धार किंवा आत्मविश्र्वास पुरेसा होता का? त्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन आणि एखाद्या चांगल्या संस्थेचं पाठबळ यांची गरज नव्हती? ती जिवापाड मेहनत घेईल हे तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं. प्रश्न होता तो तिच्या ध्येयासाठी आमची संस्था योग्य होती की नाही? तशी ती नसेल तर ही संस्था तशी बनावी यासाठी मी दिवस-रात्र काम करायला तयार होतो का? गोड बोलणं आणि शुभेच्छा देणं हा भाग वेगळा आणि त्या प्रश्नात उडी घेऊन पुढं जाऊन प्रत्यक्ष काम करणं हा भाग वेगळा. तिला उत्तुंग यश मिळावं असं मला मनापासून वाटत होतं; पण त्यासाठी प्रत्यक्षात काही करण्याची माझी तयारी नव्हती.

दुसरी मुलगी तिच्या वसतिगृहाकडे परतत होती. मी कॅम्पसमध्ये संध्याकाळचा फेरफटका मारत असताना मला ती भेटली. 
‘‘गुड इव्हिनिंग’’ असं म्हणत मी तिला थांबवलं आणि  ‘‘आपण चालत चालत एक चक्कर मारायची का?’’ असं तिला विचारलं. 
ती लगेच तयार झाली. सूर्यास्ताची वेळ होती. सुरुवातीला काही मिनिटं आम्ही काही न बोलता निःशब्दपणे चालत होतो. मग मीच संवादाला सुरुवात केली.
‘‘वर्ग आटोपून परतत आहेस का?’’
‘‘होय.’’ 
‘‘काय शिकतेस?’’ मी विचारलं. 
‘‘इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे,’’ ती म्हणाली. 
‘‘पुढं काय करायचं ठरवलं आहेस?’’
‘‘मला फायटर पायलट बनायचंय.’’ 
‘‘पायलट?’’ 
‘‘पायलट नव्हे, फायटर पायलट.’’ 
‘‘नक्की?’’ 
‘‘होय. फायटर पायलटच. दुसरं काहीच नाही.’’ 

मी तिच्याकडे पाहिलं. फायटर पायलट बनण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी तिच्याकडे होत्या असं मला त्या क्षणी जाणवलं. पुन्हा मागचाच प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. आम्ही तिला जे शिक्षण उपलब्ध करून देत आहोत ते फायटर पायलट होण्यासाठी पुरेसं आहे का? उत्तर नकारार्थी होतं. त्या वेळी मला प्रकर्षानं वाटलं की शिक्षणक्षेत्रात काम करण्याची संधी मला खूप आधी, तरुण वयातच मिळायला हवी होती. मिळाली असती तर...पण ती मिळाली नाही. त्यामुळे त्या वेळी समोर आलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय मी निवडला आणि आयुष्य त्यानुसार उलगडत गेलं. मला चांगली नोकरी मिळाली. खरं सांगायचं तर न्यूटनच्या गतिमानतेच्या तिसऱ्या सिद्धान्ताच्या विरुद्धच घडलं. मला माझ्या पात्रतेपेक्षा खूप जास्त मिळालं. मी ‘नाबार्ड’सारख्या एका राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष झालो. मला जाणवलं की शिक्षणक्षेत्रात काम करण्याची संधी आज, या क्षणी, माझ्यासमोर आहे. पूर्वी जेव्हा मला खूप तीव्रतेनं वाटत होतं तेव्हा मला तशी संधी मिळाली नव्हती; पण आज ती संधी माझ्यासमोर उभी होती. प्रश्न होता तो ती संधी स्वीकारायचं धैर्य माझ्यात होतं का? कितीही किंमत द्यावी लागली तरी..? की वयाचं कारण सांगून मी ती हातची घालवणार होतो? विचारांचा हा कल्लोळ माझ्या मनात दाटला होता. त्यामुळे त्या रात्री मी बराच वेळपर्यंत जागा होतो. अस्वस्थ होतो. अनेक वर्षांपासून हीच टोचणी माझ्या मनाला सलत होती. शेवटी आयुष्यातलं यश कसं मोजायचं? तुम्ही भूषवलेल्या पदांवरून की तुम्ही गाजवलेल्या अधिकारावरून?

तुमच्या पदव्यांवरून की तुमच्या संपत्तीवरून की तुमच्या नावलौकिकावरून? समाज तुम्हाला काय मानतो ते महत्त्वाचं की तुमचं स्वतःविषयीचं मूल्यमापन महत्त्वाचं? हे प्रश्न मला रात्रभर छळत राहिले. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. त्या अस्वस्थतेतच केव्हातरी मला झोप लागली. 

तिसरी मुलगी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत भेटली. कुठलीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयाची अचानक पाहणी करण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. सफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कुणीही नव्हतं. त्या वेळी ती मुलगी प्रयोगशाळेत काहीतरी प्रयोग करत होती. एवढ्या सकाळी तिला तिथं पाहून मला आश्र्चर्य वाटलं. 

‘‘काय करतेस?’’ मी विचारलं. 
‘‘प्रोजेक्टचं काम करतेय,’’ ती म्हणाली. 
‘‘कुठला प्रोजेक्ट?’’ 
‘‘टिश्यू कल्चर,’’ ती समोरच्या सूक्ष्मदर्शक यंत्रातल्या स्लाईडकडे बोट दाखवत म्हणाली. तिच्या उत्तरात मला किंचित उद्धटपणा वाटला. कदाचित तिची बोलण्याची पद्धतच तशी असावी. तिला जमिनीवर आणणं आवश्यक आहे असं मला वाटलं. त्यापुढची २० मिनिटं मी तिला अनेक तांत्रिक प्रश्न विचारले. माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिनं शांतपणे आणि आत्मविश्र्वासानं उत्तर दिलं. मी अधिकच अस्वस्थ झालो. 
निघता निघता मी एक गुगली टाकत तिला विचारलं : ‘‘इथल्या शिक्षणाचा दर्जा तुला कसा वाटतो?’’ 
माझ्या प्रश्नावर ती गोंधळेल असा माझा अंदाज होता; पण ती अजिबात गोंधळली नाही. 

माझ्या डोळ्यांत रोखून पाहत ती म्हणाली : ‘‘सर, तुम्हाला खरं काय ते जाणून घ्यायचंय? मग मी दर्जाच्या बाबतीत या महाविद्यालयाला १० पैकी ४ गुण देईन.’’ 
तिच्या उत्तरातल्या अनपेक्षित प्रामाणिकपणामुळे मी क्षणभर अवाक् झालो. 
‘‘इथली स्थिती सुधारण्यासाठी आपण काय करायला हवं?’’ मी विचारलं. 
तिचं मत जाणून घेण्यापेक्षा माझा गोंधळ लपवणं हा माझा त्यामागचा हेतू होता.

मी प्रशासकीय इमारतीत प्रवेश केला तेव्हा आमचे अध्यक्ष माझी वाटच पाहत होते. आम्ही आत गेलो. 
विषण्ण आवाजात ते म्हणाले : ‘‘तुम्ही सोडून जाताय याचं आम्हा सर्वांना खरोखरच वाईट वाटतंय; पण वयापुढं कोण काय करणार? शेवटी ही गोष्ट आपल्याला स्वीकारायलाच पाहिजे.’’

तो क्षण माझ्या कसोटीचा होता. शिक्षणाच्या क्षेत्रात तरुण विद्यार्थ्यांबरोबर काम करावं हे माझं आयुष्यभराचं स्वप्न होतं. ‘कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; पण शिक्षणासाठी मी इतरांना हवी ती मदत करीन’ असं वचन मी माझ्या आजोबांना दिलं होतं; पण इथं मात्र वयाच्या आणि प्रकृतीच्या कारणामुळं मी त्या वचनापासून दूर जात होतो. हे केलंस तर तू कधीच शांतपणे जगू शकणार नाहीस असं माझं मन मला सांगत होतं. मी जर काम सुरूच ठेवलं तर जमिनीवर उच्च अधिकारी आणि आकाशात फायटर पायलट घडवण्याचं स्वप्न मी पूर्ण करू शकणार होतो. ग्रामीण भागातल्या शिक्षणसंस्था व त्यांचे विद्यार्थी शहरी भागातल्या संस्थांबरोबर व विद्यार्थ्यांबरोबर देशाच्या वाटचालीत बरोबरीनं वाटा उचलू शकणार होते. वाइटात वाईट काय घडणार होतं? हृदयविकाराचा आणखी एक झटका? त्याची कसली भीती? आयुष्य माणसाला एकदाच मिळतं. एखाद्या उल्केप्रमाणे क्षणार्धात चमकून नष्ट व्हायचं की मेणबत्तीप्रमाणे अखंड जळत राहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी उठलो. खिशातून राजीनाम्याचं पत्र काढून ते अध्यक्षांच्या हातात दिलं आणि म्हणालो : ‘‘हे तुमच्याकडे ठेवा. गरज भासेल तेव्हा मी ते तुम्हाला परत मागेन. तोपर्यंत मला कुणाला तरी दिलेल्या एका वचनाचं पालन करायचं आहे.’’ 

मी बाहेर पडलो. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं होतं. सूर्य मावळतीकडे झुकला होता. While I was walking, त्या सूर्याकडे पाहत मी हसलो आणि स्वतःला म्हणालो :
मंझिल मिले ना मिले, मुझे इस का गम नही 
मंझिल की जुस्तजूं में मेरा कारवाँ तो है...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com