नियोजन ‘पीसीएम’ ग्रुपचे

Education
Education

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक 
अभियांत्रिकी शाखेकडे जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘आयआयटी’ या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे हे स्वप्न असते. या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी देशात व जगाच्या पाठीवर मिळवलेले नेत्रदीपक यश व त्यांना मिळणारा मानसन्मान, त्यामुळे दहावीची परीक्षा संपताच ‘आयआयटी’ प्रवेश हेच ध्येय ठेवून अनेक खासगी क्लासेस विद्यार्थी जॉईन करतात. ‘आयआयटी’ नंतर विद्यार्थी ‘एनआयटी’, ‘आयआयआयटी’, राज्यातील ‘सीईओपी’ सारख्या स्वायत्त संस्था, शासकीय महाविद्यालये व शेवटी खासगी महाविद्यालयांतील प्रवेशांना पसंती देतो.

प्रवेशासाठीचे दोन मार्ग
   प्रथम क्रमांकाच्या ‘आयआयटी’ प्रवेशासाठी जेईई मेन-२०२० पात्रता परीक्षा देणे आवश्यक असून मागील वर्षीपासून ही परीक्षा जानेवारी व एप्रिल अशी दोन वेळा घेतली जात आहे. बेस्ट ऑफ टु नुसार निकालानंतर प्रथम येणाऱ्या सुमारे दोन लाख ४५ हजार विद्यार्थ्यांची जेईई अॅडव्हान्स्ड  परीक्षेसाठी निवड केली जाते. जेईई मेनच्या गुणवत्तेनुसार ‘एनआयटी’, ‘आयआयआयटी’सह देशातील काही नामांकित संस्थांमध्ये प्रवेश दिले जातात. राज्यातील खासगी महाविद्यालयांतील १५ टक्के कोट्यातील प्रवेशसुद्धा जेईई मेन नुसार होतात. 

   राज्यातील अभियांत्रिकी शाखेच्या शासकीय, स्वायत्त व खासगी संस्थांमधील प्रवेश राज्य शासनाच्या एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या गुणवत्तेनुसार होतात. याच सीईटी मधून फार्मसी व कृषी शाखेतील प्रवेश दिले जातात. 

आजपर्यंतची प्रगती तपासा
   दहावीनंतर १८ महिने आपण फक्त ‘पीसीएम’ या विषयांचा अभ्यास करीत आहात. आता दिवाळीच्या सुटीत पालक, मोठा भाऊ, बहीण यांच्यासमवेत विद्यार्थ्याने प्रामाणिकपणे आपली प्रगती तपासावी व ती मनापासून स्वीकारावी. 

   जेईई मेनमध्ये किती गुण, पर्सेंटाईल मिळेल, जेईई अॅडव्हान्स्ड साठी निवड होईल का, जरी अॅडव्हान्स्डसाठी निवड झाली, तरीही अॅडव्हान्स्डमध्ये यश मिळून ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळेल का? दहावीत मिळालेल्या फसव्या पर्सेंटाईलच्या जोरावर बारावीमध्ये सहज गुण मिळू शकतात या भ्रमात राहिल्याने आजपर्यंत बारावीचा अभ्यास केला आहे का? समजा यश मिळाले तरीही ‘आयआयटी’, ‘एनआयटी’, ‘आयआयआयटी’ प्रवेशासाठी बारावीमध्ये पात्रतेसाठी आवश्यक खुल्या गटासाठी ७५ टक्के गुण, राखीव ६५ टक्के मिळतील का? असे प्रश्‍न स्वतःला विचारावेत.

त्वरित निर्णय घ्या
जेईई व एमएचटीसीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप फार वेगवेगळे आहेत. आरोग्य विज्ञान शाखेत देशभरात फक्त एकच नीट परीक्षा आहे. अभियांत्रिकीसाठी दोन मार्ग असल्यामुळे वरील प्रश्‍नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधून यापुढे अठरा महिन्यांत झाले ते विसरून जाऊन आपण जेईई अभ्यास करायचा की राज्याच्या सीईटीचा करायचा याचा निर्णय आत्ता घेतला पाहिजे. समजा निर्णय होत नसेल, तो घेणे अवघड जात असेल तर पहिल्या जेईई मेन जानेवारी २०२० परीक्षेच्या निकालानंतर त्यामधील प्रगती तपासून तरी निर्णय घ्यावाच लागेल. अन्यथा जेईईमध्ये तर यश मिळणारच नाही, परंतु एमएचटीसीईटीकडे दुर्लक्ष केल्याने अपयश येऊ शकते. 

जेईई मेन - इतर प्रवेश
   देशातील एनआयटी, आयआयआयटी व राज्यातील पंधरा टक्के खासगी महाविद्यालयातील संस्थांबरोबरच काही संस्थांमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा न घेता प्रवेश दिले जातात. त्यामध्ये आयसीटी- रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई, धीरुभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अॅण्ड़ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, पंडित दीनदयाळ पेट्रोलियम युनिव्हर्सिटी, आयआयएससी - भारतीय विज्ञान संस्था बंगळूर येथील बॅचलर ऑफ सायन्स (रिसर्च) अभ्यासक्रमासाठी तसेच ‘आयआयएसटी’ - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी तसेच ‘आयआयएसईआर’ - भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थांमधील प्रवेश दिले जातात.

प्लॅन बी नुसार अन्य पर्याय
‘एनआयईएसआर’ - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन 
अॅण्ड रिसर्च भुवनेश्‍वर व ‘यूएमडीएई’ - सीईबीएस मुंबई येथील प्रवेशासाठी एनईएसटी-२०२० परीक्षा, कृषी शाखेतील प्रवेशासाठी इच्छुक असल्यास देशपातळीवरील एआयईईए- २०२० परीक्षा, ‘आयएमयू’ - इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी अंतर्गत बीटेक मरीन इंजिनिअरिंग व बीटेक नॉटिकल सायन्स प्रवेशासाठीची सीईटी तसेच बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉ़जी या परीक्षांचा पर्याय आहे. फॉरेन्सिक सायन्स व बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी हेही पर्याय उपलब्ध होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com