रंगसंवाद : कलात्मक जीवनानुभव

महेंद्र सुके
Friday, 30 October 2020

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाला असंख्य अनुभव येत असतात. ते अनुभव कलावंत आपल्या कलेतून पेश करतात. पुण्यातील निवृत्त मुख्याध्यापक, कला शिक्षक मल्लिकार्जुन सिंदगी. कलाध्यापनाच्या माध्यमातून आयुष्यभर त्यांनी असंख्य चित्रकार घडवले. वेगवेगळे उपक्रम राबवले. स्वत: त्यात सहभागी झाले. या साऱ्या व्यस्ततेतून वेळ मिळेल तेव्हा स्वत:च्या चित्रनिर्मितीतही रमले. त्या चित्रांची काही प्रदर्शनेही भरली. सोलापूरमध्ये जन्मलेल्या सिंदगी सरांनी त्यांच्या संघर्षरत आयुष्याचा कॅन्व्हास पुण्यात येऊन कीर्तिमान केला, याचे त्यांना समाधान आहे.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसाला असंख्य अनुभव येत असतात. ते अनुभव कलावंत आपल्या कलेतून पेश करतात. पुण्यातील निवृत्त मुख्याध्यापक, कला शिक्षक मल्लिकार्जुन सिंदगी. कलाध्यापनाच्या माध्यमातून आयुष्यभर त्यांनी असंख्य चित्रकार घडवले. वेगवेगळे उपक्रम राबवले. स्वत: त्यात सहभागी झाले. या साऱ्या व्यस्ततेतून वेळ मिळेल तेव्हा स्वत:च्या चित्रनिर्मितीतही रमले. त्या चित्रांची काही प्रदर्शनेही भरली. सोलापूरमध्ये जन्मलेल्या सिंदगी सरांनी त्यांच्या संघर्षरत आयुष्याचा कॅन्व्हास पुण्यात येऊन कीर्तिमान केला, याचे त्यांना समाधान आहे. निवत्तीनंतरच्या सात-आठ वर्षांनंतर एप्रिलमध्ये कोरोनाच्या संसर्गकाळात ताप आल्याचे कारण झाले आणि त्यांना एक महिन्याची एकांतवासाची शिक्षाच मिळाली. काही दिवसांतच त्यांची या तापातून सुटकाही झाली; पण एकांतवास त्यांना अस्वस्थ करत होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय करावे, याचा विचार करत असतानाच त्यांनी चित्र रेखाटायला सुरुवात केली. रोज पाच-सहा चित्रे रेखाटायची, समाजमाध्यमांद्वारे मित्रांना धाडायची, हा त्यांचा दिनक्रम सुरू झाला आणि वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी केवळ सहा-सात महिन्यांत त्यांच्या चित्रकलाकृती संग्रहात शेकडो चित्रांची भर पडली. ‘कला ही माणसाला गुंतवून ठेवते. आनंद देते. त्यात गुंतून राहिल्याने आपले नैराश्‍य दूर होते. त्यामुळे प्रत्येकाने किमान एकतरी कला आत्मसात केलीच पाहिजे,’ असे सिंदगी सर स्वानुभवातून सांगतात.    

लॉकडाउनच्या काळात सिंदगी सरांनी निर्मिलेल्या कलाकृती अमूर्त शैलीतल्या आहेत. त्यातला रंगांचा पोत, आकृतिबंध, शैलीदारपणा चित्ररसिकांना गुंतवून ठेवतो. कॅन्व्हासवर त्यांनी मारलेले फटकारे आश्‍चर्यचकित करणारे आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करून, त्यांनी अनुभवलेले समाजजीवन चित्रकलाकृतींच्या माध्यमातून आविष्कृत केले आहे. या चित्रांना वैचारिक बैठक आहे. कोणत्याही तर्काने जीवनाचे कोडे सुटत नसले, तरी तार्किक विचारमंथनातून ते उलगडण्याची दिशा मात्र नक्कीच गवसू शकते. वेगवेगळे घाव घातल्यानंतर शंभराव्या दणक्‍यात दगड फुटतो, याचा अर्थ आधी घातलेल्या नव्याण्णव घावांची किंमत कमी होत नाही. तसेच, आयुष्यात क्षणाक्षणाला प्रत्येक घटना जगण्याचे नवे भान देऊन जाते. त्याचा संचय होऊन आपला जीवनानुभव समृद्ध होत असतो, हा विचारवाही धागा सिंदगी सरांनी त्यांच्या या अमूर्त चित्रशैलीत गुंफला आहे. 

मल्लिकार्जुन सिंदगी यांनी १९७५ मध्ये पुण्यातील अभिनव कला माध्यमातून आर्ट टीचर डिप्लोमा घेतल्यानंतर मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्‌समधून आर्ट मास्टर हा सर्टिफिकेट कोर्स केला. ‘अभिनव’मधून जीडी आर्ट आणि आर्ट एज्युकेशन घेऊन पुण्यातील सौ. सुशीला वीरकर हायस्कूलमध्ये कला शिक्षकापासून ते मुख्याध्यापकापर्यंत नोकरी केली.

सेवांतर्गत काळात त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासह बुलडाणा, सोलापूर, नगर, मुंबई, धुळे, पुणे, नाशिक, गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या कला संस्थांनी त्यांच्या कलाध्यापन कार्याचा गौरव केला. मराठीसह वेगवेगळ्या सात-आठ भाषांचा अभ्यास असणाऱ्या सिंदगी सरांनी लॉकडाउनच्या काळात निर्मिलेल्या चित्रकलाकृती त्यांच्या आयुष्यातील समृद्ध संचित आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mahendra suke on Artistic life experience