SUNDAY स्पेशल : मायानगरी मुंबईतील अधोविश्‍व !

Mumbai-Criminal
Mumbai-Criminal

करीम लाला हा एकेकाळचा मुंबईच्या अधोविश्‍वातील अधोनायक. हे गुन्हेगारी विश्‍व आणि राजकारणी यांचे सगळ्याच काळात जवळचे संबंध राहिलेले आहेत. आज तर राजकारणाचेच गुन्हेगारीकरण झाले आहे. करीम लाला हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटायचा, या आरोपात त्यामुळेच काही विशेष वाटत नाही. तरीही, त्यावरून व्हायचा तो गदारोळ झालाच. त्यात अर्थातच नैतिकतेचे मुद्दे कमी आणि सत्ताकारण अधिक होते. यानिमित्ताने मुंबईच्या अधोविश्‍वाच्या आठवणी मात्र ताज्या झाल्या. त्या दुनियेचा हा वेध... 

मुंबई पहिल्यापासून व्यापारी शहर. त्यामुळे येथे भामटे, चोर, गुंड यांचा राबता पहिल्यापासूनच. मुंबईची गोदी हे तर त्यांचे केंद्र. फार पूर्वी, म्हणजे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातही गोदीवर गुंडांच्या टोळ्यांचा धुमाकूळ चालत असे. ‘मुंबईचे वर्णन’ १८६३ सालच्या गोविंद नारायण मडगांवकर यांच्या पुस्तकात त्याचे उल्लेख येतात. ते सांगतात, ‘अट्टल तर्कटी लोकांची जूट पुष्कळ वर्षांपासून मुंबईत होती, हीस बंदरग्यांग असें म्हणत. हे सर्व मिळून सुमारें तीनशें लोकांची टोळी होती. हींत कित्येक लाखो रुपयांचे धनीं होते..’ हे लोक काय करीत, तर बाहेर गावांतून तंबाखू व दुसरा माल आणून बंदरांत उतरीत आणि तो जकात भरल्यावांचून शहरांत आणून वखारींत भरून टाकीत. हें कृत्य साधायास त्यांनी कनिष्टेबल, हवालदार व पोलिसचे व कस्टम खात्यांतील कित्येक शिपायांस दरमहा ठरवून आपल्या हाताखाली करून ठेंविले होतें! 
हे तस्कर तेव्हाचे. गोरे गेले, काळे आले. तरी ही तस्करी आणि त्यांच्या टोळ्या काही

कमी झाल्या नाहीत. हाजी मस्तान आणि युसूफ पटेल हे त्यातलेच नावाजलेले तस्कर. ज्याच्यावर ‘दिवार’ हा सिनेमा बेतलेला आहे असे म्हणतात तो तोच हा मस्तान. एकेकाळी त्यांचे राज्य होते गोदीवर. सोने, चांदी, कपडे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंनी त्या काळात तस्करी व्हायची. या तस्करीच्या हद्दीवरून या दोघांत कमालीचे वाद व्हायचे, पोलिसांमार्फत एकमेकांचा माल पकडवून दिला जायचा. याच वादातून आताच्या टोळीयुद्धाचा जन्म झाला. त्याचा इतिहासही मोठा थरारक आहे. तस्करी दुनियेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी हाजी मस्तानने युसूफ पटेल याला ठार मारण्याची सुपारी डोंगरीचा सुपारी किंग करीम लाला याला दिली होती. मोठा धाक होता त्याचा त्यावेळी डोंगरी परिसरात. 

करीम लाला मूळचा अफगाणिस्तानच्या कुनारचा. १९३४ मध्ये तो पेशावरमार्गे मुंबईत आला. येथे तस्करांना संरक्षण देणे, जुगार अशा धंद्यात त्याने जम बसवला. पुढे तो हिऱ्यांच्या तस्करीतही उतरला. त्याने युसूफ पटेलला मारण्यासाठी अफगाणिस्तानातून चार पठाण आणले. पायधुनी येथील मिनार मशिदीजवळ या पठाणांनी फिल्डिंग लावली. २२ नोव्हेंबर १९६९ च्या त्या मध्यरात्री युसूफ पटेल नेहमीप्रमाणे घराबाहेर पडताच पठाण टोळीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पटेलच्या अंगरक्षकाने स्वतः गोळ्या झेलून त्याला वाचविले. तो इसामुद्दीन नावाचा अंगरक्षक मात्र त्यात मेला. मुंबईतल्या गॅंगवॉरचा तो पहिला बळी होता. 

दाऊदची सुरुवात आणि वर्चस्व 
दक्षिण मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवर राहणारा दाऊद इब्राहिम कासकर हाजी मस्तानसाठी काम करीत असे. वडील पोलिसमध्ये असल्याचा धाक दाखवून दाऊद व्यापाऱ्यांकडून हफ्तेवसुली करायचा. ४ डिसेंबर १९७४ ला त्याने साथीदारांच्या मदतीने कर्नाक बंदर येथे एका व्यापाऱ्याला पावणेचार लाखाला लुटले. त्यात तो पकडला गेला.

चार वर्षांची शिक्षा झाली. पुढे त्याला जामीन मिळाला. त्यानंतर आलमजेब, जहांगीरखान, सय्यद बाटला, मोहंमद इक्‍याल, मोहंमद काल्या या गुंडांमध्ये पैशाच्या वाटपावरून फूट पडली. दाऊद आणि आलमजेब एकमेकांच्या जिवावर उठले. त्याच काळात हाजी मस्तान व युसूफ पटेल पुन्हा एकत्र आले. दाऊद व त्याचा मोठा भाऊ शाबीर हे या दोघांसाठी काम करू लागले. सय्यद बाटला, आयुब खान, मेहबूब खान ऊर्फ आयुब लाला यांच्या स्मगलिंगच्या व्यवसायात ते दोघे भाऊ धुडगूस घालू लागले.

१ जुलै १९७७ रोजी तर दाऊद आणि शाबीरने या आयुब लालाचे चक्क अपहरण केले होते. आयुब लालाच्या काळ्या धंद्यांची माहिती इक्‍बाल नातिकच्या ‘राजदार’ या उर्दू साप्ताहिकात प्रसिद्ध होत होती. त्यामुळे आयुब लालाच्या अड्ड्यांवर धाडी पडून तो पकडला गेला. इक्‍बाल नातिक दाऊदचा जवळचा मित्र होता. तुरुंगातून सुटल्यानंतर आयुबने नागपाडा येथील घरातून इक्‍बाल नातिकचे अपहरण केले आणि वांद्य्रातील भारतनगर येथील खाडीजवळ नेऊन त्याचे तुकडे केले. माध्यमांतील काही पत्रकार आणि अधोविश्‍वातील संबंधांचा हा बहुधा पहिला बळी असावा. 

याच टोळीयुद्धातून १२ फेब्रुवारी १९८१ ला प्रभादेवीतील पेट्रोल पंपाजवळ दाऊदचा भाऊ शाबीर याची हत्या झाली. शाबीर हा केनेडी ब्रीज येथील कोठीवरील चित्रा नावाच्या एका नर्तकीच्या प्रेमात पडला होता. तिला घेऊन तो रात्री बाहेर पडला आणि गाडी प्रभादेवी पेट्रोल पंपाजवळ उभी केली असतानाच दादर आगर बाजारात प्रचंड दहशत असलेल्या मन्या सुर्वेच्या मदतीने करीम लालाच्या टोळीतील आलेमजेब व आमिरजादाने मशिनगनने शाबीरच्या शरीराची चाळण केली. मन्या एका मर्डरमध्ये जेलमध्ये होता.

पॅरोलवर तो बाहेर आला होता. परंतु तो परत तुरुंगात गेलाच नाही. पुढे आमीरजादाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली. दाऊदचा मार्ग मोकळा झाला. यानंतर दोन वर्षांतरच दाऊदने मुंबईच नव्हे, तर अगदी दिल्ली, नेपाळपर्यंत आपले साम्राज्य पसरवले. 
त्यावेळी झालेल्या गिरणी संपामुळे अनेक मराठी तरुण दाऊद टोळीत सामील झाले. त्यात रमा नाईक, बाबू रेशीम, अरुण गवळी या मराठी पोरांचाही समावेश होता.

त्यानंतर दाऊदने बडा राजनच्या मदतीने पठाण गॅंगच्या आमीरजाद्याची हत्या घडवून आणली. न्यायालयातच ही हत्या घडवून आणण्यात आली. याप्रकरणी शूटर डेव्हिड परदेशी पकडला गेला. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी बडा राजनला अटक केली.

त्यालाही पठाण टोळीने न्यायालयात हजर केले असतानाच उडवले. त्यामळे पूर्व उपनगरात साम्राज्य असलेल्या बडा राजनची जागा पुढे छोटा राजनने घेतली. 
पुढे दाऊद टोळीने करीम लालाचा भाचा समदखान याचा १९८४ ला ‘गेम’ केला. त्यावेळी प्रथमच अद्ययावत शस्त्रांचा वापर दाऊद टोळीकडून केला गेला. त्यानंतर १९८५ मध्ये पठाण टोळीचा आलमजेब पोलिस चकमकीत मारला गेला. त्याच वर्षी दाऊदने पटाण टोळीच्या अब्दुल कुंजूलाही मारले आणि मुंबईत त्याची एकहाती सत्ता निर्माण झाली. पुढे त्याने १९८६ मध्ये दुबई गाठली व तेथून सर्व टोळी हाताळू लागला.

इतर टोळ्या 
बाबू रेशीमच्या हत्येनंतर रमा नाईककडे नेतृत्व आले. जमिनीच्या वादातून नाईक दाऊद टोळीपासून वेगळा झाला होता. तो दाऊद टोळीची टीप पोलिसांना देत होता. दगडी चाळीवर त्यावेळी नाईकचा दबदबा होता. तो चकमकीत मारला गेल्यानंतर टोळीची सर्व जबाबदारी अरुण गवळीवर आली. त्यावेळी छोटा राजननेही दुबई गाठली.

पुढे १९९३ च्या बॉंबस्फोटानंतर राजनही दाऊद टोळीपासून वेगळा झाला. त्यावेळी संतोष शेट्टी, एजाज लकडावालासारखे पंटरही त्याच्यासोबत बाहेर पडले. 

१९९४ मध्ये अमर नाईक टोळीलाही घरघर लागली. पण राजनने दाऊद टोळीविरोधात त्याच्या कारवाया सुरूच ठेवल्या. २००३ मध्ये छोटा राजनवर बॅंकॉकमध्ये झालेल्या गोळीबारानंतर त्याचा अत्यंत विश्‍वासू बनलेल्या संतोष शेट्टीचे २००४ साली मॅन्ड्रेक्‍समधील गुंतवणूक व जकार्तातील हॉटेल वादावरून राजनशी संबंध बिघडले.

याच वादानंतर त्याने राजनशी फारकत घेत एसएस सिंडिकेट नावाने आपले वेगळे बस्तान मांडले होते. मात्र, इंडोनेशियातील त्यांच्या साम्राज्यावर जप्ती आल्यामुळे घरघर लागलेल्या शेट्टीने पुढे कंबोडिया करीत बॅंकॉक गाठले. शेट्टीसोबत तेव्हा भरत नेपाळी व विजय शेट्टीही होते. पुढे २०१० मध्ये नेपाळी आपल्याला डबलक्रॉस करेल या भीतीने त्याने त्याची हत्या केली. त्यानंतर एसएस सिंडिकेटवर विजय व संतोष या दोघांचेच राज्य होते. या काळात त्याने हुअँगमध्येही आपले नेटवर्क पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र जकार्तात असतानाची आर्थिक स्थिती त्याला प्राप्त करता आली नाही. पुढे त्याने आपला म्होरक्‍या राजनच्या पावलावर पाऊल ठेवत देशविरोधी कारवाया करणाऱ्यांची हत्या करून सहानुभूती मिळविण्याचाही प्रयत्न केला. असा प्रयत्न रवी पुजारीनेही केला. २०१५ मध्ये सर्वाधिक खंडणीसाठी दूरध्वनी त्याचे आले होते. पण आता तोही अस्तित्वाची लढाई लढतोय. तर संतोष शेट्टी, लकडावाला, राजन पुढे भारताकडे हस्तांतरित करण्यात आले.

राजकीय वरदहस्त 
सत्तेचे अभय असल्याशिवाय गुन्हेगारी फोफावत नाही, हेच मुंबईतील एन्काउंटरच्या इतिहासातून स्पष्ट होते. येथील टोळ्यांना वेळोवेळी वेगवेगळे राजकीय नेते आणि पोलिस यांचे अभय होते. यात कोणताही पक्षपात नसे. सगळे पक्ष याबाबत एकाच माळेचे मणी. मुंबईतील टोळी युद्धात मारल्या गेलेल्या राजकारण्यांची नावे आणि त्यांचे पक्ष नीट पाहिले तरी अधोविश्व आणि राजकारणी यांचे संबंध किती जिव्हाळ्याचे असत हे दिसून येते. मुंबई दंगलीनंतर तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी थेट धर्माच्या आधारावर टोळ्यांची वाटणी करून घेतली होती. त्यांचा दाऊद तर आमचा गवळी अशी. पुढे सेनेचे आणि गवळीचे फाटले. त्यातून त्याने स्वतः राजकीय पक्ष काढला. निवडणुका लढविल्या. परंतु सत्तेपुढे शहाणपणाप्रमाणेच गुंडांचेही काही चालत नसते. गवळीची टोळी सेना-भाजपच्या सत्तेच्या काळात पुरती उद्‌ध्वस्त करण्यात आली.

बदलता माफिया 
हप्तेवसुली, सोने-चांदीच्या तस्करी असे धंदे करीत असलेले मुंबईचे अधोविश्‍व कालांतराने अमली पदार्थांच्या तस्करीत घुसले. यात दाऊद टोळीचा हात धरण्याएवढे कोणी मोठे नव्हते. पण ती टोळी येवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी बनावट नोटा छापणे यासारख्या धंद्यासह गुटखा, चित्रपट, पायरसी व बांधकाम व्यवसायातही मोठ्या प्रमाणत पैसे गुंतवले. दाऊदचा ड्रग्सचा व्यवहार पाहणाऱ्या इक्‍बाल मिर्चीकडे हजारो कोटींची मालमत्ता होती. त्यावरून ही उलाढाल किती मोठी होती, याचा प्रत्यय येतो.

एकट्या मुंबईत मिर्चीची बेनामी ५०० कोटींची मालमत्ता आहे. यावरून दाऊदची स्वतःची मालमत्ता किती आहे, याचा अंदाजच करता येऊ शकतो. पाकिस्तान, दुबईतील साम्राज्य, आफ्रिकेतील हिरे व्यवसाय याच्यासह दाऊदच्या मालमत्ता तुर्कस्थान, स्पेन, मोरक्को, साइप्रस, नेपाल, थायलंड और सिंगापूर येथेही आहेत. नेपाळमध्ये दाऊद टोळी डान्स बारमध्ये मोठ्या प्रमाणत सक्रिय आहे. हत्यारांच्या व्यवसायातही दाऊद टोळी उतरली होती. पण जाणकारांनुसार, त्यांना त्या व्यवसायात म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. 

या अधोविश्‍वाचे व्यवसाय आणि त्यांचे स्वरूप यात आता मोठा बदल झाला आहे. जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण, धार्मिक अतिरेक, तंत्रज्ञानातील बदल अशा विविध घटकांमुळे अधोविश्‍वही बदलले आहे. आता तर काही टोळ्या ऑनलाइन लुटमारीत, हॅकिंगमध्ये उतरल्या आहेत. या बदलत्या कार्यपद्धतीच्या परिणामी मुंबईत पूर्वीसारखे टोळीयुद्ध होत नाही. खंडणीखोरी कमी झाली आहे. खंडणी मागणार कोणाकडून? अनेक माफियाच या व्यवसायात पैसे लावत आहेत आता. अर्थात याचा अर्थ असा नाही, की येथील अधोविश्‍व अधोगतीला गेले आहे. ते आहेच. कोणत्याही महानगराच्या व्यापारी संस्कृतीचा तो एक कायमचा विकृत भाग असतोच...

चकमकीचे अस्त्र 
मुंबईत हैदोस घालत असलेल्या टोळ्यांना संपविण्यासाठी मग मुंबई पोलिसांनी चकमकीचे अस्त्र उगारले. इसाक बागवान यांनी मन्या सुर्वेच्या केलेल्या एन्काउंटरवर चित्रपटही निघाला. पण ते पहिले एन्काउंटर नव्हे. २९ जानेवारी १९६० रोजी संगमनेर येथे किसन सावजी याचे झालेले एन्काउंटर हे राज्यातील पहिले. फौजदार ढुमणे यांनी ते केले होते. 

१९९८ मध्ये गुंडांनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढत १०१ जणांची हत्या केली होती. १९९९ मध्ये गुंडांच्या रक्तरंजित कारवायांत ४७ जण ठार झाले. गुन्हेगारी टोळ्यांची वाढती दहशत पाहून तत्कालीन पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी कडक धोरण स्वीकारले. त्याचे फलस्वरूप म्हणून १९९९ मध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ८३ गुंड मारले गेले. त्यामुळे गुन्हेगारांनीही धसका घेतला. २००० मध्ये पोलिस चकमकीत ७३ गुंड मारले. तर गुंडांनी शिवसेना नगरसेविका नीता नाईक, शाखाप्रमुख शिवाजी चव्हाण, बबन सुर्वे, रमाकांत हडकर, रिपाइंचे रागो मकवाना यांच्यासह २४ जणांच्या हत्या केल्या. २००१ मध्ये पोलिस चकमकीत ९४ गुंड मारले गेले होते. मुंबई पोलिस दलाच्या इतिहासातील हा उच्चांक होता. त्यानंतर २००२ मध्ये ४७ गुंडांचा चकमकीत खात्मा झाला. 

एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची एक फळी मुंबई पोलिस दलात होती. त्यांनी २७२ गुंडांना यमसदनी धाडले आहे. त्यात छोटा राजन टोळीच्या ९७ गुंडांचा, तर दाऊद टोळीच्या ४६ गुंडांचा समावेश आहे. या चकमकफेम अधिकाऱ्यांतील काहींच्या नावावर शतक आहे. काही शतकाच्या उंबरठ्यावर, तर काहींनी अर्धशतक पार केले आहे. त्यात अग्रक्रमाने नावे घेतली जातात ती प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, दया नायक, सचिन वाझे यांची. यातील बहुसंख्य अधिकारी १९८३ च्या बॅचचे. प्रदीप शर्मा यांनी एन्काउंटरचे शतक साजरे केले होते. प्रफुल्ल भोसले यांच्या नावावर ८५ एन्काउंटरची नोंद आहे. विजय साळसकर यांनी तर अख्खी अरुण गवळी व अमर नाईक टोळी संपवली होती. रवींद्र आंग्रे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात हैदोस घालणारी मंचेकर टोळी रसातळाला नेली.

दया नायक व सचिन वाझे यांच्या नावावरही एन्काउंटरचे अर्धशतक आहे. २७२ पैकी ९० टक्के एन्काउंटर विजय साळसकर, प्रदीप शर्मा व प्रफुल्ल भोसले या तीन अधिकाऱ्यांनी मिळून केले होते. त्यातील विजय साळसकर यांना मुंबई हल्ल्यात वीरमरण आले. प्रदीप शर्मा यांना लखन भैया एन्काउंटर भोवले, तर ख्वाजा युनूस प्रकरणात भोसले अडकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com