चटपटीत, चमचमीत भेळ

bhel
bhel

कुरकुरीत चुरमुरे, चटपटीत फरसाण, खुसखुशीत शेव सगळं छान मिसळलं जातं, त्यात घातली जाते आंबटगोड चिंचेची चटणी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. या सगळ्याचं मिश्रण म्हणजे भेळ. भेळेचं नाव काढलं की जीभ चाळवते. भेळ म्हटलं की डोळ्यांसमोर अनेक गोष्टी एकत्र करणं हेच येतं. अनेकदा हा संदर्भ इतर गोष्टी एकत्र करतानाही "काय भेळ केलीय' असा दिला जातो.

पुण्यात भेळेचे खवय्ये थोडे जास्तच आहेत. पेठेत जा किंवा उपनगरांमध्ये, एक तरी भेळवाला प्रसिद्ध असतोच. अर्थात, प्रत्येक ठिकाणची चव वेगळी असते आणि नेहमी तशीच असते हे विशेष. त्यामुळेच ठराविक चवीसाठी ठराविक ठिकाणीच भेळ खाल्ली जाते. भेळेच्या मिश्रणात एखादा घटक कमी-जास्त झाल्यास चव बदलंल, पण म्हणून ती डिश बिघडंलच, असं नाही. तरीही चवीबाबत चोखंदळ असणाऱ्या पुणेकरांना विशिष्ट चवीबद्दलच प्रेम जडतं. पुण्यात चटकदार भेळ मिळणाऱ्या ठिकाणांची ही धावती ओळख...

पुष्करणी भेळ (कुमठेकर रोड) : तुळशीबागेत शॉपिंग आणि त्यानंतर पुष्करणीची भेळ असं समीकरण अनेकांच्या आयुष्याचा जणू भागच झाला आहे. भेळेत भडंग चुरमुरे वापरले जाणं, हे इथलं वैशिष्ट्य. इथली चिंचेची चटणीही विशेषच असते. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं फक्त भेळच मिळते (चाट किंवा इतर खाद्यपदार्थ मिळत नाहीत.) आणि ती देखील एकाच प्रकारची.

कल्याण भेळ (अनेक शाखा) : चव कायम ठेवून बदलत्या काळानुसार स्वरूप बदलणारी भेळ म्हणजे कल्याण भेळ, असं वर्णन करता येईल. पुण्यात अनेक भागांत यांच्या शाखा आहेत. इथं भेळेचे अनेक प्रकार मिळतात, जसे मटकी भेळ, चीज भेळ, दही भेळ आणि त्यांची स्पेशल कल्याण भेळ. हातगाडीपासून झालेली सुरवात आता वातानुकूलित शाखा उघडण्यापर्यंत "कल्याण'ची प्रगती झाली आहे.

राधिका भेळ (सदाशिव पेठ) : जलद सेवा मिळणारी आणि पारंपरिक चव जपणारी ही भेळ. रगडा भेळ, दही भेळ आणि फरसाण भेळ, हे इथलं वेगळेपण. इथं जैन भेळही मिळते. जाता-येता सहज म्हणून राधिका भेळमध्ये जाऊन भेळ खाणं हे पुणेकरांसाठी नित्याचंच आहे.

गणेश भेळ (अनेक शाखा) : गणेश भेळ हे नाव पुणेकरांसाठी कॉमन असावं इतक्‍या ठिकाणी हे नाव वापरलं जातं. तरीही नेहमीच आणि पूर्वापार चालत आलेल्या भेळेची चव घेणं हा वेगळाच आनंद आहे. ही भेळ आता पॅकिंगमध्येही मिळते. त्यामुळे परदेशात किंवा कुठंही प्रवासाला जाताना ही भेळ नेणं सोयीचं जातं. विशेष म्हणजे, आयएसओ मानांकन मिळालेली ही एकमेव भेळ आहे.

पांडुरंग भेळ (सदाशिव पेठ) : ज्ञानप्रबोधिनीच्या खाऊगल्लीत असणारं खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या गर्दीतलं हे दुकान. इथली चांगली चव किफायतशीर किमतीत चाखता येते, हे याचं वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यामुळे कॉलेज आणि अगदी शाळेच्या मुलांचीही इथं गर्दी असते. उपवासाच्या ठराविक दिवशी उपवासाची भेळ मिळणं हे एक इथंल आकर्षण.

झटका भेळ (शिवाजीनगर स्टेशन) : नावाप्रमाणे तिखटपणाचा झटका देणारी ही भेळ. या भेळेतला अधिक ओलसरपणा हे याचं वैशिष्ट्य.

कल्पना भेळ (सहकारनगर) : पारंपरिक आणि निवडक भेळ मिळण्याच्या ठिकाणांत हे एक नाव आहे. इथल्या भेळेमध्ये हिरव्या मिरचीच्या चटणीऐवजी लाल तिखट वापरलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com