रसाळ आंब्याच्या मधुर चवी (नेहा मुळे)

रसाळ आंब्याच्या मधुर चवी (नेहा मुळे)

वीकएंड हॉटेल
जानेवारी-फेब्रुवारी महिना सुरू होतो तशा बाजारात कैऱ्या दिसू लागतात आणि त्यानंतर अवघ्या एक-दीड महिन्यात लक्ष वेधतो तो पिवळा-केशरी हापूस आंबा. आंबा किंवा आंब्याचे पदार्थ न आवडणारे विरळाच. म्हणूनच तो फळांचा राजा असावा. आमरस हा आंब्याचा सीझनमध्ये अगदी कधीही केला जाणारा कॉमन पदार्थ. त्याबरोबर आंब्याच्या फोडी खाणं अनेक जणांना आवडतं. जेवणानंतर आंब्याचा मिल्कशेक तर हवाच! पुण्यात वर्षभर आंबा बर्फी मिळते ती ही चितळ्यांची आणि सुजाताची आंबा मस्तानीही वर्षभर मिळते, तरीही सीझनमधल्या ताज्या आंब्याची चव घ्यायला सर्वच जण उत्सुक असतात. आंब्याच्या नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळ्या चवी चाखण्यासाठी पुणेकर वाट पाहत असतात. शहरातली रेस्टॉरंट आंब्याच्या सीझनला वेगवेगळ्या आंबा डिश तयार करून त्यांची इच्छा पूर्णही करतात. अशाच काही निवडक डिशेसबद्दल जाणून घेऊन, ज्यांची चव या सीझनमध्ये घ्यायलाच हवी.

फलाहार (अनेक शाखा) : इथला मॅंगो ब्लास्ट म्हणजे आंबा खाण्याची पर्वणीच. हापूस आंब्याच्या फोडीत क्रिमी मॅंगो शेक, आइस्क्रीम घालून हा पदार्थ तयार होतो. आंब्याच्या फोडी, आंब्याचं मिल्कशेक, आंबा पल्प आणि आंबा आइस्क्रीम...असा हा पदार्थ पुरेपूर अंबामय असतो. आंबा खाण्याची इच्छा घेऊन इथं गेलं, की तृप्ततेचा आनंद या एका पदार्थाने तुमच्या चेहऱ्यावर पसरेल. 

द ब्ल्यू प्लेट (औंध) : मॅंगो डेव्हिल हे इथलं आंब्याच्या सीझनमधलं खास डेझर्ट. वर्षभर इथं वेगवेगळे कस्टर्ड मिळतात, मात्र या हंगामात इथं जायचं ते मॅंगो डेव्हिलसाठी. एका उंच ग्लासमध्ये मॅंगो कस्टर्ड, क्रीम आणि आंब्याच्या फोडी घातल्या जातात. तिन्हीची एकत्र चव अफलातूनच तयार होते. 

क्रीम क्रेव्हर (कॅम्प) ः इथला दाट मॅंगो मिल्कशेक प्यायलाच हवा. हा मिल्कशेक बाराही महिने मिळतो, पण आंब्याच्या सीझनचा विचार केल्यास इथं मिळणारी फ्रेश मॅंगो प्याली वुईथ क्रीम अँड आइस्क्रीम म्हणजे लाजवाब डेझर्ट. यात क्रीम आणि आइस्क्रीमबरोबर हापूस आंब्याचे तुकडे असतात. त्या सर्वांची एकत्रित चव म्हणजे तृप्ततेची शंभर टक्के वसुली. याबरोबर इथला मॅंगो पल्पही विशेष चवीचा असतो. 

राजधानी (अनेक शाखा) ः इथली राजस्थानी आणि गुजराती थाळी प्रसिद्ध आहेच, मात्र पण आंब्याच्या बाबतीत विचार केल्यास ‘आम्लिशियस’ हा इथं साजरा होणारा फेस्टिव्हल म्हणजे जणू कोकण अवतरतं! मे महिन्याच्या अखेरीपर्यंत यंदा हा फेस्टिव्हल आहे. फेस्टिव्हलमध्ये आंब्याचे केवळ गोड पदार्थच मिळत नाहीत, तर आंब्यापासून तयार केलेले वीसपेक्षा अधिक पदार्थ आहेत. यात आमरस तर आहेच, पण विशेष डिश म्हणजे मॅंगो जिलबी, मॅंगो डाळढोकळी, मॅंगो थंडाई, मॅंगो स्टफ्ड मालपोहा असे अनेक पदार्थ पाहून तुम्ही अचंबित व्हाल. आंब्याचा पुरेपूर आस्वाद घ्यायचा तर अशा वेगवेगळ्या चवी घ्यायलाच हव्यात. इथं तुम्ही मॅंगो सब्जी, मॅंगो राइस असे वेगळेच पदार्थही खाऊ शकाल.

कॅफे पीटर (औंध व इतर शाखा) : मॅंगो बिंगसू हा इथला कोरियन डेझर्टचा प्रसिद्ध प्रकार. यामध्ये किसलेला बर्फ, आइस्क्रीम, आटवलेलं दूध आणि टॉपिंग्ज असतात. आणि या सर्वांवर आंब्याच्या फोडी अर्थातच हव्यात. असं डेझर्ट या सीझनमध्ये नक्की खायला हवं.

पुण्यात आंब्याचा कौतुक जास्तीच आहे आणि लेखात अगदी निवडक जागांचाच उल्लेख आहे. पण या पदार्थांबरोबर इतर काही रेस्टॉरंटमध्येही आंब्याच्या विविध डिश बनवल्या जातात. अगदी आजूबाजूच्या कॅफेमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये या डिश मिळू शकतील. यातली काही नावं सांगायची झाल्यास, मॅंगो चीज केक, मॅंगो पॅना कोटा, मॅंगो फालुदा, मॅंगो पुडिंग, मॅंगो वॉफल्स, मॅंगो पॅन केक असे आंब्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ सांगता येतील. अनेक ठिकाणी मॅंगो फेस्टिव्हल्स आयोजित केलेले दिसून येतील. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये घ्या आंब्याचा पुरेपूर आनंद निरनिराळ्या चवींसह..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com