आयुष्याची त्रिमिती

प्रतिभा देशपांडे
रविवार, 22 सप्टेंबर 2019

जर आयुष्य भरभरून जगायचं असेल तर? हे शक्‍य होईल जेव्हा आपण आपल्या मनाला करू मुक्त. मी आणि फक्त मीच या पलीकडे जाऊन एक नवीन विचार मनात यायला हवा.  पण म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपल्या आयुष्याची व्यापकता मोजायची. पण कशी? जसं एखाद्या वस्तूची व्यापकता मोजायची असेल तर आपण त्याच आकारमान बघतो.

जर आयुष्य भरभरून जगायचं असेल तर? हे शक्‍य होईल जेव्हा आपण आपल्या मनाला करू मुक्त. मी आणि फक्त मीच या पलीकडे जाऊन एक नवीन विचार मनात यायला हवा. पण म्हणजे नेमकं काय करायचं? तर आपल्या आयुष्याची व्यापकता मोजायची. पण कशी? जसं एखाद्या वस्तूची व्यापकता मोजायची असेल तर आपण त्याच आकारमान बघतो.

आकारमान (volume) = लांबी+रुंदी+उंची आपल्या आयुष्याचं आकारमानही याच त्रिमिती वरून मोजता येईल.  ‘या तिन्ही पैलूंमध्ये परिपूर्ण जगणं म्हणजे welcome जिंदगी’

आयुष्याची लांबी 
जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे आपल्या आयुष्याची लांबी. सर्वप्रथम विचार स्वतःचा. स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्व-विकास. स्व-कल्याण म्हणजेच आपल्या आयुष्याची लांबी ज्यामुळे स्वतःच ध्येय आणि महत्त्वाकांक्षा यापर्यंत पोचता येईल. जीवन जसं आहे तस स्वीकारायचं की  जीवन जसं हवंय तसं जगायचा प्रयत्न करायचा?, असा प्रश्न स्वतःला विचारूया. काही लोक भावनिक संघर्षामध्ये अडकतात.

भावनेच्या गर्तेत खोलवर रुतून बसतात. काही दुसऱ्यांना आदर्श बनवून त्यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांची नक्कल करतात आणि आपलं स्व हरवून बसतात. प्रत्येक माणूस अद्वितीय आहे. त्यामुळे त्याने स्वधर्म न सोडता ठामपणे स्वतःशी म्हणायचं की मीच माझा मित्र, बंधू, सखा. स्वतःचं स्वतःशी असलेलं नात स्नेहपूर्ण असेल, प्रेम असेल तर आणि तरंच आपण दुसऱ्या नात्यांकडं परम भावाने बघू शकू.  एका अर्थाने हे परिमाण स्वार्थी आहे. पण, स्वतःचं निरोगी कल्याण केल्याशिवाय, आपण दुसऱ्यांना पुरेशा प्रमाणात मदत करू शकत नाही, हेही तितकंच खरं. आपल्या आयुष्याचं प्रयोजन काय? मला कुठं पोचायचं आहे? माझ्या आयुष्याचं काय करायचं? हे आपणच ठरवायचं. कारण, आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत. 

आयुष्याची रुंदी
स्वतःचा विकास झाला. यशाच्या शिखरावर विराजमान झालो. आता पुढे? आयुष्याच्या परिपूर्णतेकडे जाऊ शकू का, या पुंजीवर? कदाचित नाही. आता गरज आहे रुंदीची. काहीजण आपला प्रवास पहिल्या म्हणजेच लांबी या पैलूच्या पलीकडे नेत नाहीत. या पृथ्वीतलावर आपल्याशिवाय कोणी राहतंच नाही, असं यांना वाटतं. स्वतःचं विश्वापलीकडे यांच्या विचारांची उंची नसते.

दुसऱ्या माणसांनाही ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात. पण, इथे विचार करण्याची गरज आहे की आपल्या पलीकडेही एक जग असतं. आपल्या उत्कर्षामध्ये इतरांचाही हात आहे आणि आता वेळ आहे, याची जाण ठेवण्याची. हे ऋण फेडण्याची.  वैयक्तिक प्रगतीमध्ये माणसानं किती काळ रमावं? आपल्या कक्षा रुंदावायच्या असतील, तर आयुष्याचं चित्र विशाल करायला हवं. आता वेळ आली आहे ‘स्व’ला कुरवाळत न बसता दुसऱ्यांचा विचार करण्याची. खूप कल्पना आहेत दुसऱ्यांना मदत करण्याच्या. आपण किती सुंदर आहात. आपल्याकडे किती पैसा आहे? आपण किती मोठ्या घरात राहतो? आपण आपल्याला किती यशस्वी मानतो? यापेक्षाही माझ्या आयुष्याची रुंदी किती आहे? मी दुसऱ्यांना किती मदत करतो? किती जणांच्या आयुष्यात माझ्यामुळे आनंद निर्माण झाला आहे?, याचं उत्तर मिळणं महत्त्वाचं ठरतं. समाजातल्या ज्या लोकांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करून तर बघूया, आपल्या आयुष्यात किती फरक पडतो ते. 

आयुष्याची उंची
स्व:विकास झाला, दुसऱ्यांचाही विचार करतो आहोत. पण, इथेच नाही थांबायचं, जायचं आता क्षीतिजापलीकडे. लांबी झाली गुणिले रुंदीही झाली. आता थांबायचं का? अजिबात नाही. कारण विचार करा याला जोड जर उंचीची मिळाली तर आकारमान किती पटीने वाढेल?  पण उंची वाढवायची म्हणजे काय करायचं? विचारांची उंची वाढवायची. सुंदरतेचं पुजारी व्हायचं.

इथे ‘सुंदर’ हे विशेषण दिसण्याला नसून, विचारांना आहे. सुंदर विचारांमध्ये राग, लोभ, मद, मत्सर मोह-माया, अपेक्षा यांना स्थान नाही. शिव-पार्वतीचा अर्थ काय? कोण आहेत हे शिव-पार्वती? देव? माहीत नाही. पण हे आपल्या मनातले आपले मित्र आहेत हे निश्‍चित. शिव म्हणजे आपल्या मनातली कल्याणकारी भावना (आपली रुंदी) पार्वती म्हणजे आपल्या विचारांची उंची.

जी पर्वताएवढी असायला हवी. अंगात कृतज्ञता आणि क्षमाशील वृत्ती असली तर विचारांची उंची पर्वताएवढी होते. त्याच्याही पल्याड जाऊन दैवी स्वधर्मी स्वभावाशी आपण स्वतःला जोडूया  जेव्हा आपण ही त्रिमिती जगू, तेव्हा आपलं जीवनक्षेत्र पूर्ण होईल. आपण संपूर्ण आयुष्य परिपूर्ण जगू शकू. आता पश्‍चात्ताप नाही, कोणाबद्दलही आकस नाही आणि अपेक्षाही नाही. आहे ते केवळ समाधान, आणि परमानंद चला, तर मग आनंदाने जगू या  येणाऱ्या जिंदगीला welcome करू या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Pratibha Deshpande