रुट ओपनिंगला पुन्हा प्रारंभ ( मिशन एव्हरेस्ट)

everest
everest

पाऊस कसा पडतो किंवा पडत नाही, यानुसार आपण वरुणराजा रुसला किंवा प्रसन्न झाला असे नेहमी म्हणतो. एव्हरेस्टचा मोसम अंतिम टप्यात आल्यानंतर हवामानासंदर्भात गिर्यारोहकांची भावना अशीच असते. हवामान कसा प्रतिसाद देते यानुसार रुट ओपनिंगचे काम पुढे सरकते. याप्रसंगी रुट ओपनिंगबद्दल माहिती देणे समयोचित ठरेल. नेपाळमधील शेर्पांच्या विविध संघटना एकत्र येऊन हे काम तडीस नेतात. त्यासाठी एक टीम बनविली जाते. त्यात सोळा शेर्पा असतात. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण संघ, शेर्पा ऍडव्हेन्चर ग्रुप, हिमालयन ग्रुप व इतर काही शेर्पा संस्था आहेत. त्यांच्यातील सर्वोत्तम क्षमतेच्या शेर्पांची निवड केली जाते. ही टीम कॅम्प दोन ते एव्हरेस्ट समिट या मार्गाचा रूट ओपन करतात. दरवर्षी हा रूट ओपन करण्यास पंधरा ते वीस दिवस लागतात, यावर्षी मात्र अगदी दहा ते बारा दिवसातच कॅम्प ते साउथ कोलपर्यंतचा रूट शेर्पांनी ओपन केला. त्यानंतर मात्र त्यांना प्रतिकूल हवामानामुळे बेस कॅंपला परत यावे लागले. आता रविवारी हवामानात आणखी सुधारणा झाली. त्यामुळे ही टीम पुन्हा चढाईला गेली आहे. रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी पहाटेपर्यंत रुट ओपनिंगचे काम पुर्णत्वास येण्याची अपेक्षा आहे. साउथ कोलपासून पुढे एव्हरेस्ट समिट पर्यंत 848 मीटर एव्हढे अंतर उरते व एव्हरेस्टच्या शिखर चढाईमध्ये हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. यात बाल्कनी आणि हिलरी स्टेप असे दोन महत्त्वाचे अडथळे असतात. त्यामुळे रुट ओपनिंगचे काम येथेच सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. अर्थात अनुभवी शेर्पांमुळे त्यात कोणतीही अडचण येत नाही.

रुट ओपनिंग दोन टप्यात होते. खुंबू आईसफॉल ते कॅम्प दोन हा रुट ओपन करण्याचे काम 8 जणांची टीम करते. या मार्गाची सतत देखभाल करावी लागते. हे काम सगरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटी (SPCC) चे शेर्पा करतात. त्यांना आईसफॉल डॉक्‍टर्स असे संबोधले जाते. त्यांना सतत सक्रिय राहावे लागते. याचे कारण खुंबू आईसफॉलमध्ये सतत हिमनगांच्या हालचाली होत असतात. अनेकदा तुम्ही खुंबूतून वर जाता तेव्हाची लॅडर (शिडी) परत येतेवेळी वेगळ्या ठिकाणी लावलेली असते.

तसे पाहिले तर ज्या त्वरेने आणि सफाईने शेर्पा रुट ओपनिंग करतात ते पाहिले की त्यांना सलाम करावा लागेल. रविवारी शेर्पा टीम वर जाताच काही छोटी पथके सुद्धा चढाईसाठी रवाना झाली. ती समिट अटेम्प्टसाठी गेली आहेत. रुट ओपनिंग करणाऱ्या टीमपाठोपाठ ती पथके समिट करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. आम्ही या पहिल्या जथ्यात नसू. आमचा निर्णय सोमवारी होईल.

आमची तंदुरुस्ती उत्तम आहे. बेस कॅम्प मॅनेजर म्हणून अंतिम टप्यात दाखल झालेला डॉ. सुमित मांदळे याच्यासह आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या वेदर रिपोर्टचा आढावा घेत आहोत. पुण्यात एव्हरेस्टवीर गणेश मोरे याला याची चांगली माहिती असून तो माहिती पुरवित आहे.

काल मी बंगाली पथकामधील गौतम घोष याच्या पार्थिवाबद्दल माहिती दिली होती. त्याचे पार्थिव साऊथ कोलमध्ये एका टेंटमध्ये ठेवण्यात आले होते, पण वर्षभरात वादळी वाऱ्यांमुळे टेंट फाटला. पार्थिव खाली आणण्याचा खर्च आतापर्यंत त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी करीत होती, पण ही माहिती मिळताच पश्‍चिम बंगाल सरकारने निधी मंजूर केला. त्यासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः पुढाकार घेतला. बंगाल सरकार गिर्यारोहणाला सक्रिय पाठिंबा देते.

दरम्यान, ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन झाल्याचे आम्हाला कळले. 2012च्या महत्त्वाकांक्षी नागरी मोहिमेच्यावेळी त्यांना आमच्या टीमला मार्गदर्शन केले होते. तेव्हा मोठ्या मोहिमेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या होत्या. एव्हरेस्ट मोहिमेच्या यशात बाम सरांचा वाटा मोठा आहे.
(क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com