ऑन एअर : बे दुणे काय बे!?

आर. जे. संग्राम ९५ बिग एफ.एम.
शुक्रवार, 29 मे 2020

मराठी माणसं साधारणपणे दोन प्रकारची असतात. एक जे हिंदीला घाबरतात आणि दुसरे जे हिंदीला घाबरवतात! हिंदीबरोबरच गणिताला दबकुन असणारी माणसं खूप आहेत आपल्याकडं. नेमका आकडा नाही सांगता येणार मला - अर्थात गणित कच्चं असल्यामुळं...

मराठी माणसं साधारणपणे दोन प्रकारची असतात. एक जे हिंदीला घाबरतात आणि दुसरे जे हिंदीला घाबरवतात! हिंदीबरोबरच गणिताला दबकुन असणारी माणसं खूप आहेत आपल्याकडं. नेमका आकडा नाही सांगता येणार मला - अर्थात गणित कच्चं असल्यामुळं...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपण या आधी समाज म्हणून कोरोना रुग्णांइतकी आकडेवारी गोळा केल्याचं मला आठवत नाही. रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये भर पडते आहे. मार्चमध्ये २-४ केसेसचं निदान होत होतं. आता रोज हजारोंमध्ये आपण बोलतो. लोकडाउनच्या नजरकैदेपेक्षा मानसिक ताण या आकड्यांमुळंच वाढतोय, अशी शंका मला येते. आमच्या आधीच्या अशिक्षित पिढ्यांना ‘हम दो हमारा एक’ याचा अर्थ एकावेळी एक, असे पाच सहा चालतील, असं वाटलं असावं!! पण आजही गणित हा मुलींचा विषय नाही, असं उच्चशिक्षित पालकांचंसुद्धा ठाम मत आहे. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या दहापैकी सात उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना दर जानेवारी ते मार्चदरम्यान आपल्या पगारातला किती टक्के भाग इन्कमटॅक्ससाठी काढून घेतला जाणार आहे, हे माहीत नसतं. दरवर्षी  ‘अरे माझे केवढे पैसे कापलेत कंपनीनं,’  असं उद्‍गारवाचक वाक्य ऐकायला मिळतं. त्याच त्या गोष्टीनं आपण दरवर्षी आकर्षित होतो म्हटल्यावर दर पाच वर्षांनी आपण पुन्हा तीच चूक करतो, यात नवल नाही.
माणसाचं गणित जितकं कच्चं, तितका त्याचा न्युमरॉलॉजीवर दृढ विश्‍वास असतो.

व्हॉट्सॲप विद्यापीठवाल्यांनी या आपल्या आकडे (वाकडे?) कौशल्याचा चांगलाच फायदा घेतला आहे. कुठल्याही राजकीय नेत्याच्या फोटोसमोर सात, आठ, दहा शून्य असलेला आकडा टाकायचा. त्या नेत्याच्या चाहत्यांना वाटतं की, एवढ्याचा विकास झालाय. त्याच्या विरोधकांना वाटतं, एवढ्याचा भ्रष्टाचार झालाय! राज्यपाल या घटनात्मक पदासाठी अर्ज करताना बायोडेटामध्ये गणितात ठराविक गुण किंवा पदवी असायलाच हवी, अशी अट असावी अशी माझी मागणी आहे. नाहीतर पहाटेची गणितं उजाडल्यावर चुकू शकतात. विंदा करंदीकर यांनी खरंतर कवितेचे शीर्षक सब घोडे दहा-बारा टक्के असं केलं असतं, तर ती अधिक वास्तववादी झाली असती. आणि तसंही राजकारणात या दहा आणि बारा टक्क्यांमधला फरकच महत्त्वाचा असतो. 

आमच्या अगणित लोकांच्या गणिताची ही परिस्थिती असताना वीस लाख करोडचा हिशोब आम्हाला ठेवता येईल, याचा आत्मविश्‍वास नसल्यानं आम्ही तो मागतच नाही. असं सगळं असताना परदेशातील काही लोक भारताचा कोरोना मृत्युदर इतका कमी कसा, नक्कीच हे लोक लपवून ठेवत आहेत असे आरोप करत आहेत. अशा वेळी ‘नासा’ आणि सिलिकॉन व्हॅलीमधील आपले भारतीय त्यांना उत्तर का देत नाहीत, म्हणून मी काही एनआरआय लोकांना फोन केला. तर, त्यांनाही वाटत होतं की, आपण आकडे लपवतोय. नेमके कुठं लपवतोय याचं उत्तर मात्र कोणाकडंच नाही! 

इथं फोडणीमुळं शिंक आली, तरी शेजारच्या काकू बाल्कनीतून आवाज टाकतात, ‘‘काय हो, कोरोना तर नाही ना झाला? रोज हजारो लोकांना होतोय आणि लाखो लोक बरेदेखील होत आहेत. आणि उद्यापर्यंत तुम्हाला बरं नाही वाटलं, तरी काळजी करू नका, मी रात्री पोलिसांना फोन करते. घेऊन जातील तुम्हाला. परत आलात की सोसायटीतर्फे स्वागत समारंभ ठेवू. चला, मी लगेच बिल्डिंगच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सगळ्यांना कळवते की, संग्रामसाहेब शिंकत आहेत सकाळपासून...’’ आपलं सामाजिक  गणितच असं आहे की, काहीच लपवून ठेवता येत नाही. मृत्यू कुठं दडपून ठेवणार? एक वेळ कावळा म्हणेल, ‘मी दीक्षित डाएट वर आहे, नैवेद्य नको आज,’ पण बाकी नातेवाईक, शेजारी यांना जेवण घालावाच लागतं. मला वाटतं कोरोना स्वतःही गोंधळला आहे, दमला आहे. ‘माणूस टू माणूस’ असा त्याचा प्रवासाचा प्लॅन असतो, पण भारतात मात्र वर्णव्यवस्था, उच्च-नीच, लोकल-परप्रांतीय, मराठी-हिंदी-मद्रासी (मराठी माणसानुसार दक्षिण भारतात मद्रासी भाषा बोलली जाते...), झोपडपट्टी-टाउनशिप, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, या सगळ्या भिंती कोरोनाच्या आगेकुचीच्या आड येत असाव्यात. 
मला सांगा, आठ लोकांना कमीत कमी सहा फूट सोशल डिस्टंसिंग ठेवायचं असल्यास किती एरिया लागेल? 

या प्रश्नाचं उत्तर : ‘सर, हे आठ लोक एकाच जातीचे, लिंगाचे, धर्माचे आहेत का?’ 
आपल्याकडं अशा सोशल ‘डिस्टंन्सिंग’ची प्रथा काही नवीन नाही! 

ता. क. :
अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न : (हे गणित फक्त खूप जास्त आयक्यू असलेल्यांनाच सुटेल) 
दोन ट्रेन बिहारकड निघाल्या. महाराष्ट्र ते बिहार अंतर १७०० किलोमीटर आहे. (असेल!); सकाळी सहा वाजता ‘ए’ ट्रेन ४० किलोमीटर प्रतितास या वेगानं, तर ‘बी’ ट्रेन सात वाजता ५०च्या वेगानं सुटली. कोणती ट्रेन प्रथम पोचेल?
संभाव्य उत्तर - अर्थात, जी आधी केरळमार्गे फेरफटका मारून येणार नाही ती...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rj sangram on air