ऑन एअर - प्रबोधनाचा फायदा

Enlightenment
Enlightenment

‘वर्क फ्रॉम होम’मध्ये कामाची वेळ निश्‍चित होत नाहीये. माझी टीम सकाळ, दुपार, संध्याकाळ मला मेसेजेसचे डोस पाठवत असते, न्यूज रिपोर्ट्स, मीम्स, कार्टून्स, आकडे, व्हिडिओजच्या स्वरूपात जगभरातल्या घडामोडी त्यात असतात. यातलं आपल्या श्रोत्यांसाठी काय महत्त्वाचं आहे, हे ठरवून मी त्याचा सखोल अभ्यास करायचा प्रयत्न करतो आणि मग सादर करतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला काही दिवसांपूर्वी माझ्या टीमनं पुण्यातील सोनेरी मास्कवाल्या व्यक्तीबद्दल सांगितलं, लगेच त्याचं नाव, गाव, पत्ता आणि फोन नंबर वगैरे माहिती काढली आणि मुलाखतीसाठी मेसेज पाठवला. माझी विनोदबुद्धी जास्त असल्यामुळं, आपुलकीनं आपल्या लोकांची खेचायची लकब (खोड?) असल्यामुळं, यातून गंमत करता येणार, हे मला लगेच समजलं. सोन्याचा मास्क तोंडाला बांधणाऱ्या माणसाची स्टोरी दाखवायची, ऐकवायची म्हटल्यावर कुठल्याही मीडियावाल्याच्या तोंडाला पाणी सुटणं साहजिक आहे.

मी मात्र यावर काहीही कार्यक्रम करायचा नाही, असं ठरवलं! ‘लो हँगिंग फ्रुट’ म्हणजे हाताला आलेलं फळ (---- एडिटर प्लस चेक----) याला कधीच नाही म्हणायचं नसतं. अगदी संवेदनशील पद्धतीनं यावर भाष्य करून यातून लोकांना आनंद देणारा, दिखावूपणाबद्दल प्रबोधनात्मक कार्यक्रम करता आला असता. पण मी तो विषयच नाही काढला. 

मी रेडिओवर विषय कसे निवडतो? यासाठी नोम चोमस्की नावाच्या अमेरिकन विचारवंताकडं जावं लागंल. ‘संमतीचे उत्पादन’ या पुस्तकात चोम्स्की म्हणतो की, सामान्य माणसाला मीडियामार्फत जितक्या गमंत-गोष्टींमध्ये गुंतवून ठेवता येईल, तितकं ते महत्त्वाच्या विषयांवर विचार करणार नाहीत. कामावरून दमून भागून आलेल्याला मूलभूत प्रश्‍नांऐवजी इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं हे बहुतांश मीडियाचं एक महत्त्वाचं काम असतं. ते आजही खरं आहे, नव्हे, सोशल मीडियामुळं ते अजूनच प्रखर झालं आहे. सोनेरी मास्क लावलेली व्यक्ती हे एक मीडिया निर्मित बुजगावणं आहे, जे आपल्यासारख्या पाखरांना महत्त्वाच्या विषयापासून दूर हाकलत आहे. 

बाळ रडायला लागल्यास त्याला काहीतरी आवाज करणारं, समजणारं दाखवायचं आणि काही वेळ का होईना त्याला शांत करायचं. असं चार-पाच वेळा केल्यानंतर पुन्हा एकदा पहिल्या खेळण्याची पाळी येते. कारण, पब्लिक मेमरी इस शॉर्ट! सत्ताधारी राजकारण्यांना हे खूप छान जमतं. महत्त्वाच्या विषयांना बगल देऊन जनतेच्या हातात भावनिक चमक आणि आवाज असलेल्या विषयांचा खुळखुळा द्यायची जगभरातल्या सरकारांची जुनी सवय आहे. गेली काही वर्षं इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया हे या खोट्याचं, खुळखुळ्याचं काम करतंय. मद्यधुंद माणसासारखं आपण ‘मुद्दे-धुंद’ होतो! यावर उपाय काय? आपण कशाकडं लक्ष देतोय, याकडं लक्ष द्यावं लागंल! जमंल ना तुम्हाला?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com