ऑन एअर : श्रीमंतीबाबत 'लिमिटेड' चर्चा

ऑन एअर : श्रीमंतीबाबत 'लिमिटेड' चर्चा

जगात दोन हजारांच्या वर अब्जाधीश आहेत. त्यांची एकूण मालमत्ता साधारण ८ ट्रिलियन (आठ हजार अब्ज) डॉलर एवढी आहे. हा आकडा सारखा बदलत असतो, कारण यांची बहुतांश मालमत्ता ही शेअर बाजाराशी निगडित असते.

अतिश्रीमंतांबद्दल बोलायचं म्हणजे आधी काही शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. मिलियन, बिलियन, ट्रिलियन हे शब्द आपण नेहमी ऐकतो आणि कधी कधी बिनधास्त वापरतो. भारतीय संस्कृतीने जगाला शून्य दिला; पण तो एकच शून्य होता. स्वतःला कार्यकर्ता म्हणवणारे; पण स्टेज दिसले, की लगेच एका लायनीत बसलेल्या पुढाऱ्यांसारखे जेव्हा अनेक शून्य एका आकड्यात एकत्र येतात, तेव्हा मात्र आपली गडबड होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१ मिलियन = १० लाख 
१ बिलियन = १०० कोटी (१ अब्ज)
१ ट्रिलियन = १,००० अब्ज

मात्र, नुसते कोरडे आकडे उपयोगाचे नाहीत. डॉलर ते रुपया अशी घरवापसी झाली पाहिजे. १ मिलियन डॉलर म्हणजे किती? १० लाख डॉलर! असं उत्तर तुम्ही दिलं तर act of God देखील तुम्हाला वाचवू शकत नाही. उत्तर आहे ७ कोटी रुपये, जर एक डॉलर = 70 रुपये असं धरलं तर. एक बिलियन डॉलर म्हणजे ७,००० कोटी रुपये. एक ट्रिलियन डॉलर म्हणजे ७० लाख कोटी रुपये, चूक भूल माफ. तसंही साल वीस एकवीसमध्ये बऱ्याच लोकांचं उन्नीस-बीस झालंय.

जगातल्या २,०९५ अब्जाधीशांकडे टोटल ५६० लाख कोटी रुपये एवढी मालमत्ता आहे. पैकी पहिल्या दहा माणसांकडे ७० लाख कोटी एवढी आहे.
जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जेफ बेझोसे- ज्यांच्याकडे जवळजवळ पंधरा लाख कोटी रुपये आहेत. सन २०१४ मध्ये भारतात कोणाकडे किती मालमत्ता होती? सगळ्यात गरीब १० टक्के भारतीयांकडे ०.२ टक्के; तर ५० टक्के भारतीयांकडे २.५ टक्के. ७० टक्के भारतीयांकडे ८.४ टक्के; ८० टक्के भारतीयांकडे १४.१ टक्के; ९० टक्के भारतीयांची एकूण संपत्ती २३.५ टक्के. म्हणजेच, १० टक्के लोकांची संपत्ती ही ९० टक्के भारतीयांच्या एकूण संपत्तीच्या तिपटीपेक्षा जास्त! आणि हे सगळ्यात महत्त्वाचं - १ टक्का भारतीयांकडे, ७० टक्के भारतीयाच्या चारपट संपत्ती आहे!

अति श्रीमंतांबाबतचे हे आकडे ऐकले, की माझ्यातला कम्युनिस्ट आणि समाजवादी खाडकन जागा होतो. ‘दास कॅपिटा’ याचं प्रवचन ठेवावं असं वाटतं. या सगळ्या बड्या कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण करावं आणि विषमता दूर करावी. अर्थात हा वाद काही नवीन नाही. असं केलं तर कोणीच धंदा करणार नाही, किंवा वाढवणार नाही, नोकऱ्या निर्माण होणार नाहीत. मात्र, तशीही आता जॉबलेस ग्रोथ होत आहे, मशीन आणि AI  हळूहळू नोकऱ्या गायब करत आहेत वगैरे.

श्रीमंतीला लिमिट असावं का? 
अमेरिकेसारख्या भांडवलशाहीप्रधान देशातसुद्धा ही मागणी व्हायला लागली आहे. ज्या देशात डाव्या विचारसरणीचे आणि समाजवादी हे शब्द देशद्रोही या अर्थी वापरले जायचे, तिथे आता एकाच व्यक्तीकडे एक बिलियन डॉलरपेक्षा जास्त मालमत्ता असू नये, वन पर्सेंट लोकांवर आणि कंपन्यांवर अधिक कर लावण्यात यावा, आणि आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकाला फुकट देण्यात यावी असा सूर काढण्यात  येतोय.

भारतात एक अब्ज म्हणजे ७,००० कोटी रुपये हेच लिमिट असावं? का ७०० कोटी? का १०० कोटी बास झाले एका व्यक्तीसाठी? ग्रामीण भारतात ७० टक्के लोकांचं उत्पन्न पाच हजार रुपये दरमहा आहे, मग श्रीमंतांकडे १० कोटींपेक्षा जास्त रुपये तरी का असावेत? चांगलं - म्हणजे निरोगी, सुखी, अर्थपूर्ण आयुष्य जगायला जास्तीत जास्त किती पैसे लागतात? तुम्ही स्वकष्टाने, स्वतःच्या प्रतिभेच्या दमावर कमावलेली मालमत्ता फुकट तुमच्या मुलांना मिळावी का? आपल्या आर्थिक यशात खरंच कष्ट आणि ‘मेरिट’ याचा किती वाट असतो? आपल्या सामाजिक आणि वर्णव्यवस्थेचा किती? 

हा असा सामाजिक आणि राजकीय उहापोह आपल्याकडे होईल का नाही माहीत नाही; पण प्रत्येक मिडल, अप्पर मिडल क्लास व्यक्तीने या निमित्ताने या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे: किती पैसा/ मालमत्ता/ संपत्ती पुरेशी आहे, असते, असावी?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com