कोणता मार्ग? कोणती दिशा?

संदीप वासलेकर
रविवार, 1 जानेवारी 2017

समाज घडवण्याचे दोन मार्ग आहेत. बाह्य व अंतर्गत शत्रूंवर सतत हल्ला करत राहणं व राष्ट्रीय सुरक्षेचा आभासी प्रश्‍न निर्माण करणं हा एक मार्ग आहे; तर बाह्य व अंतर्गत शक्तींना आपल्याविरुद्ध हल्ला करण्याची इच्छा होऊ नये असं राष्ट्राचं चारित्र्य बनवणं हा दुसरा मार्ग आहे. देशातल्या नागरिकांना बडगा दाखवून, धाडी टाकून, पिसून काढून शिस्त लावणं हा एक मार्ग आहे किंवा त्यांना अभिमानास्पद सुविधा देणं, सामंजस्याचं वातावरण निर्माण करून व आत्मविश्‍वास देऊन स्वतःहूनच सर्व नियम पाळण्यास प्रेरित करणं हा दुसरा मार्ग आहे. या नव्या वर्षात आपण दोन मार्गांपैकी कोणता मार्ग निवडूया?

समाज घडवण्याचे दोन मार्ग आहेत. बाह्य व अंतर्गत शत्रूंवर सतत हल्ला करत राहणं व राष्ट्रीय सुरक्षेचा आभासी प्रश्‍न निर्माण करणं हा एक मार्ग आहे; तर बाह्य व अंतर्गत शक्तींना आपल्याविरुद्ध हल्ला करण्याची इच्छा होऊ नये असं राष्ट्राचं चारित्र्य बनवणं हा दुसरा मार्ग आहे. देशातल्या नागरिकांना बडगा दाखवून, धाडी टाकून, पिसून काढून शिस्त लावणं हा एक मार्ग आहे किंवा त्यांना अभिमानास्पद सुविधा देणं, सामंजस्याचं वातावरण निर्माण करून व आत्मविश्‍वास देऊन स्वतःहूनच सर्व नियम पाळण्यास प्रेरित करणं हा दुसरा मार्ग आहे. या नव्या वर्षात आपण दोन मार्गांपैकी कोणता मार्ग निवडूया? आपल्या देशाला कोणती दिशा देऊया? 

पनामा हा छोटासा देश आहे. तो उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका या खंडांना जोडतो, तसंच अटलांटिक व प्रशांत (पॅसिफिक) या दोन महासागरांनाही जोडतो. पनामा कालवा १०० वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. प्रशांत महासागरातून या कालव्यामार्गे अटलांटिक महासागरात जाण्यासाठी १० तास लागतात. तो कालवा नसता तर जहाजांना एका महासागरातून दुसऱ्या महासागरात जाण्यासाठी २१ दिवस लागले असते. सध्या अमेरिका व आशिया या दोन खंडांमधल्या व्यापारापैकी निम्मा व्यापार एकट्या पनामा कालव्यातून होतो.

अशा या दोन खंडांना, दोन महासागरांना, दोन आर्थिक विभागांना जोडणाऱ्या देशात सैन्यच नाही. म्हणजे पनामा कालव्यासारखा महत्त्वाचा व्यापारी मार्ग देशात असूनही दुसरा कोणता देश आपल्यावर कब्जा करेल, अशी भीती त्यांना वाटत नाही, ही त्या छोट्या देशाच्या आत्मविश्‍वासाची खूण आहे. 

कोस्टा रिका या पनामाच्या शेजारच्या देशातही सैन्य नाही. त्याच्या भोवतालचे देश म्हणजे निकाराग्वा, होंडुरास, एल साल्वादोर, बेलिझ इथं यादवी, दहशतवाद व छोटी युद्धं अधूनमधून होत असतात; पण आपल्यावर कुणी हल्ला करेल, याची भीती कोस्टा रिकाला वाटत नाही व म्हणून १९४८ पासून तिथं सैन्यच नाही.

युद्धात शत्रुराष्ट्राला पराभूत करणं ही खूप वाहवा करण्याजोगी गोष्ट आहे; परंतु आपल्यावर हल्ला करण्याचा विचारच इतर देशांच्या मनात येऊ न देण्यात खरा विजय आहे. दहशतवादाबाबतही असंच. दहशतवादाचा सामना करून दहशतवाद्यांना यमसदनास पाठवलंच पाहिजे; पण आपल्यावर कुणीही दहशतवादी हल्ला करण्याचा विचारही करणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यात मोठं यश आहे.

स्वित्झर्लंड हा छोटा देश युरोपच्या केंद्रस्थानी आहे. आधुनिक स्विस राज्याची स्थापना २०० वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासून स्वित्झर्लंडवर कुणी हल्ला केला नाही किंवा तिथं दहशतवादी हल्ल्यातून घातपात घडवून आणला नाही. अशा या स्वित्झर्लंडमध्ये खूप छोटं सैन्य आहे. इंग्लंडवर पूर्वी आयर्लंडमध्ये लपून राहिलेल्या ‘आयरिश रिपब्लिकन आर्मी’च्या दहशतवाद्यांचे हल्ले होत असत; परंतु १९८५ नंतर आयर्लंडमधून दहशतवाद्यांचे हिंसक हल्ले तर सोडाच; पण रेडिओवरून प्रचार करण्याचीही त्यांना मुभा मिळू नये, असा विचार आयर्लंडच्या सरकारनं केला. नंतर ब्रिटनच्या भूमीवरूनच त्यांनी दहशतवादी हल्ले सुरू ठेवले; पण ते त्यांना कठीण गेलं. शेवटी १९९६ नंतर दहशतवाद्यांनी शस्त्रं खाली ठेवून शांतताविषयक चर्चेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला व त्यांची दहशतवादाची इच्छाच नाहीशी झाली

पूर्वी इंग्लंडचं सरकार दहशतवाद्यांना पराभूत करत असे; परंतु नंतर त्यांना दहशतवाद्यांना परावृत्त करण्यात यश मिळालं. हे यश मोठं होतं. अलीकडच्या काही वर्षांत इंग्लंडवर अल्‌ कायदा, इसिस अशा दहशतवादी संघटनांनी हल्ले केले, तसंच हल्ल्याचे काही असफल प्रयत्न केले. त्यांच्यावर हल्ला झाल्यावर इग्लंडनं सूड घेतला; पण दहशतवाद्यांच्या मनातली हल्ला करण्याची इच्छाच ते नष्ट करू शकले नाहीत.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जिअम, जर्मनी, इटली या देशांवर हल्ला करण्याचा विचार अरब दहशतवाद्यांच्या मनात का येतो आणि स्वित्झर्लंड, स्वीडन, फिनलंड, कॅनडा या देशांवर हल्ला करण्याचा विचार त्यांच्या मनात का येत नाही? 

जेव्हा एखादा देश अंतर्गत परिस्थितीसंदर्भात सामर्थ्यवान असतो, समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन सर्वसमावेशक प्रगती करतो, विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग लष्करी विकासापेक्षा मानवी विकासासाठी करतो, आल्हाददायक निर्सगाची जोपासना करतो व जिथले अतिशय राष्ट्रप्रेमी व दक्ष नागरिक छोट्यातल्या छोटा धोका मोठा होण्याआधी स्वतःहूनच पावलं उचलतात, अशा देशांवर सहसा इतर देश सैनिकी अथवा दहशतवादी हल्ले करण्याचा मनात विचारच आणत नाहीत.

असा सुरक्षित समाज व राष्ट्र निर्माण करणं सगळ्यांनाच शक्‍य आहे. अशा देशात नेत्याचं नावदेखील नागरिकांना विशेष माहीत नसतं. कारण नेता व नागरिक हे समान असतात. अशा देशात निसर्ग व मानव यांचे सकारात्मक संबंध असतात. अशा देशात सर्व धर्म, भाषा, आर्थिक वर्गातले नागरिक गुण्यागोविंदानं राहण्यासाठी आपापल्या पातळीवर प्रयत्न करत असतात. अशा समाजात नागरिक आनंदानं कर भरतात. अर्थात, कर चुकवणाऱ्याला दंड झालाच पाहिजे; पण कर चुकवण्याची इच्छाच मनात येऊ न देणं यात जे यश आहे, ते करचुकव्यांवरच्या धाडीत मिळणाऱ्या हजारो कोटींपेक्षा मोठं आहे.

जिथं उद्योजकांना विजेचा मुबलक पुरवठा आहे व जनरेटर बसवण्याची गरज नाही, तिथं कर चुकवण्याचा विचार मनात येत नाही, जिथं सुंदर रस्ते आहेत, नगरपालिकेनं चालवलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्कृष्ट शाळा आहेत, सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आलेली आधुनिक व स्वच्छ आणि स्वस्त वैद्यकीय सेवा आहे, तिथं नागरिकांना कर चुकवण्याची इच्छा होत नाही. जिथं सरकारी कर्मचारी नागरिकांना लाच मागत नाहीत, तिथं कर चुकवण्याची इच्छा होत नाही.

समाज घडवण्याचे दोन मार्ग आहेत. बाह्य व अंतर्गत शत्रूंवर सतत हल्ला करत राहणं व राष्ट्रीय सुरक्षेचा आभासी प्रश्‍न निर्माण करणं हा एक मार्ग आहे; तर बाह्य व अंतर्गत शक्तींना आपल्याविरुद्ध हल्ला करण्याची इच्छाच होऊ नये असं राष्ट्राचं चारित्र्य बनवणं हा दुसरा मार्ग आहे. देशातल्या नागरिकांना बडगा दाखवून, धाडी टाकून, पिसून काढून शिस्त लावणं हा एक मार्ग आहे किंवा त्यांना अभिमानास्पद सुविधा देणं, सामंजस्याचं वातावरण निर्माण करणं व आत्मविश्‍वास देऊन स्वतःहूनच सर्व नियम पाळण्यास प्रेरित करणं हा दुसरा मार्ग आहे. देशातले युवक परदेशी जाऊन चमकले तर टाळ्या वाजवणं, हा एक मार्ग आहे; तर देशातल्या युवकांना देशात राहू देऊनच शेकडो ऑलिम्पिक पदकं व नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी समर्थ करणं हा दुसरा मार्ग आहे.

या नव्या वर्षात आपण दोन मार्गांपैकी कोणता मार्ग निवडूया? आपल्या देशाला कोणती दिशा देऊया? 
***
‘सप्तरंग’च्या वाचकांच्या प्रेमाग्रहामुळं ‘एका दिशेचा शोध’ हे सदर २०१७ मध्येही सुरूच राहील. हे सदर सुरूच ठेवण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण केल्याबद्दल सर्व वाचकांचे आभार व त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Web Title: Article by Sandeep Waslekar in Saptranga