मेरे ये गीत याद रखना... (संदीप वासलेकर)

Sandip-Vaslekar
Sandip-Vaslekar

मी तरुणांना सुचवीन, की तुमचं भविष्य तुम्ही तुमच्या हातात घ्या. भूतकाळाच्या सापळ्यात सापडू नका. भविष्यासाठी उपयुक्त असणाऱ्या कृषी, पर्यावरण, जल, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन या विषयांवर लक्ष केंद्रित करा. भूतकाळाशी संबंध असलेल्या भावनात्मक विषयांत गुरफुटून बसाल तर काळ तुम्हाला मागं ठेवेल!

अंत हीच एक बाब जगात शाश्‍वत आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीला कधी ना कधी अखेर ही असतेच. आज या सदरातला मी हा अंतिम लेख लिहीत आहेत. मात्र, तत्पूर्वी तुम्हा सर्व वाचकांविषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

या सदराची कल्पना माझी नव्हती. ‘एका दिशेचा शोध’ हे माझं पुस्तक प्रकाशित झाल्यावर ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी ही कल्पना मला सुचवली व मी ती मान्य करेपर्यंत त्यांनी आग्रह कायम ठेवला. परिणामी, मी जून २०१२ मध्ये हे सदर लिहायला सुरवात केली. सतत साडेसात वर्षं मराठीत असं सदर चालणं हे अपवादात्मक आहे. त्यासाठी मी ‘सकाळ’चा खूप आभारी आहे. 

हे सदर थांबवून त्या जागी अन्य लेखकांना संधी मिळायला हवी असं मला गेली दोन-तीन वर्षं प्रामाणिकपणे वाटत होतं. त्यासाठी ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांच्याकडे मी सदर थांबवण्याची परवानगीही दोन वर्षांपूर्वी मागितली होती; पण त्यांनी ती दिली नाही. या वेळी परवानगी न मागताच मी हा शेवटचा लेख लिहीत आहे. परवानगी मागितली तर ती मिळणार नाही हे मला माहीत आहे, म्हणून मी ‘सकाळ’च्या संपादकमंडळाची परवानगी न घेताच निरोप घेत असल्यामुळे माफी मागतो. 

मी जरी सदर थांबवत असलो तरी ‘सकाळ’चं व्यवस्थापन, संपादक व वाचक यांच्याबरोबरचं माझं नातं यापुढेही कायम राहील. कधी पुण्याला आलो तर मला तुम्ही आपलं मराठी पद्धतीचं पिठलं-भाकरीचं जेवण द्याल अशी अपेक्षा! माझ्या सततच्या परदेशप्रवासामुळे मला हे आपलं मराठी जेवण मिळत नाही. 

माझ्या या प्रवासात युवा वाचकांशी झालेला संवाद हा सर्वांत आनंदाचा अनुभव होता. महाराष्ट्रातले अनेक युवक नावीन्यपूर्ण उद्योग अथवा सामाजिक कार्य करण्यासाठी धडपडत असतात. काही जणांचा उल्लेख मी गेल्या वेळच्या लेखात (ता १५ डिसेंबर) केला आहे. वास्तविक, आपली सामाजिक व आर्थिक परिस्थिती अवघड आहे. इतर देशांत ज्या प्रमाणात युवकांना संधी उपलब्ध करून दिली जाते त्या तुलनेत आपल्याकडील सरकार, उद्योगपती व समाजातली इतर बलस्थानं आपल्या युवकांना खूपच अल्प प्रमाणात संधी निर्माण करून देतात. तरीही निराश न होता अनेक युवक नवनवीन प्रयोग करतात. भारताचं उज्ज्वल भवितव्य युवकांच्या प्रतिभेत दडलेलं आहे. 

मला साडेसात वर्षं कोणत्याही विषयावर लिहिण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. मी एक मुद्दा पुनःपुन्हा मांडला व तो म्हणजे, ‘आपल्या लोकशाहीचं नेतेशाहीत जे रूपांतर झालं आहे ते थांबवलं पाहिजे.’ 

तुम्ही इंटरनेटवर जाऊन जगातल्या १९३ देशांची माहिती घ्या. ज्या देशात नेत्यांना अवास्तव महत्त्व दिलं जातं ते देश गरिबी, विषमता, युवकांचं वैफल्य अशा समस्यांत अडकतात. 

जिथं नेता मोठा, तो देश होतो छोटा.
जिथं नेता-नागरिक समान, तोच देश होतो महान. 
आपल्याला भारताला जर महान देश करायचं असेल तर नेत्यांचं पूजन बंद करून त्यांना नागरिकांसमान केलं पाहिजे. 

आपण लोकशाहीचं नेतेशाहीत रूपांतर होण्याच्या भयाच्या सावलीत वावरतो. कारण, आपण राष्ट्रकारणापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व देतो. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात राजकारण आणण्याची गरज नसते. कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू, शिक्षक, उद्योजक असे सर्व आपापल्या परीनं राष्ट्रनिर्मितीचं कार्य करतच असतात; पण ते कारण नसताना राजकीय नेत्यांच्या मागं लागतात अथवा राजकीय नेते कर्तबगार शास्त्रज्ञ, कलाकार, क्रीडापटू यांचं कौतुक करण्याचं निमित्त करून स्वतःची प्रतिमा उजळून घेतात. उद्योगपतींच्या परिषदेत चीनमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अर्थशास्त्रज्ञांना निमंत्रित केलं जातं. आपले उद्योगपती मात्र अर्थमंत्र्यांना वा अर्थखात्याशी संबंध असलेल्यांना न बोलावता इतर मंत्र्यांना निमंत्रित करतात. प्रत्येक राष्ट्रीय कार्याचं रूपांतर राजकीय स्वरूपात करणं हे राजकीय नेत्यांसाठी चांगलंच सोईचं असतं. 

मी जेव्हा ही लेखमाला सुरू केली तेव्हा पहिल्याच लेखात (ता. तीन जून २०१२) भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, भविष्याचा अंदाज घेऊन भविष्याला आकार देण्याचं व भूतकाळ विसरण्याचं आवाहन केलं होतं. त्याला वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यामागं कारण होतं, आपल्याला काळाची दिशा समजली पाहिजे. आधी येतो भविष्यकाळ, नंतर तो होतो वर्तमानकाळ व त्यानंतर होतो भूतकाळ. भविष्याला आकार देणं हे आपल्या हातात असतं. भूतकाळाबद्दल कितीही चर्चा केली तरी त्यात बदल करणं शक्‍य नसतं. तरीही काही राजकीय प्रवाह सतत भूतकाळावर लक्ष केंद्रित करतात. पूर्वी कधी काय चुकीचं घडलं हे शोधण्याच्या नादात भविष्यात कसं सर्वमंगल करता येईल याबाबतचा विचार करण्याचा त्यांना विसर पडतो. त्यातही त्याला पुन्हा भावनात्मक विषयांची जोड दिली गेल्यावर व ‘राष्ट्रीय सुरक्षा’ अशा महत्त्वाच्या विषयाशी संबंध लावल्यावर तर लोकही भूतकाळाच्या चर्चेत रमतात. परिणामी, आपण भविष्यकाळाला विसरतो आणि मग भविष्यकाळ आपल्यालाही विसरतो! 

त्यामुळे जे आवाहन मी पहिल्या लेखात केलं होतं तेच आवाहन मी या अखेरच्या लेखात तुम्हा सर्वांना व विशेषतः युवा वाचकांना करत आहे...भविष्य तुमच्या हातात घ्या. भूतकाळाच्या सापळ्यात सापडू नका. भविष्यासाठी उपयुक्त असणाऱ्या कृषी, पर्यावरण, जल, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन या विषयांवर लक्ष केंद्रित करा. भूतकाळाशी संबंध असलेल्या भावनात्मक विषयांत गुरफुटून बसाल तर काळ तुम्हाला मागं ठेवेल! 

लिहायचं खूप आहे...पण कुठंतरी थांबायलाच हवं. अलविदा तर म्हणतो; पण ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना’ असंही सांगतो!

तेव्हा तरुणांनो, भूतकाळ विसरून भविष्यकाळ घडवा. त्यासाठी प्रखर आत्मचिंतन करून एका दिशेचा शोध घ्या. हा शोध तुम्हाला सुखी व समाधानी आयुष्य देवो ही ईश्‍वरचरणी प्रार्थना...
...अच्छा, तो हम चलते हैं। 
कधी भेटलो तर, पिठलं-भाकरीची माझी विनंती जरा लक्षात ठेवा हं! 

(गेली साडेसात वर्षं सुरू असलेलं आणि वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळालेलं हे सदर. परराष्ट्रसंबंधांपासून ते देशातल्या अनेक प्रश्नांपर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य करणारं, जगण्याचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणारं, प्रेरणा देणारं आणि अनेक गोष्टी सुगम पद्धतीनं समोर आणणारं हे सदर आता वाचकांचा निरोप घेत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com