आहे वलयांकित तरीही...

शेखर गुप्ता
रविवार, 2 जून 2019

पक्षहिताला प्राधान्य
सुषमा स्वराज खरेतर अडवानी गटातल्या; मात्र २००९ मधील अपयशानंतरही अडवानींनी नव्या पिढीसाठी जागा मोकळी करून देण्याचे नाकारले, त्या वेळी पक्षाला नवा तरुण अध्यक्ष निवडण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवतांना गळ घालण्यासाठी त्या सरळ वेंकय्या नायडू, अनंतकुमार आणि अरुण जेटली या पक्षनिष्ठांच्या गटात सामील झाल्या. याचा परिणाम म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेली. अरुण जेटली यांच्याशी त्यांचे अजिबात पटत नाही, हे उघड गुपित असतानाही त्यांनी पक्षाच्या भल्यासाठी त्यांच्याशी हातमिळवणी केली.

सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे.

शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता समोरील जागेत पहिल्या रांगेकडे चालत येताना पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि दबक्‍या आवाजात कुजबूज सुरू झाली होती. मोठ्या संख्येने असलेल्या त्यांच्या चाहत्यांना अखेरपर्यंत आशा वाटत होती. आपल्या या सर्वांत लोकप्रिय मंत्र्याशिवाय सरकारचा कारभार हाकणे नरेंद्र मोदी यांना कसे परवडेल? 

सुषमा यांची प्रकृती बरी नसल्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आपल्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी स्वत:च ट्विटरवर जाहीर केले होते. आजारपणाच्या या काळाचा त्यांनी मोठ्या धीराने सामना केला. शारीरिक व्याधींचा यशस्वी सामना केल्यानंतर स्वस्थ न बसता संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला सामोऱ्या जात त्यांनी जगभरातील अनेक परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेत पाकिस्तानपासून असलेल्या धोक्‍याच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. हे करताना त्यांच्या तोंडून एकही चुकीचा शब्द बाहेर पडला नाही, संतापाचा अथवा भावनांचा उद्रेक झाला नाही, अतिशयोक्ती नाही. ठामपणा कायम राखत त्यांनी हे सर्व अत्यंत शालीनपणे केले. जगभरातील आपल्या समकक्ष मंत्र्यांपर्यंत पोहोचत त्यांनी नव्या प्रकारच्या राजकारणाची पायाभरणी केली. नरेंद्र मोदी हेच परराष्ट्र खाते चालवत असून, सुषमा यांना फक्त नागरिकांचे पासपोर्ट आणि व्हिसाचे प्रश्‍न सोडविण्याचे काम बाकी राहिले आहे, असे त्यांचे काही विरोधक टोमणे मारत होते. अर्थात, यामुळे स्वराज यांनी अशा टोमण्यांना कधी भीक घातली नाही. जागतिक पातळीवर प्रसिद्धीचा सर्व झोत पंतप्रधानांवर पडत असताना सुषमा या मनात कोणताही किंतु न ठेवता त्यांचा मार्ग मोकळा करत होत्या. या काळात मोदींबद्दल बोलताना स्तुतीशिवाय इतर काहीही त्यांनी व्यक्त केले नाही. 

जनता पक्ष ते भाजप
मी त्यांना १९७७ पासून ओळखतो. याच वर्षी आम्ही दोघांनीही चंडीगडसारख्या छोट्या शहरातून आपापल्या करिअरची सुरवात केली होती. देवीलाल यांच्या जनता पार्टीच्या सरकारमध्ये २५ वर्षांच्या सुषमा या सर्वांत तरुण मंत्री होत्या आणि मी ‘इंडियन एक्‍सप्रेस’मध्ये युवा पत्रकार होतो. मी पाहिलेल्या इतर कोणत्याही राजकीय व्यक्तींपेक्षा अधिक आत्मसन्मान आणि मनोधैर्य त्यांच्याकडे होते, त्यामुळेच ४२ वर्षांच्या राजकीय आयुष्यानंतर आलेल्या या नव्या वळणावर त्यांच्या पक्षाचे सरकार दुसऱ्या कार्यकाळात प्रवेश करत असताना केवळ पाहुण्या म्हणून समारंभाला हजर राहणे त्यांनी कसे पचविले, हे मला अद्याप समजलेले नाही. कदाचित त्यांनी आंतरिक शक्तीला साद घालत ही परिस्थिती तात्त्विक पातळीवरून हाताळली असावी. त्यांना हेदेखील माहीत आहे, की हे साधेसुधे राजकीय वळण नसून त्यांच्या असामान्य राजकीय प्रवासाचा कदाचित अंतिम थांबा असेल. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या घरात सुषमा यांचा जन्म झाला. आणीबाणीच्या काळात बडोदा डायनामाइट प्रकरणात जॉर्ज फर्नांडिस यांना अटक झाली होती, त्या वेळी अत्यंत अभ्यासू, बेडर युवा वकील म्हणून सुषमा यांची सर्वांना पहिली ओळख झाली. फर्नांडिस हे समाजवादी असल्याने आणि सुषमा यांनी ज्यांच्याशी विवाह केला ते स्वराज कौशल हेही समाजवादी असल्याने त्याही त्याच नौकेत बसल्या. १९७७ मध्ये आणीबाणी उठली, इंदिरा गांधींचे काँग्रेस सरकार पडले आणि वयाच्या २५ व्या वर्षी सुषमा हरियानाच्या कामगारमंत्री बनल्या. त्याकाळी त्यांच्याकडे जनता पक्षाचा उगवता तारा म्हणून पाहिले जात होते. हरियानातील जनता पार्टीच्या त्या अध्यक्ष बनल्या त्या वेळी त्यांचे वय २७ वर्षे होते. सत्तरच्या दशकातील भारतीय राजकारणात एखाद्या स्वयंभू महिलेसाठीही ही अत्यंत मोठी झेप होती. मात्र, १९७९ मध्ये जनता पार्टीची शकले झाली आणि त्या नैसर्गिकरीत्या जनसंघाकडे खेचल्या गेल्या.  

वेगळा बाणा जपला
भाजपच्या परंपरावादी साच्यात त्या चपखल बसतात, असा विश्‍वास बसण्याइतपत त्यांनी बरेच काही केले आहे. एफ टीव्हीवर बंदी, कंडोमच्या ‘अश्‍लील’ जाहीरातींविरोधात मोर्चे, ‘सेक्‍सी राधा’ गाण्याला, ‘फायर’ चित्रपटातील दृश्‍यांना विरोध, बलात्कारपीडित महिलेला ‘जिंदा लाश’ म्हणणे ही त्यांची कृत्ये भाजपच्या या धोरणातच बसतात. मात्र, तरीही त्या भाजपच्या सर्वसाधारण परंपरावाद्यांप्रमाणे नाहीत. त्यांच्या आयुष्याचे अनेक पैलू आणि कामगिरी अशी आहे, की त्या वेगळ्या असल्याचे तुम्हाला लक्षात येईल. त्यांनी भाजपसारख्या पुरुषप्रधान, ज्याची पालकसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी केवळ पुरुषांचाच समावेश असलेली संघटना आहे, त्या पक्षात राहण्याचा निर्णय स्वतःहून घेतला. हिंदू परंपरावादाच्या नावाखाली मंगळूरमध्ये काही गट तरुणींना बारमधून हाताला धरून बाहेर खेचत होते आणि ‘अनैतिकता’ पसरवीत असल्याबद्दल मारहाण करत होते, त्या वेळी याविरोधात आवाज उठविण्यास त्या कचरल्या नाहीत. निवडीचे स्वातंत्र्य आणि आधुनिक, स्वतंत्र महिलेच्या सुरक्षेच्या बाजूने त्यांनी आवाज उठविला. पक्षातीलच काहींनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, त्या हटल्या नाहीत. 

मोदींचाही विश्‍वास सुषमांवरच
यंदाची निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करून सुषमा यांनी बाहेर पडण्याचे सूतोवाच फार पूर्वीच केले होते. अकरा निवडणुका लढविण्याचा अनुभव असताना वयाच्या केवळ ६६ व्या वर्षी त्यांनी यंदाची चुरशीची लढत सहजासहजी सोडली नसती. मात्र, प्रकृतीचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले. त्यामुळेच त्यांचे सरकारबाहेर राहणे हे नियोजनबद्ध आणि सन्मानपूर्वकच होते. त्यांची राजकीय कारकीर्द ही अत्यंत यशस्वी असल्याचे आणि त्या पक्षनिष्ठ असल्याचे त्यांचे विरोधकही मान्य करतील. गेल्या पाच वर्षांत अनेक वेळा सुषमा यांना पंतप्रधान कार्यालयाने बाजूला टाकल्यासारखे, दुर्लक्ष केल्यासारखे किंवा अधिकारांवर अतिक्रमण केल्यासारखे वाटले असेल. पण, मागे एकदा स्वतः परदेश दौऱ्यावर असताना आणि दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री राजनाथसिंह हेही चीनमध्ये असताना, मोदींनी अरुण जेटलींऐवजी सुषमा यांच्यावरच जबाबदारी सोपविली होती. सुषमा यांनी त्यांचा नियोजित दुबई दौरा रद्द करून दिल्लीतच थांबावे, असे मोदींनी त्यांना सांगितले होते, हे राजकीय चाणक्‍यांच्या नजरेतून सुटले नव्हते.

सुषमा यांचा आवाका आणि निष्ठा यावर मोदींचा विश्‍वास असल्याचेच हे निदर्शक होते. संघाने अडवानी यांच्यानंतर युवा चेहरा म्हणून सुषमांचीच निवड केली असती तर काय झाले असते, यावर तुम्ही चर्चा करू शकता. त्यांनी भाजपला कसे वळण लावले असते? कदाचित सध्या असलेला परंपरावादी चेहरा बदलला गेला असता; पण इतका एकसंधही हा पक्ष राहिला नसता. 

या विषयावर चांगली चर्चा होऊ शकेल; पण ती चर्चेच्याच पातळीवर राहील. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे, तर प्रत्येक जण कपिलदेव किंवा सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही; कोणाला तरी राहुल द्रविड व्हावेच लागते, अपरिहार्य असूनही हवे तितके वलय, प्रसिद्धी आणि अधिकार नाकारलेला. हेच सुषमा यांचे योग्य वर्णन आहे. 
(अनुवाद - सारंग खानापूरकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Shekhar Gupta