​मुलं जितकं खेळतील, तितकं शिकतील! 

playings-kids
playings-kids

बालक- पालक 

"खेळानं मुलांची बुद्धी वाढीस लागते,' हे आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. खेळाच्या व्यायामामुळं हृदयाला रक्तपुरवठा होतो, तसा तुमच्या मेंदूलाही नवीन पेशींचा पुरवठा होतो. मेंदूच्या पेशींत होणारी ही वाढ अत्यंत उपयुक्त ठरते, त्यामुळे स्मरणशक्ती वाढू शकते. माणसाच्या प्रतिक्षिप्त क्रिया अधिक योग्य व चपळतेनं होतात. ताण सहन करण्याची क्षमताही वाढते.

विद्यार्थिदशेत मुलांना खेळाच्या माध्यमातून व्यायाम होतो, त्यातून वाढ व विकास दोन्ही साध्य होते. नियमांचं महत्त्व, नियम/सूचना पाळणं, यश/अपयश पचवणं, समस्येवर उत्तर शोधणं, प्रसंगावधान राखणं हे सारं खेळातून शिकता येतं. कोणतीही नवी गोष्ट, कोणताही नवा खेळ तुम्ही शिकता तेव्हा मेंदूतील पेशी जोमानं काम करू लागतात. तुमच्या मेंदूमध्ये नवं उत्साहवर्धक रसायन तयार होतं. खेळाच्या प्रांतात खूप विविधता आहे.

काही खेळ स्मरणशक्ती वाढविणारे असतात, तर काहींमुळे निर्णयक्षमता वाढते. काही खेळांत वेगानं धावावं लागतं, तर काहींमुळे खेळात सावध राहावं लागतं. खेळातूनच मुलं सहकार्य शिकतात, तल्लख/चलाख होतात. शारीरिक आणि मानसिक दोन्ही क्षमता वाढण्यासाठी विविध खेळांचा उपयोग होतो. शिवाय, हे अगदी सहज आणि आनंदानं, हसत-खेळत घडत असतं. हे झालं मैदानी खेळाबद्दल आणि त्यातून शिकता येणाऱ्या कौशल्यांबद्दल. वैज्ञानिक खेळाच्या माध्यमातून विविध "विषयां'चं शिक्षण होऊ शकतं. अरविंद गुप्ता यांनी मुलांसाठी अडीचशे वैज्ञानिक खेळणी बनविली आहेत. ते म्हणतात, "मुलांना खेळ खेळायला मनापासून आवडतं. खेळांच्या माध्यमातून त्यांच्या विचारप्रक्रियेला चालना मिळाल्यास त्याचा दुहेरी उपयोग होऊ शकतो. नुसते खेळ आणि नुसता अभ्यास यापलीकडं जाऊन ती वैज्ञानिक खेळण्याच्या/खेळांच्या माध्यमातून शिकत राहतात.''

मुख्य म्हणजे ही "खेळणी' बनवायला खर्चही येत नाही. आगपेटीच्या काड्या, स्ट्रॉ, सुतळी अशा गोष्टींपासून ही खेळणी बनविता येतात. गुप्ता यांच्या साइटवर बघूनही मुलं खेळणी बनवू शकतात. प्रत्येक खेळण्यामागं एक शास्त्रीय संकल्पना असते. ती मुलांना उलगडत जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com