व्यक्तिमत्त्वाची मूलभूत वैशिष्ट्ये

शिवराज गोर्ले
गुरुवार, 6 जून 2019

व्यक्तिमत्त्व हे केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतं हे समजावून मुलांची स्वप्रतिमा अनुकूल होईल असा प्रयत्न करावा.

बालक-पालक
व्यक्तिमत्त्व विकासात भावनिक विकास ही महत्त्वाचा असतो. तो साधण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या व्यक्तिमत्त्वात जबाबदारीच्या जाणिवेबरोबरच इतर कोणती मूलभूत वैशिष्ट्यं ‘क्रो ॲट्रिब्यूट्‌स’ रुजविण्याचा प्रयत्न करावा, याबद्दल स्वचेतन संस्थेचे संचालक डॉ. रजत मित्रा यांनी दिलेल्या काही टिप्स-

व्यक्तिमत्त्व हे केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतं हे समजावून मुलांची स्वप्रतिमा अनुकूल होईल असा प्रयत्न करावा. इतरांशी तुलना करणं निरर्थक असते. स्वतःचं व्यक्तिमत्त्व आहे तसं ग्रेसफुली स्वीकारायला शिकवा. गिव्ह देम ऑब्जेक्‍टिव्ह ॲप्रेझल- मेक देम फील गुड!

राग, मत्सर, द्वेष, भीती या नकारात्मक भावना कशा हाताळाव्यात, त्यांचा योग्य रीतीनं निचरा करून मन मोकळं कसं करावं, हे मुलांना समजावून द्यावं. त्यांना मूडमास्टरी शिकवण्याचा प्रयत्न करावा.

वडीलधाऱ्यांचा आदर करावा, ही पारंपरिक शिकवण चुकीची नाही. पण ती अपुरी आहे. आता मुलं हे समजू लागली आहेत. पालकांनीही त्यांना समजून द्यायला हवं की आदर केवळ वयावर अवलंबून नसतो... व्यक्तीच्या गुणावगुणांवर, वर्तनावरही अवलंबून असतो. फक्त वयाचा नव्हे, तर चांगुलपणाचाही आदर करायला मुलांनी शिकायला हवं.

सतत काही नवं शिकणं, नवी कौशल्य आत्मसात करणं, विविध उपक्रमांत भाग घेणं, इतरांसाठी निरपेक्ष वृत्तीनं काही करणं- अशा जीवनाच्या विविध अंगांविषयी मुलांच्यामध्ये ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न पालकांनी करावा. त्याचबरोबर अपयश कसं पचवावं, याचंही मार्गदर्शन करावं.

नातेसंबंधांबाबतीत- कुणावर... कसा विश्‍वास ठेवावा, याबरोबरच जिथे/ज्यांच्याशी जमणं शक्‍य नाही असं जाणवलं तर कटुता निर्माण न करता दूर कसं व्हावं, याविषयी पालकांनी (स्वतःचे अनुभव व चुका याआधारे) मार्गदर्शन करायला हवं.

मुलं मोठी होत जातात, तसतसे त्यांच्यात शारीरिक बदल होत जातात. अनेक मानसिक व भावनिक आंदोलनांचा त्यांना सामना करावा लागतो. बदलत्या काळानुसार व वाढत्या वयानुसार स्वतःत काही बदल करावे लागतात. या काहीशा अवघड अशा संक्रमण अवस्थेत पालकांनी मुलांना धीर, दिलासा, मार्गदर्शन करणं आवश्‍यक असतं. 

प्रत्येक मुला-मुलीच्या आयुष्यात पहिली वेळ येत असते. ते प्रथमच परगावी जाणं असो, पहिलं भाषण असो की पहिलं प्रेम... या पहिलेपणात धाकधूक असतेच- पण अशावेळी थोडं धिटाईनं पुढं पाऊल टाकलं की सारं सुरळीत होऊ शकतं, याचाही धडा पालकांनी मुलांना द्यायला हवं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article By Shivraj Gorle The Basics of Personality