प्रश्‍न मुलांच्या भाषिक विकासाचा...

शिवराज गोर्ले
शुक्रवार, 15 मार्च 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
मराठी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं, तेव्हा नेमकं काय घडतं, हे समजून घ्यायचं तर प्रथम दोन्ही भाषांची वैशिष्ट्य व वेगळेपण समजून घ्यायला हवं. त्या संदर्भात प्रा. उमाकांत कामत यांचं विश्‍लेषण असं आहे : इंग्रजीत केवळ २६ मुळाक्षरं आहेत, ५ स्वर व २१ व्यंजनं. मराठीत १२ स्वर आहेत आणि ३४ व्यंजनं. मराठी उच्चार व लेखन यांत सारखेपणा, समरुपता आहे. इंग्रजीत स्पेलिंग आणि उच्चारात तशी समरुपता नाही. अ, आ, ऑ, ॲ, ए असे निरनिराळे उच्चार होतात. त्याबाबत नियमच सांगता येत नाहीत. प्रत्येक शब्दोच्चार व स्पेलिंग वेगळं असल्यामुळं पाठच करावं लागतं.

उच्चारण व लेखन यांतील समरुपतेबाबत तुलना केल्यास भाषाशास्त्रदृष्ट्या मराठी भाषा सरस आहे, तरीही आपण इंग्रजीला श्रेष्ठ मानतो! पण श्रेष्ठतेचा मुद्दा जाऊ दे, मुद्दा भिन्नतेचा आहे. मराठीच्या तुलनेत इंग्रजीचं ध्वनिप्रतीकात्मक रूप अत्यंत भिन्न आहे. केवळ शब्द भिन्न आहेत, असं नव्हे तर इंग्रजीत नामाची विभक्तीरूपं किंवा क्रियापदांची काळ/अर्थवाचक रूपं मराठीप्रमाणं होत नाहीत. मराठीत नामांच्या शब्दरूपांच्या अखेरच्या भागाबद्दल होतो, तर इंग्रजीत नामापूर्वी ‘प्रेपोझिशन’ येऊन अर्थात बदल होतो. परिणामी मराठी मुलांना इंग्रजीतलं ध्वनिरूप चौकट व प्रतीकात्मक पद्धती आत्मसात करताना अनेक अडचणी येतात. इंग्रजीची भाषारूप घडण मराठीहून भिन्न आहे. दोन विषयांमध्ये वा क्रियांमध्ये समान घटक जेवढे अधिक, तेवढ्या प्रमाणात एका विषयाचे अध्ययन (ज्ञान) दुसरा विषय शिकताना उपयोगी पडतं. याला शिक्षण-संक्रमण (ट्रान्स्फर ऑफ लर्निंग) म्हणतात. दोन विषयांमध्ये विसंगती, विरोध, तीव्र भिन्नता असल्यास दुसरा विषय शिकताना अडथळे निर्माण होतात. नेमकं हेच इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या बहुसंख्य मुलांच्या बाबतीत घडत असतं.

भाषा का शिकायची असते? तर स्वतःला व्यक्त करण्याची, विषय समजून घेण्याची शक्ती विकसित होण्यासाठी. परंतु, सर्वस्वी परकीय भाषा शिक्षणाचं माध्यम होतं, तेव्हा मुलांची आकलनाची व अभिव्यक्तीची शक्ती कुंठित होते. त्यांना अधिक प्रयत्न करावे लागतात. मग जादा शिकवणी, त्याची फी, खेळण्याचा वेळही जादा अभ्यासासाठी... एवढा सारा ताण सोसूनही अनेकदा मुलांची अपेक्षित प्रगती होत नाही. कारण अनेक मुलांची भाषिक क्षमताच मर्यादित असते. फक्त मोजक्‍या विशेष बुद्धिमान मुलांचा अपवाद सोडल्यास बाकी मुलं भाषिक विकासात थोडी मागेच राहतात. म्हणूनच मातृभाषेतून पुरेसा विकास झाल्याशिवाय इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून सर्वसामान्य मुलांना शिक्षण देणं शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे.

Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today