मुलं मराठी! माध्यम इंग्रजी!!

शिवराज गोर्ले
शनिवार, 16 मार्च 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
इंग्रजी माध्यम आणि मराठी मुलं यांच्या संदर्भातही ही काही निरीक्षणं ‘घरी, दारी, बाजारी आपण ज्या भाषेत बोलतो; त्या भाषेत शिक्षण घ्यायचं नसतं,’ असं आपण भारतीय मानतो! गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी या लोकांसाठी ‘मूढ’ शब्द वापरला होता.

जगाची लोकसंख्या २००० मध्ये साडेसात अब्ज (७५० कोटी) होती. त्यापैकी सुमारे ५ अब्ज लोकांना इंग्रजी भाषा येत नव्हती. त्यांनी इंग्रजी भाषा माध्यम म्हणून वापरली नाही. त्यात प्रगत देशही मोडत होते. त्यांनी आपापल्या मातृभाषेतच शिक्षण घेतले. त्यातील जर्मनी या देशाने नवनवीन ज्ञान निर्माण केले. नोबेल पारितोषिकाचे बरेच मानकरी अशा देशांतून निर्माण झाले. भारतातील मूलभूत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांची शालेय शिक्षणाची भाषा ही त्यांची मातृभाषाच होती. प्रसिद्ध गणिती रामनुजन यांना तर आधी इंग्रजी येतच नव्हतं!

‘‘एका गांधीवादी म्हणवून घेणाऱ्या शाळेमध्ये मी भेट देण्यास गेलो. तेथील बालवाडीमध्ये (सॉरी! के.जी.) तीन-चार वर्षांच्या मुलांना इंग्रजीतून शिकविण्यात येत होते. ‘पप्पू, ब्रिंग द बॉल! अरे, ब्रिंग म्हणते ना!!’’ असं चेंडू दूर फेकून शिक्षिका म्हणत होत्या. मी म्हटलं, ‘‘आपण अशा रीतीनं तर कुत्र्यास शिकवितो!’’ ‘‘होय, कारण आपली अशी पक्की समजूत आहे, की कुत्र्यांना इंग्रजीच समजते! धन्य तो गोरा साहेब! जिथं असंल तिथं तो खदखदून हसत असेल!’’
- विद्याधर अमृते

‘‘काही इंग्रजी शाळांमध्ये मुलांना मराठी बोलण्यावर बंदी असते. आपला मेंदू एकाच वेळी अनेक भाषा शिकू शकतो, त्यामुळं अशी बंदी घालणं चुकीचं आहे. मुलांची मातृभाषा, घर भाषा पक्की असते. त्यात सवयीनं उत्स्फूर्तपणे बोलता येतं. त्यावर बंदी घालणं म्हणजे मुलांच्या विचारक्षमतेवर व संवाद कौशल्यावर टाच आणणं होय. विचार खुंटल्यामुळं इंग्रजी माध्यमात शिकणारी बहुसंख्य मराठी मुलं मागं पडत आहेत. त्यांना कोणतीच भाषा धड येत नाही. भाषाच खुंटली तर मुलं कोणत्याच भाषेतून कोणताच विषय धडपणे लिहू शकत नाहीत. मुलांवर पालकांचं दडपण वाढतच आहे.’’
- डॉ. श्रुती पानसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today