काय असतं पालकत्व? (शिवराज गोर्ले)

शिवराज गोर्ले
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे' मधील 'EDU' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
आजची मुलं कुठल्या वातावरणात वाढताहेत? आई-बाबा कामांवर जाणार, मुलं सतत ‘इतरां’सोबत असणार, प्रेमाचा, आपलेपणाचा जो अनुभव त्यांना मिळायला हवा आहे, तो कसा मिळणार? त्यातून आजच्या मुलांची दिनचर्या, हाही प्रश्‍नच.

मुलांना सकाळी सात-साडेसातला स्कूल बसमध्ये बसवावे लागते. शाळेतून आल्यावर पाळणाघर किंवा काही क्‍लासेस. म्हणजे तेसुद्धा संध्याकाळी उशिरापर्यंत बाहेरच. अधूनमधून या क्‍लासमधून त्या क्‍लासमध्ये सोडण्यासाठी आई भेटली, तरी दोघांतील संवाद काही जिव्हाळ्याचे नसतातच. उशीर का झाला हा प्रश्‍न किंवा मग सारख्या चुका दाखवणं, त्रागा, उद्याचा अभ्यास या भोवतीच सारे संवाद. या वातावरणात मुलं वाढली तरी त्यांना जीवनाची कोणती मूल्यं, तत्त्व समजणार, उमजणार. आज पालक नकळतपणे मुलांना कोणती मूल्यं देताहेत?

      कुणावर पटकन विश्‍वास टाकू नये.
      उगीच कुणाशी जवळीक वाढवू नये.
      लोकांना अंतरावरच ठेवावं.
      गरज पडल्यास आपणसुद्धा दोन सुनवाव्यात.

यातून मुलं कशी घडताहेत? काय घेताहेत? ती उद्या पालक भूमिकेत, हेच ‘पालकत्व’ शिकून अमलात आणणार आहेत...

काय असतं पालकत्व? पालकत्व म्हणजे खूप काळजीपूर्वक मुलांचं व्यक्तिमत्त्व घडवणं असतं. प्रत्येक मुलाची त्याची-त्याची एक नैसर्गिकता असते, त्यानुसार त्याची वाढ होणार असते. पालकांनी आपल्या मुलाची ही नैसर्गिकता ओळखणं गरजेचं. त्यानंतरही त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला वेगवेगळ्या आधारांची गरज असते... ती गरज अचूक ओळखणं आणि त्याला हवा तो आधार त्या-त्या वेळी पुरवणं. मुलाच्या शारीरिक विकासाच्या टप्प्यांप्रमाणेच भावनिक विकासाचे व बुद्धिमत्ता विकासाचे टप्पे असतात. लहानपणी शरीरावर अवास्तव जोर पडल्यास अवयवात दोष, व्यंग निर्माण होऊ शकतं. अगदी तसंच भावनिक व बौद्धिक न्यून निर्माण होऊ शकतं. ती शारीरिक न्यूनाप्रमाणं ‘दिसली’ नाहीत, तरी परिणाम स्वरूपात नक्कीच दिसू शकतात. डोळसपणे पाहिल्यास आपल्या आजूबाजूच्या मुलांवरचे असे परिणाम आणि त्यातून सुजाण पालकत्वाची गरजही स्पष्ट जाणवू शकेल.

Web Title: Article By Shivraj Gorle in EDU Supplement of Sakal Pune Today