स्पर्धा कशा असाव्यात?

Competition
Competition

बालक-पालक
आजचं युग स्पर्धेचं आहे. स्पर्धा टाळता येत नाही; म्हणूनच तिला सामोरं कसं जावं हे मुलांना कळायला हवं. खरं तर शाळकरी मुलांमध्ये स्पर्धा नसावी, असंही म्हटलं जातं. तरीही मुलांच्या स्पर्धा घ्यायच्याच झाल्यास त्या कशा असाव्यात, याविषयी दिशादर्शन करताना मीना चंदावरकर म्हणतात, ‘‘स्पर्धेमुळे मुलांना वैफल्यग्रस्त, निराश करण्याऐवजी मुलांना स्पर्धेविषयी एक खणखणीत, टिकाऊ आणि बळकट मानसिकता द्यायला हवी. मात्र, त्यासाठी शिक्षक व पालक प्रथम सहृदय असले पाहिजेत. अतिमहत्त्वाकांक्षी नसावेत.’’

स्पर्धेमुळे राग, मत्सर आणि द्वेषापर्यंतची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अविचारी आणि अविवेकी स्पर्धांमुळे मुलांचा आत्मविश्‍वास डळमळीत होतो. न्यूनगंड आणि नंतर बेफिकिरी येऊ शकते. ज्या वयात निर्धास्तपणे खेळायचं, बागडायचं त्या वयात पालक, शिक्षक, कोच मुलांना स्पर्धेत ढकलतात. तरीसुद्धा ही अनिवार्य स्पर्धा स्वीकारल्यानं काही फायदेही होतात.

दुसऱ्याचं कौतुक करण्याची वृत्ती, गुणग्राहकता वाढू शकते. चारचौघांत असल्यामुळे आपल्या क्षमतांचा वास्तव अंदाज येऊन स्व-परीक्षणाची सवय लागते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नियम पाळण्याची सवय लागते. स्पर्धांच्या माध्यमातून निर्णयक्षमता, संघटित वृत्ती, नेतृत्वगुण आणि खिलाडूपणा मुलांच्या अंगी बाणवता येतात.

हे गुण वाढीस लागतील अशाच स्पर्धा शाळांमधून घ्यायला हव्यात. जिंकणाऱ्याचं वारेमाप कौतुक आणि हरणाऱ्याची हेटाळणी हे थांबवल्यास मुलांना स्पर्धा इतर उत्सवांसारख्या आनंददायी वाटतील. छोटं-मोठं यश म्हणजे प्रचंड विजय नव्हे आणि अपयश म्हणजे अपराध नव्हे, हे मुलांना समजवायला हवं. बालवाडीत स्पर्धांऐवजी उत्सवच करावेत. त्यांना स्पर्धा म्हणजे गंमतच वाटायला हवी. लुटुपुटीच्या स्पर्धा घेतल्याच तरी सगळे जिंकले, असं जाहीर करायला विसरू नये.

मोठ्या मुलांच्या स्पर्धांमध्ये मुलाला हे कळलं पाहिजे, की दुसरी दोन्ही मुलं माझ्यापेक्षा जास्त वेगानं धावली म्हणून माझा तिसरा नंबर आला. असे वाईट वाटो, पण ती गोष्ट समजावून घेता आली पाहिजे. शिक्षक पालकांनी ती समजावून दिली पाहिजे. आपण हरलो याचं वाईट वाटलं, तरी मुलांना मित्र-मैत्रिणी जिंकले याचाही आनंद होत असतोच. म्हणूनच स्पर्धांनंतर मुलांशी काय व कसं बोललं जातं, हे महत्त्वाचं ठरतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com