अरे अभ्यास अभ्यास...

शिवराज गोर्ले
बुधवार, 10 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
शिकणं ही प्रक्रियाच मुळात शिकणारा आणि शिकवणारा या दोघांच्या परस्परसंबंधावर अवलंबून असते. एकमेकांबद्दल प्रेम, आस्था, भावबंध नसल्यास ही प्रक्रिया केवळ उपचारच ठरतो. शाळेत तसं होऊ शकतं, पण घरात? पालक आणि मुलांत तर भावबंध असतातच. शिवाय मुलांमध्ये शिकण्याची उपजत प्रवृत्ती असते. तरीही योग्य वातावरण नसल्यास मुलांमधल्या नैसर्गिक ऊर्मी मारल्या जातात. मुलांना जितकं हसत-खेळत शिकवता येईल तितकं शिकवावं हे खरंच, पण शेवटी अभ्यास आणि परीक्षा या दोन्ही गोष्टी (आजच्या शिक्षणपद्धतीत) अपरिहार्य असतात. मुलांना भरपूर खेळायचं असतं, पण शाळेत शिक्षक आणि घरात पालक अभ्यास करून घेऊ लागले, की मुलांना आवडत नाही. मग पालक रागावू लागतात. हे टाळायचं असल्यास मुलांचा आणि पालकांचाही अभ्यासाबद्दल योग्य दृष्टिकोन असणं हे सर्वांत महत्त्वाचं. हा ‘योग्य दृष्टिकोन’ कोणता हे स्पष्ट करताना डॉ. रमा मराठे म्हणतात, ‘‘अभ्यासाचा स्वीकार ही यातली पहिली बाब. अभ्यासाकडं ओझं म्हणून पाहणं, पालकांनीही मुलांचा अभ्यास ही कटकट मानणं यांतून अभ्यासाबद्दल अढीच निर्माण होते. अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यास, ही कल्पना पालकांच्या डोक्‍यात नसावी आणि मुलांच्याही. शिकणं, आत्मसात करणं, सराव करणं, लक्षात ठेवणं हे सारं अभ्यासात येतं... आणि असा अभ्यास हा फक्त शालेय जीवनाचा नव्हे, तर एकूण जीवनाचा एक भाग असतो, हे मुलांच्या मनी ठसायला हवं. अभ्यासाचे वेगवेगळे विषय... त्यांचं आकलन, त्यांचं ज्ञान हे जीवनात कसं उपयुक्त ठरतं याची मुलांना कल्पना द्यायला हवी. त्यातूनच अभ्यासाची इच्छा व आवड निर्माण करायला हवी. शालेय अभ्यास हा अशा अभ्यासाचा फक्त एक भाग आहे, याचं सतत भान हवं.

पण मुळात मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो, त्याचं काय? प्रश्‍न कळीचा आहे, पण त्यासंदर्भात डॉ. नियती चितालिया म्हणतात, ‘‘मुलांना अभ्यासाचा कंटाळा येणं हे नैसर्गिकच म्हणावं लागंल. मुलांना काही बोलण्यापूर्वी पालकांनी स्वतःचं बालपण आठवावं म्हणजे अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो, हे आठवेल. आणि काही वेळा अभ्यासात आपण रमून जात असू, हेही आठवेल. मग कदाचित मुलांचा अभ्यास कसा घ्यायला हवा, हेही उमगू शकेल.

Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today